५ भुतांचा माळ २-२
प्रेरक मनाशी भूत बित सर्व काही झूट आहे म्हणत होता .त्याने बरोबर आणलेले तयार पदार्थ खाल्ले .स्पिरीटच्या दिव्यावर कडक कॉफी करून तो प्याला.स्लीपिंग बॅग वगैरे काढून त्याने झोपण्याची तयारी केली .
एवढ्यात त्याला समोर मंद प्रकाश दिसायला सुरुवात झाली .त्या प्रकाशात त्याला एक महाल दिसत होता .
त्या महालाच्या खिडक्यांतून बाहेर प्रकाश येत होता .तो महाल हळूहळू प्रकाशाने उजळून गेला.प्रेरकचा पहात असलेल्या दृश्यावर विश्वास बसत नव्हता .ज्या वेळी तो तिथे आला त्यावेळी तिथे काहीही नव्हते .रात्र झाली तरीही तिथे काहीही दिसत नव्हते .एकाएकी एवढा महाल कुठून आला ?आपण एखादे स्वप्न तर पाहात नाही ना ?त्याने स्वतःला एक जोरदार चिमटा काढून पाहिला.तो स्वप्नात नव्हता .त्याने या गोष्टीचा छडा लावण्याचा निश्चय केला . भीती हा शब्द त्यांच्या कोषात नव्हता.उठून तो महालाच्या दिशेने चालू लागला.
त्या महालाच्या बाहेर एक छानपैकी कुंपण घातलेले होते .त्याने आपला मोबाईल काढला .महालाचे बाहेरून काही फोटो काढले. कुंपणाचा दरवाजा उघडून तो आत गेला.मुख्य दरवाजाजवळ जाऊन त्याने तो दरवाजा ठोठावला .आतून कुणीतरी चालत आल्याचा आवाज आला .एका नोकराने दरवाजा उघडला .आपल्याला कोण पाहिजे असे मोठ्या अदबीने विचारले .मला मालकांना भेटायचे आहे असे प्रेरकने सांगितले .राजेसाहेब गावाला गेलेले आहेत परंतु छोट्या राणीसाहेब आहेत त्यांना बोलवू का? असे त्या नोकरांने विचारले .चालेल असे प्रेरकने सांगितल्यावर त्या नोकराने प्रेरकला मोठ्या दिवाणखान्यात नेले व बसण्याची विनंती केली .थोड्याच वेळात तो नोकर पाणी घेऊन आला .त्यांने कमरेत वाकून नम्रपणे छोट्या राणीसाहेब थोड्याच वेळात येतील म्हणून सांगितले.या दिवाणखान्याचे काही फोटो घ्यावे म्हणून त्याने आपला मोबाईल पुन: काढला .दिवाणखान्याचे त्याने दोन तीन फोटो घेतले. त्याने महालाचे व दिवाणखान्याचे फोटो व्यवस्थित आले आहेत ना हे चेक केले .
एवढय़ात आतून पैंजणाचा आवाज आला .दिवाणखान्याच्या दरवाजात एक अपूर्व सौंदर्यवती उभी होती .सडपातळ बांधा,सुवर्णाची कांती, भरघोस केशसंभार, पाणीदार डोळे, किंचित उंच मान,सरळ नाक,गोबरे गाल, बेताची उंची ,अशी ती स्वप्न परी वाटत होती .प्रेरकने आत्तापर्यंत असे दैवी सौंदर्य पाहिले नव्हते.तो कोण आहे? तो कुठे आला आहे? तो कशाला आला आहे? हे सर्व तो विसरून गेला .मोहिनी मंत्र टाकल्याप्रमाणे तो तिच्याकडे पाहात बसला .तो काही बोलण्याला सुरुवात करणार एवढ्यात त्या सुंदरीने अगोदर जेवून घ्या नंतर आपण बोलू असे सांगितले .त्यांच्या हाताला धरून भोजनकक्षात नेले .इथे एक लांबलचक शिसवी लाकडाचे टेबल होते .शिसवी लाकडाच्या काळ्याभोर नक्षीदार खुर्च्या बाजूला मांडलेल्या होत्या .टेबलावर भरतकाम केलेले एक कापड अंथरलेले होते.प्रत्येक खुर्चीसमोर टेबलावर भरतकाम केलेले वर्तुळाकार रुमाल होते.त्यावर सुवर्णताट ,शेजारी सुवर्ण तांब्या भांडे ठेवलेले होते .मंद दिवे तेवत होते. सर्वत्र एक अनोळखी दैवी सुवास येत होता.बहुधा अत्तराचे दिवे लावलेले असावेत .
त्या सुंदरीने त्याला खुर्चीवर बसण्याची विनंती केली .नंतर नोकरानी वाढण्याला सुरुवात केली. त्याने तंबूमध्ये स्लिपिंग बॅगमध्ये शिरण्याअगोदर भोजन केले होते.हे तो विसरला होता.त्याने पंचपक्वानाचे भोजन आकंठ घेतले. नंतर तृप्तीची ढेकरही दिली.त्याच्या हातावर सुवासिक पाणी घालण्यासाठी एक नोकर उभा होता .हात धुतल्यानंतर सुगंधी विडाही तिने दिला .नंतर गप्पा मारता मारता तिने तिची दर्दभरी कहाणी सांगितली .
फार फार वर्षांपूर्वी या डोंगरावर एक किल्ला होता . किल्ला लहानसा असला तरी डोंगराच्या विशिष्ट रचनेमुळे अजिंक्य होता.ती इथल्या राजाची कन्या होती.सर्व काही छान चालले असताना एके रात्री खूप मोठे वादळ आले .धुवाधार पाऊस नंतर पडू लागला .प्रचंड वेगाने वारा वाहू लागला .विजा चमकू लागल्या .भूकंप झाला .सर्व महाल अातील लोकांसह गाडला गेला.राजेसाहेब बाहेर गेलेले असल्यामुळे ते या अस्मानी संकटातून वाचले .तेव्हापासून अाम्ही राजेसाहेबांची वाट पाहात आहोत .आम्ही महालाबाहेर जाऊ शकत नाही. यात अडकलेले आहोत. कुणीतरी येईल आणि आम्हाला सोडवील म्हणून वाट पाहात आहोत. तुम्ही दमला असाल आता झोपा म्हणून त्या सुंदरीने प्रेरकला एका खोलीत नेऊन पलंगावर निजण्याची विनंती केली .
मोहित झाल्याप्रमाणे मोहनिद्रेमध्ये असल्याप्रमाणे प्रेरक त्या पलंगावर झोपला.ती सुंदरी त्याचे पद चेपू लागली.तिची सेवा घेता घेता प्रेरकला निद्रा केव्हा लागली ते कळले नाही.
सकाळी प्रेरकला जाग आली तेव्हा तो पोटाशी पाय घेऊन थंडीने कुडकुडत होता.गवतांमध्ये तो झोपलेला होता .आजूबाजूला व त्यांच्या अंगावर दव पडलेले होते .सकाळचा गार वारा अंगावर शहारा आणत होता .त्याने पाहिले तो थोड्याच अंतरावर त्याचा तंबू त्याला दिसला .त्याला आपण स्वप्न पाहिले की सत्य होते तेच कळेना .त्याने मोबाइलवर काढलेले फोटो पाहिले . फोटो दिसत नव्हते .
डोंगर उतरून खाली आल्यावर प्रेरकने एका महंतांची भेट घेतली .त्याला सर्व हकीगत सांगितली .त्याने तिथे तो महाल गाडला केल्यामुळे मृत आत्मे तिथे सुटकेची वाट पाहात आहेत असे सांगितले .अनेक वर्षे गिर्यारोहक त्या डोंगरावर गिर्यारोहण करीत असताना रात्री तिथे तंबू ठोकून राहात असताना कुणालाही काहीही दिसले नाही आणि आता गेली दहा वर्षे असे अनुभव का येतात असे विचारता त्याने पुढील खुलासा केला .
भूकंपामुळे महाल खूप खोल गाडला गेला होता .एवढ्या खोलीतून मृतात्म्यांना बाहेर येणे शक्य नव्हते.अनेक वर्षे जमिनीची धूप झाल्यावर आता तो महाल भूपृष्ठाजवळ आला आहे .त्यामुळे तिथे रात्री राहणाऱ्यांना विचित्र भास होतात .विचित्र दृश्ये दिसतात.विचित्र अनुभव येतात .त्यांच्यावर विधीपूर्वक अग्निसंस्कार केल्यावर ते आत्मे पुढील वाटचाल सुरू करतील आणि त्यानंतर मग रात्री तिथे कुणालाही काही अनुभव येणार नाहीत.
महंतांच्या बोलण्यावर जरी विश्वास असला तरी खात्री करण्यासाठी प्रेरक पुरातत्त्वखात्यांमध्ये गेला . तिथे त्याला एक हजार वर्षांपूर्वी किल्ला असल्याचा पुरावा मिळाला .त्याने वरिष्ठांना भेटून त्या डोंगरावर उत्खनन करण्याची परवानगी मिळविली.पुरातत्त्व खात्यानेही त्याला आवश्यक ती आर्थिक मदतही केली .
*उत्खनन केल्यावर महालाचे व काही माणसांचे अवशेष मिळाले .*
*रत्नजडीत दिवे सुवर्ण ताटे आणि इतर अवशेष पुरातत्व खात्यामध्ये नेण्यात आले .*
* सर्व अस्थी एकत्र करून त्याला मंत्राग्नी देण्यात आला*
* त्यानंतर त्या माळरानावर कधीही केव्हाही कुणालाही काहीही भास झाले नाहीत.*
* अजूनही तो डोंगर भुत़ांचा डोंगर म्हणून ओळखला जातो.*
* वरील छोट्याश्या माळरानाला भुतांचा माळ असे म्हटले जाते.*
* गिर्यारोहक बिंनधास्तपणे त्या भुतांच्या माळरानावर रात्री थांबतात .*
(समाप्त )
९/५/२०१९©प्रभाकर पटवर्धन