४ अकस्मात (भाग २)
राय
आमचा मुलगा हरवल्यानंतर हिची प्रकृती ठीक नव्हती .विशेषतः मानसिक स्वास्थ्य जास्त बिघडलेले होते .जसा काळ लोटला तसा तिला हळूहळू विसर पडला .परंतु आत कुठेतरी दुःखाचा सल होताच .शेट्टी व शिरसाट यांनी हा मुलगा तुमचा मुलगा असावा असे म्हटल्यापासून तिच्या आशा पल्लवीत झाल्या .शेखर पंधरा वीस दिवस काही ना काही कारणाने फूड पॅकेट्स घेऊन आमच्याकडे येत होता .त्याची उंची वर्ण व हातावर गोंदलेले श्रीकृष्णाचे चित्र हे सर्व पाहून तो आमचाच मुलगा असावा असे आम्हाला वाटू लागले.बनारसची त्याला इत्थंभूत माहिती होती .तरीही खात्री करून घेण्यासाठी मी बनारसच्या अनाथाश्रमागृहांमध्ये चौकशी केली.त्यांनी हा मुलगा बनारसच्या घाटावर सापडला वगेरे वगेरे सर्व सांगितले.एकंदरीत आमची खात्री पटली .मिसेसने तर पहिल्या दिवसापासून हा आपलाच मुलगा आहे असे खात्रीलायक सांगितले. माझा स्वभाव थोडा संशयी आहे .पूर्ण खात्री पटल्याशिवाय मी विश्वास ठेवीत नाही .जरी मी शेखरचा मुलगा म्हणून स्वीकार केला तो घरात राहू लागला तरीही माझी त्याच्यावर बारीक नजर होती .मुलगा चांगला वाटत होता. विश्वासू होता.मी त्याची दोन तीन वेळा परीक्षाही घेतली त्यात तो संपूर्णपणे उत्तीर्ण झाला .तरीही आर्थिक व्यवहार मी त्याच्यावर सोपविले नव्हते. माझे धंद्याचे व्यवहार तो व्यवस्थित सांभाळीत होता. मुलगा प्रेमळ विश्वासू चांगला वाटत दिसत होता .
सौ.राय
या मुलाला मी पाहिला तेव्हा तो माझा मुलगा आहे हे मी ओळखले .इतक्या वर्षांनंतर माझा मुलगा मला पुन्हा परत भेटेल असे मला कधीच वाटले नव्हते.त्याला कुठे ठेऊ आणि कुठे न ठेवू असे मला झाले होते .यांनी खात्री करून घेतल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी तो आमच्याकडे राहण्यासाठी आला .त्याला खाऊ पिऊ घालण्यात न्हाउ माखू घालण्यात मला परमानंद होत होता .प्रथम प्रथम तो संकोचत असे परंतु नंतर तो आमच्या घरातीलच एक झाला. खरे म्हणजे हे घरच त्याचे होते .हे मात्र अधूनमधून त्याच्याबद्दल संशय प्रगट करीत असत .यांचा हा संशयी स्वभाव मला मुळीच आवडत नाही .एक दिवस हा आपला मुलगा नाही म्हणून यांनी त्याला घराबाहेर काढले नाही म्हणजे पुरवले .
नंदिनी
त्या दिवशी मी त्याला पाहिले आणि मी तर त्याच्या प्रेमातच पडले .कोण कुठचा जात काय धर्म काय कुठून आला कुठे जाणार आहे किती दिवस राहणार आहे काही माहित नाही .माझ्या बाबांचे हॉटेल आहे .नेहमी अनेक कस्टमर्स येत असतात जात असतात .आम्ही हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर राहतो .आमच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट आहे .आमची इच्छा असेल तर एखाद्या मजल्यावर आम्हाला थांबविता येतो .अन्यथा आम्ही एकदम वरच्या मजल्यावर जातो .बाकी दुसर्या कुणलाही हा लिफ्ट वापरता येत नाही.आम्ही व आमच्याकडे येणारे पाहुणे यांच्यासाठी हा लिफ्ट आहे .नोकरांसाठी मागून वक्राकार जिना आहे .
त्या दिवशी लिफ्टने खाली उतरून मी माझ्या कारजवळ जात होते .तेवढ्यात एक ओला येऊन हॉटेलच्या पोर्चमध्ये थांबली .त्यातून एक उंचापुरा रेखीव नाकेला तरुण एक दोन बॅग घेऊन उतरला .हॉटेलमध्ये कस्टमर असेल म्हणून मी दुर्लक्ष करू शकले नाही .तो चेक इन करीत असताना माझे वडीलच तिथे काऊंटरवर होते .मॅनेजर कुठेतरी बाहेर गेला होता .मी नंतर वडील काऊंटरवर नसताना जाऊन पुस्तक पाहिले .त्यामध्ये शेखर म्हणून एंट्री केलेली होती .मला तो मुलगा आवडला असला तरी एक दोन दिवसांत तो नेहमीप्रमाणे कुठेतरी इतर कस्टमर्स प्रमाणे निघून जाईल म्हणून मी दुर्लक्ष केले .आठ दिवस झाले तरी तो मुलगा तिथेच होता .पुढे एक दिवस मी त्याला आमच्या डिलिव्हरी व्हॅन मध्ये गाडी चालविताना पाहिला .बाबांनी त्याला नोकरीवर ठेवला असे लक्षात आले .
मी मग त्यांच्याशी सहज म्हणून ओळख करून घेतली .तो बोलण्या चालण्यात सभ्य व सुसंस्कृत वाटला .आमचे बोलणे चालणे भेटणे हळूहळू वाढू लागले .त्यालाही मी आवडत आहे हे माझ्या हळूहळू लक्षात आले .तीन चार महिन्यानी तो दुसरीकडे राय कुटुंबीयांकडे राहायला गेला .त्यानंतर तर आम्हाला जास्तच मोकळेपणाने भेटता येऊ लागले .रॉय कुटुंबीयांचा तो हरवलेला मुलगा आहे असे पुढे मी बाबांच्या तोंडून ऐकले .त्या बाबतीत त्याला विचारता त्याने मला लहानपण आठवत नाही म्हणून सांगितले .मुरली वाजविणाऱ्या कृष्णाचे हातावरील गोंदलेले चित्र व बनारसमधील अनाथाश्रमातील वास्तव्य याशिवाय त्याला काही लहानपणचे आठवत नव्हते .बनारस बद्दल याशिवाय तो जास्त काही बोलण्यास तयार नव्हता .
माझ्या वडिलांचे सर्वच व्यवसाय स्वच्छ नाहीत हे मला माहीत आहे .ते किती खोल पाण्यात आहेत ते मला माहीत नाही .मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे .ही सर्व प्रॉपर्टी माझीच आहे .असे असूनही तो माझ्याकडे पैशासाठी आकृष्ट झाला असे अजिबात वाटत नाही .अर्थात राय कुटुंबीयही कोट्याधीश आहेत .त्यामुळे त्याला आमच्या प्रॉपर्टीचे आकर्षण वाटत नसणार हे उघडच आहे .रॉय काकांचा तो मुलगा आहे हे त्याला कळण्य़ाअगोदरही तो माझ्याकडे पैशांसाठी आकृष्ट झाला होता असे वाटत नाही .
बनारसचा विषय मात्र तो कटाक्षाने टाळतो .केव्हाही चर्चा निघाली की तो सफाईने त्या बोलण्याला बगल देतो .आता जवळजवळ आठ दहा महिने होत आले तरीही तो अजून बनारसला गेला नाही .आपण एकदा बनारसला जाऊया असे मी त्यांच्याजवळ म्हटल्यावर त्याने तो विषय बदलला.बनारसच्या त्याच्या स्मृती कटू असाव्यात असे वाटते .किंवा बाबांप्रमाणे तो खोल पाण्यात तर नाही ?काही कळत नाही .तो आता बोलत नसला तरी एक ना एक दिवस मला तो सर्व प्रामाणिकपणे सांगेल अशी मला खात्री आहे .येथेही त्याची काही गडबड नाही ना अशी मला मधूनमधून शंका येते .पाहूया काय होते ते परंतु आम्ही एकमेकात जास्त जास्त गुंतत जात आहोत एवढे खरे .ही गोष्ट माझ्या आईबाबांच्या लक्षात आलेली आहे . बाबा त्याबद्दल काही बोलले नाहीत त्या अर्थी त्यांची मूकसंमती असावी असे मला वाटते
शेखर
मी संभ्रमात पडलो आहे .मी आई बाबांवर खरेच प्रेम करू लागलो आहे .लहानपणी अनाथाश्रमात वाढल्यामुळे मला कुटुंब म्हणजे काय व कौटुंबिक प्रेम काय असते ते मुळीच माहीत नाही.आई एवढ्या प्रेमाने माझ्याशी वागते कि मला तिला फसविणे अशक्य आहे .बाबा अजूनही माझ्यापासून थोडे अंतर राखून आहेत .मी जसे माझे सर्व पत्ते उघड केलेले नाहीत त्याप्रमाणे त्यांनीही अजून त्यांचे सर्व पत्ते उघड केलेले नाहीत असे मला वाटते .विषाची बाटली मला अजून समोर गुप्त ठिकाणी ठेवलेली दिसत आहे .ती शेट्टीच्या सांगण्याप्रमाणे मला आई बाबांना देणे अशक्य आहे .वेळ पडल्यास मी ती स्वतःच घेईन .शेट्टीशीही मला कठोर वागता येत नाही .कारण ते शेवटी नंदिनीचे बाबा आहेत .हळूहळू मी प्रेमाच्या जाळ्यात गुंतत चाललो आहे .एकीकडे आई बाबा व दुसरीकडे नंदिनी यांमध्ये मी पार गुरफटून गेलो आहे .मी आता संपूर्णपणे बदललो आहे .आता इथेही मी कोणत्याही काळ्या धंद्यांमध्ये नाही .राय कुटुंबीयांचे बरेच व्यवहार मला माहीत झाले आहेत .बाबांनी बऱ्याच गोष्टी माझ्याकडे सोपविल्या आहेत .त्यांचे सर्व व्यवहार स्वच्छ दिसतात.माझ्या मागील काळ्या भूतकाळाची छाया माझ्यावर आहे.नंदिनीला किंवा आई बाबांना मी किती काळ असाच फसवत राहणार .आता जास्त फसवणे मला शक्य नाही .एक दिवशी सर्वकाही सर्वांना सांगून टाकावे असे मला वाटते .मग जे काही होईल ते होईल .फार तर काय मी पुनः फूटपाथवर येईन.जिथे होतो तिथे तर मी येईन .पण या सज्जन माणसांना फसविणे अशक्य आहे .नंदिनी मधूनमधून बनारसचा विषय काढते .मी तो विषय सफाईने टाळतो .माझ्या चेहर्यावरील भाव ती बारकाईने निरखीत असते .माझा भूतकाळ असावा तितका स्वच्छ नाही असे तिच्या बहुधा लक्षात आले असावे असे वाटते .मी सर्व काही केव्हा तरी सांगेन अशी तिला खात्री दिसते .ती बहुदा त्याचीच वाट पाहत असावी .मला आई बाबांकडे व नंदिनीकडे सर्व स्वच्छ करून टाकावे असे वाटते .परंतु प्रथमच मिळालेल्या या प्रेमाला मी मुकेन की काय अशी मला भीती वाटते.मी द्वंद्वात सापडलो आहे .मला केव्हा केव्हा रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोप येत नाही.हा ताण आता असह्य होत आहे .
केतन
मी व माझे मित्र मुंबईला सहज फिरण्यासाठी आलो होतो .चार दिवस जिवाची मुंबई करावी नंतर परत जावे असा आमचा मनसुबा होता.आमचे टोळके चौपाटीवर भेळ खात असताना मी अकस्मात दचकलो.एक दोन स्टॉल पलीकडे शेखर कुणातरी मुलीबरोबर भेळ पाणीपुरी खात होता.त्या दिवशी तो मला भोसकून पळाला तो कुठे गेला ते माहीत नव्हते.आता मुंबईला बरा सापडला .मी बहुधा मेलो असे समजून तो घाबरत असावा.मी जर त्याच्या दृष्टीस पडलो तर तो ताण मुक्त होईल.आपण तर त्याच्या दृष्टीस पडता कामा नये .पण तो कुठे राहतो काय करतो हे जाणून घेतले पाहिजे .त्या दिवशी तो तीन लाख रुपये घेऊन पळाला .शिवाय त्याने मला भोसकले.मी मरता मरता वाचलो .बचावलो म्हणा. मला निसटते सुदैवाने लागले .तरीही मला पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले .या सगळ्याची भरपाई झाल्याशिवाय मी त्याला सोडणार नाही .तो कुठे राहतो काय करतो ते जाणून घेतले पाहिजे .त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे .पण मी तर त्याला दिसता कामा नये .मी मेलो असे त्याला वाटले पाहिजे .म्हणजेच माझ्या मित्रांना त्याच्याकडून भरपूर वसुली करता येईल .आणि आम्हा सर्वांना आणखी मौज करता येईल .त्याला ठार मारण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही परंतु त्याला आर्थिक पिळून काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे .मी मित्रांना सोडून त्यांच्या पाठोपाठ निघालो .तेवढ्यात एका मोटारीत बसून तो निघून गेला .मी त्याचा पाठलाग करू शकलो नाही .मोटार उंची होती. मुलगी सुंदर श्रीमंत वाटत होती .इथे येऊन त्याने चांगले बस्तान बसविलेले दिसत आहे .आज नाही उद्या परंतु मी तो कुठे राहतो काय करतो हे नक्की शोधून काढीन.त्याला पुरा धुतल्याशिवाय आम्हाला समाधान वाटणार नाही .मी परत आल्यावर मित्रांनी मला एकदम कुठे धावत गेलास म्हणून विचारले. मी त्यांना सर्व सांगितल्यावर आम्ही आणखी काही दिवस मुंबईत राहून त्याचा शोध घेण्याचे ठरविले .त्याचा हिशेब चुकता केल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असे आम्ही पक्के ठरविले .
शेखर
त्या दिवशी मी नंदिनी बरोबर चौपाटीवर फिरायला गेलो होतो .भेळ खात असताना मला अकस्मात ती आमची बनारसची टोळी दिसली.त्यात केतनही होता.मी तो केतनच आहे ना म्हणून खात्री करून घेणार एवढय़ात त्याचे माझ्याकडे लक्ष गेले असे मला वाटले .त्याला मी दिसणे व कुठे आहे ते कळणे सर्वच धोकादायक आहे .तो केतनच होता असे मला नक्की वाटत आहे.जर तो केतन असेल तर माझी खुनाच्या आरोपातून सहीसलामत सुटका होते.जर त्याने मला पाहिले असेल तर मला धोका संभवतो .मला तो केतनच आहे ना त्याची खात्री करून घेतली पाहिजे.एकूण माझ्यावरील ताण वाढत चाललेला आहे . मी ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो जी माझ्यावर जिवापाड प्रेम करतात अशा आई बाबा व नंदिनी यांच्यापासून आता काही लपविणे अशक्य आहे .उद्या मी नंदिनीला व आई बाबांना सर्व काही स्पष्ट सांगून टाकणार आहे .मग जे काही व्हायचे असेल ते होऊ दे.त्याचप्रमाणे केतन व त्याच्या टोळीला शोधून काढणे आवश्यक आहे हे दोन संकल्प सोडले आणि मी बरेच दिवसांनी पहिल्यांदाच शांतपणे अंथरुणावर झोपी जाण्यासाठी आडवा झालो
( क्रमशः)
५/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन