६ रहस्यमय खून
आज सर्वत्र चर्चेचा एकच विषय होता .अनेक पेपरच्या पहिल्या पानावर किंवा शेवटच्या पानावर हेडलाइन्स होत्या. ".प्रसिद्ध उद्योगपती आशिष यांच्यावर खुनाचा आरोप"या खटल्याच्या बातम्या बरेच दिवस पेपरमध्ये उलटसुलट प्रकारे येत होत्या
महिन्याभरापूर्वी आशिषच्या बंगल्यामध्ये त्याच्या हातून त्याच्या बायकोचा पोटात सुरा खुपसून खून झाला होता .खून होताना त्यांचा नोकर भास्कर याने स्वतः पाहिला होता .त्याप्रमाणे त्याने पोलिसांना लिखित जबाबही दिला होता .भास्कर चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये येत असताना त्याने आशिष व त्याची बायको कालिंदी यांच्यामध्ये झटापट होताना पाहिली .कालिंदी आशिषपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती.झटापटीमध्ये आशिषच्या हातून सुरा कालिंदीच्या पोटात खुपसला गेला .क्षणात कालिंदी रक्ताच्या थारोळ्यात गालिच्यावर पडली .सुरा हातात घेऊन वेड्यासारखा आशिष उभा होता .नंतर त्याने सुरा फेकून दिला .व तो हमसून हमसून रडू लागला .
भास्करने पोलिसांना फोन केला .इन्स्पेक्टर शामराव त्यांच्या फौजफाट्यासह तिथे दहा मिनिटात दाखल झाले .अजूनही गुडघ्यात डोके घालून अाशिष रडत होता .रक्ताच्या थारोळ्यात कालिंदी पडलेली होती .भास्कर फार जुना नोकर होता .त्याने लगेच त्यांच्या फॅमिली डॉक्टरलाही बोलवून घेतले होते .डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले .शामराव आपले सर्व तेथील कामकाज आटोपून नंतर ऑफिसवर आपल्या फौजफाट्यासह परत आले .
आशिषला अर्थातच अटक करण्यात आली होती .का कोण जाणे आशिषकडे बघितल्यानंतर शामरावांना त्याची कणव आली होती .त्याने जाणीवपूर्वक खून केला असेल असे शामरावांना वाटत नव्हते .कालिंदीचा मृत्यू हा अपघात असावा असे त्यांना वाटत होते .आत्तापर्यंत शामरावांनी अनेक खुनी पाहिले होते . त्यांची दर्दी नजर खुन्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तो खुनी आहे की नाही ते बरोबर ओळखत असे .
त्यानंतर शामरावांनी युवराजांना फोन केला होता .सर्व हकीगत त्यांना सांगितली होती .युवराज नामांकित वकील होते .ते फौजदारी केसेस घेत असत .युवराजानी केस घेतली म्हणजे आरोपी सुटला असे समीकरण तयार झाले होते .आरोपी निर्दोष आहे अशी खात्री पटल्याशिवाय युवराज कधीही केस हातात घेत नसत .खासगी डिटेक्टिव्ह संदेश त्यांना सर्व प्रकारची मदत करीत असे .युवराज तपास कोणत्या बाबींचा करावयाचा याचा आराखडा देत असत .त्या आराखड्याला अनुसरून सर्व माहिती गोळा करून संदेश आपला अहवाल देत असे.
आशिषचे आईवडील त्याच गावात परंतु दुसरीकडे राहात असत. खानदानी उद्योग आशिषने चांगला सांभाळला होता किंबहुना त्यामध्ये बरीच भरही घातली होती.आशिषचे वडील शामरावांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांना युवराजांचे नाव वकील म्हणून सुचविले होते .
आशिषचे वडील युवराजांना भेटल्यानंतर युवराजांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते .त्याचप्रमाणे शामरावांनी वडिलानी सांगितलेल्या हकिगतीला अनुसरून संदेशला अनेक प्रकारची माहिती गोळा करण्याला सांगितली होती .संदेशने दिलेली माहिती वाचून आणि आशिष निर्दोष आहे याची खात्री पटल्यानंतरच युवराजांनी आशिषच्या वडिलांना मी तुमची केस स्वीकारतो म्हणून सांगितले होते .
आजपासून हा खटला रोज कोर्टात सुरू राहणार होता .त्याच्याच बातम्या हेडलाईनच्या स्वरूपात पेपरमध्ये आल्या होत्या .आशिष सारखा बडा उद्योगपती, युवराज सारखे नामांकित फौजदारी वकील,व शामरावसारखे इन्स्पेक्टर असा हा संयोग होता . सर्व केस ओपन अँड शट स्वरूपाची दिसत होती .यामधून युवराज आपल्या अशिलाला कसे सोडवणार अशी उत्सुकता सर्वांना होती .
अकराचे टोल पडले.जज्जसाहेब आपल्या खुर्चीत येऊन बसले .स्टेट व्हर्सेस आशिष अशी पुकारणीही झाली.सरकारी वकील गायतोंडे प्राथमिक भाषणासाठी उभे राहिले .ते म्हणाले
दहा जानेवारी रोजी सकाळी हॉलमधे आशिष बसला होता.समोरच त्याची बायको कालिंदी दुसऱ्या सोफ्यावर बसली होती .एवढ्यात आशिष उठला आणि त्याने टेबलावरील सुरी आपल्या हातात घेतली .ही सुरी एका म्यानामध्ये होती. शोपीस म्हणून टेबलावर ठेवलेली होती.ती घेऊन तो कालिंदीवर वार करू लागला .कालिंदीने बचावासाठी त्याचा हात धरला .दुर्दैवाने कालिंदी आपला बचाव करू शकली नाही .व आशिष सुरा कालिंदीच्या पोटात खुपसण्यात यशस्वी झाला .झटापट होत असताना भास्कर चहाचा ट्रे घेऊन दरवाजात आला .तो ट्रे बाजूला ठेवून कालिंदीला वाचविण्यासाठी धावणार एवढ्यात कालिंदी रक्ताच्या थारोळ्यात गालिच्यावर पडली .त्यावेळी सुरा आशिषच्या हातात होता .नंतर त्याने सुरा गालिच्यावर टाकला .भास्करने पोलिसांना बोलवून घेतले .भास्करने खून होताना पाहिले आहे .सुर्यावर आशिषच्या हाताचे ठसे आहेत.माझ्या हातून सुरा कालिंदीच्या पोटात खुपसला गेला हे आशिषने मान्य केले आहे .तेव्हा आशिषला खुनाच्या गुन्ह्याखाली जेवढी जास्तीत जास्त शिक्षा देता येईल तेवढी द्यावी अशी माझी विनंती आहे.असे म्हणून गायतोंडे बसले .
जज्ज साहेबांनी युवराजांना तुम्हाला काही प्राथमिक भाषण करायचे आहे का म्हणून विचारले .त्यावर युवराज उठून म्हणाले की आशिषने जाणून बुजून खून करायचा म्हणून खून केलेला नाही. तो झटापटीमध्ये अजाणता त्याच्या हातून झाला आहे.तेव्हा खुनाच्या आरोपातून त्याला मुक्त करावे अशी माझी विनंती आहे . एवढे बोलून युवराज बसले .
जज्ज साहेबांनी गायतोंडेना त्यांची केस मांडण्यास सांगितले.
गायतोंडेनी पहिल्यांदा भास्करला बोलाविले.त्याने ट्रे घेऊन मी येत होतो दरवाज्यात असताना बाईसाहेब व साहेब यांची झटापट मी पाहिली नंतर बाईसाहेब रक्ताच्या थारोळ्यात गालिच्यावर पडल्या. साहेबांच्या हातात सुरा होता असे सांगितले .
युवराजांनी भास्करला एकच प्रश्न विचारला तू साहेबांना पोटात सुरा खुपसताना पाहिले का ?त्यावर अर्थातच भास्करने नाही मी फक्त दोघांची झटापट पाहिली नंतर बाईसाहेब गालीच्यावर कोसळताना पाहिल्या असे सांगितले.
नंतर गायतोंडेनी पोलीस इंस्पेक्टर शामरावांना बोलाविले .शामरावांनी इथे खून झाला आहे म्हणून भास्करचा फोन आला. मी सर्व संबंधित स्टाफसह आशिषच्या बंगल्यावर पोचलो .त्यावेळी आशिष रडत होता .गालिच्यावर कालिंदी पडलेली होती वगेरे हकिकत सांगितली .
नंतर ठसे तज्ञांना बोलाविण्यात आले. सुर्यावर आशिष व कालिंदी दोघांचेही ठसे होते असे त्यानी सांगितले .डॉक्टरांना बोलाविले त्यांनी तपासले त्या वेळी रक्तस्रावाने मृत्यू झाला होता .पोटात सुर्याची जखम दिसत होती वगैरे सांगितले.शामरावांना पुन्हा विटनेस बॉक्समध्ये बोलाविण्यात आले. आशिष व त्याची बायको कालिंदी यांच्यामध्ये झटापट झाल्याचे कोणते चिन्ह दिसत होते काय असे विचारले त्यावर त्यांनी झटापट झाल्याचे दिसत होते असे सांगितले .
दोन दिवस भास्कर ,डॉक्टर, ठसे तज्ञ, शामराव,इत्यादिकांच्या साक्षी चालल्या होत्या. त्यानंतर सरकारी बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील गायतोंडे उभे राहिले .त्यांनी सुरुवातीलाच ही ओपन अँड शट केस आहे असे सांगितले.कालिंदी व आशिष हॉलमध्ये बसले होते .काही कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला असावा .रागाच्या भरात आशिषने टेबलावर ठेवलेल्या म्यानातून सुरा काढून तो कालिंदीला मारण्याचा प्रयत्न केला .कालिंदीने स्वसंरक्षणासाठी आशिषचा हात पकडला .त्या झटापटीमध्ये सुरा कालिंदीच्या पोटात घुसला व तिचा मृत्यू झाला .सुरा कालिंदीने प्रथम हातात घेतला नसून तो आशिषने घेतला होता.सुरा घरातीलच असल्यामुळे त्यावर कालिंदीच्या हाताचे ठसे असणे स्वाभाविक आहे .आशिषने खून केला आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असे शेवटी सांगितले .केस इतकी सरळ दिसत होती की त्यातून आशिष सुटणे अशक्य आहे असे वाटत होते .युवराज ही केस नक्की पहिल्यांदाच हरणार असे प्रेक्षकांना वाटू लागले .
(क्रमशः )
प्रभाकर पटवर्धन
*रहस्यमय खून*(भाग)२
(युवराज कथा )
हे सर्व होईपर्यंत युवराज स्वस्थ बसलेले होते .त्यांनी कुणालाही क्रॉस एक्झॅमिन करण्याचा प्रयत्न केला नव्हता .युवराज त्यांची केस कशी मांडणार ते कुणाच्याच लक्षात येत नव्हते .
नंतर युवराज बचावाची बाजू मांडण्यासाठी उभे राहिले .त्यांनी प्रथम स्वयंपाकिण सुनंदाबाई ,मोलकरीण रखमा व भास्कर यांना साक्षीसाठी बोलाविले .प्रत्येकाला त्यांनी एकच प्रश्न विचारला .बाई साहेब व साहेब यांच्यामध्ये भांडणे होत असत का?त्यावर अर्थात तिघांनीही त्यांचे कधीही मोठे भांडण झालेले आपण पाहिले नाही असे सांगितले. तिघांनीही त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते .संसारामध्ये काही वादविवाद होत. पण ते अत्यंत क्षुल्लक स्वरूपाचे असत.त्यांना भांडताना किंवा वारंवार वाद घालताना पाहिलेले आठवत नाही असे सांगितले .त्यानंतर युवराजांनी ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्यांच्यामध्ये काही भांडण झाले का असे विचारले.त्यावर तिघांनीही नाही म्हणून सांगितले . त्यांनी भास्करला साहेबांना वाचनाची आवड होती का म्हणून विचारले .त्यावर त्याने होय म्हणून सांगितले .साहेब कसली पुस्तके वाचीत असत असे विचारता त्याने रहस्यकथा वाचीत असत असे सांगितले.युवराजांच्या या प्रश्नाचा रोख कुणालाच कळला नाही .
त्यानंतर युवराजांनी आशिषला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलाविले . कालिंदीवर हल्ला का केला असे विचारता त्यांने सांगितले .कालिंदी सुरा घेऊन त्याला मारण्यासाठी आली. त्यामुळे त्याने आपल्या बचावासाठी तिचा हात धरला.त्याला सुरा मारावयाचा नव्हता .तो फक्त आपला बचाव करीत होता .त्यामध्ये अपघाताने तो सुरा तिच्या पोटात घुसला. कालिंदी त्याला सुरा घेऊन मारायला येण्याचे कारण काय असे विचारता त्याला ते नीटसे सांगता आले नाही.ती सुर्याशी खेळत होती आणि मला ती मारण्यासाठी येत आहे असे वाटले एवढेच सांगितले.कालिंदीने यापूर्वी तुला मारण्याचा कधी प्रयत्न केला होता काय असे विचारता तो म्हणाला, रात्री कालिंदी मारण्यासाठी सुरा घेऊन येते अशी स्वप्ने मला पडतात .अशा स्वप्नांची तुला भीती वाटत नाही काय असे विचारता त्याने होय म्हणून सांगितले.मग तू डॉक्टरांकडे यासाठी गेला नाहीस का असे विचारता त्याने होय मला डॉक्टरांची ट्रिटमेंट चालू आहे असे सांगितले
त्या दिवशी ती प्रत्यक्ष सुरा घेवून माझ्या अंगावर धावून आली. तोपर्यंत मला फक्त स्वप्ने पडत असत .त्या दिवशी ती प्रत्यक्ष मारायला येताना पाहून मी खूपच घाबरलो आणि तिचा हात धरला .मी माझा बचाव करीत होतो त्यामध्ये तो सुरा तिच्या पोटात घुसला असे सांगितले.एवढे बोलून तो ढसाढसा रडू लागला .गायतोंडेनी उलटतपासणी घेतली त्यावेळीही तो आपल्या सुरुवातीच्या सांगण्यापासून तिळभरही ढळला नाही .
त्यानंतर युवराजांनी त्याच्या वडिलांना साक्षीसाठी बोलाविले. लहानपणापासून आशिषला स्वप्ने पडत असत का असे विचारता ते म्हणाले.अशा तर्हेची स्वप्ने त्याला पूर्वी पडत नसत.परंतु त्या घटनेनंतर मात्र त्याला वाईट स्वप्ने पडू लागली .आपल्याला कुणी तरी मारायला येत आहे अशा प्रकारची ती स्वप्ने असत .त्या स्वप्नातून घाबरून तो जागा होत असे .ती घटना कोणती असे विचारता त्यांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले . लहानपणी आशिष क्रिकेट खेळत असताना त्याच्या डोक्याला चेंडू लागून तो बेशुद्ध झाला होता .त्यावेळी त्याला अंतर्गत जखम झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता .त्यातून तो सुधारला शिकला धंदाही चांगला संभाळित असे. तरीही त्याला केव्हा केव्हा वेडाचे झटके येत असत .त्यासाठी त्याला डॉक्टरांचे उपचार चालू होते .डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी लागत. वेडाच्या झटक्यांमध्ये तो काय करीत असे असे विचारता त्यांनी तो निपचित पडून राहात असे असे सांगितले.
लग्न झाल्यानंतर हल्ली तो वेगळा राहत असे त्यामुळे हल्लीची परिस्थिती मला माहीत नाही असेही सांगितले .
त्यानंतर युवराजांनी शामरावांना पुन्हा साक्षीसाठी बोलाविले.त्यांनी शामरावांना विचारले.आशिषची लायब्ररी तुम्ही पाहिली का ?.त्यावर त्यांनी हो म्हणून सांगितले .त्यामध्ये तुम्हाला कोणती पुस्तके आढळली यावर त्यांनी मराठी व इंग्रजी रहस्यकथांची पुस्तके प्रामुख्याने होती असे सांगितले .
नंतर त्यांनी त्यांचा नेहमीचा नोकर भास्कर याला बोलाविले .त्याला साहेब नेहमी काय वाचीत असत असे विचारता त्याने त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असे त्या त्या वेळी ते रहस्यकथांची पुस्तके वाचत असत असे सांगितले किंबहुना त्यांना रहस्य कथा वाचण्याचे वेड होते असेही सांगितले .
त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध मानसरोग तज्ञ आठवले यांना बोलाविले .
