६ अविश्वसनीय (न उलगडलेले गूढ) १-२
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे जिवंत वा मृत व्यक्तींशी यांचा संबंध नाही यातील संस्थाही काल्पनिक आहेत.साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
हेरंब ढगे हे भारत कन्स्ट्रक्शन कंपनीत फार उच्च पदावर होते .कन्स्ट्रक्शन कंपनीची प्रोजेक्ट्स भारतात निरनिराळ्या ठिकाणी चालू असत.प्रोजेक्ट हेड म्हणून ढगे निरनिराळ्या साईटवर नेहमी जात असत.त्यांचा मुलगा एमबीए होऊन एका कंपनीत उच्च पदावर होता .तर मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती .मुलगी हॉस्टेलवर तर मुलगा आपल्या नोकरीच्या ठिकाणी असत .ढगे व त्यांची पत्नी दोघेही साइटवर रहात.त्यांना स्वतंत्र बंगला नोकर इ.सुविधा कंपनीतर्फे दिल्या जात .
अशाच एका प्रोजेक्टवर ढगे यांची नेमणूक झाली होती . कोकणात जाताना वाटेत एक मोठा डोंगर होता .तो ओलांडल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते .अठरा वीस किलोमीटरचा मोठा घाट होता .त्याला असंख्य वळणे होती .खोल खोल दऱ्या होत्या .या घाटात नेहमी पावसाळ्यात दरडी कोसळून रस्ता बंद होत असे.घाट रस्ता अरुंद होता .पुढील वाहनाला ओलांडून जाणे कठीण असे .घाईघाईत मोटार ओलांडून पुढे जाण्याचे प्रयत्न करताना अपघात होण्याची शक्यता असे .त्यामुळे वारंवार अपघात होत असत .कोकणातील धोकादायक घाटांपैकी हा एक महत्त्वाचा घाट समजला जात असे .घाटात एखादे मोठे वाहन बंद पडल्यास ते वाहन दूर करी पर्यंत घाट बंद ठेवावा लागे.
घाट बंद ठेवल्यानंतर एक पर्यायी मार्ग होता .संपूर्ण डोंगराला वळसा घालत एक रस्ता जात होता .डोंगराच्या पायथ्याला असलेल्या अनेक खेड्यांना तो रस्ता जोडीत असे.हा रस्ता लांबचा तर असेच परंतु प्रत्येक खेडय़ातून हा रस्ता जात असल्यामुळे प्रवासाला खूप वेळ लागे.खेड्यांमधून जाताना अपघात होण्याचाही संभव असे.
या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी व द्रुतगतीने सुरळीत वाहतूक व्हावी म्हणून सरकारने एक आरपार बोगदा खणण्याचे ठरविले .बोगद्याचे काम एकाच वेळी दोन्ही बाजूंनी सुरू होणार होते .बोगदा जवळजवळ चार पाच किलोमीटर लांबीचा होणार होता .भारत कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे काम मिळाले होते. प्रोजेक्ट प्रमुख म्हणून ढगे यांची नेमणूक झाली होती .ढगे यांनी येऊन कार्यभार स्वीकारला . ढगे यांना बंगला ड्रायव्हर नोकर सर्व कंपनीकडून मिळाले होते .त्यांना दोन बंगले मिळाले होते .दोन्ही बाजूनी एकदम काम सुरू होणार असल्यामुळे दोन्ही बाजूला त्यांना बंगले मिळाले होते.कामाच्या गरजेप्रमाणे ते कधी अलीकडच्या तर कधी पलीकडच्या बंगल्यात वास्तव्य करीत असत .
ढगे यांना ड्रायव्हिंगची आवड होती .बर्याच वेळा सौ. व श्री. ढगे पुढे व ड्रायव्हर मागे बसत असे.दोन्ही बाजूला बंगला नोकर खानसामा अशी सर्व व्यवस्था होती . अनेकदा घाट रस्ता पार करावा लागत असल्यामुळे तो रस्ता त्यांना अगदी पायाखालचा सॉरी ओळखीचा मोटारीखालचा झाला होता .पावसाळ्यात या घाटात भरपूर पाऊस व धुके असे .कोकणात सर्वत्र हिरवेगार वातावरण नेहमीच असते त्यातच पावसाळा असला तर कुठे पाहू आणि कुठे नको अशी प्रेक्षकांची अवस्था होत असे.धुक्यामुळे व पावसामुळे रस्ता आणखीच धोक्याचा होत असे.गाडी घसरून दरीत पडण्याची शक्यता असे .जिथे घाटाचा चढ संपून उतार लागत असे तिथे एक आकर्षक बंगला होता.तो बंगला कुणीतरी एका हौशी उद्योगपतीने बांधला होता .तो व्यावसायिक जरी मुंबईला रहात असला तरी अधूनमधून तो येथे येऊन रहात असे.ढगे त्या उद्योगपतीचे मित्र होते .त्याने त्यांना त्या बंगल्यात जेव्हा वाटेल तेव्हा येऊन राहण्याची मुभा दिली होती.त्या बंगल्यातून सृष्टी सौंदर्य अत्यंत मनोहारी दिसत असे .
दोन्ही बाजूला उतरत जाणारा वळणा वळणाचा रस्ता .लांबवर पसरलेले खोरे.बंगल्याच्या पुढच्या बाजूने एक खोरे दिसे तर मागच्या बाजूने दुसरे खोरे दिसे .दोन्ही बाजूंनी अप्रतिम सौंदर्य दिसत असे.केव्हा केव्हा या बाजूला उभे राहावे की त्या बाजूला उभे राहावे असे वाटत असे.दोन्ही बाजूना वर्हांडे होते .तिथे सोफे टाकलेले होते .आरामशीर बसून सृष्टीसौंदर्य पहात न्याहारी घेण्याची चहा घेण्याची सोय होती.ढगे पती पत्नी बऱ्याच वेळा या बंगल्यातही वास्तव्य करीत असत.
निवृत्तीनंतर या बंगल्यात येऊन आपण अधूनमधून राहात जाऊ असे श्रीयुत ढगे सौ. ढगेजवळ म्हणत असत.इथेच एखादा प्लॉट घेऊन बंगला बांधून राहू असेही ते केंव्हा केंव्हा म्हणत असत.असे दिवस महिने चालले होते .दोन्ही बाजूंनी झपाट्याने बोगद्याचे काम चालू होते .बोगदा चौपदरी होता मध्ये डिव्हायडरही होता .मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे घाटातील रस्त्याला एक पर्यायी रस्ताही होता .ज्यावेळी काही कारणाने घाट बंद राहत असे त्यावेळी या रस्त्याचा वापर केला जात असे.एरवी या पर्यायी रस्त्याचा उपयोग त्या वाटेवरील व जवळपासच्या गावांना होत असे.बोगदा जवळजवळ पुरा होत आला होता .तीन चार महिन्यांत त्या बोगद्यातून वाहतूक सुरू झाली असती.
आणि ती दुःखद घटना घडली
पावसाळी दिवस होते .धुवांधार पाऊस कोसळत होता.विजा चमकत होत्या.काही कामासाठी ढगे घाटाच्या रस्त्याने दुसऱ्या बाजूला जात होते.सौ ढगे त्यांच्या बाजूला होत्या व ड्रायव्हर नेहमीप्रमाणे मागे बसला होता .रस्ता ओळखीचा असल्यामुळे ढगे निश्चिंतपणे वळणावळणाचा रस्ता पार करीत होते .तेवढ्यात काय झाले कुणालाही कळले नाही .घाट माथ्यावर असताना वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे किंवा टायर पंक्चर झाल्यामुळे किंवा आणखी काही तांत्रिक कारणामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीने दरीमध्ये उडी घेतली .
त्यांच्या मागून येणार्या एका मोटारीने त्यांना दरीत पडताना पाहिले.ताबडतोब फोनाफोनी झाली .वाईट हवामानामुळे रेस्क्यू वाहन लगेच येऊ शकले नाही .दुसऱ्या दिवशी वातावरण निवळल्यावर दरीमध्ये सर्व बाजूंनी शोध घेण्यात आला.निष्णात माँटेनिअर्स ट्रेकर्स हेलिकॉप्टर यांचा वापर करण्यात आला.शोधाच्या आधुनिक साधनांचाही वापर अर्थातच करण्यात आला .कुठेही मोटारीचा एखादा भाग किंवा ढगे पती पत्नी व ड्रायव्हर यांचा काही पत्ता लागला नाही.ढगे यांच्या मुलाला व मुलीला कळविण्यात आले.कंपनीतर्फे सरकारतर्फे व वैयक्तिक त्यांच्या मुला मुलींकडून शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला .
काहीही सापडले नाही .जणूकाही मोटारीसह तिघेही अदृश्य झाले होते .
(क्रमशः)
४/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन