२ भुताची टेकडी २-३
~ विश्वनाथ ~
रात्री मधूचा फोन आला .टेकडीविषयी आणि नेहमीप्रमाणे इतरही सविस्तर बोलणे झाले.
दुसऱ्या दिवसापासून मी टेकडीच्या शोधाला सुरुवात केली.
~मधुसूदन~
काल रात्री फोनची रिंग वाजली .फोन माझा मित्र विसूचा होता .त्या रात्री मी विसूजवळ बोलल्याप्रमाणे त्याने टेकडी शोध मोहीम सुरू केली होती .त्याने त्याच्या ओळखीच्या माणसांना टेकडी शोधण्याबद्दल सांगितले होते.तोही स्वतः वेळ मिळेल त्यावेळी निरनिराळया समुद्रकाठच्या गावांना भेट देत होता .
उजाड टेकडी सापडे परंतु तिच्या तिन्ही बाजूला हिरव्यागार टेकड्या नसत .कधी केवळ डाव्या बाजूला असत. कधी केवळ उजव्या बाजूला असत.कधी केवळ मागे असत .कधी चारी बाजूला हिरव्यागार टेकड्या असत . उजाड टेकडी व तिन्ही बाजूला हिरव्यागार टेकड्या सापडत परंतु समोर समुद्रकाठ नसे .
त्याचा शोध चालूच होता .मी सांगितल्याप्रमाणे टेकडी मिळेल की काय अशी शंका त्याला येऊ लागली होती. शेवटी त्याला मला हवी तशी टेकडी मिळाली .तिचा मालक ती टेकडी विकण्याला तयार होता .अशी बदनाम नापिक उजाड भयाण टेकडी आपल्याजवळ ठेवून तो काय करणार होता?
विसू तसा चतुर .श्रीमंत मनुष्य टेकडी घेण्याला तयार आहे आणि हीच टेकडी त्याला हवी आहे असे कळल्यावर मालकाने उगीचच किंमत वाढवून सांगितली असती .विसूने टेकडीच्या मालकाला पुढील थाप मारली .एका व्यावसायिकाला समुद्रकाठी पर्यटकांसाठी रिसॉर्ट विश्रांतीगृह बांधायचे आहे. तो मुंबईला रहातो.त्याने मला एक टेकडी बघायला सांगितली आहे .त्याला तिथे रिसॉर्ट बांधायचे आहे. समुद्रकाठीच टेकडी पाहिजे याबद्दल तो आग्रही नाही . त्याला कुठलीही टेकडी चालणार आहे .समुद्र जवळ असला म्हणजे झाले .मीच त्याला समोर समुद्र असण्याचे महत्त्व पटवून दिले .समोर समुद्र असल्यामुळे हॉटेलच्या बाल्कनीतूनही सतत समुद्राची गाज ऐकू येईल.चांदण्या रात्री चांदण्यामुळे चमकत असलेले पाणी बाल्कनीतून दिसेल.खोलीतूनही दिसेल.त्यामुळे जास्त पैसे देऊन लोक राहायला तयार होतील. हे त्याला पटवून दिल्यामुळे तो अशी उजाड बदनाम टेकडी विकत घेण्याला तयार झाला आहे .नाहीतर तो या टेकडीची कीर्ती ऐकून दुसरीच कुठली तरी टेकडी बघ असे मला म्हणत होता .जास्त किंमत सांगितली तर तो बिथरेल आणि दुसरी कोणतीतरी टेकडी आणखी कुठल्या तरी गावात विकत घेईल आणि रिसॉर्ट तिथे उभे करील इत्यादी गप्पा मारून त्याने कमी किमतीत टेकडी मिळेल अशी पूर्व तयारी करून ठेवली होती .आता मला प्रत्यक्ष जावून टेकडी पाहून माझ्या स्वप्नातील टेकडी तीच आहे का याची खात्री करून घ्यायची होती .
विसूने मला शक्य तितक्या लवकर येऊन खरेदीखत करावे असे सुचविले होते .
मी फर्मची जबाबदारी असिस्टंटकडे सोपवून दोन दिवसांनी निघणार होतो .
~अण्णासाहेब (मधूचे वडील)~
त्या दिवशी मधू अकस्मात जेवताना म्हणाला .अण्णा मी चार दिवस आपल्या गावाला जाऊन येईन .मी उद्याच निघणार आहे .मधू अकस्मात गावाला जाण्यासाठी कां निघाला असा प्रश्न मला पडला . मी त्याला तसे विचारताच त्याने त्याचे स्वप्न सांगितले .हे स्वप्न त्याला नेहमी मधूनमधून पडते .तशी टेकडी कुठे आहे याची चौकशी करण्यासाठी त्याने विसूला सांगितले होते .त्याप्रमाणे एक टेकडी विसूला मिळाली आहे.ती त्याच्या स्वप्नातील टेकडी असल्यास ती खरेदी करण्याचा त्याचा मानस आहे .त्या टेकडीवर हापूस आंब्याची बाग त्याला निर्माण करायची आहे असे तो म्हणाला.
हे सर्व ऐकल्यावर का कोण जाणे मला त्याला,त्याच्या व आमच्या आयुष्यातील एक सत्य सांगावेसे वाटले.आतापर्यंत आम्ही त्याला सांगावे सांगावे असे वाटत असतानाही ते सत्य सांगण्याला धजलो नव्हतो.तो आम्हाला दुरावेल अशी एक सुप्त भीती कुठेतरी वाटत होती. परंतु आता ते सत्य सांगावेच असे मला कुठून तरी आतून वाटले.
मी त्याला म्हणालो , "तू आमचा मुलगा नाहीस. आम्ही गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी गेलेले असताना समुद्र किनाऱ्यावर फिरताना तू आम्हाला सापडलास .जेव्हा तू सापडलास त्यावेळी तू बेशुद्ध होतास .आम्ही, तुझे आईवडील नातेवाईक शोधण्याचा खूप प्रयत्न केला .पोलिस कम्प्लेंटही दिली.वर्तमानपत्रात जाहिरातही दिली .तुझे आई वडील मिळाले नाहीत.तुझा ताबा घेण्यासाठी कुणी नातेवाईकही आले नाहीत.शेवटी आम्ही तुला दत्तक घेतला .सर्व काही कायदेशीर केले .त्यावेळी तू तीन चार वर्षांचा होता .आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून वाढविला .आम्हालाही मूलबाळ नव्हते .गजाननाचा प्रसाद असे आम्ही तुला समजलो."
"ही गोष्ट कधीतरी केव्हातरी कुणाकडूनतरी तुझ्या कानावर कदाचित आली असती.आम्ही सत्य लपवून ठेवल्याबद्दल तुला त्यावेळी विषाद वाटला असता. म्हणून मी सर्व तुला सांगायचे ठरविले ."
त्याला सत्य हकीगत ऐकल्यावर किंचित धक्का बसला .धक्क्यातून सावरल्यानंतर पुढे तो म्हणाला, "तुम्ही आत्तापर्यंत ही हकीगत मला न सांगितल्याबद्दल विषाद वाटून घेवू नका. अण्णा तुम्ही माझे वडीलच आहात .आई तू माझी आईच आहेस .जन्म देणाऱ्यापेक्षा वाढविणारा, संस्कार करणारा ,पालन पोषण करणारा, मोठा असतो."
त्याला सत्य हकिगत सांगितल्यामुळे आमच्या मनावरील आतापर्यंत असलेले एक अस्पष्ट दडपण नाहीसे झाले.
~ विश्वनाथ ~
त्या दिवशी रात्री मधूचा मी येत आहे म्हणून फोन आला .म्हटल्याप्रमाणे तो लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच्या कारने आला.बरेच दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू आणि किती न बोलू असे अाम्हा दोघांनाही झाले होते .गप्पांमध्ये झोपायला खूप उशीर झाला .दुसऱ्या दिवशी आम्ही ती टेकडी ज्याच्या मालकीची होती त्याच्याकडे गेलो.नंतर आम्ही तिघेही ती टेकडी जिथे होती तिथे गेलो.टेकडी शंभर टक्के पसंत पडली असे मधूच्या चेहऱ्यावर दिसले. मधूने किंमत विचारली .थोडी घासाघीस झाल्यावर शेवटी सौदा पक्का झाला .मधू त्यासाठी दोन दिवस राहिला.कागदपत्र फायनल कायदेशीर करूनच नंतर तो मुंबईला परत गेला.
~ टेकडी~
त्या दिवशी मी आश्चर्यचकितच झाल्ये. आत्तापर्यंत कित्येक वर्षांत कुणीही मनुष्य येऊन माझ्या अंगाखांद्यावर खेळला नव्हता .एखाद्याने तशी हिंमत केलीच तर तो कसा कोण जाणे परंतु गडगडत पायथ्याला जात असे.बहुधा माझ्या अंगाखांद्यावर खेळणारे ते पाच आत्मे त्याला ढकलून देत असावेत असा माझा संशय आहे .त्या दिवशी तीन माणसे माझ्या अंगावर येऊन बसली .त्यातील एकाला भीती वाटत असलेली दिसली .दुसरे दोघेजण निर्धास्त होते .माझ्या आश्रयाला असलेले हे आत्मे यानाही ढकलून देणार असे मला वाटत होते.परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही .सर्वत्र सामसूम होते .ते तिघेजण काही गप्पा मारीत होते.मला खरेदी करण्याचा त्या आलेल्यापैकी एका बाबाचा विचार होता.
माझी मालकी कुणाकडे आहे त्याचे मला काहीही सोयरसुतक नव्हते .माझा ध्यास एकच होता मी हिरवीगार कधी होईन?दुसऱ्या दिवशी पुन्हा दोघे जण माझ्या खांद्यावर येऊन बसले .ते दोघे मित्र होते .विश्या व मध्या म्हणून ते एकमेकांना संबोधित होते.या वेळीही त्या आत्म्यानी या दोघांना ढकलून दिले नाही .
त्या दोघांच्या बोलण्यातून माझ्या अंगावर एक कलमांची बाग उभी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे असे माझ्या लक्षात आले .मी हरीभरी होणार .माझे हिरवेगार होण्याचे स्वप्न पुरे होणार .यामुळे मी पुलकित झाले .आतापर्यंत कुणीही माणूस पशुपक्षी यांना, माझ्या अंगावरील ते आत्मे उभे राहू देत नसत.या बाबांना पाहून त्यांना आनंद झाला असावा .हे दोघे त्यांना आपले वाटत असावेत .मला हिरवेगार करण्यामध्ये ते आत्मे अडथळे आणणार नाहीत याची मला खात्री पटली .
~ मधुसूदन ~
मनासारखी टेकडी मिळाल्यामुळे माझा आनंद गगनात मावेना . मला स्वप्नात जशी टेकडी दिसत असे तशीच ही बरोबर होती .तिन्ही बाजूला हिरवेगार डोंगर होते . समोर समुद्र होता .स्वप्नात जसा खारा वारा अंगावर येत असे तसाच येथे येत होता.या टेकडीचे आकर्षण मला का आहे ते मात्र मला कळत नव्हते .
त्या रात्री मला त्याचा उलगडा झाला .
स्वप्नात दोन व्यक्ती आल्या . दोघांनीही मला मधू म्हणून हाक मारली.ती दोघे माझी रक्ताची आई वडील होती. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही सर्व स्टीमरने जात होतो . अकस्मात मोठे वादळ झाले .स्टीमर लाटेमुळे उपडे झाले.ती सर्व एका सापडलेल्या उपड्या होडीवर चढून बसली. त्या टेकडी समोरील खडकावर येऊन ती होडी आदळली .तेव्हापासून ती पांचजणे त्या टेकडीवर माझी वाट पाहत आहेत .मी फेकला गेलो . त्यानंतर कुठे गेलो, माझे काय झाले,त्यांना माहीत नाही .इतक्या वर्षांनंतरही मी एवढा मोठा झालेला असूनही त्यांनी मला बरोबर ओळखले . आणि म्हणूनच ते रात्री माझ्या स्वप्नात आले .
माझी आई मला म्हणाली," बाळ मधू,आपण सहाजण तू,तुझे दोन भाऊ, एक बहीण व बाबा आणि मी मुंबईहून गोव्याला स्टीमरने जात होतो.तसा समुद्र शांत होता .पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते.अकस्मात तीन मोठ्या लाटा आल्या .जहाज त्यामुळे उपडे झाले . आणि थोड्याच वेळात बुडाले .आम्ही चौघे एका उपड्या होडीवर चढून बसलो होतो .मी दोघांना व बाबांनी दोघांना कपडय़ाने आमच्या छातीजवळ घट्ट बांधून ठेवले होते .तुला आमच्या बरोबर घेण्याच्या अगोदरच तू कुठेतरी दिसत नाहीसा झालास .आम्ही उपड्या होडीवर लटकून तरंगत होतो .एवढ्यात आणखी एक प्रचंड लाट आली आणि आमची होडी एखाद्या कस्पटासारखी त्या टेकडी खालील खडकावर जाऊन आपटली .खडकावर आपटून पाण्यात बुडून आम्हा पाचही जणांचा मृत्यू झाला .तूही बुडालास असेच आम्ही समजत होतो. तरीही तू आम्हाला कुठेतरी भेटशील अशी खात्री आम्हाला वाटत होती.त्या टेकडीवर आम्ही तुझी वाट पाहात होतो .आणि तू आम्हाला भेटलास."
"तू दुरावल्यामुळे आम्ही क्रोधित झालो होतो .त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवसृष्टीला आम्ही टेकडीवर येऊ देत नव्हतो .तू आल्याबरोबर आम्ही तुला बरोबर ओळखले .त्यामुळेच तुझ्याबरोबर असलेल्या दोघांनाही आम्ही टेकडीवर येऊ दिले ."
तिला आणखी काही तरी मला सांगायचे होते परंतु तेवढ्यात घडाळ्याचा गजर झाल्यामुळे मी स्वप्नातून जागा झालो .
(क्रमशः)
१८/१०/२०१९©प्रभाकर पटवर्धन