प्रश्नोत्तरांमध्ये आशिषला त्यांची ट्रीटमेंट चालू होती असे त्यांनी सांगितले. आशिषला वारंवार त्याला कुणीतरी मारण्यासाठी येत आहे असा भास होत असे व त्यावर त्यांची ट्रिटमेंट चालू होती असेही सांगितले .पूर्वी डोक्याला लागलेला मार आणि त्यात भर म्हणून रहस्यकथांचे अतिरिक्त वाचन यामुळे त्याला असे भास होत असत असेही सांगितले .त्याला रहस्यकथांचे वाचन बंद करण्याला सांगितले होते असेही सांगितले.अशा व्यक्तीला सत्य व भास यांच्यामध्ये फरक करता येत नाही .तो भासाला सत्य समजून चालतो . जर गप्पा मारताना सुनंदा तो सुरा हातात घेऊन त्याच्याशी खेळत असेल तर त्याला त्याचवेळी झटका आल्यामुळे ती आपल्याला मारायला येत आहे असे वाटू शकेल. स्वसंरक्षणासाठी म्हणून तिचा हात तो धरील व येथे घडला त्याप्रमाणे अपघात घडू शकेल असेही सांगितले.एवढेच काय पण कालिंदी सुर्याशी खेळत नसतानाही त्याला तसा भास होऊ शकतो असेही सांगितले . त्यांच्या बोलण्याची सत्यता पटवून देण्यासाठी त्यांनी मानसशास्त्रीय पुस्तकातील काही उतारेही जज्ज साहेबांना वाचण्यासाठी दिले .
शेवटी युवराजांनी पुढील प्रमाणे बचावाचे भाषण दिले.
आशिष लहानपणापासून अत्यंत भावनाप्रधान होता .अशा व्यक्तींचा मानसिक तोल चटकन ढळतो.लहानपणी डोक्याला क्रिकेटचा चेंडू लागल्यामुळे अंतर्गत जखम झाली .त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता.त्याचे मानसिक संतुलन चटकन बिघडत असे .जरी वैद्यकीय उपायांनी तो बराचसा बरा झाला होता तरीही तो पूर्णपणे बरा झाला नव्हता .मानसिक असंतुलनाचे काही अवशेष शिल्लक राहिले होते. रहस्यकथांच्या अती वाचनामुळे त्याला आपल्याला कुणीतरी ठार मारायला येत आहे असे भास होऊ लागले .त्यावर उपचारासाठी कालिंदी त्याला डॉक्टर साहेबांकडे घेऊन येत असे .औषधे व उपचार नियमितपणे चालू होते .अश्या व्यक्तीच्या नेहमीच्या व्यवहारांमध्ये मानसिक असंतुलन आहे असे लक्षात येत नाही .तो आपले नेहमीचे व्यवहार व्यवस्थित शहाणपणाने करीत असतो.परंतु एखाद्या वस्तूच्या दर्शनाने एखाद्या विशिष्ट हालचालीने त्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते .त्या दिवशीही हॉलमध्ये चहाची वाट पाहात असताना कालिंदी कदाचित सुर्याशी सहज खेळत असावी.त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे. कालिंदी आपल्याला मारायला येत आहे असे वाटल्यामुळे त्याने प्रतिकारासाठी प्रयत्न केला असावा.व त्यात सुरा लागून कालिंदी मृत्यू पावली.अशा व्यक्तींना उगीचच्या उगीच आपल्याला कुणीतरी मारायला येत आहे असे वाटू शकते.कालिंदीने हातात सुरा घेतलेला असलाच पाहिजे असे नाही . कालिंदीशी त्यांचे कधीही भांडण नव्हते दोघांचाही संसार प्रेमाने चाललेला होता .कालिंदीला हेतूपूर्वक मारण्याचे आशिषला काहीही कारण नव्हते .हा हेतूपूर्वक केलेला खून नाही.वेडाच्या तत्कालीन झटक्यामुळे झालेला अपघात आहे .त्यासाठी आशिषला तुरुंगात नव्हे तर मनोरुग्णालयात दाखल करून योग्य ट्रीटमेंट देण्याची गरज आहे असे म्हणून युवराज बसले .
दुसऱया दिवशी जज्ज साहेबांनी दोन्ही बाजूचा काळजीपूर्वक विचार करून व अशा प्रकारच्या पूर्वीच्या केसेसमध्ये न्यायासनाने दिलेले निकाल पाहून आशिषला निर्दोष म्हणून जाहीर केले .त्याचबरोबर पूर्ण बरे वाटेपर्यंत मनोरुग्णालयात त्याला ठेवावे.पूर्ण बरा वाटल्याशिवाय त्याला मोकळा सोडू नये . असा निकाल दिला .रहस्यकथा वाचनाच्या वेडापायी बिचाऱ्या कालिंदीला आपला जीव गमवावा लागला .
११/२/२०१९©प्रभाकर पटवर्धन