भाग-५
सेंट पिटसरबर्ग. रात्री अकराला निघालेल्या ट्रेनचा प्रवास रात्रभर चालूच होता. पहाटे ५ लाच बाहेर चांगले उजाडले होते. याकाळात रशियाच्या या भागात ८-९ तासांची रात्र आणि १५-१६ तासांचा दिवस असतो. कुपेमधून बाहेर पॅसेज मध्ये येऊन बघितले तर बाहेर बर्फ पडत होते. सगळा आजूबाजूचा परिसर बर्फाच्या पांढऱ्या दुलईने झाकलेला होता. ट्रेन मध्ये मात्र थंडीची काहीच जाणीव नव्हती. अनेक जण मोबाईल द्वारे लाईव्ह दृश्ये घरातल्या लोकांना दाखवत होते. बऱ्याच जणांनी ट्रेन मधेच शक्य तेवढे फ्रेश होऊन कपडे बदलले होते. आठ वाजता ट्रेन सेंट पिटर्सबर्गला पोहोचली. एवढ्या सकाळी हॉटेलची रूम ताब्यात मिळणे शक्यच नव्हते. सगळ्याच आंतराष्ट्रीय हॉटेल्समध्ये चेकिन दुपारी दोन नंतर असते आणि चेक आऊट ११ ला. स्टेशनवर उतरलो. रेल्वेचा एक कर्मचारी बॅगेज उतरवून घेण्यास स्वतःहून मदत करत होता. बोगी अटेंडंट सुद्धा दारात येऊन सर्वांना बाय-बाय करत होती. काहींनी आठवण म्हणून तिच्याबरोबरही फोटो काढून घेतले.
खाली उतरलो तर एक सहा फुटी वेलड्रेस्ड गोरा रशियन माणूस उभा होता. त्याच्या हातात `ग्लोबल हॉलिडेज' चा बोर्ड होता. तो होता पुढील दिवसांकरता आमचा गाईड `निखोलाय'. त्याची पर्सनॅलिटी बघून तो पूर्वाश्रमीचा के.जी.बी. एजंट असावा असे वाटत होते. `गॉडझिला' सिनेमात एक के.जी.बी.एजंट त्या डॉक्टरचा पाठलाग करत असतो ना, आणि शेवटी गॉडझिलाचे चित्रीकरण असलेला रोल घेऊन गायब होतो ना, आमचा हा गाईड निखोलाय अगदी तसाच दिसत होता. त्याचे इंग्लिशही अतिशय फ्लुएंट होते. स्टेशन मधून बाहेर आलो तर अगदी हलका पाऊस आणि भुरुभुरु बर्फ पडत होते. थंडी अर्थातच जबरदस्त होती. बस मध्ये येताच बस सुरु झाली आणि सेंट पिटर्सबर्ग शहराचे दर्शन काचेतून होऊ लागले.
सेंट पिटर्सबर्ग राजेशाहीच्या काळात अखंड रशियाची राजधानी होती. १९१८ ला सोव्हियेत क्रांतीनंतर व्लादिमिर लेनिन यांनी मॉस्को ही राजधानी केली. त्यामुळे सेंट पिटर्सबर्गच्या बहुतांशी इमारती या राजेशाही थाटाच्या आणि पूर्वांपार चालत आलेल्या युरोपियन आर्किटेक्चर चा प्रभाव असलेल्या दिसतात. रशियन राजांना `झार' म्हटले जायचे. खरेतर रशियन मध्ये `सी-झार'. ही उपाधी मूळची रोमन एम्परर (सम्राट) `ज्युलियस सीझर' कडून आली. सीझर चे अपभ्रंशी रूप म्हणजे `झार' झाले. `पीटर द ग्रेट' हा सोळाव्या शतकातील कर्तबगार राजा (झार) होता. त्यानंतरही पीटर-दुसरा, अलेक्झांडर, कॅथेरीन, निकोलस-दुसरा अशी वंशावळ आहे. `अलेक्झांडर द ग्रेट' म्हणून आपल्या इतिहासात नोंद असलेला वेगळा बरं का आणि हा रशियन अलेक्झांडर वेगळा. पीटर द ग्रेट ची ५३ वर्षाची कारकीर्द खूप प्रभावशाली होती. याच्याच काळात रशियाने सायन्स, ऍडव्हान्स टेकनॉलॉजी, इंडस्ट्री, एज्युकेशन अशा विविध क्षेत्रात खूपच प्रगती केली. म्हणूनच १९३५ साली इथे जमिनीखाली ३०० फूट मेट्रोचे जाळे उभारले जाऊ शकले. रशियातील पहिले वर्तमानपत्र छापले गेले तेही याच पीटर द ग्रेट च्या कारकिर्दीत. याचबरोबर अनेक भव्य राजवाड्यांची बांधकामे याच्याच कारकिर्दीत झाली. ख्रिश्चन धर्मगुरूंना खुश ठेवण्यासाठी अनेक भव्य कॅथेड्रलची निर्मितीही याच काळात झाली. पीटर द ग्रेटने रशियाची सीमाही भरपूर वाढवली आणि रशियन साम्राज्य स्थापन केले. त्यामानाने नंतरच्या पिढ्यांनी या `पीटर द ग्रेट' च्या कमाईवर ऐश करण्यापलीकडे फारसे काही केले नाही. (इतिहास पुरे झाला, वर्तमान पाहूया).
`नेव्हा' नदीने या शहराला समृद्ध केलेलं आहे. ही एकच नदी असली तरी शहरात मात्र तिला अनेक फाटे फुटलेले आहेत. त्याकाळी मुद्दामहून कालवे खोदून या नदीला शहरभर खेळवले असावे. त्यामुळे अनेकदा ही `नेव्हा' नदी क्रॉस होते. शहरात अनेक पूल बांधलेले आहेत. या नदीतून क्रूझ बोटिंग केले जाते. नदीच्या कडेला भव्य रस्ते आणि चार मजलीच पण एकसारख्या दिसणाऱ्या अनेक इमारती दिसतात. गाईडने निखोलायने बसमधूनच एक जुने कॅथेड्रल दाखवत सांगितले कि याची निर्मिती १६ व्या शतकात झाली, आणि १९ व्या शतकापर्यंत इथे या कॅथेड्रल पेक्षा उंच इमारत बांधायला परवानगी नव्हती. बस मधून प्रवास चालू होता, नाश्त्याचे हॉटेल आता येईल, येईल असे चालले होते पण काहींना घाईची लागल्याने निखोलाय ने गाडी एका सोव्हेनियर शॉप समोर थांबवली. आत जाऊन त्या दुकानातील टॉयलेट वापरता येणार होते. अर्थात आलेल्या लोकांनी काहीतरी खरेदी करावी अशी दुकानदाराची इच्छा असणारच पण खरंच किमती इतक्या अफाट होत्या कि कुणीही काहीही घेऊ शकले नाही.
पुन्हा सुरु झालेला प्रवास एका उंच चर्च जवळ थांबला. पण हे आपण उद्या पाहणार आहोत असे गाईडने सांगितले आणि जवळच्याच रस्त्यावरील इंडियन रेस्टोरेंट मध्ये नेले. तिथे आमच्यासाठी गरम गरम नाश्ता तयार होता. गेले तीन दिवस `रॅडिसन' मधला कॉंटिनेंटल नाश्ता करून लोक वैतागलेले होते. (पदार्थ भरपूर पण कशाशी काय खातात हा प्रश्न आणि बिन मसाल्याचे पदार्थ, त्यातल्या त्यात बेकरी प्रॉडक्ट, फळे, ड्राय फ्रुट्स यावर भागवले जायचे) इथे मात्र गरम गरम उपमा, बटाटे वडे, हिरवी चटणी, भारतीय चहा, ब्रेड असा सरंजाम होता. सगळ्यांनीच मग या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. बाहेर येऊन काही जण टाईमपास करत होते. त्यावेळी बर्फ पडत नव्हते पण पार्क केलेल्या गाड्यांवर बर्फाचे थर साठलेले होते. एकाने सुरुवात केली म्हणून दुसऱ्याने, तिसऱ्याने असे होत होत बरेच जण त्या भुसभुशीत बर्फाचे गोळे बनवून एकमेकांवर फेकत होते. रस्त्यावर फार गर्दी नव्हती पण तुरळक येणारे जाणारे आणि गाड्यांमधील रशियन लोक आमचा हा बालिश खेळ हसून बघत होते.
मस्त नाश्ता झाल्यानंतर पुन्हा बसमध्ये आलो आणि काहीवेळाने बस ने आम्हाला पीटर अँड पॉल नावाच्या भुईकोट किल्ल्याजवळ आणून सोडले. खरेतर हा किल्ला पाण्यातच होता. एका जुन्या लाकडी पुलावरून आमची बस या परिसरात पोहोचली होती. नदीचे पात्र भराव टाकून (रेक्लेमेशन) तयार करवून घेऊन हा किल्ला बांधला असावा. त्याच्या एका टोकाला बंदर आहे. हा किल्ला सध्या सरकारी इमारत आणि हेरिटेज म्हणून राखीव असल्याने याच्या सगळ्या भागात काही फिरता येत नाही. केवळ यात असलेले `पीटर अँड पॉल' हे कॅथेड्रल बघता येते. हे एक ऑर्थोडॉक्स चर्च. सनातनी किंवा जुन्या परंपरा पाळणारे. या कॅथेड्रल चा बेल टॉवर हा रशियातील सर्वात उंच बेल टॉवर म्हणून गणला जातो. या कॅथेड्रल चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक राजाचा( झारचा) शपथविधी इथे व्हायचा. इथेच पीटर द ग्रेट पासून च्या सर्व राजपरिवारातील व्यक्तींचे दफन केले गेलेय. हे सर्व बघून आमचा गाईड निखोलाय ने आम्हाला घाईघाईत बाहेर आणले. त्यावेळी बाराला पाच मिनिटे कमी होते. एका उंच चौथऱ्यावर उभे राहून दूरवर एका बुरुजावर मोठी तोफ दिसत होती तिकडे बघायला सांगितले. बरोब्बर बारा वाजता `धडाम-धूम' आवाज करत त्या तोफेतून खराखुरा गोळा डागला गेला. पूर्वीच्या काळी इथे राजाचे आरमार आणि गोदी होती. त्या सर्वांना दुपारी बाराला जेवणाच्या सुट्टीचा इशारा म्हणून ही तोफ उडवली जायची. आता तिथे आरमार नसले तरीही एक पारंपरिक विधी म्हणून रोज ही तोफ डागली जाते.
इथून बाहेर पडलॊ आणि एका इंडियन रेस्टोरेंटमध्ये जेवण करून हॉटेल गाठले. `हॉटेल अँबॅसेडर' एका गर्दीच्या रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती भागात होते. बाहेरून काही फारसे मोठे दिसत नसले तरी आत मात्र हे फारच भव्य होते. हॉटेल चेकिन करून सर्वांनी रूम ताब्यात घेतल्या. यानंतरचा वेळ तसा ऐच्छिक होता. कोणी आराम करणे पसंत केले तर कोणी खरेदीसाठी बाहेर पडले.
रशियाला जायचे आणि रशियाचा पारंपरिक `बेली डान्स' बघायचा नाही असे कसे होईल. ही तर रशियाची खासियत. आपल्या भरतनाटयम किंवा कथ्यक सारखा हा पारंपारिक रशियन नृत्य प्रकार. यातही दोन प्रकार आहेत. `बॅले (किंवा बॅलेट) हा ग्रुपने किंवा अनेक कपल्सने ने मिळून करायचा असतो. आणि दुसरा `बेली-डान्स' हा एक किंवा दोन स्त्रियांनी करायचा असतो. बेली म्हणजे आपली नाभी. शरीराचा इतर भाग स्थिर ठेऊन फक्त नाभी आणि त्याभोवतालचा पोटाचा भाग याचे लक्षवेधी थिरकणे म्हणजे हा बेली-डान्स. अनेकांची रशियन बेली डान्स शो बघायची इच्छा असल्याने पूर्व नियोजित कार्यक्रम नसला तरी सर्वसंमतीने अशा एक डान्स प्रोग्रॅमची व्यवस्था केली गेली. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण दुसऱ्या एका हॉटेल मध्ये गेलो. हे एका पाकिस्तानी माणसाचे हॉटेल होते. त्यामुळे हिंदी ऐकायला येत होती. पण हा बेली डान्स प्रकार काही फारसा पसंत पडेल असा नव्हता. अगदीच सुमार दर्जा. यापेक्षा उच्च दर्जाचे बेली डान्स शो आपल्या भारतात अनेक मोठ्या कार्यक्रमात आयोजित केले जातात. अगदी वर्णनच करायचे म्हटले तर असे समजा कि `एखाद्या मित्राच्या आग्रहावरून तुम्ही एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलात. काहीतरी छानसे कानावर पडेल म्हणून सावरून जागा पकडून बसलात. गायिका स्टेजवर आली आणि अपेक्षित असलेली ठुमरी किंवा गझल म्हणण्याऐवजी तिने ``कसं काय पाटील, बरं हाय का? सांगा बरं हाय का ....... काल काय ऐकले ते खरं हाय का?..... अशी बैठकीची लावणी म्हणावी....... हे ऐकून तुम्हाला जसे वाटेल अगदी तसेच बहुतांशी जणांना वाटले. अर्थात याचा अर्थ असा नव्हे कि आपली लावणी वाईट आहे. ती तर आपली मराठमोळी खासियत. पण प्रसंगानुरूप नृत्य किंवा गाणे असावे. एखाद्या लावणीच्या कार्यक्रमात जर गायिका भजन म्हणायला लागली तर कसे वाटेल? त्यामुळे काहींना आवडले, काहींना नाही तरी पण तास दोन तास टाईमपास झाला.
हा प्रोग्रॅम बघून सर्वजण परत हॉटेल वर आलो आणि निद्रादेवीच्या कुशीत गडप होऊन गेलो......... भेटूच पुन्हा उद्या................
अनिल दातीर.
(९४२०४८७४१०)