४ हायवे रॉबरी (भाग २)
श्यामरावांना हायवेवर वाटमारी कोण करतो त्याचा काहीही सुगावा लागला नाही.एक दोन दिवस आणखी थांबून ते परत आपल्या ड्युटीवर हजर झाले . तपास चालू आहे असा रिपोर्ट पाठवून दिला .या बाबतीत युवराजांचा सल्ला घ्यावा असे त्यांना वाटले. युवराजांना सर्व हकीगत सांगितल्यावर युवराजही एक दोन दिवस त्या वाड्यातील हॉटेलात राहण्यासाठी गेले . त्यांच्याबरोबर डिटेक्टिव एजन्सीचा सर्वे सर्वा संदेश होता.त्यांनी तो परिसर संपूर्णपणे न्यहाळला.जिथे मोटारी लुटल्या जात असत तो भागही व्यवस्थित पाहिला. शहरात परत आल्यावर त्यांनी शामरावांच्या मदतीने एक योजना आखली.युवराजांनी मोटार एकटय़ानेच चालवत रात्रीचे त्या रस्त्याने जावे .मोटारीत मागच्या बाजूला लपून संदेशने बसावे .श्यामरावांनी अगोदरच तिथे जाऊन झाडीमध्ये दबा धरून बसावे.युवराज अपघातग्रस्त मनुष्य बघण्यासाठी मोटारीतून उतरून गेल्यानंतर त्यांच्यावर होणारा हल्ला रोखण्याची आणि हल्लेखोर पकडण्याची जबाबदारी संदेश व शामराव यांच्यावर होती.
रात्रीची गाडी चालवत युवराज त्या रस्त्याने ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळी रात्री साडेबारा वाजता आले.मोटारीच्या प्रकाशात त्यांना रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त अपघातग्रस्त पडलेली एक व्यक्ती दिसली .युवराजांनी मोटर कडेला घेऊन थांबविली.मोटारीत संदेश व झुडपात शामराव तयारीत होते .युवराज त्या व्यक्तीकडे वाकून पाहात असताना एकाएकी दुसऱ्या बाजूने एक व्यक्ती आली व काही करण्याच्या आत त्याने एक फटका त्यांच्या मानेवर मारला.युवराजांनी शिताफीने तो फटका चुकविला होता .तरीही ते बेशुद्ध झाल्याप्रमाणे रस्त्यावर आडवे झाले.ती व्यक्ती त्यांचे खिसे तपासू लागली . एका बाजूने शामराव व मोटारीतून संदेश हळूच येऊन त्यांनी त्या व्यक्तीवर झडप घातली. त्यांच्या अंदाजापेक्षा ती व्यक्ती चांगलीच सशक्त होती . क्षणार्धात त्यांना बाजूला करून ती व्यक्ती गावाच्या दिशेने सुसाट पळत सुटली .त्याच्या पाठोपाठ संदेश शामराव युवराजही धावत सुटले .धावत धावत ती व्यक्ती राममंदिरात शिरली .आता ती आपल्याला नक्की सापडणार असे तिघांनाही वाटत होते .राम मंदिरात कुठेही ती व्यक्ती मिळाली नाही .जणूकाही राममंदिराने ती व्यक्ती गिळून टाकली होती .
युवराज काळजीपूर्वक राम मंदिराची पाहणी करीत होते .राम मंदिराच्या पाठीमागील गाभाऱ्यामध्ये त्यांना ठोकताना खाली तळघर असावे असे वाटले .ज्याअर्थी तळघर आहे त्या अर्थी खाली उतरण्याचा रस्ता असला पाहिजे म्हणून ते तिघेही गुप्त वाटेचा तपास करू लागले .मूर्तीच्या मागे त्यांना एका फरशीमध्ये किंचित फट आढळली .युवराजांनी ती फरशी बाजूला केली.त्यांना खाली उतरत जाणारा एक जिना दिसला.तिघांनीही भुयारात उतरणे धोक्याचे होते .राम मंदिर रघू शेटच्या मालकीची आहे हे त्यांना अगोदरच हॉटेलमध्ये उतरले असताना माहित झाले होते .आता सरळ वाड्यावर जाऊन रघूशेठला अटक करायची असे त्यांनी ठरविले .राम मंदिर रघू दामूच्या मालकीचे आहे त्या खाली तळघर आहे एवढ्या पुराव्यावर ते दोघे दोषी आहेत असे म्हणता येत नव्हते .फटका मारणारी व्यक्ती पळणारी व्यक्ती त्यांना अंधारात नीट दिसली नव्हती . तळघर रघू किंवा दामूला माहीत नसण्याची एक शक्यता होती.तळघरात भुयार असल्यास ते आणखी कुठेतरी निघण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. वाड्यावर गेल्यावर सर्व उलगडा होणार होता .वाड्यावर राममंदिर तसेच सोडून जाणे धोक्याचे होते .जर केवळ खाली तळघर असेल आणि त्यात ती व्यक्ती लपली असेल तर ती पळून जाण्याची शक्यता होती.
तिघानीही तळघरात उतरण्याचे ठरविले.तिघांनी एकदम उतरणे धोक्याचे होते .प्रथम श्यामरावांनी उतरावे त्यांना संदेश व युवराज यांनी कव्हर द्यावे असे शेवटी ठरले . संदेशजवळ पॉवरफुल्ल टॉर्च होता.त्याचा प्रकाश आत सोडताच खाली तळघर नाही असे आढळून आले .पायऱ्या संपल्यावर पुढे एक वाट काळोखात अदृश्य झाली होती .ही वाट कुठे जाते ते शोधून काढणे आवश्यक होते .तिघेही सावधगिरीने त्या वाटेने पुढे सरकू लागले . त्या भुयारी वाटेवर हवा कोणत्यांना कोणत्या उपायाने खेळती ठेवलेली होती .वाऱ्याची झुळूक मधूनमधून येत होती .थोड्याच वेळात त्यांना एक दरवाजा लागला .तो दरवाजा किल्लीशिवाय उघडता येणे शक्य नव्हते .तो दरवाजा कुठे उघडतो तेही त्यांना माहित नव्हते .गेल्या वाटेने ते तिघेही परत आले .पायऱ्या चढून ते पुन्हा राम मंदिरात आले .आता पुढे काय करावे असा त्यांच्यापुढे प्रश्न होता .
जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांची कुमक घ्यावी तो दरवाजा फोडून कुठे जातो ते पाहावे असा एक विचार मनामध्ये आला .परंतु या सर्वांमध्ये सावज सावध होऊन पळून जाण्याचा संभव होता.राममंदिर रघू दामूच्या मालकीचे असल्यामुळे त्यांची मदत घ्यावी व आवश्यक वाटल्यास त्यांना अटक करावी असे ठरविण्यात आले .पोलीस स्टेशनवरून दोन पोलिस बोलवून राममंदिरातून कुणी पळून जाऊ नये असा बंदोबस्त करण्यात आला .आणि मग ही त्रयी हॉटेल कम वाड्यावर पोहोचली .
वाड्यावर पोहोचल्यावर त्यांनी रघू व दामू यांना बोलवून घेतले.त्यांना सर्व हकिगत सांगितली .राम मंदिराची पाहणी करायची आहे व ते भुयार कुठे जाते तेही पाहायचे आहे असे सांगितले.त्यावर दोघांनीही ते भुयार आमच्या तळघरात येते असे एकाच वेळी सांगितले .वाटमारी कोण करतो व तळघराचा वापर कोण करतो ते आम्हाला माहीत नाही असेही सांगितले .युवराजांना त्यांच्या चेहऱ्यावरून ते खरे बोलत आहेत असे वाटले .तसे असेल तर मग गुन्हेगार कोण हा प्रश्न पुन्हा शिल्लक होता .तळघराची माहिती आणखी कुणाला तरी आहे .तो या तळघराचा वाटमारीसाठी उपयोग करून घेत आहे.किंवा रघू व दामू गुन्हेगार आहेत असा निष्कर्ष निघत होता. हॉटेलमधील सर्व नोकर वाड्यावरील सर्व नोकर यांना त्यांनी एका खोलीत बोलावून घेतले .आणि त्यांच्यावर पोलिसांचा सक्त पहारा ठेवला .ही समस्या सुटल्याशिवाय कुणालाही वाडा सोडून कुठेही जाता येणार नाही म्हणून सांगितले .
रघू व दामूला हे तळघर भुयारी वाट व त्याचा राम मंदिरात शेवट हे तुम्हाला केव्हापासून माहित आहे व त्याचा वापर कसा करता असा प्रश्न विचारला .
त्यावर रघूने सुरुवातीपासून सर्व सांगतो असे म्हणून सर्व हकीकत सविस्तर सांगण्यास सुरुवात केली .
प्रभाकर पटवर्धन