३ स्वप्न मालिका
जस्मिनला गेले दोन महिने मधून मधून एकाच प्रकारची स्वप्ने पडत होती .एकाच प्रकारची म्हणजे एकच स्वप्न असे नव्हे .ज्याप्रमाणे एखाद्या टीव्ही सीरियलमध्ये आपण हळूहळू पुढे मार्गक्रमण करीत असतो.कथानक हळूहळू पुढे सरकत असते .त्याच प्रमाणे तिच्या स्वप्नामध्ये ती हळूहळू पुढे मार्गक्रमण करीत होती. अजून तरी तिला स्वप्नांमध्ये भीती वाटत नव्हती.एक प्रकारे ती तिची स्वप्ने एन्जॉय करीत होती. अजूनही तिला पहिल्या स्वप्नापासून आतापर्यंत सर्व स्वप्ने व्यवस्थित आठवत होती .पहिल्या स्वप्नामध्ये ती झोपेतून उठून अंथरुणावर बसली नंतर तिने आपले कपडे बदलले आणि ती चालू लागली .हळूहळू ती दरवाज्यापर्यंत आली व तिने दरवाजा उघडला.इथे तिचे स्वप्न संपले. नंतर तिला गाढ झोप केव्हा लागली तेही कळले नाही.सकाळी उठल्यावर मात्र तिला पडलेले स्वप्न व्यवस्थित आठवत होते .बर्याच वेळा आपल्याला काही स्वप्ने पडतात परंतु उठल्यानंतर त्यांची आठवण राहात नाही.फक्त काहीतरी चांगले किंवा वाईट स्वप्न पडले एवढीच आठवण राहते. जस्मिनला मात्र तिची सर्व स्वप्ने व्यवस्थित आठवत होती .
तिचे पुढचे स्वप्न पहिले जिथे संपले तिथून पुढे चालू होई.दुसर्या स्वप्नांमध्ये ती दरवाजा उघडून बाहेर आली व रस्त्याने चालू लागली.तो रस्ता टेकडीकडे जात होता .ती टेकडी तिला माहिती होती. .त्यावरती एक देवीचे मंदिर आहे असे तिने ऐकले होते .ती ख्रिश्चन असल्यामुळे देवळात आपणहून ती कधी गेली नव्हती .तिच्या बऱ्याच मैत्रिणी हिंदू होत्या.त्यांच्याबरोबर कधी कधी ती एखाद्या मंदिरापर्यंत जात असे .क्वचित आत जाऊन ती मूर्तीचे दर्शनही घेत असे .मैत्रिणी नमस्कार करीत त्याप्रमाणे नमस्कार करून ती प्रदक्षिणाही घालीत असे .परंतु या टेकडीवरील मंदिराकडे कधी जाण्याचा प्रसंग तिच्यावर आला नव्हता .ती ज्या रस्त्याने निघाली होती तो रस्ता टेकडीकडे जातो हे तिला माहीत होते .तिचे आई वडील ख्रिश्चन होते आणि त्यांच्याबरोबर ती दर रविवारी चर्चमध्ये जात असे.
तिच्या जवळ स्कूटर होती मोटर होती दोन्ही तिला चालवता येत होत्या तरीही ती स्वप्नामध्ये टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालत जात असे .दोन चार दिवसांनी पुन्हा तिला स्वप्न पडे आणि ते स्वप्न त्यापूर्वीचे जिथे संपले तिथून पुढे चालू होई.तिला तो रस्ता माहित असण्याचे कारण म्हणजे त्याच रस्त्याने ती पुढे युनिव्हर्सिटीमध्ये जात असे .तो रस्ता टेकडीला वळसा मारून युनिव्हर्सिटीकडे जात होता.तिला प्रथम स्वप्नामध्ये आपण युनिव्हर्सिटीकडे चालत जात आहोत असेच वाटत होते .पंधरा वीस दिवसांत चार पाच स्वप्नामध्ये ती टेकडीच्या पायथ्यापर्यंत आली .पुढच्या स्वप्नामध्ये ती युनिव्हर्सिटीच्या रस्त्याला लागण्याऐवजी टेकडीच्या रस्त्याला लागली .तेव्हा तिला आपण टेकडीकडे व बहुधा टेकडीवरील मंदिराकडे जात आहोत असे वाटू लागले .अजून तरी भीतीदायक असे काहीही घडले नव्हते. एक प्रकारे झोपताना ती आता आज स्वप्न पडणार की नाही आणि पडल्यास कसे पडेल याचा विचार करीतच बहुधा झोपी जात असे .
एकदा ती आपल्या वडिलांजवळ स्वप्नांबद्दल बोलली. वडिलांनी म्हणजे पपानी ते स्वप्न हसण्यावरी नेले .आई वडिलांची ती एकुलती एक होती .पप्पांची ती फारच लाडकी होती .ती जेव्हा आईजवळ स्वप्नाबद्दल बोलली त्यावेळी आईने झोपताना सैल कपडे असावेत,उताणे झोपू नये.झोपताना दोन्ही हात छातीवर ठेवू नयेत .पाणी पिऊन झोपावे.झोपताना क्रॉस करावा.मेरीचे स्मरण करावे. गळ्यातील लॉकेट मध्ये जो क्रॉस आहे त्याला हात लाऊन स्मरण करावे. झोपताना क्रॉससकट लॉकेट गळ्यात ठेवावे.अशा काही सूचना केल्या.जोपर्यंत तिला भीती वाटत नव्हती तोपर्यंत त्या स्वप्नांचे कुणालाच काही विशेष वाटत नव्हते.जस्मिनला तर आता पुढे केव्हा स्वप्न पडणार आणि त्यात काय दिसणार याची उत्सुकता असे .
टेकडीवर मंदिराकडे जाणारा रस्ता वळणावळणाने वरपर्यंत गेला होता .तो मोटारीचा रस्ता होता .दुसरा एक रस्ता पायऱ्या पायऱ्यांचा होता .त्याने ट्रेकिंग करीत टेकडीवर जाता येई.पुढच्या स्वप्नामध्ये तिने मोटारीचा रस्ता सोडून दिला व ती पायऱ्यांच्या रस्त्याकडे वळली .एक दिवस म्हणजे एका रात्री स्वप्नामध्ये ती पायऱ्या चढू लागली. पायऱ्या ताशीव घोटीव काळ्या व पांढर्याअशा होत्या .एक काळी नंतर पांढरी पुन्हा काळी अशाप्रकारे त्या पायऱ्या टेकडीवर जात होत्या .पायऱ्यांना दोनही बाजूला धरण्यासाठी कठडा होता.ती अजूनपर्यंत आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा एकटीच कधीही टेकडीवर किंवा टेकडीवरील मंदिरात गेली नव्हती .शेवटी एका स्वप्नामध्ये तिची टेकडी संपूर्ण चढून झाली .त्यानंतर तिने आपल्या हिंदू मैत्रिणीना टेकडीवर जाणारा रस्ता कसा आहे ते विचारले.त्यांनी वर्णन केलेला रस्ता व तिला स्वप्नात दिसलेला,ती वरती चढून गेलेला रस्ता एकच होता .
स्वप्न पडू लागल्यानंतर तिला अनेकदा आपण टेकडीवर जावे .रस्ता कसा आहे ते पहावे .मंदिर पाहावे. मूर्ती पहावी.असे वाटले होते परंतु आपण जे पाहिले तेच आपल्याला दिसले असे होऊ नये म्हणून ती मुद्दाम अनेकदा मनात येऊनही टेकडी चढून मंदिरात गेली नव्हती .मैत्रिणींना विचारल्यावर तिला स्वप्नात दिसलेला रस्ता व मैत्रिणीनी वर्णन केलेला रस्ता दोन्ही एकच आहेत असे ऐकून तिला आश्चर्य वाटले .स्वप्नात पायऱ्या चढताना तिने मुद्दाम पायऱ्या मोजल्या होत्या.त्या एकूण एकशेपंचाहत्तर होत्या.त्याही बरोबर जुळल्या.आता अापण स्वप्नात मंदिरात केव्हा जाणार याची तिला उत्सुकता होती .
एक दिवस तिची ती उत्सुकता पूर्ण झाली ती मंदिरात देवीच्या मूर्ती पुढे उभी होती .देवी वाघावर स्वार होती .तिने आपल्या सहा भुजामध्ये वेगवेगळी शस्त्रे घेतली होती .दोन उरलेल्या हातामध्ये एकात कमळ व दुसरा वरदहस्त स्वरूपात होता .देवीच्या पायाखाली राक्षस होता. तिने आपल्या हातातील त्रिशूल त्या राक्षसाच्या छातीत खुपसलेला होता. आणि राक्षसाच्या छातीतून रक्त वाहत होते.जरी तिने पूर्वी अशी देवीची मूर्ती टीव्ही सीरियलमध्ये किंवा मैत्रिणीच्या घरात तसबिरीमध्ये पाहिली असली तरी तिला त्यावेळी भीती वाटली नव्हती.आता मात्र स्वप्नात तिला भयंकर भीती वाटली व ती किंचाळून ओरडत उठली .झोपेतच ती हातपाय झाडत होती. किंचाळत होती. तिचे किंचाळणे ऐकून तिचे मम्मी व पप्पा आपल्या खोलीतून धावत आले.व त्यांनी तिला जागे केले .
तिने आपले स्वप्न सविस्तर सांगितले ती अजून त्या मंदिरात गेलेली नसूनही तिला तसे स्वप्न का पडले याचे त्यांना आश्चर्य वाटले .दुसऱ्या दिवशी तिला ते डॉक्टरांकडे घेऊन गेले.डॉक्टरने तपासून सर्व काही ठीक आहे म्हणून सांगितले व गाढ झोप लागण्यासाठी एक औषध दिले.
नंतर काही दिवसांनी तिला पुन्हा तसेच स्वप्न पडले परंतु या वेळी वाघावर देवी स्वार नसून त्या ठिकाणी कुणीतरी एक मनुष्य,उग्र मनुष्य स्वार होता त्याच्या पायाखाली तिचे पप्पा होते व त्यांच्या छातीत त्रिशूळ मारलेला होता .यावेळी ती भयानक किंचाळून ओरडत उठली .मम्मी पप्पाना तिची काळजी वाटू लागली.ते तिला घेऊन मनोविकारतज्ज्ञकडे गेले .त्यानेही तपासून काही प्रश्न विचारून तिला जुजबी औषधे दिली .
आता तिची स्वप्ना बद्दलची उत्सुकता संपली होती .तिला स्वप्नांची गंमत वाटत नव्हती . पूर्वी झोपताना आज काय स्वप्न पडणार?पडणार की नाही? अशी जी उत्सुकता असे ,ती संपूर्ण नाहीशी झाली होती .उलट तिला आता झोपण्याची भीती वाटू लागली होती. तिच्या खोलीत तिची आई तिच्या सोबतीला झोपू लागली होती . तरीही तिला रात्री पुन्हा स्वप्न पडलेच.या वेळी तिला स्वप्नात एकदा देवी वाघावर व पायाखाली राक्षस असे दिसे,तर दुसऱ्याच क्षणी एक राक्षसासारखा माणूस वाघावर व पायाखाली तिचे पप्पा असे दिसे.तो राक्षसासारखा माणूस कुठे तरी पाहिलेला आहे असे तिला वाटत होते .या वेळीही ती भयानक किंचाळून जागी झाली व तिने तिचे स्वप्न मम्मी पप्पांना सांगितले .
आता स्वप्नाने गंभीर वळण घेतले होते .तिचे पप्पा नामांकित वकील होते .अनेक फौजदारी केसेस त्यांनी यशस्वीपणे सोडविल्या होत्या .गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या मंडळींची त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमीच ये जा असे .त्यातील काही गुन्हेगार असले तरी गुन्हेगार वाटत नसत तर काही उग्र चेहर्याचे राकट व आडदांड असत.असे चेहरे तिने लहानपणापासून पाहिल्यामुळे तिला अशा प्रकारचे स्वप्न पडत असावे असे डॉक्टरांचे म्हणणे होते .पप्पांच्या एका मित्राने त्यांना एका मांत्रिकाचे नाव सुचविले .तो कदाचित या स्वप्नाचा अर्थ उलगडू शकेल असे त्याने सांगितले .त्या मित्राचा त्या मांत्रिकाबद्दलचा अनुभव चांगला होता.
जस्मिनला घेऊन तिचे पप्पा त्या मांत्रिकांकडे गेले .त्या मांत्रिकाने सर्व हकिगत ऐकून घेतली .काही आकडेमोड केली .एक दोन पुस्तकांची काही पाने चाळून पाहिली .व त्या स्वप्नांचा पुढीलप्रमाणे अर्थ सांगितला .तो म्हणाला
या जगात न पटणाऱ्या गोष्टी बऱ्याच आहेत .तार्किकतेच्या कसोटीवर व उपलब्ध ज्ञानाच्या कसोटीवर त्या खर्या वाटत नाहीत . परंतु त्या अस्तित्वात असतात .कधीही न पाहिलेले मंदिर,पायऱ्या, जस्मिनच्या स्वप्नात का आल्या सांगता येणार नाही.ती ख्रिश्चन असूनही हिंदू देवता तिच्या स्वप्नात का आली तेही सांगता येणार नाही.तिला हे स्वप्न का पडले?तिच्या मम्मीला किंवा पप्पांना का नाही? सांगता येणार नाही.परंतु मला या स्वप्नाचा जाणवलेला अर्थ पुढीलप्रमाणे आहे .
तिला स्वप्नात जो राक्षसासारख्या चेहऱ्याचा माणूस दिसतो त्याच्याकडून पप्पांना धोका आहे. जस्मिनला जर तो चेहरा नीट आठवत असेल तर तिने तुमच्याकडे येणार्या अशिलांवर व इतरांवर लक्ष ठेवावे त्यात त्या चेहऱ्याचा माणूस सापडेल. त्याच्यापासून तुम्हाला धोका संभवतो. कदाचित ती व्यक्ती तुमच्याकडे अजून यायची आहे .भविष्यात ती तुमच्याकडे येईल .तो कदाचित तुमचा खून करण्याचा प्रयत्न करील.याहून मी जास्त काही सांगू शकत नाही .तुम्ही योग्य ती काळजी घ्या . स्वप्नाने, देवीने, मंदिराने,हेच सूचित केले आहे .तुमचा विश्वास असो किंवा नसो आहे हे असे आहे .
जस्मिनला रेखाचित्रे चांगली काढता येत असत .ती चित्रकलेच्या क्लासलाही एक दोन वर्षे जात होती .तिला तो स्वप्नातील चेहरा व्यवस्थित आठवत होता .तिने त्याचे चित्र काढले .अजूनपर्यंत तरी त्यांच्याकडे त्या चेहऱ्याचा कुणी माणूस आलेला नव्हता.
लवकरच तशा चेहऱ्याचा एक माणूस त्यांच्याकडे सल्ला मसलतीसाठी आला .त्याला पाहताच वकील साहेब सावध झाले.तो माणूस ,ज्याला त्यानी आपल्या वकिली कौशल्याने तुरुंगात पाठविले होते, त्याचा भाऊ होता.सल्ला मसलत हा त्याचा बहाणा होता .वकील साहेबांना अद्दल घडविणे हा त्याचा उद्देश होता .वकील साहेबानी टेबलाखालील बेलचे बटण दाबले.ती ऐकून बाहेर उभा असलेला त्यांचा रक्षक ,बॉडीगार्ड आत आला .त्या सल्लामसलतीसाठी आलेल्या माणसाने बोलता बोलता वकीलसाहेबांवर झेप घेतली. त्याच्या हातात सुरा होता. वेळीच वकीलसाहेबांच्या रक्षकाने त्याला मागून पकडले. त्याला नि:शस्त्र केले.पोलिसांच्या ताब्यात त्या हल्ला करणाऱ्याला देण्यात आले .
*तूर्त तरी वकीलसाहेबांवरील प्राण संकट टळले*
*मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे जस्मिनला तशी स्वप्न मालिका का पडली सांगणे अशक्य आहे*
१२/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन