बेरोजगार
स्टेशन जवळ येऊन तिने खिसे तपासून पहिले तिचा मोबाइल तिच्याकडेच होता आणि पर्ससुद्धा जवळ होती. ती रिक्षेत बसली आणि तिने रिक्षावाल्याला रिक्षा कोपरखैरण्याला घ्यायला सांगितली. ती घरी आली. तो प्लास्टिकचा हात घेऊनच..!
आईने दार उघडले. आई काही विचारणार इतक्यात तिने तो प्लास्टिकचा हात सोफ्यावर टाकला आणि टी.व्ही. सुरु केला. टी.व्ही.वर तिने मराठी न्यूज चैनल सुरु केले. त्यावर वाशीतील सेंटर वन मॉलबद्दल ब्रेकिंग न्यूज सुरु होती.
“आपण आता या ठिकाणी पाहू शकतो कि, सेंटर वन मॉल जो आहे तो बॉम्बच्या हल्ल्याने जमीनदोस्त झाला आहे. इकडे आगीचे लोळ उठत आहेत आणि अग्निशामक दलाचे जवान ती आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. स्फोट नक्की कसा झाला याबद्दल काहीच ठोस अशी माहिती समोर आली नाहीये पण, नवी मुंबईचे पोलीस अधिकारी श्री. किशोर पाटील यांनी या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे! पुढील माहिती तपासानंतरच समजेल.”
ही बातमी संपूर्ण वाशीमध्ये आता वाऱ्यासारखी पसरली होती. स्टेशन जवळच काम करत असल्यामुळे ही बातमी विशालला पण समजली होती. कोपरखैरणे स्टेशनला उतरून विशाल धावत-पळत घरी पोहोचला. आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घरात जायच्या आधी तो चौथ्या मजल्यावरील नार्वेकरांच्या घरात आधी पोहोचला. तो धापा टाकत होता. घराचे दार क्षमा काकीनी उघडले आणि विशाल काही न बोलता आत शिरला. त्याला समोर टी.व्ही. पाहत डोक्याला हात लावून बसलेली पूजा दिसली आणि त्याचा जीव भांड्यात पडला.
पुजाची विचारपूस त्याने केली. पण पूजा एक शब्दही बोलत नव्हती. तिची लाडकी स्कुटी आता तिच्यासोबत नव्हती त्यामुळे, ती खिन्न झाली होती. त्याला ते समजले आणि तो निघाला. जाताना काकीना “काळजी घ्या..!” असं तो सांगत असताना त्याची नजर हॉलमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या हाताकडे गेली.
“हे काय?” त्याने विचारले.
“हात...!” पूजा म्हणली.
“कोणाचा? विशालने विचारले.
पूजा वैतागून म्हणाली,” बोर नको करू रे....जा घेऊन तो...!”
“खरंच? तुझा हात तू मला दिलास?”
पूजाने त्याच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. तो काही न बोलता हात घेऊन निघाला. कदाचित मस्करी करण्याची ही योग्य वेळ नाही हे त्याला कळले असावे. जाता-जाता त्याने तो हात बिल्डींगच्या आवारातील कॉमन डस्टबिनमध्ये टाकला आणि मग तो आपल्या घरी निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सवयी प्रमाणे पूजा सकाळी नऊ वाजता उठली पण, नंतर तिला तिच्या आईने सांगितले...
“ झोप तंगड्या वर करून... आता कुठे नोकरी आहे तुला..!”
पूजा वैतागली तिने आईकडे दुर्लक्ष केले. तिने कसेतरी जड पावलं टाकत-टाकत बाथरूम गाठले. तिकडून बाहेर आल्यानंतर तिने बेसिनजवळ जाऊन हात-तोंड धुतले आणि ब्रशवर पेस्ट लावून घेतली. ब्रश तोंडात घालून ती सोफ्यावर जाऊन बसली. तिची नजर शून्यात लागली होती. ती बरीच टेन्शन मध्ये होती. इतक्यात बाल्कनी मध्ये तिला कसली तरी खुडबुड ऐकू आली. तिने जाऊन पहिले तर तिकडे काहीच दिसले नाही. मग तिला हॉलच्या दरवाज्याजवळ कोणीतरी आहे आणि काहीतरी करत आहे असा आवाज आला. तिने दरवाजा उघडला.
“तू...?”
ती जवळपास किंचाळलीच. दारात प्रोफेसर उभा होता त्याच्या हातात एक षटकोनी स्क्रीन असलेलं मोबाईलसारखं दिसणारं डिव्हाईस होत आणि त्यातून बीप... बीप... असा आवाज येत होता.
“तुझा फोन मस्त आहे रे...!” ती म्हणाली
" eon1100..!" तो म्हणाला.
" कितीला?" ती म्हणाली.
ऐकून न ऐकल्यासारखं करत ते डिव्हाईस हातात घेऊन पुढे-पुढे गेला. तसा त्याचा बीप... बीप... चा आवाज अधिक जलद गतीने येऊ लागला. तो बाल्कनीत गेला. आता तो आवाज सतत न थांबता येत होता. मग तो अचानक थांबला. त्याने आश्चर्याने इकडे तिकडे पहिले. त्याला काहीच दिसले नाही. म्हणून तो निघून जाऊ लागला. तेव्हा तिने दार आतून लॉक करून घेतले आणि म्हणली,
“ बस...!”
तो बसला. पुन्हा डिव्हाईस बीप... बीप... करू लागले आणि मग थांबले. तो त्याच्या आवाजाकडे लक्ष देऊन होता.
“ काय चालू आहे? मला कळेल का?” तिने विचारले
“ नाही...!” तो म्हणाला.
तिने त्याच्या हातातून त्याच डिव्हाईस आता खेचून घेतले आणि पुन्हा विचारले,
“काय... चालू... आहे?”
तो गोंधळून म्हणाला, “ खूप दिवसात चांगली कॉफी प्यायली नाहीये. करतेस?”
तिने वैतागून मानेने होकार दिला. आणि त्याचे डिव्हाईस परत दिले.
“गाईचं दुध घालशील ना?” त्याने विचारलं.
“नाही, मुंगीच आहे. चालेल ना?” ती म्हणाली
आता तो स्वत:शीच पुटपुटत होता, “ मला पुन्हा झूऑलॉजीची पुस्तकं वाचायला हवीत. पृथ्वीवर मुंग्या कधीपासून दुध द्यायला लागल्या...? ”
मग तो तिला म्हणाला “चालेल, मुंगीचं दुध!”
ती वैतागून आत जाऊ लागली, “तुमच्या घरात 4G सिग्नल जरा वीक आहे. वायफायचा पासवर्ड काय आहे?” तो म्हणाला.
आता मात्र ती नक्की काय चालू आहे हे कळण्यासाठी खूप उतावीळ झाली होती. त्यामुळे ती नाईलाजाने म्हणाली,
“कॅपिटल P, Poojavashi@1989”
“ थँक्स!” असं म्हणून त्याने स्माईल दिली. तो पुढे काही बोलेल या आशेवर ती उभी होती आणि तो परत म्हणाला, “कॉफी?”
ती काही न बोलता आत निघून गेली. आई अंघोळीला गेली होती त्यामुळे, तिने स्वत: कॉफी करायला घेतली. इकडे हॉलमध्ये प्रोफेसर गुगलवर दुध देणाऱ्या मुंग्यांची माहिती सर्च करू लागला. इतक्यात डिव्हाईस खूप फास्ट बीप करू लागले आणि दुसऱ्या क्षणाला एक प्लास्टिकचा हात त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. त्याला काहीच बोलता येत नव्हते. तो त्या हातापासून गळा सोडवून घेण्यासाठी खूप झटापट करू लागला पण पकड घट्ट होती. इतक्यात पूजा कॉफीचा कप घेऊन बाहेर आली आणि तो हात प्रोफेसरची मान सोडून हवेतून झेप घेऊन पूजाच्या मानेकडे जाऊ लागला. इतक्यात प्रोफेसरने चपळाईने त्याच्या षटकोनी यंत्रातून एक स्टायलस बाहेर काढला आणि त्या हाताच्या दिशेने जादूच्या कांडी सारखा धरला. त्या स्टायलसमधून निळ्या रंगाची लेसर बीम बाहेर पडली आणि तो हात निकामी होऊन जमिनीवर पडला. त्याने तो उचलून पुन्हा स्टायलसने चेक केला.
“ मेला! प्लास्टिक... भंगार!” असं म्हणून त्याने तो हात तिथेच टाकला आणि तो अचानक दारातून बाहेर पडला. तो जिन्याने खाली जाऊ लागला. पुजाला काहीच कळल नाही ती प्रोफेसरच्या मागे-मागे जाऊ लागली. चालत-चालत तो टी.टी.सी. इंडस्ट्रीयल एरियामध्ये पोहोचला. तिने त्याला हाका मारून थांबायला सांगितलं. तिला जाणून घ्यायचं होत, “नक्की काय सुरु आहे?”
“ हे बघ. काल जे मॉलमध्ये पाहिलेस ना ते पॉलीमोरॉन होते. प्लास्टिकॉनवर नुकत्याच आलेल्या “प्लास्टिक इटर व्हायरसच्या साथीत” जवळजवळ ६५% पॉलीमोरॉन मारले गेलेत. त्यामुळे त्यांना आता पुन्हा प्रजनन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची गरज आहे. पॉलीमोरॉन प्लास्टिकला स्पर्श करून प्रजनन करतात. पण त्यासाठी त्यांना प्लास्टिकची गरज असते. त्यांच्या ग्रहावरील मदर रडारने शोधून काढले कि, पृथ्वीवर खूप जास्त प्लास्टिकचा कचरा आहे. त्यामुळे त्यांची स्पेसशिप गेले काही दिवस मुंब्रा-शिळ रोड जवळ डोंगरावर जंगलात उभी आहे. आता युद्ध अटळ आहे. कारण ते कचरा घेऊन जातीलच पण त्याबरोबर इतर जे काही प्लास्टिक आहे ते सगळं हिसकावून घेऊन जातील. काल तर फक्त ट्रेलर पाहिलास... पिक्चर अभी बाकी है...!”
तो असं म्हणाला आणि टी.टी.सी. इंडस्ट्रीयल एरियामध्ये मिलेनियम बिझनेस पार्कजवळ उभ्या केलेल्या एका चारचाकी लाल पिवळ्या फूडट्रकमध्ये शिरला. पूजा त्याने सांगितलेल्या माहितीवर विचार करत होती. तिचा विश्वासच बसत नव्हता. पुढे काही समजायच्या आत तो फूडट्रक सुरु झाला. ड्रायव्हर सीटवर कोणीच दिसले नाही. तरी तो फूडट्रक चालत होता. पंचवीस तीस मीटर पर्यंत चालला आणि तो फूडट्रक दिसेनासा झाला. हे सगळे फार जलद प्रकारे घडले, तिने त्या ट्रकचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण, तोपर्यंत तो दिसेनासा झाला होता.