५ अकस्मात (भाग ३)
राय
सकाळी सकाळी शेखरने बाबा मला तुमच्या जवळ काही बोलायचे आहे म्हणून सांगितले .त्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी गंभीर मामला आहे असे वाटत होते .आणि ते तसेच निघाले .त्याने आईलाही हाक मारी आणि दोघांनाही बसा म्हणून सांगितले .त्याने जे काही सांगितले त्यामुळे तिला मोठा धक्का बसला .मलाही थोडा धक्का बसला. परंतु काहीतरी संशय माझ्या मनात अगोदरच होता .शिरसाट वकील असे काही करील असे मला कधीच वाटले नव्हते .आणि त्याला साथ त्या शेट्टीची होती .शेट्टी साधा माणूस नाही याची मला कल्पना होती.परंतु तो इतका बदमाश असेल असे मला वाटले नव्हते .दोघांनीही कट करून हा मुलगा माझ्या घरात घुसवला होता . लहानपणी कुंभ मेळ्यामध्ये अलाहाबादला माझा मुलगा हरवला ही गोष्ट यांना माहिती होती. त्याच्या हातावर मुरली वाजवणाऱ्या कृष्णाचे चित्र आहे हेही त्यांना माहीत होते .या माहितीचा उपयोग करून त्यांनी या मुलाच्या हातावर तसेच चित्र गोंदवले .ते गोंदण आम्हाला दिसेल अशा प्रकारे त्या मुलाला वारंवार आमच्या घरी पाठविले.आमच्या मनात हा आमचा मुलगा आहे अशी भावना निर्माण होईल अशी एकूण रचना केली.आम्ही अल्लाद त्यांच्या जाळ्यात फसलो.
शेखरने प्रामाणिकपणे ही सर्व हकिगत आम्हाला सांगितली.तोही हा धोका स्वीकारण्यासाठी तयार नव्हता परंतु पैशांच्या लोभाने व या आयुष्यात स्थैर्य येईल या आशेने त्याने ही योजना स्वीकारली.शेखर एवढेच सांगून थांबला नाही .बनारसला अनाथाश्रमातून बाहेर आल्यानंतर त्याने केलेल्या उचापती गैरधंदे गुंडागर्दी जुगार वगैरेही गोष्टी सांगितल्या .जुगारामध्ये झालेले भांडण त्यातून त्याने केलेल्या एका तरुणाचा खून त्यातून त्याच्यावर इतर तरुणांनी केलेला हल्ला आणि म्हणून बनारस मधून रेल्वेने पलायन व मुंबईत आगमन इत्यादी सर्व गोष्टी सांगितल्या .तुम्ही जर सांगत असाल तर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून जातो असेहि त्याने सांगितले .त्याचा प्रामाणिकपणा बघून मला आनंद झाला .त्याने पुढे बनारसला खून झाला नव्हता हेही सांगितले .त्याला ते टोळके चौपाटीवर भेटले इत्यादी हकीकतही त्याने सांगितली.त्याच्या हातून खून झाला नव्हता हे ऐकून मला अतिशय आनंद झाला .मी त्याला अभय दिले .तू आहेस तसाच आमचा मुलगा म्हणून इथे काही दिवस तरी राहा म्हणून सांगितले. बनारसच्या टोळक्याचे काय करता येईल ते पाहू .त्याच प्रमाणे केतन याच्या हातावर काय गोंदण आहे व तो आमचा मुलगा आहे की नाही याची आम्ही खात्री करू असेही पुढे सांगितले .तूर्तास आहे तसेच सर्व चालू दे असे मी त्याला सांगितले .त्याचे बोलणे ऐकून माझी बायको मात्र संपूर्ण हादरून गेली होती .ती त्याला आपला मुलगा समजत होती .तिने त्याचा संपूर्ण स्वीकार केला होता .आणि आता त्याला दूर करायचा हे तिला फार कठीण वाटत होते .तो केतन कि कोण त्याची पुन्हा परीक्षा पाहावयाची हे सर्व तिला जड जात होते .ती रडवेली झाली होती .शेखरला ते पाहावेना .तो तिच्या जवळ जाऊन तिचे सांत्वन करू पाहात होता .पहिल्यांदा तिने त्याला दूर ढकलले परंतु नंतर थोड्याच वेळात त्याला आपल्या कुशीत घेतले .हे सर्व पाहून आणि शेखरचा एकूण गेल्या चार सहा महिन्यातील स्वभाव व प्रामाणिकपणा लक्षात घेऊन मी जरी केतन किंवा आणखी कुणाचा मुलगा म्हणून स्वीकार केला तरी शेखरचाही दुसरा मुलगा म्हणून स्वीकार करायचा हे मनोमन निश्चित केले.
नंदिनी
त्या दिवशी शेखरचा फोन आला आणि मला जरा आश्चर्यच वाटले .त्याने मला तुझ्याजवळ काही अत्यंत महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगितले .एवढ्या सहा महिन्यांच्या सहवासानंतर महत्त्वाचे बोलणे म्हणजे काय ते माझ्या लक्षात आले. तो मला प्रपोज करणार हे मी ओळखले .त्या वेड्याला माझा होकार आहे हे माझ्या तोंडून ऐकायला पाहिजे होते .प्रत्यक्ष आमची जेव्हा जुहूला भेट झाली त्यावेळी त्याने सांगितलेली हकिगत ऐकून मला धक्काच बसला . ज्याला मी सज्जन सुस्वभावी व प्रामाणिक समजत होते तो एक बनारसचा खून करून पळालेला नामचीन चालू जुगार खेळण्यात अट्टल असलेला मुलगा होता हे त्यांनेच त्याच्या तोंडाने सांगितले व शेवटी माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे परंतु तुला सर्व हकीगत मला सांगितली पाहिजे आणि नंतर जर तू माझा स्वीकार केलास तर मी मला भाग्यवान समजेन असा सिनेमॅटिक शेवट केला .मीही विचारात पडले .माझे त्याच्यावर पहिल्यापासून खरेच प्रेम होते.तरीही मी त्याला मला विचार केला पाहिजे असे सांगितले. त्याने बाबा तो व शिरसाट यांनी रचलेली योजना मला सांगितली होती ती ऐकून मी स्तिमित झाले होते .त्याने सर्व हकिगत रॉय यांना सांगितलेली आहे ते विचार करून निर्णय घेणार आहेत हेही त्याने मला सांगितले .जर राय यानी तू घर सोडून जा म्हणून त्याला सांगितले तर त्याला ना घर ना दार ना कुटुंब ना नोकरी ना पैसा ना प्रतिष्ठा कुठच्या कुठे तो फेकला गेला असता .मला थोडा विचार करूनच निर्णय घेणे जरूर होते .
सौ.राय
हा माझा मुलगा होय मी अजूनही त्याला माझा मुलगाच मानते असा निघेल असे स्वप्नातही वाटले नव्हते .सर्व हकीगत ऐकूनही मला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम आपुलकी जिव्हाळा मुळीच कमी झाला नाही. मी यांना स्पष्ट सांगितले की तो माझाच मुलगा आहे जर आपला हरवलेला मुलगा सापडला तर मी मला दोन मुले आहेत असे समजेन.आणि मी तो विषय तिथेच संपवला आता यांना जे काय करायचे असेल ते करू दे .
आय.जी.पी.मुधोळ
काल मला राय साहेबांचा फोन आला .राय व मी एक वर्गात शिकत होतो .आम्ही एकमेकांना अरे जारे म्हणतो .त्याला त्याचा मुलगा सापडला याबद्दल आम्हा सर्व मित्रांना आनंद होत होता .राय चिकित्सक आहे. लहानपणापासून कोणतीही गोष्ट पारखून घ्यायची त्याची सवय आहे .मुलाला स्वीकारण्यापूर्वी त्याने नक्कीच त्याची चौकशी केली असणार .परंतु रायवहिनींपुढे तो निष्प्रभ होतो. त्यांच्यावरील प्रेमामुळे तो त्या म्हणतील त्याप्रमाणे बर्याचवेळा निर्णय घेत असतो.त्यांचा मुलगा हरल्यापासून त्या फारच हळव्या झाल्या आहेत. फोनवर त्याने मला सांगितलेल्या गोष्टी ऐकून अचंबा वाटला .हा त्यांचा मुलगा असा दसनंबरी असेल असे वाटले नव्हते .आता मला पूर्ण चौकशी केली पाहिजे. बनारसचा पोलीस प्रमुख माझ्या ओळखीचा आहे .तिथे जाऊन चौकशी केली म्हणजे सर्व उलगडा होईल .यात्रे परी यात्रा मित्रा घरी पाहुणचार प्रवास सर्वच एकत्रित होईल .
केतन
आम्ही आठ दिवस मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी फिरत होतो परंतु शेखरचा आम्हाला कुठेही सुगावा लागला नाही .त्या दिवशी आम्ही फोर्टमध्ये मेट्रोमधून सिनेमा पाहून बाहेर पडत होतो आणि आम्हाला एका इन्स्पेक्टरने अडविले व थोडी चौकशी करायची आहे म्हणून जीप जवळ नेले.आम्ही थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हालाही विशेष काही करता येणे शक्य नव्हते .आम्ही बनारसमध्ये काळ्या यादीत असलो तरी इथे आम्हाला कुणी अडविल चौकशी करील असे वाटत नव्हते.इथे आम्ही अगदी सभ्य टूरिस्ट सारखे वागत होतो .जुगार अड्डय़ावर जावे असे वाटत असूनही आम्ही कधीही तिकडे गेलो नव्हतो .बनारसलाही काही लफडे करून आम्ही इकडे आलो नव्हतो .आम्हाला पोलीस चौकीवर नेण्याचे व चौकशी करण्याचे काहीच कारण नव्हते.पोलीस चौकीवर नेल्यावर आम्हाला एका प्रशस्त खोलीमध्ये नेण्यात आले.तिथे एक मध्यम वयाचे करड्या नजरेचे इन्स्पेक्टर बसलेले होते . ते मुंबई पोलीस प्रमुख आहेत असे नंतर कळले .त्यांच्या प्रश्नांवरून त्यांना आमच्याबद्दल बरीच,बरीच काय सर्वच माहिती होती असे लक्षात आले. लपवाछपवी करण्यात काहीही अर्थ नव्हता . आम्ही अगोदरच खोल पाण्यात होतो .जास्त खोल पाण्यात जाण्यात अर्थ नव्हता .आम्ही धडाधडा सर्व कबूल केले .आम्ही मुंबईत कोणताही गुन्हा केला नव्हता .बनारसला सुद्धा एवढ्यात काही गडबड केली नव्हती .त्यांना माझ्या हातावर गोंदलेल्या रामाबद्दल कुतूहल दिसले .ते गोंदण पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा जरा रिलॅक्स झालेला वाटला .त्यांनी मुंबईत तुम्ही किती दिवस राहणार आहात अशी चौकशी केली .इथे कमी जास्त काही केले तर तुम्हाला महाग पडेल असा दमही दिला .दोन तीन तासांच्या खडतर कडक चौकशी नंतर आम्हाला पुन्हा मेट्रो सिनेमाच्या दारात आणून सोडण्यात आले .मला चौपाटीवर दिसलेला शेखर असेल किंवा नसेल त्यासाठी मुंबईत जास्त दिवस घोटाळण्यात अर्थ नाही हे आमच्या लक्षात आले.आम्ही खोलीवर आल्यावर तिकिटे बुक करून दोन दिवसांतच निघण्याचे ठरविले .
दुसऱ्या दिवशी आम्ही रूमवर बसलेले असताना कुणीतरी दरवाजावरील बेल वाजविली.दरवाजा उघडतो तो प्रत्यक्ष शेखर त्याच्याबरोबर एक मध्यमवयीन गृहस्थ व खुद्द त्या दिवशी आमची पोलीसचौकीत चौकशी केलेले इन्स्पेक्टर आत शिरले .आत आलेल्या त्या गृहस्थांनी एकूण परिस्थितीचा ताबा घेतला .त्यांचे मुंबईत एकूण चांगल्यापैकी वजन असावे असे लक्षात आले .त्यांनी प्रथम स्वतःची ओळख रायसाहेब म्हणून करून दिली .शेखरची ओळख हा माझा लहानपणी हरवलेला मुलगा म्हणून करून दिली .बनारसला असताना हा तुमचे काही देणे लागतो असे त्यांनी सांगितले .त्यांनी पाच लाख रुपयांच्या नोटा आमच्यासमोर ठेवल्या .व्याजासह ही सर्व रक्कम आहे म्हणून सांगितले.त्या इन्स्पेक्टर साहेबांनी आणखी काही देणे हा लागतो का म्हणून आम्हाला विचारले .आम्ही चौघांनीही पढविल्या सारखे काहीही नाही म्हणून सांगितले .आमचे शेखरशी काही वैयक्तिक वैर नव्हते.त्या दिवशी तो खरोखरच जिंकत होता .आमचे तीन लाख रुपये डोळ्यासमोर जाताना पाहून राग आला होता .त्याला घाबरविण्यासाठी आम्ही पिस्तूल काढून एक गोळी चालविली होती .त्याने मारलेला सुराही मला निसटता लागला होता .सर्व परिस्थिती पाहून त्याला ब्लॅकमेल करणे शक्य नव्हते हे आमच्या लक्षात आले .उगीच गडबड केली तर हे लोक आम्हाला इथे आणि बनारसला अडकविल्याशिवाय राहणार नाहीत हे आमच्या पूर्णपणे लक्षात आले .उगीच वाकड्यात जाण्यात अर्थ नव्हता .इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला शेखरशी हात मिळविण्यास सांगितले .शेखरनेही हात पुढे केला. चौघांनीही हस्तांदोलन केले . आणि ते तिघेही खोलीमधून बाहेर पडले .आम्ही ठरल्याप्रमाणे बनारसला जाण्यासाठी गाडीत दुसऱ्या दिवशी बसलो .
शेट्टी
त्या दिवशी नंदिनीने सांगितलेली एकूण सर्व कथा ऐकून मी चकितच झालो.या मुलाने माझ्या घरातच शिरकाव करून घेतला असेल असे मला वाटले नव्हते .इतके महिने दोघांचेही अफेअर चालू असताना मला बिलकुल पत्ता लागू नये हे एक आश्चर्यच.माझे सर्व पंटर काय करीत होते ?नंदिनी माझी एकुलती एक मुलगी .तिच्या आई मागे मी तिला तळहातावरील फोडाप्रमाणे वाढविली .शेखरमध्येही तसे काही ऑब्जेक्शन घेण्यासारखे नाही. बनारसमध्ये तो जरी जुगार खेळत असला तरी आणखी काही गडबड त्याने केलेली नाही.ही चौकशी मी माझ्या बनारसमधील कनेक्शनकडून अगोदरच केली होती. जुगार सोडला तर तो बराचसा प्रामाणिकपणे जगत होता . रायसाहेबांनी तर त्याचा मुलगा म्हणून खरेच स्वीकार केला आहे .त्याला ब्लॅकमेल करून पैसा शेवटी त्याच्याकडेच जाणार .मलाही माझे गैरधंदे हळूहळू बंद केले पाहिजेत .शेवटी मी रायसाहेबांचा व्याही आहे त्या स्टेट्सने मला राहिले पाहिजे .
नंदिनी
शेखरचा प्रामाणिकपणा त्याचे माझ्यावर असलेले प्रेम गेल्या आठ दहा महिन्यातील सभ्य वर्तणूक यामुळे त्याला नकार देण्यासारखे काहीही मला दिसत नव्हते .मीही त्याच्यावर त्याला पहिल्या दिवशी गाडीतून उतरताना पाहिले तेव्हापासून प्रेम केले होते .मी त्याला माझा होकार कळवून टाकला.
सौ.राय
यांनी शेखरला मान्य केला यामुळे सर्वच प्रश्न सुटले आहेत .अजूनही माझा बछडा कुठे असेल काय करीत असेल हे आठवून छातीत कळ उठते.इलाज नाही आम्हाला कुंभमेळ्याला जायला नको होते .शेखर खरेच फार चांगला मुलगा आहे .म्हातारपणी आम्हा दोघांना तो नक्की सुखात ठेवील.एकदा बनारसला जाऊन आम्ही काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणार आहोत.त्याचप्रमाणे तो ज्या अनाथाश्रमात वाढला त्याला भरघोस देणगी देणार आहोत .नंदिनीही सून म्हणून आम्हाला पसंत आहे .
शेखर
एकूण ज्याचा शेवट गोड ते सर्व गोडच.हे सर्व एखाद्या सुखांत सिनेमा सारखे वाटत आहे .खरेच असे घडले आहे का ? मी मलाच केव्हातरी चिमटा काढून स्वप्नात तर नाही ना याची खात्री करून घेत असतो. या जगात अशक्य काय आहे ?हा शेखर भलताच नशिबवान निघाला .बेटा दोन्ही हात तूप साखरेत घालून बसला आहे .पंचवीस वर्षांपर्यंत ज्या काही हालअपेष्टा काढल्या त्याची आता सव्याज भरपाई होणार .कालच पेपरमध्ये शिरसाट वकिलांच्या खुन्याला पकडले असे वाचले .एकूण सर्व चक्रव्यूहातून मी सहीसलामत बाहेर पडलो .
समाप्त
६/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन