सुभाषित माला पुष्प ७
प्रास्ताविक
एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत तुकड्याचा वापर सामान्यत:केला सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल.
१
साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् |
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति ||
सुशिक्षित [साक्षरा हे बहुवचन आहे] जर उलटले [साक्षरा हा शब्द उलट वाचला] तर राक्षसा होतात. [सुशिक्षित उलटले तर राक्षसांप्रमाणे त्रास देतात ,रा-क्ष-सा उलट सा-क्ष-रा ] पण सुसंस्कृत [सरस] उलटले तरी ते सरसत्व [स-र-स उलट स-र-स ] सोडत नाहीत.
--सरसत्वम् न मुञ्चति--हा चरण लक्षात ठेवण्यासारखा आहे .सुशिक्षित व सुसंस्कृत या मधील फरक थोडक्यात स्पष्ट व नेटकेपणाने मांडला आहे.खूप शिकलेल्या व्यक्तीचा स्वभाव सभ्य शांत समंजस सहानुभूतिपूर्ण उदार मृदू असेलच असे नाही . कित्येक शिकलेल्या व्यक्ती उर्मट अहंकारी रागीट तापट वाचाळ असण्याचा संभव असतो .अर्थात त्या तश्या असतीलच असेहि नाही .साक्षराचे उलट राक्षसा होते. राक्षसी मनोवृत्तीच्या त्या असू शकतील .सुसंस्कृत हा नेहमीच सुसंस्कृत असतो तो शिक्षित असेल किंवा नसेल .साक्षरा उलटा झाला वाकड्यात गेला तर तो राक्षसी होईल .साधले तर सूत नाहीतर भूत अशी त्यांची मनोवृत्ती असते .सरस हा नेहमी सरस असतो उलटा असो किंवा सुलटा असो तो वाईट वागूच शकत नाही.सज्जन हा सज्जनच असतो तुम्ही त्यांच्याशी कसेही वागा तो आपला सुसंस्कृतपणा सोडत नाही .थोडक्यात सुशिक्षित हा सुसंस्कृत असेलच असे नाही. सुसंस्कृत हा सुशिक्षित असू शकेल .तो सुशिक्षित असो किंवा नसो तो नेहमीच सुसंस्कृत व सरस असतो .
२
अर्थागमो नित्यमरोगिता( प्रिय भार्या भर्ता प्रिय वादिनौच) प्रिया च भार्या प्रियवादिनी च |
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ||
मूळ सुभाषितामध्ये कंसातील भाग नाही तो मी घातला आहे .
पैसे [नेहमी] मिळणे , कायम तब्येत चांगली असणे , आवडती पत्नी ,आणि ती गोड बोलणारी ,अनुकूल असलेला मुलगा आणि पैसे मिळवून देणारी विद्या , हे राजा , या सहा गोष्टी या जगात सुख देणाऱ्या आहेत.-
मूळ सुभाषितामध्ये कंसातील भाग नाही तो मी घातला आहे
-प्रियाच भार्या प्रियवादिनी च या ऐवजी -(प्रिय भार्या भर्ता प्रिय वादिनौच)हे वापरल्यास हे सुभाषित हल्लीच्या काळाला अनुकूल होईल असे मला वाटते .अर्थात हे संस्कृत बरोबर आहे असे मला वाटते (अर्थात हे संस्कृत पंडित सांगू शकेल )
हा श्लोक पुरुषाने रचलेला आहे .पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा या श्लोकावर आढळून येतो .इतर चार गोष्टी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लागू आहेत .संपत्ती, आरोग्य ,अनुकूल गुणी मुलगा,पैसा मिळवून देणारी विद्या, आवडती पत्नी व गोड बोलणारी पत्नी आणिआवडता पती व गोड बोलणारा पती असा पाठभेद करावयास हरकत नाही असे मला वाटते .हल्लींच्या स्त्री पुरुष समानतेच्या काळात गोड बोलणारी पत्नी वआवडती पत्नी याबरोबरच गोड बोलणारा पती व आवडता पती हा कौटुंबिक सौख्यालाआवश्यक आहे --.-प्रिय भार्या भर्ता प्रिय वादिनौच--- परस्पर प्रेम आहे अशी पत्नी व पती व ज्यांची एकमेकांशी वर्तणूक मधुर शालीन व सुसंस्कृत आहे अशी पत्नी व पती ,हे भाग्याचे लक्षण आहे .मुलगा प्रेमळ आई वडिलांचा मान राखणारा पाहिजे .मुलगी सामान्यत: तशी असते असा एकंदरित अनुभव येतो .परंतु मुलांचे मात्र काही निश्चित सांगता येत नाही. असा अनुभव आहे .--अर्थ करीच विद्या-- . शिक्षण एका प्रकारचे व अावड दुसऱ्या क्षेत्राची अर्थार्जनही बऱ्याच वेळा घेतलेल्या विद्येमुळे नसून इतर विद्येमुळे असते असा प्रकार बर्याच वेळा आढळून येतो .विद्येमुळे अर्थार्जन होत असेल तर मानसिक समाधान मिळते .थोडक्यात निरामय आरोग्य ,संपत्ती ,चांगली पत्नी व पती, परस्पर प्रेम असलेले पती व पत्नी ,प्रेमळ व आज्ञाकारी मुलगा/मुलगी वअर्थानुकूल विद्या या सहा गोष्टी भाग्यवान पुरुष किंवा स्त्री दर्शवितात . श्लोकाचा अर्थ लावताना व स्पष्टीकरण देताना हल्लींच्या परिस्थितीला अनुरूप व मला स्वतःला पटणारे असे बदल केले आहेत
स्मरणीय
१)सरसत्वम् न मुञ्चति-
२प्रिय भार्या भर्ता प्रिय वादिनौच
७/९/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com