Get it on Google Play
Download on the App Store

सुभाषित माला पुष्प ८

प्रास्ताविक                                    

बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल


उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः |
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनिः ||

काही वेळा अगदी क्षुल्लक अशा माणसांची गाठ पडते आणि अशासारख्या गोष्टी घडतात. उंटाच्या घरी लग्न [होतं आणि] गाढव पुरोहित असते. त्यामुळे ते एकमेकांचे कौतुक करतात. [गाढव म्हणतो ] काय रूप आहे उंट म्हणतो काय आवाज आहे.

अहो रूपं अहो ध्वनि: ही उक्ती अतिशय प्रसिद्ध आहे .जेव्हा कुणीही दोन व्यक्ती भेटतात, आणि त्या एकमेकांची  स्तुती करू लागतात, प्रत्यक्षात मात्र त्यांची तेवढी लायकी नसते ,तेव्हा अहो रूपं अहो ध्वनी:वापरता येईल .अशा स्तुतीमधून काहीतरी फायदा मिळवण्याचा हेतूही अनेक वेळा असतो .निदान राजकीय सभांमध्ये वक्त्यांमध्ये अध्यक्षाची स्तुती करण्याची अहमहिका लागते .त्या वेळीअसा हेतू नक्कीच असतो .  अध्यक्ष त्या लायकीचा असतो असे नाही अध्यक्षही काही वेळा आपल्या फायद्यासाठी कार्यकर्त्यांची स्तुती करतो .काही वेळा एखादा पाहुणा आल्यावर यजमान त्याला बरे वाटावे म्हणून त्याची अवास्तव स्तुती करतो व .पाहुणाहि जरा जास्तच स्तुती करतो .एकतर्फी स्तुतीमध्ये अहो रूपं एवढाच भाग वापरला जातो. उंट बेढब व कुरुप असतो तरीही त्याला रूपवान म्हटले जाते. आणि गाढवाच्या मधुर आवाजाबद्दल तर बोलण्याचे कारणच नाही .थोडक्यात फायद्यासाठी किंवा उगीचच परस्पर अवास्तव स्तुतीला,लायकी नसताना केलेल्या स्तुतीला , किंवा कधी कधी एकांगी स्तुतीला ही उक्ती वापरता येईल .कधी कधी अशी स्तुती उगीचच हेतू विनाही केली जाऊ शकते .

                 स्मरणीय 
        अहो रूपम् अहो ध्वनिः ||

     २
खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति |
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ||

दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे दोष मोहोरी एवढे असले तरी पाहतो. [ नावे ठेवतो ] पण आपले दोष बेलफळा एवढे असले तरी दिसत असूनही न पहिल्यासारखे करतो.

परच्छिद्राणि पश्यति एवढा यातील भाग सोपा व वापरण्यासारखा आहे-- दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते परंतु आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही --अशी म्हण मराठीत अापण नेहमी वापरतो .आणखी एक मराठीत म्हण आहे --आपण हसे लोका आणि शेंबूड माझ्या नाका --दोन्ही म्हणींचा भावार्थ एकच आहे . मनुष्य नेहमी दुसऱ्याना हसत असतो. त्यांना नावे ठेवीत असतो. त्यांचे दोष दाखवत असतो .त्यांच्यावर टीका करीत असतो.परंतु हे करीत असताना आपल्यातील दोष उणिवा कमतरता यांच्याकडे मात्र संपूर्णपणे दुर्लक्ष करतो .अापण सर्वगुण संपन्न आहोत असा त्यांचा समज असतो .लोकांवर टीका करण्यासाठी मनुष्य उत्सुक असतो .अशी टीका करण्यामध्ये मजा घेतानाही काही लोक दिसतात .अश्या सर्व वेळी-- परच्छिद्राणि पश्यति-- या भागाचा वापर करता येईल .संस्कृत उक्ती वापरल्यास भाषेला जास्त लालित्य सौंदर्य  व वजन प्राप्त होते .

                स्मरणीय 
          परच्छिद्राणि पश्यति

२५/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com