तिसरी नोंद
डायरी, तारीख २६ मे १९९१
दुसरा दिवस
वेळ रात्री ८.०० वाजता
आज सकाळी मी शाळेत रुजू झाले आहे, आनंद शेअर करण्यासाठी कोणीच नाही, म्हणून मी तो माझ्या डायरीच्या लेखनात व्यक्त करून दाखवत आहे. घरी आल्यावर काहीच बरे वाटत नव्हते, कसतरीच होत होतं. कालच्या घटनेचा विचार करून मी घाबरले. मी ज्युलीला याबाबत सांगितले त्यावर ती म्हणाली ताई, एखादी मांजर बिंजर असेल, खिडकीतून आत शिरली असेल आणि तुमची चाहुल लागताच पळून गेली असेल. तुम्ही विनाकारण काळजी करत आहात.
हे ऐकून काही प्रमाणात मला तिचे पटले, पण तरीही ज्युलीने आज मला सोडून जावे असे मला वाटत नव्हते, मी शर्लीला पण दिवसा फोन केला होता पण ती घरी नव्हती त्यामुळे मी तिच्याशी बोलू शकले नाही.
मी कितीतरी वेळा विनंती करूनही ज्युलीने रात्री माझ्यासोबत राहण्यास नकार दिला, आजही ती फक्त जेवण बनवून घरी निघून गेली होती, पण अंधार पडल्यानंतर मला कुठल्यातरी अज्ञात भीतीने पछाडले आहे. आजही मला तेच वाटत आहे की या चार भिंतीत मी एकटी नाही. कोणीतरी आहे जो क्षणोक्षणी मला पाहत आहे. बरं आता रात्र झाली, मी जेवते, जेवण झाल्यावर काहीतरी लिहीन.