युगंधर
युगंधर हे पौराणिक चरित्र श्रीकृष्णचे जीवन आपल्या समोर आणते. मृत्युंजयकार सावंत ह्यांची सर्वांत लोकप्रिय अशी जी तीन पुस्तके आहेत त्यातील हे तिसरे. श्रीकृष्ण ह्यांचे जीवन फार मोठे तसेच अत्यंत क्लिष्ट होते पण सावंत ह्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ते आमच्या समोर ठेवले.
भगवान श्रीकृष्णाला आम्ही देव आणि विष्णूचा अवतार म्हणून ओळखतो पण सावंत ह्यांनी श्रीकृष्णाला एका महान व्यक्तीच्या स्वरूपांत आपल्या समोर ठेवले. कुरु वंश त्या काली भारतातील सर्वांत बलाढ्य शक्ती होती तर यादव वंशाला विशेष महत्व नव्हते. गरिबीत जन्माला आलेला बालकृष्ण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि निव्वळ आपल्या लोकसंग्रहाच्या मदतीने एका नवीन युगाचा प्रारंभ करतो.
कृष्ण ह्यांचे जीवन म्हणूनच खूप रोमांचकारी तसेच खिळवून ठेवणारे ठरते. रामा प्रमाणे कुठलेही एक युद्ध किंवा एक खलनायक ह्यांचा संहार करण्यासाठी कृष्ण नाही तर संपूर्ण भारत वर्षांत धर्माचे पुनरुज्जीवन ते निर्माण करतात. कुरुवंशातील अनाथ अश्या ५ भावंडांचा ते पाठपुरावा करतात, द्रौपदीला भगिनी करतात तर अर्जुनाला परम मित्र. युद्धांत ते भाग घेत नाहीत तरीसुद्धा एक महत्वाची जबाबदारी पार पाडतात.
धर्म म्हणजे काय ह्याची ते एक स्वतः जिवंत व्याख्या ठरतात.
श्रीकृष्णचे हे पैलू युगंधर ह्या कादंबरीतून सावंत ह्यांनी आमच्या पुढे आणले आहेत.
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’,‘महाभारत’,‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात.परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत.त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर,तांबूस-नीलवर्णी,सावळं रूपडं घनदाट झालं आहे,वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे.श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.!
त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं.आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून,डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती-‘युगंधर’!!