अंकाया
पूजा आणि प्रोफेसर तिथून पळाले. प्रोफेसरच्या हातात विशालचे डोके होतेच. ते दोघे पळत-पळत मॉलच्या बाहेर पडले. डोके नसलेला डुप्लिकेट विशाल त्यांचा पाठलाग करतच होता. मॉलच्याजवळ असलेल्या पनवेल एस.टी. डेपोमध्ये प्रोफेसर शिरला. त्याने त्याचा फूडट्रक एस.टी. डेपोत मुतारीजवळ पार्क केला होता. प्रोफेसर चटकन त्याच्या फूडट्रक मध्ये शिरला. पूजाने विशालला त्यांच्या मागे धावत येताना पहिले होते. आता जायचे कुठे या चिंतेत असताना ती प्रोफेसरच्या मागोमाग आत शिरली तिने आत जाऊन पहिले आणि ती लगेच बाहेर आली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने चारही बाजूने फिरून ट्रक नॉर्मल साईजचा असल्याची खात्री करून घेतली. ती पुन्हा आत गेली. फूडट्रकच्या आतला भाग फूडट्रकच्या बाहेरच्या आकारापेक्षा प्रचंड मोठा होता. ती आत गेली...
आता प्रोफेसर बोलू लागला...
“ वेलकम टू ‘अंकाया’... माझे ‘अंतराळ-काळ-यान’!”
“ तू नक्की कोण आहेस? तू एलियन आहेस ना?” पूजाने विचारले.
“ मी प्रोफेसर, प्रोफेसर एक्स! हो.. मी एलियन आहे आणि अंकायासुद्धा” तो हसत-हसत म्हणाला.
“ विशाल मेला का?” पूजाने विचारले
“ कोण विशाल?” प्रोफेसर म्हणाला.
“ विशाल माझा फ्रेंड...” तिने रडत सांगितले.
“ ओह! हा?” त्याने अंकायाच्या पॅनेलवर ठेवलेल्या विशालच्या डोक्याकडे बोट दाखवत विचारले. त्याने पॅनेलवरचा स्कॅनर सुरु केला आणि त्यातील दोन क्रोकोडाइल क्लिप विशालच्या कानाला जोडल्या आणि काही कमांड दिल्या.
“त्याला दुखेल ना... हसतोस काय?” पूजा रडू लागली.
“ नाही...! हा तुझा विशाल नाहीये. हा एक पॉलीमोरॉन आहे... कॉपी! त्यांनी खऱ्या विशालला ओलीस ठेवून घेतलं असेल आणि हा प्लास्टिकचा पुतळा पाठवलाय...”
तिने धावत जाऊन ट्रकचे दार लावून घेतले. तिला वाटले बिना डोक्याचा विशाल आत येऊन पुन्हा हल्ला करेल. ते पाहून प्रोफेसर म्हणाला...
“ काळजी करू नकोस. मोहम्मद घोरीच्या सैन्याने या दरवाज्यातून आत येण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना जमलं नाही.”
इतक्यात पूजाने दाखवले कि विशालचा प्लास्टिकचा चेहरा वितळून गेला होता. प्रोफेसरने वैतागून पॅनेलवर हात आपटले.
“ शिट....!” त्याने विशालचे डोके वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्या डोक्याच्या सहाय्याने तो मदर रडारचा शोध घेऊ शकणार होता. इतक्यात अंकाया बोलू लागला.
अंकाया : “ लोकेशन ट्रॅकिंग कम्प्लीट.”
प्रोफेसर: “ प्लीज टॅग्!”
अंकाया: “ टॅगिंग कम्प्लीट”
प्रोफेसर: “ अनाउन्स प्लीज”
अंकाया : “ अननोन लोकेशन, प्रायव्हेट फॉरबीडन एरिया. CDMA सिग्नल्स डिटेक्टिंग!”
प्रोफेसर : “अंकाया, आम्हाला तिकडे घेऊन चल.”
अंकाया थोडी थरथरू लागली. काही वेळात सर्व काही पुन्हा शांत झाले. दोघे अंकायाच्या बाहेर आले. लवकरच घणसोली MIDC मध्ये गवळीदेव धबधब्याजवळ पोचले होते.