Get it on Google Play
Download on the App Store

५ हायवे रॉबरी भाग ३ (अंतिम)

नानासाहेबांचा मृत्यू ,मृत्यूच्या वेळी त्यांनी उच्चारलेले पा व जी हे शब्द ,त्यावरून दोघांनीही घेतलेला जिन्याचा शोध .त्यातून जिन्यामध्ये  सापडलेले लपविलेले धन.त्याचा योग्य प्रकारे केलेला उपयोग .इत्यादी गोष्टी सविस्तर सांगितल्या . त्याचवेळी एक लहानशी पितळी पेटी मिळाली त्यात एक किल्ली होती .ही गोष्ट ते पुढे विसरून गेले .नंतर केव्हातरी त्यांना ती किल्ली सापडली .    

रघू व दामू यांना ती किल्ली कशाची आहे ते समजत नव्हते.जिन्यामध्ये शिवकालीन शुद्ध सोन्याचे होन सापडले .आणखी कुठेतरी धन लपवून ठेवलेले असावे आणि त्याची ही किल्ली असावी असे त्यांना वाटत होते .ती पितळी किल्ली  जाडजूड जवळजवळ पाच सहा इंच लांब होती .वाड्यांमध्ये कुठे एखादा गुप्त दरवाजा आहे का याचा त्यांनी कसून तपास केला .त्यांना अजून तरी दरवाजा सापडला नव्हता .धान्य साठविण्यासाठी जुन्या काळातील एक मोठे दगडी कोठार होते .त्या दगडी कोठारांमध्ये उतरून कुठे एखादा दरवाजा आहे का याचाही तपास त्यांनी केला होता .हा सर्व तपास त्यांना गडी माणसांना काही कळू न देता मुलांना कळणार नाही अशा पद्धतीने गुपचुप करावा लागत होता .

वाड्याला जुनाट तळघर होते .त्यामध्ये कितीतरी अडगळ साठलेली होती .होन सापडल्यानंतर त्याचे सोनारा मार्फत गुपचूप  पैशात रूपांतर करणे,निरनिराळ्या व्यवसायांमध्ये ते चांगल्या प्रकारे गुंतविणे,वाड्याचे पुनरुज्जीवन पुनर्रचना हॉटेल सुरू करणे ओसाड डोंगरांवर कलमांची लागवड करणे ,इत्यादी कामांमध्ये दोघेही दंग होते .एक छोटी पेटी सापडली ,त्यात एक पितळी किल्ली आहे,ही बाब दोघेही विसरून गेले होते .

एक दिवस कपाटात काहीतरी शोधीत असताना त्यांना ती छोटी पितळी पेटी सापडली .ही किल्ली कशाची याचा शोध घ्यावा असे त्याने मनाशी पक्के केले .त्यांनी तळघराची साफसफाई करून घेतली .त्यामध्ये भरपूर प्रकाश असेल असे दिवे बसविले .वटवाघळे सरपटणारी जनावरे यांचा त्रास होणार नाही असा बंदोबस्त केला.तळघरातील अडगळ बाजूला करीत असताना त्यांना एका भिंतीमध्ये केसासारखी फट आढळून आली.इथे दरवाजा असावा असा संशय त्यांना आला.विटांचे बांधकाम पाडून दूर केल्यानंतर त्यांच्या मागे दरवाजा आहे असे त्यांना आढळून आले.हेतूपुरस्सर तो दरवाजा विटानी बंद करण्यात आला होता .

एका रात्री सर्वत्र शांतता असताना त्यांनी तो दरवाजा पितळी किल्लीने उघडण्याचा प्रयत्न केला .शेवटी तो दरवाजा उघडण्यात त्यांना यश आले .दुसऱ्या दिवशी तो दरवाजा उघडून पुढे आत काय आहे ते पाहावयाचे त्यांनी ठरविले .तो एक भुयारी रस्ता आहे असे त्यांना आढळून आले .भुयारी रस्त्यांमध्ये एकदम शिरणे धोकादायक होते .साप किरडू चावण्याची भीती त्याचप्रमाणे प्राणवायू कमतरता यामुळे धोका संभवत होता .त्यासाठी प्रथम त्यांनी धूप भुयारी रस्त्याच्या तोंडाशी जाळला आणि एक टेबल फॅन भुयारी रस्त्याच्या बाजूला तोंड करून सुरू केला .धूर भुयारी रस्त्यांमध्ये गेल्यावर साप किरडू निघून गेले असते हवा शुद्ध झाली असती.दुसऱ्या दिवशी भरपूर प्रकाशाचा टॉर्च घेऊन काठी वगैरे घेऊन जय्यत तयारीने दोघेही  भुयारामध्ये शिरले.भुयार बरेच लांब होते हवा खेळती राहण्यासाठी काही व्यवस्था केलेली असावी.सुमारे एक किलोमीटर गेल्यानंतर वर जाणाऱ्या पायऱ्या लागल्या .ते भुयार  राम मंदिरात उघडत होते .राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती असलेल्या चबुतर्‍याखाली जिना होता.मूर्तीच्या पाठीमागील फरशीचा भाग सरकवून वर मंदिरात येता येत होते.

ते मंदिर त्यांच्याच पूर्वजांनी बांधलेले होते .संकटकाळी वाड्यातून परस्पर सुटका करून घेण्याची ती व्यवस्था असावी .फरशी जाग्यावर बसवून पुन्हा दोघे जण भुयारातून तळघरात आले.त्यांचा आपापला व्यवसाय व्यवस्थित चालला होता .त्यांना काही खजिना सापडला नाही .ती किल्ली त्यांनी कपाटात ठेवून दिली . व पुढे ते ती गोष्ट विसरून गेले .

वरील सर्व हकीगत युवराजांना व श्यामरावांना सांगून रघूशेठ गप्प बसले.किल्ली घेऊन संपूर्ण भुयारी मार्ग दाखवण्यासाठी ते तयार झाले .त्यांच्या बोलण्यावरून ते खरे सांगत आहेत असे वाटत होते .आणि असे असेल तर मग वाटमारी करणारा कोण भुयारात राममंदिरातून कोण पळून गेला हे प्रश्न शिल्लक राहात होते .जर हे दोघे खरे बोलत असतील तर भुयाराचे रहस्य आणखी कुणाला तरी माहीत आहे असा सरळ सरळ अर्थ निघत होता .युवराजांनी ती किल्ली पाहण्यासाठी मागविली .ती किल्ली  लगेच रघु शेटने कपाटातून काढून दिली.म्हणजे किल्ली चोरीला गेली नव्हती. कुणीतरी त्या किल्लीवरून डुप्लिकेट किल्ली तयार करून घेतली होती.व त्याचा वापर अशा प्रकारे वाटमारीसाठी ती व्यक्ती करीत होती.

रघूशेठचे हॉटेलचे व्यवस्थापक विसाजीपंत हे अत्यंत विश्वासू समजले जात होते .त्यांना सर्वत्र प्रवेश होता .त्यांना ती किल्ली सापडली असावी .त्यावरून त्यांनी डुप्लिकेट किल्ली बनवून घेतली असावी .व नंतर कुणाच्या तरी साहाय्याने वाटमारी सुरू केली असावी .असा अंदाज युवराजांनी बांधला .विसाजीपंत कुठे आहेत म्हणून चौकशी करता ते आपली ड्युटी संपवून घरी गेल्याचे कळले.सर्व जण लगेच विसाजीपंतांकडे गेले.

विसाजी पंतांना ही मंडळी आपल्याकडे एवढ्या लवकर येतील अशी कल्पना नव्हती .ते बेसावध होते .त्यांना चौदावे रत्न दाखविताच ते धडाधडा बोलू लागले .अपघाताने त्यांना किल्ली व भुयाराचा शोध लागला होता .ते व त्यांचे एक स्नेही यांनी वाटमारीची योजना आखली.लुटल्यानंतर ते सरळ आपल्या घरी येत असत .जर यदा कदाचित पाठलाग झाला तरच राममंदिराच्या भुयाराचा लपण्यासाठी ते वापर करीत .सर्वत्र सामसूम झाल्यावर ते पुन्हा वर राम मंदिरात येऊन आपापल्या घरी जात .जर यदा कदाचित आपला पाठलाग झाला तरच किल्लीचा वापर करून भुयारी मार्गाने हॉटेलात यायचे असा त्यांचा प्लॅन असे .रात्री या तिघांनी पाठलाग केल्यावर ते किल्लीचा वापर करून हॉटेलमध्ये आले .नंतर रघूशेठची परवानगी घेऊन घरी आले. आपल्यापर्यंत कुणीही पोहोचणार नाही अशी त्यांची कल्पना होती .वाटमारी करून मिळालेल्या मालापैकी काही माल त्यांनी विकून टाकला होता.उरलेल्या वस्तू त्यांनी काढून दिल्या .दोघांनाही अर्थातच अटक झाली .रघू व दामू यांच्यावरील संभाव्य संकट टळले .

हायवेवरील वाटमारी ही त्यानंतर थांबली हे सांगायला नकोच !!! 

( समाप्त )

१४/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन