हनुमान जन्माच्या कथा
हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतात झाला. त्याची आई अंजनी अाणि पिता केसरी होते. अंजनी एक अप्सरा होती. तिला स्वर्गात एक शाप मिळाला होता त्यामुळे ती पृथ्वीतलावर एका वानराशी विवाह करुन राहिली होती. तो वानरराज केसरी होता. तिला पुत्र प्राप्तीनंतरच या शापातुन मुक्तता मिळणार होती. वाल्मिकी रामायणानुसार वानरराज केसरी, सुमेरुचे महाराज बृहस्पती यांचा पुत्र होता. अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी बारा वर्षे भगवान शंकराचा तप केला. बारा वर्षाच्या तपाने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी वरदानात एक पुत्र दिला. हनुमानाला त्यामुळे भगवान शंकराचा अवतारही मानला जातो. त्यामुळेच हनुमान चिरंजीवी आहे असेही मानले जाते.
सोळाव्या शतकातील एकनाथांच्या भावार्थ रामायाणानुसार श्री हनुमान पवनपुत्र आहेत अासे मानले जाते. हनुमानच्या जन्मासाठी वायुदेवांची महत्वाची भूमिका आहे असेही मानले जाते. ज्यावेळात माता अंजनी पुत्रप्राप्तीसाठी शंकराचा तप करत होती. त्याचवेळी अयोध्येत राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी 'पुत्रकाम यज्ञ' आरंभ केला होता. त्या यज्ञाचा प्रसाद जेव्हा तो आपल्या राण्यांना द्यायला गेला तेंव्हा एका चतुराने त्यातला प्रसादाचा एक घास उचलुन घेतला. त्याच वेळी वायु देवांनी तो प्रसाद अंजनीच्या हातात पाडला. अंजनी तेंव्हा तपात मग्न होती तिने तो प्रसाद आचमनाबरोबर ग्रहण केला. त्यामुळे हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते.
याच कथेबरोबर एक कथा अशीही सांगितली जाते की, केसरी आणि अंजनी यांनी शिवशंकराकडे पुत्रप्राप्तीसाठी वरदान मागितले. तेव्हा शंकराच्या सांगण्याने वायुदेवाने आपली शक्ती एकवटुन अंजनीच्या गर्भात सोडली. असा हनुमानाचा जन्म झाला म्हणुनच त्याला पवनपुत्र ही म्हणतात.