७ राजधानी एक्स्प्रेसमधील बॉम्ब १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. यातील पात्रे काल्पनिक आहेत. साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
पोलिस कमिशनरना त्यांच्या डायरेक्ट लाईनवर फोन आला .आताच सुटलेल्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला आहे.मला पन्नास लाख रुपये शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात हवे आहेत .नोटा वापरलेल्या असाव्यात .नोटा सलग नंबर नसलेल्या असाव्यात .बॅग कुठे द्यायची ते मी पुन्हा कळवीन.राजधानी एक्स्प्रेस थांबवून बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न केल्यास मी बॉम्ब रिमोट कंट्रोलने उडवीन. माझा हस्तक राजधानी एक्स्प्रेसमध्ये आहे. तो माझ्याशी संपर्कात आहे. अशा परिस्थितीत पॅसेंजरच्या मृत्यूंना तुम्ही जबाबदार राहाल .असे म्हणून फोन लगेच कट केला .
पोलीस कमिशनरनी टेबलावरील एक बटण दाबून आतांचा फोन कुठून आला ते तात्काळ शोधण्यास सांगितले .
फोनवरील बोलणे ऐकून पोलिस कमिशनर हादरले.
दहशतवाद्यांच्या मागण्या पूर्ण करणे जरुरीचे होते .अन्यथा राजधानी एक्स्प्रेसमधील हजारो पॅसेंजर्सचे प्राण धोक्यात आले असते .त्याचबरोबर या दहशतवाद्याला पकडणेही गरजेचे होते .पोलिस कमिशनरनी मुख्यमंत्र्यांना हॉटलाईनवर फोन लावला.मुख्यमंत्री महत्वाच्या कामात असल्यामुळे त्यांच्या पीएने फोन उचलला.पीएला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले.त्याने मुख्यमंत्र्यांना लगेच फोन दिला.कमिशनरनी सर्व हकीगत थोडक्यात सांगितली .मुख्यमंत्र्यांनी काळजी करू नका मी लगेच तुम्ही सांगितलेल्या स्वरूपात पन्नास लाख रुपये तयार ठेवतो असे सांगितले .त्याचप्रमाणे गुन्हेगाराला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा असेही सांगितले .तुम्हाला आणखी काही मदत हवी असल्यास लगेच सांगा त्याची पूर्तता करू असे सांगून कमिशनरना आश्वस्त केले. आपल्या पीएला दहशतवाद्यांच्या मागणीप्रमाणे त्या स्वरूपात नोटा भरलेली बॅग तयार ठेवण्यास सांगितले .
कमीशनरनी लगेच दुसरा फोन शामरावांना केला. शामराव स्पेशल ब्रँचचे प्रमुख होते.त्याना ही केस टॉप प्रायॉरिटी समजून सर्व फोर्स कामाला लावा म्हणून सांगितले. एखादेवेळी कुणीतरी केवळ गंमत म्हणून फोन केला असेलही परंतु आपण तो गंभीरपणे घेतला पाहिजे असेही बोलणे झाले .
फोन कुठून आला कोणत्या नंबरवर आला ते सर्व्हिस प्रोव्हायडर मार्फत लगेच शोधून काढण्यात आले .पोलिसांची गाडी त्या व्यक्तीला पकडण्यासाठी निघाली .
कबीर एका मेडिकल दुकानासमोर उभा होता .एवढ्यात पोलिसांची गाडी तिथे येऊन थांबली .पाच सहा पोलिस त्या दुकानाला गराडा घालून थांबले .तेथील प्रत्येकाचा फोन त्यांनी चेक करायला सुरुवात केली .ते प्रत्येकाला फोन ओपन करायला सांगून नंतर चेक करीत होते .कबीरचा फोन बघितल्याबरोबर त्यांनी कबीरला अटक करून गाडीत बसविले. दोन पोलिसांनी अक्षरश त्याची पालखी करून त्याला धसमुसळेपणाने पोलीस व्हॅनमध्ये बसविले गाडी पोलिस स्टेशनच्या दिशेने निघाली .पोलिसांची गाडी येते काय आणि चौकशी करून कबीरला उचलून नेते काय सर्वजण अचंब्याने बघत राहिले होते.
पोलिस स्टेशनमध्ये आल्याबरोबर त्याला पोलिसांनी दमात घेतला .राजधानी एक्स्प्रेसमध्ये तूच बॉम्ब ठेवला ना ?तूच पोलीस कमिशनरना फोन केला ना ? तुझी गँग कुठे आहे?तुझा बॉस कोण ?सर्व प्रश्नांची खरी खरी उत्तरे दिलीस तरच वाचशील नाहीतर तुझे काही खरे नाही . प्रश्नांची सरबत्ती ऐकून, पोलिसांची पोलिसी स्टाईल दमबाजी ऐकून ,कबीर पूर्णपणे गोंधळून व घाबरून गेला.पोलिसांचा राकट हात त्याच्या खांद्यावर पडला आणि तो त त प प करू लागला. एवढ्यात एक जण म्हणाला अरे त्याला आंत घ्या .पोलिसी हिसका दाखविल्याशिवाय तो काही बोलणार नाही.
तो काकुळतीने गयावया करीत म्हणाला अहो मी काहीही बेकायदेशीर केलेले नाही .तुम्ही काय म्हणत आहात ते मला कळत नाही .मी कमिशनरना ओळखत नाही. त्यांचा फोन नंबर माझ्याजवळ नाही. कोणती गॅंग?कोणता बॉस?मी एक साधा ऑफिसमध्ये काम करणारा कारकून आहे. मी प्रामाणिक व सभ्य नागरिक आहे .हवे असेल तर माझ्या शेजारी पाजारी चौकशी करा .माझ्या ऑफिसात चौकशी करा .माझ्या ऑफिस प्रमुखाजवळ चौकशी करा.तुम्ही काय बोलता ते मला मुळीच कळत नाही .त्याचा चेहरा पाहून पोलिसांनाही काहीतरी गोंधळ होत आहे असे वाटले .पोलिसांना नेहमी गुन्हेगारांचे चेहरे पाहायची सवय असते .दर्दी पोलिसांना चेहऱ्यावरील भाव लगेच कळतात .शामराव हे सर्व शांतपणे पाहात होते . शामराव म्हणाले की याने फोन केला असेल असे वाटत नाही काहीतरी गडबड आहे.
कबीरच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सोय होती एकाने तो फोन कबीरला ओपन करायला सांगितला . कॉल रेकॉर्डिंग सुरू करायला सांगितले . त्यातून सुरुवातीला सांगितलेला आवाज स्पष्ट येऊ लागला .त्यावर कबीर पटकन म्हणाला तुम्ही माझा अावाज एेका हा आवाज माझा नाही .मी मेडिकल दुकानाच्या समोर उभा असताना एक मनुष्य माझ्याजवळ आला .त्याला काही औषधे घ्यायची होती.त्याने औषधे खरेदी केल्यावर आपले खिसे चाचपले तो मला म्हणाला .मी माझा फोन आणायला विसरलो.मला जरा तुमचा फोन द्याल का?मला महत्त्वाचा एक कॉल करायचा आहे मी तुम्हाला त्याचे पैसे देईन .तो गृहस्थ सज्जन वाटल्यामुळे मी त्याला माझा फोन ,कॉल करण्यासाठी दिला .तो थोडा बाजूला जाऊन फोन करीत होता .तो काय बोलला ते मला माहीत नाही.मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो .त्याने लगेच मला फोन आणून दिला. एकदा तो काय बोलला ते ऐकावे असे मला वाटले परंतु ते सभ्य गृहस्थांचे कृत्य होणार नाही असे लक्षात आल्यामुळे मी तो मोह टाळला .
सुदैवाने ऑफिसात ध्वनीतज्ञ हजर होता. त्याने कबीरचा आवाज व धमकी देणाऱ्याच्या आवाजाची तुलना केली . कबीरचा आवाज व कमिशनरजवळ बोलणाऱ्याचा आवाज निरनिराळे होते असे स्पष्ट मत नोंदवले .मात्र लिखित स्वरूपात मत हवे असल्यास पूर्ण खात्री करून ते उद्या देईन असेही सांगितले . इतरांनाही त्या दोन आवाजामध्ये फरक आहे असे लक्षात आले होते .पोलिसांनी त्याला तू त्या गृहस्थाला ओळखशील का? म्हणून विचारले .त्यावर त्याने हो म्हणून सांगितले.फोन करणाऱ्या व्यक्तीने वेषांतर नक्की केलेले असणार त्यामुळे कबीर त्याला ओळखू शकेल असे पोलिसांना वाटत नव्हते.
कबीरला पुन्हा असा कोणाला फोन देत जाऊ नकोस गोत्यात येशील असा दम देऊन सोडून देण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून त्याच्यावरही लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.पोलिसांची सर्व खटपट व्यर्थ गेली होती .पोलिस सुरुवातीला जिथे होते तिथेच होते.गुन्हेगाराला पकडण्यासाठी आणि त्याप्रमाणे त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे गरजेचे होते .हजारो पॅसेंजर्सचे प्राण धोक्यात होते .
(क्रमशः)
९/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन