७ घटस्फोट होणार का
(ही गोष्ट काल्पनिक आहे जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
अनिल व रेवा यांचे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती .सुरुवातीला सर्व काही ठीक चालले होते. परंतु हल्ली सर्व काही ठीक नाही असे संकेत दोघांच्या बोलण्यातून वागणुकीतून मिळत होते. रेवाची अनिलबद्दल सारखी धुसफूस चाललेली असे.पूर्वी अनिलचे मनमोकळेपणाने कौतुक करताना न थकणारी रेवा, आता एक गप्पतरी बसू लागली होती किंवा तोंड उघडले तर ती त्याच्यावर टीका करीत होती .त्याचे दोष दाखवत होती . हल्ली अनिल रेवाच्या वाटेला जवळजवळ येत नाहीसा झाला होता.याचे कारण त्याचे अनेक ग्रुपशी असलेले संबंध होय. त्याचे व्यवसायाशी संबंधित व व्यवसायाबाहेरील असे अनेक ग्रुप होते.
शाळेतील मित्रांचा एक ग्रुप.
कट्ट्यावरील मित्रांचा दुसरा ग्रुप .
कॉलेजमधील मित्रांचा तिसरा ग्रुप.
तो ज्या व्यवसायात होता त्या व्यावसायिकांचा चौथा ग्रुप.
व्यवसायातील जे लोक त्याला जास्त प्रिय होते त्यांचा पाचवा ग्रुप.
मित्रांमधील जे "भीशि"शी संलग्न होते अश्यांचा आणखी एक सहावा ग्रुप .
त्याला अभिनयाची आवड होती त्याशी संबंधित अश्या नवोदित नटांचा आणखी एक ग्रुप होता .
या निरनिराळया ग्रुपच्या कधी साप्ताहिक कधी पाक्षिक कधी मासिक अशा मिटिंग होत .
या मिटिंग्स नेहमी रात्री असत.दिवसा प्रत्येकजण आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायात मग्न असे.त्यांना रिकामा वेळ रात्री मिळत असे.साधारण आठ साडेआठ ते साडेअकरापर्यंत या मीटिंग्ज चालत.तिथे अर्थातच जेवणाची व्यवस्था असे.खाण्याबरोबर थोडेबहुत पिणेही आलेच.
आठवड्यातून दोन तीन दिवस अनिल घरात रात्रीचा जेवायला नसे.रेवाला एकटेच जेवावे लागे.पुस्तक टीव्ही सोशल मीडिया कुठेना कुठे रेवा आपला वेळ घालवीत असे.संध्याकाळी अनिल घरी आला की लगेच फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर कुठल्या ना कुठल्या मिटिंगला जात असे.
दोघांमधील संवाद मनमोकळे बोलणे हळूहळू हरवत चालले होते.
रेवानेही हळूहळू आपले ग्रुप जमवायला सुरुवात केली.शाळा कॉलेज नोकरी अशा निरनिराळ्या ठिकाणच्या मैत्रिणी गोळा करून त्या एकत्र येऊ लागल्या.त्याही हॉटेलात जाऊ लागल्या .दोघे एकत्र राहात होती परंतु त्या एकत्र राहण्याला विशेष अर्थ नव्हता.
प्रत्येकाने केव्हाही उठावे कुठेही बाहेर जावे .केव्हाही परत यावे.असा सगळा मामला सुरू झाला .कौटुंबिक जीवन म्हणून विशेष काही शिल्लक राहिले नाही .
दोघांचीही बाहेर जाण्यावरून सारखी भांडणे होऊ लागली.अनिल स्वतः मात्र बाहेर जात असे परंतु रेवाने सारखे सारखे बाहेर जाणे त्याला आवडत नसे.तो स्वतःच सारखा बाहेर जात असल्यामुळे तो तिला नाही म्हणू शकत नसे.आजच्या स्त्री स्वातंत्र्याच्या काळात तिने ते ऐकूनही घेतले नसते. त्याने तिच्या बाहेर जाण्याचा विषय काढला की तीही लगेच त्याचे बाहेर जाणे आणि बाहेर पिणे काढीत असे .अरेस कारे,ठोश्यास ठोसा, हल्ला व प्रतिहल्ला, असे सारखे चालले होते
अनिलचे पिणे हळूहळू वाढू लागले.प्रथम एखादा अर्धा पेग घेणारा अनिल आता तीन चार पेग सहज घेऊ लागला.रेवाला दारूचा वास मुळीच सहन होत नसे.बाहेर जाण्यावरून व पिण्यावरून दोघांची रोज खडाष्टके उडू लागली.बाहेरून पिऊन आल्यानंतर अनिल जरा जास्तच रंगात येत असे .तो प्यायलेला असताना रेवाला त्याचे जवळ येणेसुद्धा नकोसे वाटे.दारूचा वास तिला सहन होत नसे .दारू पिणाऱ्याबद्दल एक प्रकारची घृणा तिच्या मनात खोलवर रुजलेली होती .
समजून सांगूनसुद्धा अनिलमध्ये सुधारणा होण्याचे लक्षण दिसत नव्हते.त्याचे मित्र त्याचे ग्रुप यामध्ये तो हळूहळू वहात जात होता.
दारू सिगारेट गुटखा यासारख्या सहजासहजी न सुटणार्या सवयी,अश्या व्यसनांच्या आहारी मनुष्य केव्हा जातो ते त्याचे त्यालाही कळत नाही. अश्यावेळी बऱ्याच वेळा परतीचा रस्ता इच्छा असूनही सापडत नाही.
केव्हा केव्हा एखाद्याला काही विचित्र सवयी असतात .अंग करा करा खाजवणे ,चारचौघांदेखत किंवा एरवीही उघडेबंब बसणे ,उगीचच पचापचा थुंकणे ,रात्री झोपताना स्वच्छ तोंड न धुणे,जेवतांना मचमच आवाज करणे,नखे वेळच्या वेळी न कापणे ,व्यवस्थित अंघोळ न करणे ,निष्कारण फार मोठ्याने बोलणे ,आपल्याकडे आलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करणे ,पाहुण्यांवर, आलेल्या माणसावर उगीचच टीका करणे,आलेल्या माणसाला अपमानास्पद वागणूक देणे ,इ. जोडीदाराला त्या सवयी सहन होत नाहीत.
पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.अशी स्पर्धा असे जशास तसे नसावे .
अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
अश्यावेळी परस्परांशी मोकळेपणाने बोलणे अत्यावश्यक असते.बोलण्यातून एकमेकांचे प्रश्न एकमेकांच्या अडचणी परस्परांना कळू शकतात. सवयी सुटू शकतात .आपले दुसऱ्याला त्रासदायक वाटणारे दोष आपल्याला माहित नसतात.त्याची जाणीव झाल्यास ते सुटू शकतात .
समस्या सोडवण्याची इच्छा असेल तर मार्ग नक्की निघू शकतो .
प्रथम परस्परात मोकळा संवाद झाला पाहिजे .बऱ्याच वेळा संवाद न होता वाद होतो .
अनिल व रेवा यांनी भांडत बसण्यापेक्षा परस्परांना समजून घेणे अत्यावश्यक होते.
जर अंतरंगात दुसऱ्याबद्दल खरेच प्रेम असेल तर दुसऱ्याला समजून घेणे कठीण नाही .कित्येक वेळा बोलल्याशिवायही दुसऱ्याला काय म्हणायचे आहे ते कळू शकते.सर्वांच्याच बाबतीत हे शक्य असेल असे नाही .अश्या वेळी कौन्सिलरची मदत अवश्य घेतली पाहिजे . त्यात चूक कांहीही नाही .कौटुंबिक सल्लागार,समुपदेशक , मानसिक सल्लागार, दोघांचेही प्रश्न समजून घेऊन,त्यांना पटेल अश्या प्रकारे, समुपदेशन करून,दोघांमधील संबंधाला, दोघांच्या दृष्टिकोनाला, योग्य वळण लावू शकतो.
अश्या समुपदेशकाकडे जाण्यात काहीच चूक नाही . आजारी पडल्यावर ज्याप्रमाणे डॉक्टरकडे जाण्यात काही गैर नाही त्याप्रमाणेच अश्या वेळी सल्लागारांकडे जाण्यात काही चूक नाही .
बऱ्याच वेळा दुसर्याचे गुण आपण जाणतो.परंतु मोकळेपणाने ते बोलून दाखवत नाही .दोष दाखविण्यामध्ये आपण जेवढे पुढे असतो तेवढे गुणांचे कौतुक करण्यामध्ये मागे असतो .असे कौतुकही बिघडलेले संबंध योग्य मार्गावर आणण्याला मदत करू शकतात.
मनमोकळा संवाद,मनमोकळे कौतुक ,बऱ्याच वेळा ताणलेले संबंध व्यवस्थित करू शकतात.
अनिल व रेवा यांचे ताणलेले संबंध, होणारी भांडणे, निर्माण झालेली कटुता,परस्परांमधील गैरसमज ,वेळीच त्यांच्या आई वडिलांच्या लक्षात आले .दोघेही आमचे मुळीच जमणार नाही.आम्ही घटस्फोट घेतो. अश्या विचारांवर कडेलोटावर आले होते.
दोघांच्याही आई वडिलांनी सर्वांची एकत्र मीटिंग घेऊन त्यांना समजून सांगितले.
कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
तडजोड ही दोन्ही बाजूनी असावी लागते .परंतु मीच प्रथम कां? असा दृष्टिकोन असू नये.प्रेमामध्ये कुटुंबांमध्ये अवाजवी अहंकार हा दुधातील मिठाच्या खड्यासारखा आहे.आपण प्रथम पुढाकार घ्यायला काय हरकत आहे ?
आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
मीच का बदलायचे? हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत
आई वडिलांचे बोलणे दोघांनीही नीटपणे ऐकले .मीच बरोबर कसा व दुसरा चूक कसा, दुसऱ्याचेच सगळे दोष कसे, असा वितंडवाद घातला नाही.
*अनिल व रेवा या दोघांचाही दृष्टिकोन सकारात्मक होता. सुदैवाने दोघांनाही घटस्फोट घ्यावा असे आतून वाटत नव्हते . आणि ही गोष्ट सर्वात महत्त्वाची होती. सुरुवातीच्या दोन वर्षातील प्रेम स्नेह आपुलीक ओलावा त्यांना आठवत होता.
*तसे त्यांचे परस्परांवर मनापासून प्रेम होते. अनिलच्या असंख्य ग्रुपमुळे त्यावर अभ्रे आली होती .सुविचारांच्या वार्याने ती दूर करणे गरजेचे होते.
*बऱ्याच वेळा दुसऱ्याचा उपदेश आपल्याला नकोसा वाटतो .
*आला मोठा शहाणा शिकवणारा,आम्ही काय अडाणी मूर्ख आहोत काय , असा दृष्टिकोन असतो .
*बर्याच वेळा दुसरा बोलत असताना आपण त्याचे बोलणे नीट ऐकून न घेता त्याला मनातून विरोध करीत असतो.
* त्याच्यावर टीका करीत असतो .
*मीच बरोबर कसा आहे असा आपला नेहमी बचावाचा दृष्टिकोन असतो .
*दुसऱ्याचे बोलणे आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी मन एक भिंत उभी करीत असते.
*ही भिंत नष्ट करण्याचा प्रयत्न न करता आपण भिंत उभी करीत आहोत हे लक्षात येणे हीच भिंत नष्ट होण्याची सुरुवात असते.
* ऐकणे हीही एक कला आहे .
*सुदैवाने दोघांनीही आपापले आईवडील पोटतिडकीने काय सांगत आहेत ते समजून घेतले .
*भांडण,दूर होणे, घटस्फोट, वाद घालणे, हा त्यावरचा उपाय नव्हे.
*वाद नव्हे संवाद पाहिजे, मनमोकळे बोलणे पाहिजे, परस्परांना समजून घेतले पाहिजे,हे सुदैवाने दोघांच्याही लक्षात आले .
*अनिलने आपले बाहेर जाणे कमी केले .
*निग्रहाने त्याने दारूही सोडली .
*दोघेही काही दिवस समुपदेशकाकडे जात होती .
*जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे .*
* गाडी पटरीवरून घसरून अपघाताच्या दिशेने जात होती असे वाटत असतानाच ती व्यवस्थित रुळावरून धावू लागली .*
२०/८/२०१९©प्रभाकर पटवर्धन