११ मॉल १-२
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
कांही दिवसांपूर्वी मी माझा मित्र सदाशिव याच्याकडे त्याच्या गावाला नामपूरला गेलो होतो.गाव कसला एक बऱ्यापैकी विस्तारत असलेले ते मोठे शहरच आहे.आमचेकडे ये आमचेकडे ये असा त्याचा बरेच दिवस आग्रह चालला होता.नामपूर शहरात त्याचे छोटेसे घर तर आहेच परंतु जवळच त्याची वडिलोपार्जित शेतीही आहे.त्याच्याकडे चार दिवस रहाण्याच्या इराद्याने मी गेलो होतो.
कांही कामानिमित्ताने त्याचे आई वडील त्यांच्या गांवाला कांटेवाडीला गेले होते.त्याच्या घरी आम्ही दोघेच होतो .रात्री आम्ही सिनेमाला गेलो होतो . सिनेमा पाहून रात्री एकला घरी परत येत असताना, मित्र स्वत:शीच बोलला अर्रर्र आज मी विसरलोच की . स्वाभाविकच मी त्याला तू काय विसरलास आणि तुला आता कशी काय आठवण झाली असे विचारले.त्यावर सदाशिव म्हणाला उद्या सकाळी ब्रेड ऑम्लेटचा नाष्टा करायचा विचार होता .मी ब्रेड अंडी आणायला विसरलो.आता उद्या सकाळीच बाहेर जाऊन मला अंडी व ब्रेड आणावा लागेल.त्यावर मी त्याला म्हटले त्यात काय विशेष, आता जाता जाता एखाद्या दुकानातून खरेदी करू.तुमच्या येथे एखादा मॉल, एखादे दुकान ,रात्री सकाळपर्यंत उघडे असेलच .एवढ्यात आम्ही चालत चालत एका बंद मॉलपाशी आलो .त्या मॉलवर चौवीस गुणीले सात(24*7) असे लिहिलेले होते.ते वाचत मी बोललो येथे तर सदा सर्वकाळ दुकान उघडे असेल असे लिहिलेले आहे . मग हे दुकान बंद कसे ?त्यावर सदाशिव उत्तरला एकेकाळी हा मॉल चौवीस तास व आठवड्यातील सातही दिवस उघडा असे.कांही वाईट अमानवी अनुभव आल्यामुळे रात्री बारा ते सकाळी सात हे हरहुन्नरी (मॉल) दुकान बंद असते.उरलेल्या वेळात म्हणजे सकाळी सात ते रात्री बारापर्यंत मॉल चालू असतो.
स्वाभाविकच मी त्याला कोणता वाईट अनुभव असे विचारले .त्यावर तो म्हणाला इथे वाटेत जाताना नको. आपण घरी पोचलो की मी तुला सविस्तर हकीगत सांगतो.ती एक मोठी कहाणी आहे.मी या वाटेने यायलाच नको होते .गप्पांच्या भरात माझे रस्त्याकडे लक्ष राहिले नाही .
आम्ही घरी पोचल्यावर अंथरुणावर आरामशीर लोळत पसरलो.मी त्याला तो मला कथा सांगणार होता त्याची आठवण करून दिली .मी म्हटले ,चल आता तुझ्या कथेला सुरुवात कर .
त्याने कांही वर्षांपूर्वी मॉलमधील रात्रीच्या नोकराना आलेला विलक्षण विचित्र भीतीदायक अनुभव सांगण्यास सुरुवात केली .
आपण आत्ता येताना पाहिलेला मॉल हा पूर्वी चौवीस तास व आठवड्यातील सातही दिवस उघडा असे.त्यामुळेच त्यावर "चौवीस गुणिले सात" ( 24*7)असे लिहिलेले आहे.त्या मॉलचे हे नाव आहे .
नामपूरमधील हा सर्वात मोठा मॉल आहे.मॉल एकूण पाच सहा मजली आहे . प्रत्येक मजल्यावर एक एक विशेष विभाग आहे .इलेक्ट्रॉनिक्स, तयार कपडे,कापड ,लेडीज विभाग, ड्रायफ्रूट्स,इतर.तळमजल्यावर इतर म्हणजेच सर्वसाधारण विभाग आहे.त्यात ज्याला डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन लागत नाही अशी औषधे व इतर औषधे ,पुस्तके, वर्तमानपत्रे, नेहमी लागणाऱ्या वस्तू उदाहरणार्थ साबण, टूथपेस्ट ,टूथब्रश,लिक्विड सोप, टाल्कम व फेस पावडर, लिपस्टिक इत्यादी,शोकेसमध्ये ठेवलेल्या असतात .शिवाय एक वेगळा मेडिकल स्टोअरही आहे .तो मात्र रात्री बाराला बंद होतो .
हा मॉल सकाळी नऊ वाजता उघडतो व रात्री अकरा वाजता बंद होतो.हिशोब वगैरे पूर्ण होऊन, सर्व दुकाने व्यवस्थित बंद करून,सर्वजण घरी जाईपर्यंत बारा वाजतात.प्रत्येक मजला स्वतंत्रपणे बंद केला जातो.वर जाण्यासाठी लिफ्ट व जिना दोन्ही व्यवस्था आहेत.प्रत्येक मजल्याला स्वतंत्र प्रवेश आहे .तुला एवढे सविस्तर सांगतो याचे कारण पुढे मी जी हकीगत सांगणार आहे त्यासाठी पार्श्वभूमी आवश्यक आहे .
तळमजल्यावर प्रवेश व बाहेर असे दोन मार्ग आहेत . दोन्ही द्वारावर सुरक्षा रक्षक उभे असतात .प्रवेश केल्यावर जिना गच्चीपर्यंत जातो . जिन्याला प्रत्येक मजल्याला आत जाण्यासाठी मार्ग आहे .शेजारीच लिफ्ट आहे .तोही गच्चीपर्यंत जातो .शिवाय तळघरही आहे तिथे माल साठवला जातो .तेथून लिफ्टने तो प्रत्येक मजल्यावर नेला जातो.वर न जाता तसेच पुढे आल्यास तळमजल्यावर प्रवेश करता येतो .येथेही एक काचेचा दरवाजा आहे .तसेच तळमजल्यावरून बाहेर जातानाही काचेचा दरवाजा आहे.
पूर्वी अकरा वाजता वरच्या माळ्यावरील सर्व दुकाने बंद केली जात असत .प्रत्येक माळा स्वतंत्र पोलादी दरवाज्याने बंद केला जाई. फक्त तळमजला चौवीस तास उघडा ठेवला जात असे.तळमजल्यावरील रात्रीच्या नोकरांची ड्युटी रात्री बारा ते सकाळी सात अशी असे.मध्यरात्री बारा ते पहाटे तीन पर्यंत थोडे बहुत ग्राहक असत.तीन ते सात पर्यंत क्वचित एखादा ग्राहक असे .क्लब नाटक सिनेमा इत्यादींवरून घरी जाणारे बारा ते तीन या वेळात त्याना हव्या असलेल्या चिल्लर वस्तू खरेदीसाठी येत.उदाहरणार्थ पुस्तके, वर्तमानपत्रे, व्हिक्स, अमृतांजन, टुथपेस्ट,टूथब्रश,ब्रेड,अंडी,इत्यादी.
या सर्व वस्तू निरनिराळ्या विभागात मांडून ठेवलेल्या असत . ग्राहक प्रवेशदारातून प्रवेश केल्यावर त्याला हव्या असलेल्या वस्तू घेऊन बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या द्वाराजवळ असलेल्या काऊंटरवर पैसे देऊन बाहेर जात असे.दिवसा प्रत्येक स्टॉलवर जरी स्वतंत्र व्यक्ती असली तरी रात्री काउंटरवर फक्त दोघेजण असत .सर्वत्र कॅमेरा बसवलेले आहेत .सीसीटीव्हीच्या द्वारे काऊंटरवर बसलेला मॉनिटरिंग स्क्रीन वर कुठे काय चालले आहे ते पाहू शकतो.मॉनिटरिंग स्क्रीनचे चार भाग पाडलेले आहेत .त्यामुळे एकाच वेळी चार ठिकाणचे दृश्य पाहता येते .मॉनिटरवर असलेल्या बटणांमार्फत निरनिराळे कॅमेरे दाखवीत असले दृश्य पाहता येते.
मी तुला अगोदरच सांगितल्याप्रमाणे सर्व मजले रात्री बाराला बंद केले जात असत .फक्त तळमजला रात्री बारा ते सकाळी सात उघडा राही.त्यावेळी सुरुवातीला काऊंटरवर व प्रवेशद्वार आणि बाह्यद्वार यावर दोन असे चार नोकर असत .
जेव्हा घटना घडल्या तेव्हां सुरुवातीला अजय व सुजय असे दोघेजण होते.दोघेही कॉलेजमध्ये शिकत होते .त्यांच्यामध्ये दाट मैत्री होती .उन्हाळ्याच्या सुट्या सुरू होत्या .काहीतरी काम करावे चार पैसे मिळावेत या उद्देशाने दोघांनीही मॉलमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केला.त्यांना व्यवस्थापनाने मध्यरात्री बारा ते सकाळी सात अशी ड्युटी कराल का म्हणून विचारले .विशेष काम नाही फक्त जागृत राहायचे, एखादा दुसरा ग्राहक आल्यास पैसे घ्यायचे पावती द्यायची,एवढेच काम असल्यामुळे त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारले.
एकाला दोघे सोबतीला होते.दोन सुरक्षारक्षक होते ते निराळेच.प्रवेशदाराचा काचेचा दरवाजा उघडून कुणीही आंत प्रवेश केल्यावर एक घंटी काउंटरवर वाजत असे.त्यामुळे काउंटरवर असलेल्याला कुणीतरी मॉलमध्ये प्रवेश केला हे कळत असेच. कुणी प्रवेश केला ते मॉनिटरवर दिसत असे .निरनिराळे कॅमेरे सुरू करून ग्राहक कुठे काय करत आहे ते अर्थातच मॉनिटरवर पाहता येत असे .प्रत्येक मजल्याप्रमाणे तळमजल्यावरही स्वच्छतागृह होते.स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह होते .
दोघेही नोकरीला लागले.एक दिवस त्यांना स्वच्छतागृहात जाताना कुणीतरी स्री मॉनिटरवर दिसली.प्रवेशद्वारातून कुणीही प्रवेश केल्याची घंटी वाजली नव्हती.तरीही एक स्त्री स्वच्छतागृहात जाताना दिसली याचे त्यांना नवल वाटले.वेळ जाण्यासाठी दोघेही गप्पा मारीत असत.आयपॅडवर आवडता कार्यक्रम किंवा सिनेमा इत्यादी पाहत असत .मोबाइलवरही खेळ चाले .कदाचित त्यांना छोट्या डुलक्याही येत असव्यात .वरील कार्यक्रमात गुंग असल्यामुळे आपल्याला प्रवेशद्वारावरची घंटी ऐकायला आली नसावी, मॉनिटरवर आपले लक्ष गेले नसावे अशी मनाची समजूत त्यांनी करून घेतली .
मात्र मॉनिटरवर ते सतत पाहात होते.त्यांना ती स्त्री बाहेर येताना पाहायची होती .पांच मिनिटे झाली, दहा झाली, अर्धा तास झाला, एक तास झाला,स्वच्छतागृहातून कोणीही बाहेर आले नाही.त्यांच्या अंगावर एक लहानशी लहर येऊन गेली.अंगावर काटा उभा राहिला .दोघांनाही घंटी ऐकू आली नाही .मॉनिटरवर प्रवेश करताना स्त्री दिसली नाही, याची पक्की खात्री होती. ही गोष्ट काहीतरी विचित्र आहे असे त्यांना जाणवले .
त्यांनी प्रवेशदाराजवळील रखवालदाराला आत कुणी स्त्री आली का ते विचारले.त्यानेही कुणीही आत गेले नाही याची ग्वाही दिली.ते सतत स्वच्छतागृहाच्या दारावर लक्ष ठेवून होते.स्वच्छतागृहातून कुणीही बाहेर आले नाही .काउंटरवरही कुणी आले नाही.त्यानी मॉनिटरवरील चार विभागातील तीन विभागात कॅमेरा फिरवून आंत कुठे कुणी आहे का तेही पाहिले.कुठेही कुणीही नव्हते.स्वच्छतागृहात अर्थातच कॅमेरा नव्हता !त्यांना आतील दृश्य पाहता येणे शक्य नव्हते .दोघेही शेवटी धीर करून उठले .दोन बाजूंनी ते त्या स्वच्छतागृहाजवळ आले .त्यांना वाटेत कुणीही दिसले नाही.आता पहाटेचे चार वाजले होते. दोघेही स्वच्छतागृहात जावे की न जावे असा विचार करीत बाहेर थोडावेळ उभे राहिले .स्त्रियांच्या स्वच्छतागृहात प्रवेश करणे अर्थातच निषिद्ध होते.शेवटी धीर करून ते दोघेही आत शिरले.अांत कुणीही नव्हते. सर्व दरवाजे बंद होते. प्रत्येक दरवाजा उघडून चेक करणे आवश्यक होते .कदाचित त्या स्त्रीला हार्टअटॅक वगैरे काहीतरी आल्यामुळे ती बेशुद्ध झाली असण्याची शक्यता होती.
* एवढ्यात एका बंद दरवाज्याआडून फ्लशचा आवाज आला.*
*दोघेही चमकले पुतळ्यासारखे ते जागच्या जागीच उभे राहिले .*
*आंतून कुणीही बाहेर आले नाही.त्यांनी सर्व स्वच्छतागृहांचे दरवाजे उघडून पाहिले .
*आंत कुणीही नव्हते.दोघांनाही पहाटेच्या गारव्यातही घाम फुटला होता.*
*त्यांचा हा अनुभव त्यांनी कुणालाही सांगितला नाही.*
*बोललो तर आपल्याला स्वप्न पडले, भास झाला, इत्यादी ताशेरे आपल्यावर मारले जातील .अकार्यक्षम ठरवून आपल्याला कामावरुन काढले जाईल .*
*उगीचच अफवा पसरवतात असा आरोप आपल्यावर ठेवला जाईल.घाबरट भित्रे भागूबाई आहेत असा शिक्का आपल्यावर मारला जाईल .*
*अश्या निरनिराळ्या प्रकारच्या आशंकांमुळे ते हा अनुभव कुणाजवळही बोलले नाहीत.*
(क्रमशः)
१/७/२०२०©प्रभाकर पटवर्धन