४ गुप्तधन
गोष्ट गेल्या शतकातील आहे .एकोणीसशे दहाच्या आसपासचा कालखंड होता.अजून पहिले महायुद्ध व्हायचे होते .त्या युद्धात काही प्रमाणात महागाई झाली होती.एकोणीसशे दहा म्हणजे स्वस्ताईचा काळ होता . लोकसंख्या कमी, इंग्रजांचे राज्य,बाजारात तुम्हाला मला घ्या मला घ्या म्हणून खुणावणाऱ्या विशेष उपभोग्य वस्तूच नव्हत्या.त्यावेळच्या स्वस्ताईची आज कल्पनाही करता येणार नाही.सोने फक्त दहा रुपये तोळा होते.तोळा म्हणजे सुमारे बारा ग्रॅम . आज छत्तीस हजार रुपये दहा ग्रॅमला पडतात. आता तुम्हाला त्यावेळच्या स्वस्ताईची कल्पना येईल.
शंभूनानाना रात्रभर झोप लागली नव्हती.त्यांचा हॅम्लेट झाला होता.त्यांना धन कुठे आहे ते माहीत होते .फक्त ते काढून घ्यावे की न घ्यावे या द्वंद्वात ते सापडले होते.शंभूनाथ नावाप्रमाणेच भोळे होते.समोरचा माणूस आपल्याला फसवीत आहे गंडवीत आहे हे कळूनसुद्धा ते फसविले जात.त्यांच्या या स्वभावाचा बरेचजण गैरफायदा घेत .आई आजारी आहे बायको आजारी आहे मुलगी आजारी आहे त्यासाठी खूप पैशाची गरज आहे असे सांगून लोक त्यांच्याकडून पैसे नेत .मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत त्याला पाठवायचे आहेत असे सांगितले की शंभूनाना पैसे काढून देत .पैसे कर्जाऊ म्हणून नेले जात. त्यासाठी व्याजाचा दरही भक्कम देऊ असे आश्वासन दिले जाई .हे आश्वासन पुरे होणार नाही याची शंभू नानांना कल्पना असे .तरीही नाना कर्ज देत . स्वभावापुढे त्यांचा इलाज नव्हता .
लोकांनी कर्जाऊ घेतलेले पैसे मागायला नाना गेले म्हणजे लोक त्यांचे आदरातिथ्य करीत. गोडगोड बोलत.उद्या सकाळी नक्की पैसे आणून देतो म्हणून सांगत आणि शंभू नाना रिकाम्या हाताने घरी परत येत. अर्थात अगदी रिकाम्या हाताने नाही त्यांच्या दोन्ही हातात दोन शहाळी म्हणजे कोवळे नारळ असत.कधी कधी चांगले जून नारळही असत .गोष्ट कोकणातील आहे हे आपण ओळखले असेलच .कोकणात दाराशी चार माड प्रत्येकाकडे नेहमी असतातच .नानांना पाहिले की घराचा मालक कुणातरी गड्याला माडावर चढवून चार शहाळी पाडीत असे.गडी नसला तर मालक स्वतः माडावर चढे.व शहाळी काढी. नानाना बोलून व शहाळ्यातील थंड गार पाणी पाजून थंड केल्याशिवाय कुणीही परत पाठवीत नसे. नाना परत येताना पैशाऐवजी दोन हातात दोन शहाळी घेऊन येत.पत्नीने पैसे आणलेत का म्हणून विचारल्यावर ते सांगत .आज जरा त्याची अडचण होती. त्याच्या हाताशी पैसे नव्हते.उद्या तो आणून देणार आहे.पत्नी कपाळावर हात मारून गप्प बसत असे .सकाळी नाना जेव्हा वसुलीला जातो असे म्हणत तेव्हाच तिने पुढचे भविष्य ओळखलेले असे.
त्यांची बायको नेहमी ओरडत असे .या स्वभावाने आपण एक दिवस भिकेला लागू .नाना म्हणत तो सर्व पाहात आहे.माझे काही कमी होणार नाही .त्यावर कपाळाला हात लावण्याशिवाय त्यांच्या पत्नीला दुसरे काही करता येत नसे .जुना काळ होता सर्व सूत्रे आपल्या हाती घेण्याची बायकांची पद्धत नव्हती.पुरुषांचे वर्चस्व सर्वत्र चालत असे आणि स्त्रियांनी ते मुकाटय़ाने मान्य केलेले होते .
त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाच्या या स्वभावाची कल्पना होती .मरताना त्यांनी मुलाला आपल्या जवळ बोलाविले व गुप्तधन कुठे ठेवले आहे ते सांगितले होते. त्यांचे वडील खूप श्रीमंत होते .जमीन जुमला व रोख पैसेही त्यांनी पुष्कळ ठेवले होते.परंतु ते सर्व थोरल्या भावाच्या नावावर होते.त्यांचे थोरले बंधू माधवराव यांच्या नावावर होते .
माधव व शंभू यांच्या वडिलांनी म्हणजे रघुनाथपंतांनी जे काही मिळविले ते दोघांनाच मिळणार होते .शंभूनानानी वडिलांजवळ व्यापारासाठी पैसे मागितले.वडिलांनी त्यांना पैसे देतो परंतु तुझ्या स्वभावाला व्यापार जमणार नाही.तू या फंदात पडू नकोस .त्याचप्रमाणे सावकारीही करू नकोस म्हणून सल्ला दिला .परंतू शंभूनानाना व्यापार करण्याची खुमखुमी होती.त्याकाळी रस्ते नव्हते .मोटारी वगैरे नव्हत्या .असलेल्या मोडक्या तोडक्या रस्त्यावरून बैलगाड्या जात.रस्त्याने मालाची वाहतूक फारच थोडी होत असे .गलबतात माल भरून तो मुंबईवरून अाणला जाई.
वडिलांनी दिलेल्या वीस हजार रुपयांमध्ये शंभूनानानी सावकारी व व्यापार सुरू केला.मुंबईहून विविध प्रकारचा माल व्यवस्थित आला .त्याची विक्रीही छान झाली .परंतु लोकांनी गोडगोड बोलून उधारी भरपूर केली.नानांनी रोखीचा व्यवहार केला नाही .शेवटी व्यापारात ते डुबले. सावकारीत दिलेले कर्जाउ पैसे फारच कमी प्रमाणात परत आले. बहुतेक पैसे बुडाले. तात्पर्य शंभूनाना गळ्यापर्यंत बुडाले .वडिलांनी सांगितले की तुला दिलेल्या वीस हजार रुपयातील दहा हजार रुपये तू तुझ्या थोरल्या भावाला दे.म्हणजे निम्म्या जमिनी तुझ्या मालकीच्या होतील.न दिल्यास पैसे तुझे व जमिनी माधवच्या मालकीच्या होतील .
नाना पैसे परत करू शकले नाहीत .तरीही मरताना वडिलांनी दोघांना दहा दहा हजार रुपये दिले.त्याच्या जोरावर व जे काही थोडेबहुत पैसे त्यांच्याजवळ होते व काही वसुली झालेले कर्ज व परत आलेले उधारी यांच्या जोरावर त्यांनी दहा वर्षे काढली .परंतु आता दातावर मारायलाही दिडकी नव्हती.खर्च कसा भागवावा?मुलाला पैसे कुठून पाठवावेत? मुलीचे लग्न कसे करावे? असे अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभे होते .आता नाना शहाणे झाले होते .तसे ते शहाणे पहिल्यापासूनच होते.फक्त त्यांचे ह्रदय कुणीही काहीही सांगितले गयावया केल्या की पाझरत असे.आणि मग सर्व काही बिनसत असे.
वडिलांच्या मृत्यूनंतर जवळजवळ दहा वर्षे त्यांची व्यवस्थित गेली .परंतु शंभूनानांच्या अशा स्वभावामुळे हळूहळू त्यांच्या पैशाला गळती लागलेली होती.
त्यांच्याकडून पैसे नेणारे नेहमीच बुडवीत असत असे नाही .त्यांच्यामध्येही प्रामाणिक लोक होते .ते वेळेवर पैसे आणून देत असत .मुद्दल व व्याज व्यवस्थित मिळत असे.पण नाना देतात आणि तगादा करीत नाहीत कोर्टाची डिक्रीही आणीत नाहीत.कायदेशीर इलाज करीत नाहीत .पैसे वसुलीसाठी त्यांनी कुणा रामोश्याला ठेवलेले नाही.त्यामुळे ज्याच्याजवळ पैसे परत करण्याचे सामर्थ्य अाहे असेही लोक पैसे परत करीत नसत. एकूण पैसे परत करणाऱ्यांपेक्षा बुडविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असे.
शेवटी स्वतःच्या मुलांना शिकविण्यासाठी,स्वतःच्या मुलीचे लग्न करण्यासाठी, पैसे नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली .कालच त्याच्या मुलाचे पत्र आले होते .मुलगा डॉक्टर झाल्यावर आणखी पुढे शिकायचे असे म्हणत होता.त्याला पैसे पाठवावयाचे होते.त्यांच्या मुलीला पसंतीचे पत्र आले होते.तिथे लग्न म्हटले की काही हजार खर्च हा होताच .
धाकट्या मुलावर आई वडिलांचे जरा जास्तच प्रेम असते.शंभूचा स्वभाव त्याच्या वडिलांना म्हणजे दादांना माहित होता .म्हणूनच मरतांना त्यांनी शंभूला जवळ बोलवून गुप्तधन कुठे ठेवले आहे ते सांगितले होते.ते गुप्तधन काढून घेतल्याशिवाय काही इलाज नाही हे नानांच्या लक्षात आले होते .तेवढीच वेळ आल्याशिवाय त्या धनाला हात लावू नको म्हणून दादांनी सांगितले होते.आणि म्हणूनच रात्रभर नानांना झोप लागली नव्हती धन काढू की नको एवढा एकच विचार त्यांच्या मनामध्ये होता .
नानांचे वडिल दादा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाच्या अगोदरच इंग्रजानी ज्या काही शाळा काढल्या त्यात इंग्रजी पाचवीपर्यंत शिकले होते .त्यावेळची पाचवी म्हणजे हल्लींची आठवी .ते त्यापुढेही शिकले असते परंतु शाळाच पाचवीइयत्तेपर्यंत होती.त्या वेळची पाचवी म्हणजे पुष्कळच शिकला असे म्हणत असत .
स्वातंत्र्य युद्धात आपला पराभव झाला .सर्व भारतात इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाला.दादांना मोठ्या पगाराची नोकरी लागली. त्यावेळच्या मुंबई इलाख्यात त्यांनी नोकरी केली.मुंबई इलाख्यात कराचीपासून ते कर्नाटक पर्यंतचा सर्व भाग त्याकाळी समाविष्ट होता.दादा हुबळीच्या बाजूला कुठेतरी नोकरीत होते . त्यांनी तेहतीस वर्षे पूर्ण नोकरी केली.पेन्शन घेतल्यावर ते शहरात स्थायिक झाले नाही .त्या काळी कुठेही नोकरी केली तरी शेवटी आपल्या घरी येऊन राहावे अशीच प्रवृत्ती होती .ते आपल्या खेडेगावात येऊन स्थायिक झाले.त्या काळी त्यांना शंभर रुपये पेन्शन मिळत असे .आठ दहा रुपये तोळा सोने म्हणजे आताचे किती त्याची कल्पना करा .
कोकणात आपल्या गावी येऊन राहिल्यावर त्यांनी खूप जमिनी खरेदी केल्या .मोठे अवाढव्य लांबरुंद घर बांधले .खूप दानधर्म केला. देवधर्मही केला .मुलांना पैसे दिले .सुना व नातसुना यांच्या अंगावर शेर शेर सोन्याचे दागिने घातले.(शेर म्हणजे सुमारे चौवीस तोळे) तरीही त्यांच्या जवळ खूप पैसा शिल्लक राहिला . चांदीच्या कल्लेदार रुपयांचे त्यांनी सोन्यात रूपांतर केले.आणि हा पैसा त्यांनी लपवून ठेवला .त्याकाळी बँका नव्हत्या .धन जमिनीत कुठेतरी पुरून ठेवले जाई.तुळशी वृंदावनाखाली, उंबरठ्याखाली, घरातील चुलीखाली वगेरे वगेरे.म्हणजे रोज त्या धनावर लक्ष रहात असे.
दादांना अशाप्रकारे धन लपविण्यापेक्षा आणखी कोणत्या तरी वेगळ्या प्रकारे लपवावे असे वाटत होते.एक दिवस त्यांनी आगरात घुमटी बांधायला सुरुवात केली.दादा तुम्ही काय करता असे विचारल्यावर त्यांनी मला साक्षात्कार झाला आहे .काल रात्री शंकर माझ्या स्वप्नात आले होते.त्यांनी या ठिकाणी माझी स्थापना कर .रोज पूजा करीत जा म्हणजे तुझे कल्याण होईल असे सांगितले.म्हणून मी शंकराची लहानशी घुमटी बांधत आहे.पूजा व्यवस्थित करता यावी म्हणून साधारणपणे कंबरभर उंचीच्या दगडाच्या चवथर्यावर घुमटी बांधण्यात येत असे.त्या घुमटीत देवाची स्थापना करण्यात येत असे .दादानी बांधलेल्या घुमटीमध्ये शंकराची पिंडी स्थापन करण्यात आली .फक्त पिंडीची साग्रसंगीत पूजा व स्थापना करण्याअगोदर कुणाच्याही नकळत त्यांनी त्या चौथऱ्याच्या आत सोन्याची नाणी असलेला एक डबा ठेवला होता.
मधून मधून दादांना साक्षात्कार होत असे .स्वप्नात साक्षात भगवान येत असत.व मग कधी दत्तगुरू यांच्या पादुका, कधी देवी महालक्ष्मी, कधी श्री विष्णु व लक्ष्मी,कधी विठूराया अशा पाच सात दगडी घुमट्या त्यांच्या आगरामध्ये उभ्या राहिल्या.घरातल्या देवाबरोबर या आगरातील अनेक देवांची पूजा करण्याची जबाबदारी पुजाऱ्यांवर पडली. दादांची प्रकृती बरी असली म्हणजे ते स्वतःच पूजा करीत. दोन तीन तास त्यांचे पूजेमध्ये जात.निरनिराळी स्तोत्रे मंत्र ते म्हणत असत .जेव्हा त्यांची प्रकृती बरी नसे त्यावेळी ती जबाबदारी माधव किंवा शंभू यांच्यावर पडत असे.त्यांनाही जमत नसे तेव्हा पुजारी पूजा करीत असे .
दादांनी जमिनी खरेदी केल्या. घर बांधले. दानधर्म केला. देवधर्मही केला. मुलांना पैसा दिला.सुनांच्या अंगावर शेर शेर सोने घातले .घरात प्रत्येकाच्या नावाने एकेक मुटक्याएवढ्या जाडीचे चांदीचे ताट केले. एवढे करून नानांजवळ पैसे शिल्लक राहिले असतील असे कुणाला वाटले नव्हते.
दादांना दर महिन्याला कल्लेदार शंभर रुपये पेन्शन मिळत असे .त्याशिवाय नोकरीच्या काळात त्यांनी पैसा साठविला होता .एवढा पैसा खर्च करूनही त्यांच्या जवळ धन शिल्लक होते .दादांनी अशाप्रकारे पाचसात घुमट्या बांधून ते त्यांच्या मताने सुरक्षित ठेवले होते.त्या काळी खेडेगावात कुठल्याही जातीधर्मांमध्ये धर्मभावना व भीतीची भावना असे.घुमटी मंदिर दर्गा इत्यादीची तोडफोड करावी मूर्तीला उचलून बाहेर काढावे अशी कोणाचीही हिंमत नव्हती .असे ठेवलेले धन सुरक्षित असे.घुमटीमध्ये धन ही दादांची खास कल्पना होती.वर सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे चूल उंबरठा तुळस यांच्याखाली धन ठेवले जात असे. घुमटीमध्ये धन असेल असा संशयही कुणाला येण्याचा संभव नव्हता.दरोडा पडला तरीही कुठेही पुरलेले धन उकरून काढण्यात बराच वेळ जात असे .आणि धन कुठे असेल ते सांगता येत नसे.खणण्याचे श्रम फुकट जाण्याचा संभव असे. त्यामुळे निश्चित माहिती असल्याशिवाय सर्वसाधारणपणे त्या फंदात कुणी पडत नसे.
सकाळी नाना उठले.गुप्तधन काढण्याचा निश्चय त्यांनी केला होता .रात्री प्रत्येक घुमटीमध्ये पणती लावली जाई.पूजा करताना त्यांनी दत्तगुरूंची क्षमा मागितली .रात्री पादुका बाजूला करून त्यांनी आत खोलवर खणले .तिथे त्यांना एक डबा सापडला .जमीन सारखी करून त्यावर त्यांनी पुन्हा दत्तगुरूंच्या पादुका ठेवल्या .
त्या डब्यात शंभर सोन्याच्या मोहरा होत्या .त्याच्या साहाय्याने त्यानी मुलाचे पुढील वैद्यकीय शिक्षण,मुलीचे लग्न व थोरल्या भावाला द्यावयाचे दहा हजार रुपये ,या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या .निम्मे जमिनी त्यांच्या मालकीच्या झाल्या .
नानांनी त्यांच्या गरजेपुरती एकच घुमटी उघडली.अजूनही तीन चार घुमट्या आगरांमध्ये होत्या.
शंभू नाना गेले.माधवराव गेले. त्यांच्या पुढच्या पिढ्या शहरात जाऊन निरनिराळया ठिकाणी स्थायिक झाल्या .
कोकणातील घर आता जेमतेम जाग्यावर उभे आहे .अनेक वारसांपैकी कुणीतरी ते तसेच उभे ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
*आगरात घुमट्या अजून तशाच आहेत.त्यात काही आहे की नाही माहीत नाही .*
दादांनी असे तर केले नसेल ना ?एखाद्या दुसऱ्या घुमटीत धन ठेविले व इतर घुमट्या उगीचच बांधल्या.दादांच्या मनात काय होते त्यांनी नक्की काय केले कुणालाच माहित नाही .
*असे तर नसेल ना एकाच घुमटीमध्ये गुप्तधन होते व ते कुठच्या घुमटीत आहे ते दादांनी आपल्या मुलाला सांगितले काही कल्पना नाही .*
*कदाचित इतर घुमट्यातही कमी जास्त प्रमाणात धन नसेलच असे सांगता येत नाही!!*
*नानांवरील संकट दूर झाले एवढे मात्र खरे .*
२४/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन