Get it on Google Play
Download on the App Store

भाग-४

मॉस्को मधील आमचा तिसरा दिवस तसा जरा निवांतच होता. सकाळी ११ ला निघायचे असे ठरले होते. निघताने हॉटेल चेक आउट करूनच जायचे होते. आजही काही लोकांनी हॉटेल मधील सुविधांचा उपभोग घेतला. तर काहीजण लवकर आवरून बॅगा क्लॉक रूम ला जमा करून जवळच असलेल्या मॉल मध्ये गेलो. चार मजली भव्य मॉल चांगलाच आकर्षक होता. आणि कालच्या `गम मॉल' च्या मानाने किमतीही थोड्या कमी होत्या. तरी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच होत्या. मी एक जर्किन खरेदी केले. वेळ कमी असल्याने जास्त काही फिरता आले नाही. बरेच जण हॉटेलच्या लॉबीत तयार होऊन अकराला हजर होते. पण तरीही प्रथेप्रमाणे ५-६ जण हा जवळचा मॉल सोडून दुसरीकडच्या लांबच्या मार्केटला गेले होते. त्यांना यायला बारा वाजले. लांब जाऊनही त्यांची काही मनासारखी खरेदी झालीच नव्हती. एकदाचे बाहेर पडलो. थोड्या वेळाने चांगला पॉश एरिया दिसू लागला. याला `एक्स-लास-व्हेगास' स्ट्रीट म्हणतात. काही वर्षांपूर्वी या भागात भरपूर कॅसिनो होते. रशियन लोक एक नंबरचे जुगारी. या कॅसिनो मध्ये अनेक जणांनी आपली आयुष्यभराची कमाई उधळलीय. अनेक कामगार आपली कष्टाची कमाई इथे संपवतात हे पुतीन साहेबांच्या लक्षात आले. सरकारलाही या कॅसिनो मधून भरपूर रेव्हेन्यू मिळत असणार. पण तरीही जनतेच्या हितासाठी म्हणून प्रेसिडेंट पुतीन साहेबानी खंबीरपणे निर्णय घेत कॅसिनोला बंदी घातली आणि इथले कॅसिनो सक्तीने बंद केले. रशियन कायदे आणि अध्यक्षीय लोकशाही तशी खूप कडक आहेत. त्यांच्याविरुद्ध जायची कोनात हिम्मत नाही. आता रशियात (मॉस्को आणि सेंट. पिटर्सबर्गला तरी) कॅसिनोला बंदी आहे. काही ठिकाणी चोरून कॅसिनो चालतात असे पाकिस्तानी टॅक्सी चालकाने सांगितले. पण रिस्क नको म्हणून कोणीही हे धाडस करायचा प्रयत्न केला नाही. काहीवेळाने थोडासा निवांत आणि भरपूर झाडी असलेला भाग आला. याला `स्पॅरो हिल्स' असे म्हणतात. नावावरूनच कळते कि हा भाग पक्षांसाठी नंदनवन असेल. इथेच आहे `मॉस्को स्टेट युनीव्हर्सीटी'. दहा लाख वर्ग मीटर एरिया असलेल्या या युनिव्हर्सिटीची स्थापना १७५५ साली झालीय. जगातल्या टॉपच्या १० युनिव्हर्सिटी मध्ये हिची गणना होते.

आम्ही गेलो तेंव्हा बाहेर हलकासा पाऊस पडत होता, थंडीही भरपूर होती. पण तरीही त्या उत्फुल्ल वातावरणात सर्वांनी मनसोक्त फोटो सेशन केले. आमच्या प्रोग्रॅम मध्ये फक्त या कॅम्पसची सफर होती. कुठल्याही इमारतीत जायचे नव्हते. पण बाहेरचाच परिसर इतका भव्य आणि सुंदर होता कि आत जायची गरजही नव्हती. मुख्य इमारतीला वळसा घालून पुढे गेलो आणि बस थांबली. तिथे जवळच एक तलाव होता. तो आठ महिने गोठलेलाच असतो पण आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने तो बराचसा वितळलाय. काही भागात मात्र अजूनही बर्फाचा थर दिसत होता. वेग वेगळ्या रंगाचे पक्षी त्या तलावात आणि बाहेरच्या झाडांमध्ये होते. बाहेरच्या बागेमध्ये काही कामगार बागेतील झाडांची गळून पडलेली पाने गोळा करत होते. एवढा मोठा परिसर स्वच्छ ठेवायचा म्हणजे किती कठीण काम असेल. पण नशीब इथे निसर्ग सोडला तर इतर कोणीही कचरा करत नाही. अगदी कागदाचा साधा बोळाही या भागातच काय पण संपूर्ण मॉस्कोत किंवा नदीतही दिसला नाही. कुठेही कोणी थुंकले दिसले नाही. रशियात कोणी पान, गुटका, मावा, तंबाखू खात नाहीत आणि या गोष्टी कुठे मिळतही नसाव्यात. काही लोक सिगारेट ओढताने मात्र दिसतात. पण तेही जिथे स्मोकिंग झोन असेल तिथेच.

हा युनिव्हर्सिटी कॅम्पस बघून आम्ही दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो आणि पोहोचलो एका मॉडर्न एरियात. फक्त इथेच आम्हाला उत्तुंग अशा आधुनिक इमारती दिसल्या. इथल्या बांधकाम नियमावलीनुसार इथे इमारत बांधताने आजूबाजूला ज्या प्रकारच्या इमारती असतील तसेच एलेव्हेशन (बाह्य देखावा) ठेवावे लागते. त्यामुळेच शहरातील बहुतांशी इमारती एकसारख्या दिसतात. आणि त्यावर युरोपियन आर्चिटेक्टरचा ठसाही स्पष्ट दिसतो. या मॉडर्न इमारतीमधील एका भागात आम्ही गेलो. हा खालचा मजला पर्यटकांसाठी खुला होता. हॉलच्या सेंटरला एक ब्रॉन्झमध्ये केलेले, आणि अनेक आकार, चेहरे एकत्र असलेले स्कल्पचर होते. हा भाग सोडून आम्ही बाहेर आलो. जवळच आमचे नियोजित रेस्टोरेंट होते. जेवण करून पुन्हा प्रवास सुरु झाला. आजूबाजूच्या इमारती बघत गाडी पुढे पुढे जात होती. काहींना बाथरूमला जाण्याची निकड वाटली. पण इथे सार्वजनिक टॉयलेट सापडणे तसे मुश्किल आहे. मग आमची गाईड `याना' ने एका भव्य हॉटेल मध्ये नेले. त्याचे नाव `रॅडिसन-रॉयल' नावाप्रमाणेच हॉटेल अतिशय रॉयल होते. आम्हाला तिथे लॉबी मध्ये एक विभाग दिसला. तिथे संपूर्ण मॉस्को शहराची अतिशय भव्य प्रतिकृती (मॉडेल) ठेवलेले होते. आणि त्यावर सुंदर विद्युत रोषणाई केलेली होती. काल बघितलेल्या रेड स्क्वेअर मधील इमारती एकत्र बघून त्या भागाच्या भव्यतेची कल्पना आली. तिथून बाहेर पडलो. यापुढे तसा काही नियोजित कार्यक्रम नव्हता. फ्री टाइम होता. म्हणून मग अल्ताफभाईंनी आम्हाला एका मार्केट जवळ सोडले. इथे माझ्या ऐकण्यात चूक झाली आणि मी जर्किन, ग्लोव्ह्ज, किंवा कानटोपी न घेताच बाहेर पडलो. बस आम्हाला सोडून गेली होती. तिथे तब्बल दोन तास काढायचे होते. हा एरिया पूर्णपणे पर्यटनकांसाठी मार्केट एरियाच होता. मधला भव्य रस्ता आणि दोन्ही साईडला खच्चून भरलेली दुकाने. फक्त पायी फिरणारे लोक. बहुतांशी दुकाने हि सोव्हेनियर्स नेच भरलेली होती. अनेक दुकानांमध्ये तोच तोच माल होता. आतापर्यंत अनेक ठिकाणी आम्हाला एकात एक बसणाऱ्या चार बाहुल्या दिसल्या होत्या. त्यात एका रशियन स्त्रीचा चेहरा होता. मुद्दामहून एका दुकानदाराला त्याबद्दल विचारले. पण त्याला आमचे बोलणे काही कळत नव्हते. आणि मग इथे गुगल ट्रान्स्लेटर कामाला आले. इंग्लिश मधून टाईप करून प्रश्न विचारला कि हे काय आहे? ट्रान्स्लेटर मुळे त्याला तो रशियन मध्ये दिसला आणि मग त्याने सांगीतल्याप्रमाणे `या बाहुल्या पारंपारिक रशियन महिलेच्या' प्रतिकृती आहेत आणि त्यांना फार सन्मान दिला जातो असे कळले. किमती मात्र भयानकच. छोट्या छोट्या बाहुलीच्या किमती देखील १५०० ते २००० रुबल्स अशा होत्या. (१ रुबल म्हणजे आपला सव्वा रुपया). बाहेर मरणाची थंडी. पण वेळ काढण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या रोडवर बऱ्याच ठिकाणी काही लोकल रशियन कलाकार, एक-दोन गायक, एक ड्रम वादक आणि एक गिटारिस्ट लोकांचे मनोरंजन करत होते. मीही एका ग्रुपला विनंती करून मला गाणे म्हणायचे आहे असे सांगितले. त्यांनीही मला मोका दिला पण काय झाले माहित नाही, कदाचित थंडीचा परिणाम असेल पण `तू हि रे .......... या गाण्याचा मुखडा गायल्यानतंर मला पुढील काही सुचेनाच. मग तो नाद सोडून दिला. त्या थंडीत अर्ध्या जाकिटवर आणि टी शर्टवर काय हालत झाली असेल हे नक्की सांगायचे तर मला किमान चार रशियन लोकांनी/ स्त्रियांनी माझ्या हाफ टी शर्ट कडे बोट दाखवत `हाऊ कॅन यु वेअर धिस? अशा प्रकारची विचारणा केली होती. आमची स्टील बॉडी ना?

एक घड्याळाचे दुकान होते. सहज आत गेलो आणि किमती बघून चक्रावून गेलो. पन्नास हजार ते दीड लाख रुबल्स. माझी अवस्था `थ्री इडियट' मधल्या रँचो सारखी झाली होती. `मेरी तो दो हजार वालीही है, लेकिन टाइम सही दिखाती है'..... अजून बराच वेळ बाकी होता. मग काय कुठल्याही दुकानात घुसायचे, उबदार हवेत वस्तू बघत टाईमपास करायचा आणि दुकानदाराची नजर रागीट होण्याच्या आत बाहेर पडायचे. त्या लांबच्या लांब शॉपिंग स्ट्रीट च्या अगदी एंडला एक `मॅक्डोनाल्ड्स' होते. आठ वाजता सर्वांनी तिथे जमायचे असे ठरले होते. बरेचजण लवकरच आले होते पण शेवटचा माणूस येईपर्यंत निघणे शक्य नसल्याने तसेच कुडकुडत उभे होतो. हळू हळू एकेकजण मॅक्डोनाल्ड्स मध्ये आले आणि किमान एका कॉफीची ऑर्डर देत वेळ काढत थांबले. कॉफी सुद्धा १५० रुबल्सला होती.

सर्वजण एकदाचे आले आणि मग आम्ही बस मध्ये येऊन बसलो. ते उबदार वातावरण खूप बरे वाटले. कालच्याच `खजुराहो' रेस्टोरेंटला जेवण करून आम्ही रेल्वे स्टेशनकडे वळलो. बुकिंग आधीच केलेलं होते त्यामुळे काही गडबड नव्हती. रेल्वे उभीच होती. एका कुपेमधे चार चार जण अशी व्यवस्था होती. रेल्वे तशी चांगली होती. फ्री वायफाय होते. किमान मागील वर्षीच्या स्पेन-पोर्तुगाल पेक्षा चांगली होती. झोपण्याची व्यवस्था चांगली होती. सर्वच एकाच बोगीत असल्याने सगळ्यांचा नेहमीप्रमाणे दंगा चालू होता. काहींचा राष्ट्रीय कार्यक्रमही सुरु झाला होता. एका कुपेमधे लोकल प्रवासी होते. ते थोड्या थोड्या वेळाने अटेंडंट कडे तक्रार करत होते. अटेंडंट बिचारी आम्हाला गप्प बसण्याची विनंती करत होती. तिची भाषा काही कळत नसली तरी हावभावावरून तिचा वैताग कळत होता. मॉस्कोला गुडबाय म्हणत एकदाचा रेल्वेने वेग पकडला आणि आमचे सेंट पिटर्सबर्ग या रशियातल्या दुसऱ्या मोठ्या शहराकडे प्रयाण सुरु झाले ..............तर मित्रहो, भेटूच पुन्हा सेंट पिटर्सबर्ग वरून. .............

अनिल दातीर.
(९४२०४८७४१०)