भाग-७
सेंट पिटसरबर्ग मधला तीसरा दिवस. आज आमचे टार्गेट होते सेंट इझाक म्युझियम आणि ल-गोरा स्की माउंटन व्हिजिट. बऱ्यापैकी वेळेवर सर्व मंडळी जमा झाली. गाईड मिखोलाय वाट बघत थांबला होताच. जी इमारत अनेकदा जाता येता दिसली होती आणि ही आपण नंतर बघणार आहोत असे गाईडने सांगितले होते त्या `सेंट इझाक म्युझियम' जवळ आम्ही उतरलो. बाहेरूनच या इमारतीच्या भव्यतेची कल्पना येत होती. वरच्या टॉवरची उंची जवळ जवळ ३०० फूट असेल. समोरच आठ भव्य पिलर्स आहेत. हा एक पिलर (खांब) ६ फूट घेर आणि ३५ फूट उंच आहे. पण याचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रत्येक पिलर एकसंध ग्रॅनाइटच्या दगडातून कट करून काढलेला असून तो आतूनही भरीव आहे. एका एका पिलरचे वजन ४५० टन आहे. आता हे अठराव्या शतकात इथे कसे आणले असतील आणि कसे उभे केले असतील ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण खरेतर सहा महिन्यांपूर्वीच्या इजिप्त भेटीत मी यापेक्षाही भव्य कलाकृती उभ्या केलेल्या बघितल्या आहेत आणि त्याही हजारो वर्षांपूर्वी. पिरॅमीडला जागतिक आश्चर्य हे मानांकन आहे ते त्यामुळेच. आपल्या अगोदरची एक मानव जमात ही आपल्यापेक्षाही सरस होती हे पटलेले आहे. हे ऑर्थोडॉक्स (पारंपरिक/ सनातनी) सेंट इझाक म्युझियम मूळचे कॅथेड्रल म्हणून १८५८ मध्ये बांधले गेले असले तरी नंतर १९३१ नंतर सोव्हियेत सरकारने याला म्युझिअम म्हणून मान्यता दिली. अनेक दुर्मिळ कलाकृतींचा खजाना या इमारतीत आहे. इथेही सोन्याचा मनमुराद वापर केलेला होता. आतला घुमत फारच आकर्षक होता. छान असले तरीही तोच तोच पणाला कंटाळून लवकरच आम्ही बाहेर पडलो.
बस आता ज्या भागातून जात होती त्या पूर्वेकडच्या भागात आम्ही पहिल्यांदाच येत होतो. आतापर्यंतचा शहराचा भाग हा जुन्या युरोपियन स्टाईलचा होता पण आजचा हा भाग बराच मॉडर्न दिसत होता. कदाचित बांधकाम नियमावलीनुसार मूळच्या गावठाण भागात एकच एलेव्हेशन ठेवण्याची सक्ती असेल पण नवीन डेव्हलप होणारा शहराबाहेरच्या भाग वेगळ्या नियमावलीनुसार बांधला जात असेल. म्हणूनच इमारतींमधील फरक सहज ओळखू येत होता.
रशियाविषयी थोडेसे सांगायचे झाले तर रशियाचे आकारमान आपल्या भारतापेक्षा सव्वा पाच पट आहे. रशिया हा आशिया खंडात असला तरीही तो युरोपला जास्त जवळचा आहे. तिथले हवामान, आर्चिटेक्चर, संस्कृती आणि एकंदरीत माणसांचे शरीर सौष्ठव हे युरोपशी मेळ खाणारे आहे. त्यामुळे बऱ्याचदा रशियाला `युरेशिया' असेही म्हटले जाते. रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे लाईन ही जगातील सर्वात जास्त लांबीची म्हणून गणली जाते. सैबेरिया तर बाराही महिने बर्फाळ असतो. मॉस्को वरून निघणारी ही ट्रेन रशियाच्या दुसऱ्या टोकाच्या ९२८९ किलोमीटरवर असणाऱ्या `व्लाडिओस्टोक' इथे पोहचते तो प्रवास तब्बल १४ दिवसांचा आहे. आम्ही काही या ट्रेनने प्रवास केला नाही पण हा प्रवास नक्कीच रोमांचकारी आणि संपूर्ण रशियाचे दर्शन देणारा असेल हे नक्की. असो. आम्ही ज्या मॉस्को ते सेंट पिटर्सबर्ग या भागात होतो तिथे डोंगर फारसे नाहीत. टेकड्या आहेत. पण बराचसा भाग हा सपाट आहे. शहर सोडून आमची बस थोड्याशा चढाच्या भागात आली. आजूबाजूला सुचीपर्णीची जंगले आणि त्यात जमिनीवर पसरलेले शुभ्र बर्फ मनमोहक दिसत होते. एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही त्यातल्या त्यात सर्वात जास्त उंच असलेल्या एका टेकडीवर पोहोचलो. आपल्यासारखा घाट रस्ता असा काही लागला नव्हताच. बसमधून उतरून आम्ही एक छोटीशी बर्फाची टेकडी चढून गेलो. पलीकडच्या उतारावर दूरपर्यंत बर्फ पसरलेले होते. त्या उतारावर बर्फातल्या स्कीईंग, स्केटिंग, रॅपलिंग अशा विविध खेळांची सुविधा होती. एक रोप वे सुद्धा होता. पण खरेतर इथेही येण्याची आमची वेळ चुकली होती. सिझन जवळजवळ संपलेलाच होता. अगदी तुरळक १५ -२० लोक त्यावरून स्कीईंग करत होते. आम्हाला तर काही स्कीईंग येत नाही. त्यामुळे त्या पांढऱ्या शुभ्र बर्फात चालणे, उड्या मारणे, बर्फाचे गोळे एकमेकांच्या अंगावर फेकणे असे बालिश गेम खेळत आणि मनमुराद फोटो शूटिंग करत आम्ही तास दीड तास काढला. स्कीईंग करणारे त्या उतारावरून घसरत खाली जात होते आणि येताने एका रोपवेला अडकवलेल्या स्टिक्स पकडून घसरतच वर येत होते. हे दोन्हीही प्रकार तसे खास प्रॅक्टिस आणि त्या प्रकारचे बूट व अंगावरचे योग्य कपडे असल्याशिवाय शक्य नाहीत. थंडीचा कडाका जबरदस्त होता.
तिथून आम्ही खाली आलो. `ल-गोरा स्की रिसॉर्ट' या रेस्टोरेंट मध्ये आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था होती. पहिल्यांदाच आम्ही लोकल रशियन फूड टेस्ट करणार होतो. (ड्रिंक्स मात्र फारच महाग होते.) पहिल्यांदा स्टार्टर म्हणून त्यांनी एक चौकोनी मोठ्या वडीसारखा पदार्थ वाढला. त्याला `बोर्श' म्हणतात. बिट, मका आणि बीन्स (वाल) वापरून तयार केलेला हा पदार्थ बरा होता, त्याबरोबर ब्राऊन ब्रेड, नंतर आलेले वाडगाभर सूपही ठीक होते. नंतर मेन कोर्स म्हणून चिकन आणि राईस होता. एकंदरीत जेवणाला फिफ्टी फिफ्टी मार्क्स देता येतील, नॉट सो बॅड अँड नॉट सो गुड. पण अनुभव म्हणून छान.
तिथून आम्ही परतीचा प्रवास करत पुन्हा शहरात आलो. शनिवारची संध्याकाळ असल्याने प्रचंड ट्राफिक होते. पहिल्यांदाच इतके ट्राफिक लागले होते, आणि पुणे मुंबईची आवर्जून आठवण येत होती. हो पण पुण्यासारखे कोणी कुठूनही घुसत नव्हते. त्या ट्रॅफिकलाही एक शिस्त होती.
खरेतर इथे आमचे नियोजित प्रॉग्रॅम संपले होते. बाकीचा वेळ हा फ्री टाइम होता. पण आतापर्यंतच्या अनुभवाने शॉपिंग मधला इंटरेस्ट तसा कमीच झाला होता. मग दुसरे काही करता येईल का असा विचार सकाळपासूनच सुरु होता. गेले तीन दिवस एक्सट्रा पेड ऍक्टिव्हिटी म्हणून हेलिकॉप्टर राईड करण्याचा मानस होता पण या राईडला तिथल्या नेव्हीची परवानगी लागते. आणि ऑफिशिअली या हेलिकॉप्टर राइड्स एक मे पासून सुरु होतात. त्यामुळे ते जमण्यासारखे नव्हते. दुसरा एक प्रकार शिल्लक होता तो म्हणजे `नेव्हा रिव्हर क्रूज' आपल्या गोव्यात जशा मांडवी नदीत क्रूझ असतात आणि त्यावर एन्टरटेन्मेण्टची व्यवस्था असते तशी इथेही सोय होती. सर्वसंमतीने (?) हा पर्याय फायनल झाला होता आणि त्याप्रमाणे अगोदरच बुकिंग ही केलेलं होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि एका क्रूजवर गेलो. तिथल्या जबरदस्त थंडीमुळे इथल्या क्रूज बंदिस्त आणि हीटिंग सिस्टीम लावलेल्या असतात. तसा वर ओपन डेक होता. सुरुवातीला अनेक जण त्या डेकवर बसले पण थोडयाच वेळात जबरदस्त थंडीमुळे `आतच बरं गड्या' असे म्हणत आत येऊन बसले. आत क्रूजवर स्नॅक्सची व्यवस्था केली होती आणि जोडीला होता `रशियन बेली डान्स' अगोदरच्या अनुभवावरून मनात जरा साशंकता होती पण त्यामानाने हा जरा बरा प्रकार होता. सर्वांनी या डान्स प्रोग्रॅमचा आस्वाद घेतलाच पण म्युझिकच्या ठेक्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात स्वतःही नाचून अनेकांनी हा आनंद भभरून लुटला. प्रोग्रॅम संपल्यानंतर बरेच जण डेकवर आले. ओपन डेकवरून सेंट पिटर्सबर्गचे दर्शन खूपच विहंगम होते. आम्ही ज्या भागात फिरत होतो तो भाग राजवाड्यांचाच भाग होता. त्या नदीच्या आजूबाजूला सगळेच राजपरीवारातील लोकांचे राजवाडे होते. नदी अतिशय क्लीन, दोन्ही बाजूने भिंती असलेली, बंदिस्त पण भल्या मोठ्या कॅनॉलसारखी. इटलीतील `व्हेनिस' ला खरेतर जाणे झालेले नाही (पण इच्छा आहे, बघू). पण ऐकीव माहिती, सिनेमात पाहिलेले सिन यावरून आजचा हा प्रवास `व्हेनीस' सारखाच वाटत होता.
या रिव्हर क्रूज सफारीनंतर इंडियन रेस्टोरेंटला जेवण करून हॉटेलवर आलो. रस्त्यात एके ठिकाणी गाईडने एक मॉल दाखवला. काहीजण तिथे उतरले तर काहीजण हॉटेलवर येऊन जरा आवरून पुन्हा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. शेवटचाच दिवस असल्याने जमेल तेवढी एन्जॉयमेंट करत सर्वांनी पुन्हा आपापल्या रूम गाठला आणि आणि हाही दिवस आनंदाखाती जमा झाला. उद्याचा परतीचा प्रवास शेवटच्या भागात .................
अनिल दातीर.
(९४२०४८७४१०)