Get it on Google Play
Download on the App Store

५ बिचारा १-२

(ही कथा काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

पुराणातील कथांमधून किंवा इतरही कथांमधून सावत्रपणाच्या कितीतरी गोष्टी सर्वांच्याच वाचनात आलेल्या असतील .विशेषतः पूर्वीच्या काळात बाळंतपणांमध्ये बायकांचे मृत्यू जास्त प्रमाणात होत असत.स्वाभाविक त्यामुळे दुसरे लग्न करण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असे.सावत्रपणाच्या कितीतरी गोष्टी त्यावेळी ऐकायला मिळत.हल्ली शिक्षित वर्गात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे दुसरे लग्न व काही वेळा तुझी मुले माझी मुले व आपली मुले अशी परिस्थिती निर्माण होते.

अशा परिस्थितीत नवीन वातावरणात सर्व स्त्रिया सुसंस्कृतपणे समंजसपणे वागत असतीलच याची खात्री देता येत नाही .

ही गोष्ट सदानंदची आहे.काळ जुना साठ वर्षांपूर्वीचा आहे  सदानंद हा असाच एक सावत्र मुलगा .तो वर्षाचा होण्याअगोदरच त्याची आई बाळंतरोगाने मेली.वडिलांनी दुसरे लग्न लगेच केले.त्याला किती तरी दिवस आई ही इतर मुलांच्या आईप्रमाणे आपलीही आईच आहे असे वाटत होते.ती सावत्र आहे याची त्याला कल्पनाही नव्हती .सावत्र म्हणजे काय हे कळण्याचे त्याचे वय नव्हते . लहान मुलाच्या मनावर आपली आई सावत्र आहे .आपण सावत्र मुलगा आहोत.आपली आई छळ करणारच वगैरे गोष्टी कोवळ्या मनावर ठसविण्यात शेजाऱ्यांचा मोठा हातभार लागत असे.  शेजारच्या काकूंनीच  त्याला तू सावत्र मुलगा आहे असे सुरुवातीला सांगितले. अरेरे बिचारा यांचे कसे होत असेल कोण जाणे ? याला बहुधा उपाशी ठेवीत असणार ?सावत्र म्हणून त्याचा कळवळा आला असे दाखविण्यात स्त्रियाच पुढे होत्या .

लहान मुलाने हट्ट केला ,काही खोडी केली तर त्याला मार स्वाभाविकपणे बसतो .असा मार सख्ख्या मुलालाही बसतो .मूल सावत्र असल्यास सावत्र म्हणून मार बसला असा कांगावा करण्यात शेजारीच पुढाकार घेत असतात.लहान मुलांच्या कोवळ्या मनावर असे होणारे संस्कार बऱ्याच वेळा घातक ठरतात .

घरी येउन त्याने सावत्र म्हणजे काय ते विचारले.आणि त्याच्या (सावत्र )आईच्या हातचा एक धपाटा खाल्ला .थोडा मोठा झाल्यावर त्याला सावत्र म्हणजे काय ते कुठून तरी कळले .  लहानपणीचे त्याला काही आठवत नव्हते.परंतु शेजारी पाजारी मात्र बघत होते .त्याच्या वडिलांचे नाव माधव होते .त्याच्या सख्ख्या आईचे नाव लक्ष्मी होते.दुसऱ्या आईचे नाव पद्मजा ठेवण्यात आले .ती लग्न होऊन या घरात आली तेव्हा तिला अगोदरच एक रेडिमेड मुलगा होता.त्या मुलाला वरचे दूध पाजण्यापासून ते शी शू काढण्यापर्यंत तिला सर्व काम करावे लागे.तिला त्याची किळस वाटे.नाईलाजाने ती ते सर्व करीत असे .एखाद्या अठरा वीस वर्षांच्या  मुलीला लग्न झाल्यावर तू (दोन/एक इ.) मुलांची आई आहेस,तुला ती तुझी मुले असल्याप्रमाणे सर्व संगोपन करायचे आहे असे सांगितले तर तिला काय वाटेल ते ती मुलगी झाल्याशिवाय कळणार नाही.मुलीलाही तिची काही बाजू असते. याचा अर्थ त्यांनी छळ करावा असा नाही. मुलींना अगोदरच आपला होणारा नवरा  बिजवर आहे याची कल्पना असते .त्याला मुले किती आहेत त्यांची वये काय आहेत याचीही कल्पना असते. बऱ्याच वेळा काही मुली  जुळवून घेतात.सख्खे सावत्र केले तरी ते फार ताणीत नाहीत.

परंतू काही नमुने इरसाल असतात त्यातील पद्मा ही एक होती .ती आक्रस्ताळी चिडखोर स्वभावाची होती .  प्रत्येक वेळी पद्माची आदळआपट चालत असे.

माझ्या राशीला लागला आहे .

मला छळत असतो .

छळवादी मेला.

मी मरेन तर याच्या जाचातून सुटेन.

हा काही मरणार नाही. मी मरेपर्यंत माझ्या मानेवर बसून राहील.

मला मारून हा सुटेल .

माझ्या मानेवर खविसासारखा बसला आहे.

याच्यामुळे मला कुठे जाणे नाही की येणे नाही.

मर मेल्या. 

गीळ एकदाचा.

हा मरतही नाही .

कसा धष्टपुष्ट एरंडासारखा वाढत आहे .

हा बहुधा  चोरून खात असला पाहिजे .

ही त्यातील शेजाऱ्यांना ऐकू येणारी काही वाक्ये. धड खाणे नाही. धड पिणे नाही.आजारात शुश्रूषा नाही.धड कपडे नाहीत.इतकी आबाळ होऊनही तो दिसामासानी वाढत होता .नुसता वाढत नव्हता तर धष्टपुष्ट बलदंड होत होता .वयाच्या मानाने तो मोठा दिसे.

हवा,पाणी, आबाळ,मार,हेच त्याचे जणू टॉनिक होते.  देव एकीकडे न्यून असले तर दुसरीकडे ते न्यून भरून काढतो ते हे असे.

 अर्थात हा छळ,ही आदळआपट, सर्व काही सुरुवाती सुरुवातीला जेव्हा माधवराव घरात नसत तेव्हा चालत असे.जेव्हा माधवराव घरात असत तेव्हा ती गुपचूप सर्व काही करीत असे .वर्षभरातच तिला दिवस राहिले .आणि नाथाचा जन्म झाला.माधवरावांनी त्याचे नाव एकनाथ ठेविले होते.नाथा झाल्यावर तर सदाच्या हालांना पारावार उरला नाही.सदा व नाथा यांच्यामध्ये जेमतेम दोन तीन वर्षांचे अंतर होते. दोघेही लहानच होते. सदाकडे दुर्लक्ष करण्याला पद्माला आता एक चांगले कारण मिळाले होते. नाथांचे करण्यामध्ये माझा सर्व वेळ जातो. मला सदाकडे बघावेसे खूप वाटते .परंतु मला वेळच मिळत नाही .इत्यादी इत्यादी 

सदा तसाच वाढत होता .पद्माने कौशल्याने हळूहळू माधवरावानाही आपल्या ताब्यात घेतले.पूर्वी सदाकडे लक्ष देणारे माधवराव आता त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले.त्याला कुणीच वाली उरला नाही .त्याच्या आबाळीला हालांना सीमा उरली नाही. 

नवीन कपडे नाथाला वारंवार आणले जात  तर सदा जुनेच कपडे वापरीत असे.

सदाला कपडे फाटल्यावरच नवे कपडे मिळत.तेही काही दिवसांनी मिळत तोपर्यंत तो फाटकेच कपडे वापरत असे .

नाथाला कपडय़ांचे अनेक जोड तर बिचारा सदा दोनच जोडांवर  भागवत असे . एक अंगावर तर दुसरा दोरीवर वाळत असे.

नाथाचे कपडे जरा जुने झाले की टाकून दिले जात.सदा फाटके तुटके कपडे वापरीत असे.

वाढीचे वय कपडे लवकर अपरे होत. सदा  थोराड अंगलटीचा होता. तरीही तो ते नाइलाजाने वापरीत असे.त्यामुळे अनेकवेळा तो कपड्यामध्ये बांधून ठेवल्या सारखा वाटे.  

नाथाला नवीन खेळणी तर त्याची जुनी झालेली खेळणी सदाला.

काहीही गोड खारे केले किंवा बाहेरून आणले तर ते नाथाला मिळे.सदाचा नंबर शेवटी लागे .काही उरले सुरले तर ते त्याला मिळे. 

गरमागरम  पोळी ताजे अन्नपदार्थ नाथाला मिळत. शिळे ,उरले सुरले अन्न सदाला मिळे. बर्‍याच  वेळा शिळे त्याच्या वाट्याला येई.ते  खाऊनहि तो चांगला वाढत होता.  

बागेत,जत्रेत ,सिनेमाला, नाथाला नेले जाई.सदा धुळीतच घराबाहेर खेळत असे .

सदा जसा मोठा होऊ लागला तसे त्याला कळू लागले .आपण सावत्र आहोत म्हणून हे सर्व होत आहे हे त्याला कळू लागले.आपली आई असती तर असे झाले नसते हेही त्याला कळू लागले .प्रत्येक गोष्टीत नवी आई, माई, आपला दुस्वास करतो हे त्याला समजू लागले.दोघेही शाळेत जाऊ लागले. कपडे बूट मोजे दप्तर पुस्तके सर्व काही नवे कोरे करकरीत नाथाला तर सर्व जुने सदाला.शेजारी पाजारी, नातेवाईक ,या सर्वांच्या ही गोष्ट ठळकपणे लक्षात येई .एवढेच काय तर गाव लहान असल्यामुळे शाळेत सुद्धा त्याच्याकडे दयाबुद्धीने पाहिले जाई .

हळू हळू सदाच्या बालमनात नाथाबद्दल मत्सर द्वेष बुद्धी निर्माण होऊ लागली .दिवसेनदिवस त्यात वाढ होत गेली . आपल्या मनात काय बदल होत आहे ते त्याचे त्यालाही कळत नव्हते.ते कळण्याचे त्याचे वयही नव्हते .

आई आपल्या दोघांमध्ये फरक करते हे नाथाला केव्हाच लक्षात आले .मुले केव्हा केव्हा काही बाबतीत फार चाणाक्ष असतात .दुसऱ्याचा पाणउतारा करणे, दुसर्‍याची अवहेलना करणे,दुसऱ्याला खिजवणे,आपला शहाणपणा,श्रेष्ठत्व दाखविणे ,या भावना माणसाच्या मनात कुठेतरी खोल असाव्यात  . मोठे लोक त्या दाबून ठेवतात किंवा त्याचा अविष्कार वेगळ्या प्रकारे करतात .लहान मुले या गोष्टी उघड उघड करतात त्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो .

सदाच्या बाबतीत नाथाची मनोवृत्ती  नकळत हळूहळू  बिघडू लागली.प्रत्येक बाबतीत तो त्याला चिडवू लागला .डिवचू लागला. त्याला वेडावू लागला.त्याला मिळालेली प्रत्येक गोष्ट तो सदाला दाखवून हिणवीत असे.

कुणीही पाहुणा आला की खाऊ पहिल्यांदा नाथाच्या हातात देत असे.कदाचित तो लहान म्हणून तसे होत असावे .किंवा तो प्रथम पुढे येत असे म्हणून तसे होत असावे .कारण काहीही असो परंतु सर्वच आपल्याला हिडीसफिडीस करतात .आपण कुणाला नको ही भावना सदाच्या मनात हळूहळू दृढ होत गेली.

नाथा नसता तर पद्मा काकू अश्या  वागल्या नसत्या असे शेजारी पाजारी नातेवाईक म्हणत.त्याचा फार वाईट खोलवर परिणाम सदाच्या मनावर होत असे.

यासर्वामधून त्याच्या मनात नाथा बद्दल द्वेष भावना निर्माण होत गेली .दिवसें दिवस त्याची तीव्रता वाढत गेली.

नाथा नसेल तर आपल्याला सर्व काही मिळेल असे त्याला वाटू लागले .

नाथा हा आपल्याला मोठा अडथळा आहे .तो दूर झाला पाहिजे. असे विचार त्यांच्या मनात नकळत येऊ लागले

त्यांचे मन नकळत नाथा कसा नाहीसा होईल याचा विचार करू लागले . 

त्याचे वय लक्षात घेता असे विचार मनात येणे भयानक होते .

त्याच्यावर प्रतिदिन होणाऱ्या अन्यायामुळे स्वाभाविकपणे असे विचार त्यांच्या मनात येत होते.

अशा विचारातून पुढे केव्हा तरी मोठा प्रचंड स्फोट होणार होता का? त्यात कुणाकुणाचे बळी जाणार होते का? नियतीलाच माहीत .

(क्रमशः)

२८/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन