१२ मॉल २-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
उगीचच अफवा पसरवतात असा आरोप आपल्यावर ठेवला जाईल.घाबरट भित्रे भागूबाई आहेत असा शिक्का आपल्यावर मारला जाईल .
अश्या निरनिराळ्या प्रकारच्या आशंकांमुळे ते हा अनुभव कुणाजवळही बोलले नाहीत.
सदाशिव सांगत असलेल्या गोष्टींमध्ये मी रंगून गेलो होतो.तो थांबताच मी पुढे विचारले नंतर काय झाले?
तो म्हणाला तुला आणखी एक गोष्ट सांगणे जरुरीचे आहे .ही सर्वसाधरण माहिती आहे .पूर्वी शहर लहान होते. त्यावेळी मरणोत्तर निरनिराळया धर्मांमध्ये प्रेताची जी व्यवस्था केली जाते,त्यासाठी गांवाबाहेर व्यवस्था केलेली होती .हिंदूंसाठी स्मशानभूमी, मुस्लिमांसाठी कब्रस्तान ,ख्रिश्चनांसाठी त्यांचे स्वतंत्र कब्रस्तान,अशी व्यवस्था केलेली होती.या सर्व जागा एकाला एक लागून अशा आहेत.त्यामुळे तो विभाग काहींना भितीदायक वाटतो. शहर वाढल्यामुळे हा सर्व भाग आता शहराच्या मध्यभागी आला आहे. हा मॉल "चौवीस गुणिले सात"(24*7) या भागाला लागूनच आहे.
रात्री बारानंतरची पहाटेपर्यंतची वेळ ही सैतानाची,समंधांची, खवीसाची, अमानवी अस्तित्वांची फिरण्याची वेळ म्हणून ओळखली जाते.
मुलांना आलेला विचित्र विलक्षण अनुभव हा पहाटे दोन ते चार या वेळात होता.
त्यावर मी सदाशिवला विचारले तू मला रात्री उघडा असणारा मॉल बंद कां करण्यात आला ते सांगत होतास.ही मुले तर कुणाजवळ काहीही बोलली नाहीत.मग मॉल बंद कां करण्यात आला?
त्यावर सदाशिव म्हणाला हो मी तेच सांगत आहे.त्याने पुढे बोलण्यास सुरुवात केली .
हा अनुभव आल्यानंतर त्यांनी पुढील काळजी घेतली.रात्री दीड वाजता प्रवेशद्वारावरील रक्षकाला दरवाजा लॉक करण्यास सांगितला. काचेचा दरवाजा असल्यामुळे बाहेर कुणी आला तर लगेच दिसत असे.कुणी ग्राहक आल्यास दरवाजा उघडून त्याला आंत घ्यावा ,पुन्हा दरवाजा लॉक करावा ,अशी व्यवस्था करण्यात आली .रात्रीच्या वेळी डुलकी आल्यामुळे आपल्याला न कळता कुणीही अांत येऊ नये असा उद्देश त्यामागे होता.रात्री एक दीड नंतर सिनेमा नाटक संपल्यावर विशेष ग्राहक नसल्यामुळे हे सहज शक्य होते.
असेच कांही दिवस गेले.दोघेही आयपॅडवर सिनेमा पहात होते.मधून मधून त्यांचे लक्ष मॉनिटरवर होते.अकस्मात त्यांना मॉनिटरवर एका चौकोनात धुराचा स्तंभ दिसू लागला.धूर नाहीसा होऊन त्या ठिकाणी एक सौंदर्यवती दिसू लागली .स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधने ठेवलेल्या एका शोकेस पुढे ती उभी होती.तिचे सौंदर्य वर्णनातीत होते .दोघेही मुग्ध होऊन मॉनिटरमध्ये तिच्याकडे टक लावून पाहत होते. कसे कोण जाणे तिचे त्यांच्याकडे लक्ष गेले.तिने कॅमेर्यात बघून त्यांना डोळा मारला.ते जागच्या जागी उडाले .आपण तिच्याकडे टक लावून पहात आहोत हे तिच्या कसे लक्षात आले तेच त्यांना कळत नव्हते . डोळा मारून दोघांकडे हसून पाहिल्यानंतर ती स्री सौंदर्यप्रसाधने पाहण्यात पुन्हा मग्न झाली.
ती सौंदर्यवती धुराच्या स्तंभातून निर्माण झाली आहे हे त्यांना आठवले .या गोष्टीचा छडा लावायचाच असे त्यांनी ठरविले .पुन्हा मागच्याप्रमाणे दोन बाजूंनी ते त्या शोकेसजवळ आले .त्यांना वाटेत कुणीही भेटले नाही.शोकेसजवळही कुणी उभे नव्हते. त्यांनी स्वच्छतागृहही नीट पाहिले.कुठेही कुणीही नव्हते .त्यांनी सुरक्षा रक्षकाना आंत कुणी आले का? बाहेर कुणी गेले का?असे विचारले.दोघांनीही नाही म्हणून उत्तर दिले .
हा सर्व अमानवी खेळ आहे हे त्यांनी ओळखले. दोघांनाही तेथे रात्री काम करण्याची भीती वाटू लागली.अजूनपर्यंत त्यांना कुणी काही केले नव्हते, परंतु पुढे काय भरंवसा?अशा भुते फिरत असलेल्या जागी काम करणे दोघांनाही धोक्याचे वाटत होते.दोघांनीही राजीनामा देण्याची इच्छा मॉलच्या मालकाजवळ प्रगट केली .मालकाने त्यांना कारण विचारले.मोकळेपणाने त्यांनी त्यांना आलेले दोन अनुभव सांगितले. जर या अनुभवांची वाच्यता झाली तर मॉलमध्ये कुणीही येणार नाही.केवळ रात्रीच्याच नव्हे तर दिवसाच्याही उत्पन्नावर परिणाम होईल, या भीतीने त्याने त्यांना तुम्ही कुठेही याची वाच्यता करू नका म्हणून सांगितले.त्यांचा पगार वाढविण्यात आला.त्यांना त्यांच्या मर्जीतला आणखी एक मदतनीस देण्यात आला.दोन सुरक्षा रक्षकही वाढवण्यात आले
जास्त पगार मिळतो. आणखी एक मदतनीस मिळाला. त्यामुळे ते पुन्हा कामावर रुजू झाले. मॉलच्या मालकाने एक मांत्रिक आणून काही तंत्रमंत्र केले . लिंबू मिरची काळी बाहुली असे काही जुगाड ग्राहकांच्या चटकन लक्षात येणार नाही अशा जागी लटकवण्यात आले.शिवाय गुरुजी बोलावून मंत्र जप जाप्यही करण्यात आले.
असेच कांही दिवस शांततेत गेले.एक दिवस वरच्या मजल्यावर कुणीतरी जोरात धावत आहे असा आवाज येऊ लागला. काऊंटरवरील मॉनिटरमध्ये फक्त तळमजल्यावरील दृश्ये पहाता येणे शक्य होते.वरच्या मजल्यावर काय चालले आहे ते पहाणे शक्य नव्हते.वरच्या मजल्यावरील दिवेही बंद केलेले होते. एका सुरक्षा रक्षकाला घेऊन दोघेजण जिन्याने वर गेले.पोलादी दरवाजा बंद होता .वर कुणीतरी धावत आहे खेळत आहे असे आवाज येत होते.तिघेही थरथर कापत गुपचूप खाली आले .सर्वांनाच येथे काम करण्याची भीती वाटू लागली .सर्वांनाच भक्कम पगार मिळत होता .दोन सुरक्षा रक्षकही वाढवण्यात आले होते .आता चार सुरक्षारक्षक व काउंटरजवळील तीन क्लार्क असे सातजण एकमेकांच्या आधाराने होते .
अजून प्रत्यक्ष त्यांना कुणीही काहीही केले नव्हते.तरीही त्यांना धास्ती वाटत होती .आणखी एखादा अनुभव आणि सर्वजण काम सोडून पळाले असते.
एक दिवस चार रक्षकांपैकी एका रक्षकाला काही वैयक्तिक कारणाने येण्याला उशीर झाला.त्याला चौथ्या माळ्यावरील दिव्यांची उघडझाप होताना दिसली .त्याने इतरांनाही बोलवून ती दाखविली .अकस्मात दिव्यांची उघडझाप निरनिराळ्या माळ्यावर एखाद्या रोषणाईप्रमाणे होऊं लागली.
सर्व जण गुपचुप आत येवून बसले.ते एखादा नवीन अनुभव आला की लगेच मालकाला सांगत असत.मालक त्यांना मॉलची बदनामी नको म्हणून थोपवून धरत असे.
एक दिवस त्यांना वरच्या कुठल्यातरी माळ्यावरून किंकाळ्या ऐकू आल्या.एखाद्याला चाबकाने जिवे मारीत असल्यावर तो जसा ओरडेल तशा त्या किंकाळ्या होत्या.
एक दिवस तर कमालच झाली .मॉनिटरवर त्यांना एका स्त्रीच्या मागे सुरा घेवून एक पुरुष धावताना दिसला.ती स्त्री किंकाळ्या फोडत धावत होती .तो मनुष्य तिला ठार मारण्यासाठी तिच्या मागे धावत होता.ती त्याला चुकवीत होती.शेवटी धावत ती काऊंटर समोर आली.तिच्या मागून तो मनुष्य धावत होता.काऊंटर समोरच त्या नराधमाने(?)तिचे केस पकडले.तिचा गळा एका झटक्यात चिरला.रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या .तिची कापलेली मान रक्तबंबाळ अवस्थेत धडावर लोंबत होती.रक्ताची धार लागलेली असताना तशीच ती सैरावैरा धावत होती.
हे दृश्य पाहून सर्वजण धावत सुटले .ते घरी आल्यावरच थांबले . दोघा तिघांना तर थंडी भरून ताप आला .एक दोघे जण धडपणे काही दिवस बोलू शकत नव्हते .हे सर्व आपापल्या घरी पळून गेल्यावर तळमजल्याचे दरवाजे आपोआप लॉक झाले होते.
मालकाला सर्व हकीगत त्यांनी सांगितली .आम्ही प्राण गेला कितीही पैसे मिळाले तरी मध्यरात्रीनंतर काम करणार नाही.असे निक्षून सांगितले .
रात्रीचा विशेष गल्ला जमत नव्हताच.माझा मॉल चौवीस तास उघडा असतो हे अभिमानाने सांगण्याची एक बाब म्हणूनच तळमजला उघडा ठेवला जात होता .
~विशेष ग्राहक येत नाहीत सबब रात्री बारा ते सकाळी सात मॉल उघडा ठेवला जाणार नाही.~
अशी पाटी मॉलबाहेर लावण्यात आली .
तेव्हापासून हा मॉल रात्रीचा बंद असतो.
आपल्या धंद्यावर परिणाम होऊ नये म्हणून मालकाने ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला.
अशा गोष्टी लपत नाहीत .
उलट सांगोवांगी तिखट मीठ लावून त्या पसरत जातात .
कांही लोकांचा या गोष्टींवर विश्वास आहे तर काहींचा नाही.
शहर झपाटय़ाने वाढत आहे .पिन टू पियानो सर्व गोष्टी या मॉलमध्ये मिळतात.
येथे तुलनात्मक माल चांगला, दर्जा उत्तम व किंमत कमी असते .
सुरुवातीला जरी या मॉलच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी हळूहळू या गोष्टी लोक विसरतात .
आता ही केवळ एक भूतकथा या स्वरूपात सांगितली जाते.
*तरीही शक्यतो या रस्त्याने रात्री बारानंतर कुणी जात नाही.*
*लांबचा पडला तरी दुसऱ्या रस्त्याने लोक जातात .*
*मीही काल रात्री सिनेमाहून येताना दूरच्याच रस्त्याने आलो असतो. *
*गप्पा मारता मारता त्या रस्त्याने आपण आलो .मला ब्रेड आमलेटची आठवण झाली.तू हा मॉल तेवढ्यात बघितलासआणि या सर्व कथेची पुन्हा तुझ्याजवळ उजळणी. झाली .*
*दिवसा या मॉलमध्ये कोणत्याही मजल्यावर कुणालाही काहीही कसलाही अनुभव येत नाही.*
(समाप्त)
१/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन