Get it on Google Play
Download on the App Store

सहावी नोंद

सहावी नोंद

डायरी, तारीख २८ मे१९९१ ,

चौथादिवस

सकाळी  ६.३० वाजता

रात्रभर मी या अवस्थेत कशी पडून आहे तेच समजत नाहीये. कालचा दिवस  कदाचित आता पर्यंतचा सर्वात वाईट दिवस होता. ज्युली कामावर आली नाही, त्यामुळे मला स्वत: स्वयंपाक करणे भाग पडले, कालच्या त्या घटनेनंतर माझी तब्येत खूप खराब झाली होती, त्यामुळे  मी शाळेतही जाऊ शकले नाही, मी रात्रभर वाळलेल्या पानाप्रमाणे थरथर कापत होते. डोळे कधी उघडले ते कळले नाही, पण दुपारचे बारा वाजले होते. सकाळी दार वाजवून ज्युली गेली असावी.

मी दुपारी दार उघडले तेव्हा दारात एक पिशवी ठेवली होती, त्यात आणलेले मांस जवळजवळ खराब होऊ लागले होते. मी ते आत घेतले आणि शिजवले, ज्युली जिथे ठेवते तिथे ठेवले आणि आंघोळीला गेले.

पण मी आंघोळ करून परत आले तेव्हा माझ्या पलंगावर कोणीतरी ते शिजवलेले मांस तुकडे करून पसरून  टाकले होते. पलंगाच्या गादीलाही धारदार वस्तूने उचकटून ठेवले होते. आणि  लाकडी भिंतीवर चाकूने कोरून लिहिलेले आहे

“deef em ekam lliw htaed ruoy”

हे सर्व बघून मला आता इथे थांबण्याची हिम्मतच झाली नाही, मी सामान बांधून दाराबाहेर पडणारच होते, तेवढ्यात दरवाजाजवळ खुर्चीवर बसलेली एक बाई दाराकडे बघत असलेली दिसली. माझे पाय जिथल्या तिथेच गोठले, हातातून सर्व वस्तू खाली पडल्या, वस्तू पडण्याच्या आवाजानेही त्या बाईला काही फरक पडला नाही आणि ती भिंतीकडे मूकपणे बघत राहिली.

क्षणार्धात तिचा थंड आवाज घुमला

“!ereh morf evael t’nac uoy….noos htaed ot dael lliw uoy”

असं म्हणत ती अचानक वळली आणि तिचा चेहरा पाहताच मी बेशुद्ध पडले. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून माझी मैत्रीण शर्लीच होती. मात्र हा आवाज आणि भाषा तिच्या आवाजाशी आणि बोलण्याच्या लकबीशी अजिबात जुळत नव्हती. तिच्या त्या भयाण चेहऱ्यावर दोन लाल डोळे भयंकरपणे माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी काही क्षणानंतर बेशुद्ध पडले.

त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दार ठोठावल्याने माझी शुद्ध परत आली. मी उठले तेव्हा मला दिसले की दाराजवळ कोणीही नव्हते. हृदयाची धडधड पुन्हा एकदा वाढली. आता दारात कोण असेल कोण जाणे? मी हिम्मत करून दार उघडले तेव्हा जीवात जीव आला, दारात ज्युली उभी होती.

"ताई तुम्ही ठीक आहात ना? मी सकाळीही दार वाजवले होते पण कोणीच दार उघडले नाही. तुमच्या सोबत काही अनुचित प्रकार घडला कि काय म्हणून मला भीती वाटली, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला पुन्हा आले आहे."

पण आत येताच ज्युलीने हे सगळं भयंकर दृश्य पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती लगबगीने निघाली...धावत खाली गेली आणि जायच्या आधी मला म्हणाली,

“ताई, मी मांस आणायला जाते आहे, कदाचित सकाळी त्याला वेळेवर मांस मिळाले नाही, म्हणूनच त्याने हि सर्व नासधूस केली आहे, आणि जर त्याला त्याच्या मनासारखे अन्न मिळाले नाही तर कदाचित तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. .”

"प..पण माझं ऐक ज्युली, मी पण येते तुझ्याबरोबर..."

माझं बोलणं संपण्याआधीच ज्युली धावत मार्केटच्या दिशेने गेली होती. मी जवळ जवळ तासभर तिची आतुरतेने वाट पाहत होतो. क्षणभर वाटलं की ती आता परत येणार सुद्धा नाही, हे सगळं बघून ती घाबरून पळून गेली आहे.

मी पुन्हा एकदा सामान बांधले आणि तिथून निघून जाण्यासाठी दरवाजा उघडू लागले, पण खूप प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही. मला कोणाचे तरी भयंकर कुत्सित आणि दुष्ट हसू ऐकू येत होते.

या घटनेने मला फक्त भीतीच वाटली नाही तर शर्ली कोणत्याही रुपात तिथे असणं ही माझ्यासाठी खूपच अस्वस्थ करणारी गोष्ट होती. मी दारातून आत जाऊन भिंतीला टेकून या कॉटेज रूपातल्या  तुरुंगाकडे बघत बघत खाली कोसळले. तेवढ्यात बाहेरून कोणीतरी दरवाजा उघडून आत शिरले. ती दुसरी कोणी नसून ज्युली होती.

"ताई, तुम्ही तर आत आहात, मग हा दरवाजा बाहेरून कोणी लावला?"

ज्युलीने घाबरून विचारले.

"म...मला काहीच माहीत नाही ज्युली, मला इथून पळून जायचे आहे, आता तू दार उघडले आहेस तर मला जाऊ दे.."

"तुम्ही जाऊ नका ताई, मी इथे एकटी राहू शकणार नाही, कारण आज जे काही घडले ते आधी कधीच घडले नाही, मग तो उन्हाळा असो वा हिवाळा, पावसाळा असो हे मांस शिजतेच आणि वर पोहोचतेच."

"खरतरं आजही उशीर झाला नव्हता ज्युली, मी लवकर स्वयंपाक केला होता म्हणून.... पण मला वाटलं तू तर फक्त रात्रीच स्वयंपाक करायचीस, मी तर दिवसाच तयार ठेवला होता."

"पण बाहेर ठेवलेलं मांस सडलं होतं, ताई, मी सकाळी सात वाजता आले होते आणि तुम्ही खूप उशिरा ते आत नेलं असावं."

"हो ज्युली, मी दुपारी बारा वाजून गेल्यावर उचलले."

"म्हणूनच ताई, ते सडून गेले असावे. पाच तास बाहेर राहिल्यामुळे ते सडून गेले असावे "

"ते सगळं ठीक आहे ज्युली, पण रोज असं मांस शिजवून वर का ठेवायचं, आणि कुणासाठी?"

"ताई, मी याबद्दल काहीही बोलू शकत नाही."

"तुला काही सांगता येत नसेल, तर मी सांगते ते ऐक... ज्युली, काल रात्री मी या कॉटेजचे गुपित पाहिले आहे, इतके भयंकर रहस्य तू आजपर्यंत जगापासून लपवून ठेवले आहेस, पण दोन दिवसांपूर्वी मी जेव्हा इथे आले तेव्हा मग तू मला याबद्दल का सांगितले नाहीस?"

पण ज्युलीने पूर्वीप्रमाणेच मौन बाळगले.

"ठीक आहे ज्युली तुला हे बोलायचं नसेल तर नको बोलूस, मी पण माझे समान उचलते आणि निघून जाते इथून."

"नाही. नाही ताई, असं करू नका, मला सोडून जाऊ नका, आज इथे काय होणार आहे ते मला माहीत नाही, पण मला एक गोष्ट माहीत आहे, की तुम्हाला जे कळलं ते कळल्यावर तुम्ही इथून कुठेही जाऊ शकणार नाही."

"मला काही प्रमाणात लक्षात येतय ज्युली, तू गेल्यावर जेव्हा तो दरवाजा बाहेरून आपोआप बंद झाला तेव्हाच मला समजले की इथून बाहेर पडणे जवळ जवळ अशक्य आहे....."

"ताई, हा बंगला मार्सेलो कोस्टा या पोर्तुगीज अधिकाऱ्याचा होता, मार्सेलो हा नावापुरताच माणूस म्हणायला हवा, त्याच्या मनात भारतीय लोकांबद्दल इतका द्वेष होता की त्यांना फक्त मृत्यू देऊन शांतता त्याला कधी मिळाली नाही. तो लोकांना वेगवेगळ्या वेदनादायक मार्गाने मरण द्यायचा, पकडलेल्या व्यक्तीची चूक आहे की नाही याची एवढी चौकशी करणे आणि मग शिक्षा देणे हे साधे नियम सुद्धा तो पाळत नसे, कोणत्याही भारतीयाला मारून तो असुरी आनंद मिळवायचा.

या सवयीमुळे त्याने एकदा एका अतिशय सुंदर मुलीला कैद केले आणि तिला विविध प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली, तिला त्रास देऊनही त्याची विकृत भूक शमली नाही, तेव्हा तो तिला एका खोलीत बांधून ठेवत असे आणि दररोज तिच्या शरीराचे थोडेथोडे तुकडे काढून  खात असे.. असे ६-७ दिवस चालू राहिले आणि एक दिवस वेदना सहन करून करून ती  बिचारी तिथेच मरण पावली.

पण त्यानंतर मार्सेलोला मानवी मांसाची चटकच लागली, त्याने भारतीय लोकांना कोणत्या न कोणत्या बहाण्याने कैद केले आणि त्यांना जिवंत ठेवले आणि कधी कधी त्यांची हत्या करून त्यांचे मांस खाण्यास सुरुवात केली. आणि असे म्हणतात की मानवी मांस खाल्ल्याने त्याला अनेक प्रकारच्या राक्षसी शक्ती प्राप्त झाल्या आणि माणसाऐवजी तो वेंडीगो बनला.”

" वेंडीगो? म्हणजे काय , ज्युली?"

"वेन्डिगो म्हणजे तो एक सैतान आहे जो अर्धा मानव आणि अर्धा सैतान आहे, त्याला बाण, तलवार किंवा बंदुकीने मारता येत नाही. जर तो फक्त जाळून नष्ट केला जाऊ शकतो आणि  त्याला मानवी रक्ताची अपरिमित भूक असते. तो कोणत्याही मानवी आवाजात किंवा भाषेत बोलू शकतो, तो लोकांना लबाडीने त्यांच्या ओळखीच्या आवाजात मागून हाक मारतो आणि जेव्हा ते थांबतात किंवा वळतात तेव्हा त्यांची तो शिकार करतो, जो वर साखळदंडाने बांधलेला आहे तो एक वेंडीगो आहे."

"पण मग वरून कोणाचा आरडाओरडा ऐकू येतो?"

"ताई, शर्ली ताईचे ग्रेट ग्रांडपा कॅप्टन पीटर फर्नांडीस यांना मार्सेलो कोस्टाचे हे हेतू कळले होते. १९५५-५६ चा काळ असेल. तेव्हा गोवा भारताचा भाग नव्हता. इकडे पोर्तुगीजांचे राज्य होते. एका रात्री मार्सेलोने आमच्या पूर्वजांपैकी एकाला खोटे आरोप करून पकडले आणि त्यांना तो ठार मारणार होता. त्याला फर्नांडीस यांनी तसे करण्यापासून रोखले. त्या क्षणी मार्सेलो आपले रहस्य उघड होईल या भीतीने गप्प बसला, पण त्याची मानवी मांसाची भूक चाळवली होती. कॅप्टन त्या रात्री इथेच राहिले होते. सर्व नोकर आणि मार्सेलो सोडून बाकीचे लोक निघून गेल्यावर विचार करू लागले  की भारत सरकारला मार्सेलो बद्दल कसे सांगायचे? मार्सेलोचे त्या वेळच्या केंद्रीय राजकारण्यांशी चांगले संबध होते आणि त्याची पोहोच दिल्लीपर्यंत होती …

असा विचार करत असतानाच खुर्चीवर बसून त्यांचा डोळा लागला आणि तेवढ्यात मार्सेलोने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या झटापटीत, फर्नांडीस यांनी मार्सेलोवर गोळीबार केला, त्यानंतर त्यांनी जखमी मार्सेलोचा मृतदेह वरच्या मजल्यावरील खोलीत ठेवला. वरच्या मजल्यावर कैद्यांसाठी खोली होती जिथे कैद्यांना ठेवले जात होते आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. मोठ्या कष्टाने एकट्याने त्यांनी त्या प्रेताला वरच्या खोलीपर्यंत पोहोचवले आणि ते जरा खुर्चीत बसले होते इतक्यात मार्सेलोचे प्रेत पुन्हा जिवंत झाले आणि त्याने कॅप्टनवर हल्ला केला. त्यानंतर फर्नांडीस यांनी पुन्हा काही गोळ्या झाडल्या आणि मार्सेलो पुन्हा बेशुद्ध पडला पण वेंडीगो बनलेल्या मार्सेलोच्या या हल्ल्याने कॅप्टन गंभीर जखमी झाले होते.”

ते कसेबसे स्वत:ला ओढत ओढत हॉलमध्ये पोहोचले आणि बेशुद्ध पडले, सकाळी नोकर आल्यानंतर त्यांचे डोळे उघडले पण तोपर्यंत त्यांची परिस्थिती वाईट झाली होती, जखमी अवस्थेत त्यांनी नोकरांना सगळा प्रकार सांगितला आणि म्हणले हा माझा संदेश भारत सरकारला द्या आणि सांगा की मृत्यूनंतरही माझा आत्मा मार्सेलोला नियंत्रणात ठेवेल आणि हा वेंडीगो संपेपर्यंत मी दुसऱ्या जगात जाणार नाही.

ज्या पूर्वजांचे प्राण त्यांनी वाचवले त्यांच्या कडून कॅप्टन यांनी वचन घेतले होते की, येणाऱ्या काळात जोपर्यंत या सैतानचा नायनाट होत नाही, तोपर्यंत आमच्या भावी पिढ्या हे गुपित ठेवतील आणि रोज कुठूनतरी मांसाची व्यवस्था करतील. अवघ्या तीन पिढ्यानपासून आम्ही शर्ली दीदींच्या कुटुंबात सामील झालो आहोत आणि हे वाईट प्रकरण कधी संपेल याची वाट पाहत आहोत.

"पण हे सगळं शर्लीने मला आधी का नाही सांगितलं?"

"हे तिने तुम्हाला सांगितलं असतं तर तूमही इथे थोडीच आला असता."

"म्हणजे?"

"याचा अर्थ असा आहे की या सैतानाने मानवी मांस खाल्ल्याला एक आठवडा झाला आहे. दर महिन्याला दीदी एखाद्या बहाण्याने काही माणसांना इथे पाठवते, संपूर्ण महिना कॅप्टनचा आत्मा वेंडीगोला धाकात ठेवून बीफ, पोर्क, चिकन, फिश असे प्राण्यांचे मांस खाऊ घालतो, पण त्याचा वेडेपणा आणि आक्रमकता खूप जास्त वाढू नये म्हणून त्याला महिन्यातून एकदा मानवी मांसाची व्यवस्था करावी लागते. आणि चाऱ्याला मी चारा होणार आहे हे माहीत असेल, तर तो चारा बनायला येईल तरी का?, तू पळून जाण्याच्या विचारात आहेस असे वाटल्यावर मीच बाहेरून दार बंद केले होते, हे तुला माहीत आहे का? "

मी माझ्या खोलीत जमिनीवर पडले आहे. डायरी बाजूलाच होती म्हणून लिहिले..... पण अजून लिहायची माझ्यात ताकद नाहीये.....माझी शुद्ध हरपत आहे. प्रचंड वेदना होत आहेत... आई गं. . .. .