अतीत
माणूस वर्तमानात जगत असतो, भूतकाळाच्या जोखडात अडकून.
भविष्याकडे टुकटुक नजरेने पहात, इच्छा आकांक्षांचं गाठोडं कवेत धरून.
कितीही ठरवलं माणसांनं..........
तरी बंडखोर मन, घुसखोरी भूतकाळाच्या प्रांतात करून, उत्खनन केल्याशिवाय थांबत नाही.
गतकाळातील गाठोडं विचारांचं, न सोडताही सुटल्याशिवाय राहत नाही.
भूतकाळाचं क्षितिज जमिनीला टेकलेलं दिसतं,
उलटा प्रवास मात्र, संपता संपत नाही.
गतकालीन स्मृति मनात रुंजी घालून, मनाला चकवा पाडल्याशिवाय राहत नाही.
वर्तमानाचा प्रदेश सीमित, भूत आणि भविष्याचा प्रांत मात्र असीम.
तरीही विस्तारवादी भूतकाळ, हळूहळू कब्जा वर्तमानावर करून, गिळंकृत करतो त्याला अजगरासारखा.
वर्तमान मात्र आश्रय घेऊन भविष्याचा, कधी शरणागती पत्करून, पुढे पुढे सरकतो आश्रिता सारखा.
एक दिवस येतो, माणसाचा वर्तमानच संपून जातो.
अडकतो गतकाळाच्या घशात,
आणि जमा झालेला असतो कायमचा......
भूतकाळाच्या नकाशात.