सायनाईड प्रकरण 7
प्रकरण 7
पाणिनी ने त्याच्या खाजगी ऑफिस चे कुलूप उघडले, फोन उचलून ऑपरेटर ल म्हणाला, “ मी आलोय, हाय टाईड मोटेल ला फोन लावून सौम्या ला जोडून दे.”
“ देते मी जोडून फोन, पण इथे एक बाई आली आहे बाहेर , ती म्हणत्ये की अनन्या गुळवणी च्या प्रकरणात तुम्हाला तातडीने भेटायचं आहे “
“ आत ये तू आणि मला सांग त्या बाई बद्दल “ पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला आधी सौम्या जोडून देऊ का ? “
“ नको तू आधी आत ये , नंतर सौम्या ला लाव फोन.”
“बाहेर मिसेस लीना मिलिंद बुद्धीसागर नावाच्या बाई आल्या आहेत., साधारण एकतीस-बत्तीस वय असेल. त्या हर्षल मिरगल च्या नातलग आहेत.” ऑपरेटर मुलगी आत आल्यावर म्हणाली.
“ मला कशासाठी भेटायचं आहे तिला? काय म्हणाली?”
“ तिच्या बोलण्यावरून मला एवढच जाणवलं की तिने तुम्हाला भेटणे महत्वाचे आहे.”
“ ठीक आहे तिला सांग की मी बाहेर गेलो होतो, अत्ताच आलोय आणि थोडाच वेळ मी तिला भेटीन.”
“ सौम्या चे काय ? “
“ कर तिला फोन पण बाहेर बसलेल्या कोणाला काळात कामा नये की तू कोणाशी बोलते आहेस. आणि माझं सौम्या शी बोलणे झाले की नंतर त्या बाईला आत पाठव.”
थोड्याच वेळात पाणिनी चा फोन वाजला.पलीकडून सौम्या चा आवाज ऐकला.” कसं काय चाललय सर? “
“ निवांत रहा आता. मला वाटतंय सगळा विषयच संपलाय ! “ पाणिनी म्हणाला.
“ कसं काय ? “
पोलीस त्या पोरांच्या मार्फत हेमंत कोरगावकर पर्यंत पोचले, त्याला गोळ्या तपासायची संधी मिळू न देत बाटली हिसकून घ्यायचा त्यांचा डाव होता.मग मला पुरावा नष्ट करणे,गुन्हेगाराला मदत करणे वगैरे आरोपाखाली अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.पण त्याच वेळी मी हेमंत ला फोन केला तेव्हा कळले की पोलिसांनी बाटली ताब्यात घेण्यापूर्वी गोळीचा चुरा त्याच्या हाताला लागला होता. त्याची तपासणी केल्यावर ते सायनाईड नसून साखरेला पर्यायी गोळ्याच असल्याचे सिद्ध झाले ! ‘
“ तू अनन्याला सांग आता मनावरचा सगळा ताण सोडून दे आणि आपल्या दैनंदिन कामाला लाग.तिला जिथे जायचं असेल तिथे तिला सोड आणि नंतर तू सरळ आपल्या ऑफिस ला ये.”
“ अगदी राहवत नाही म्हणून विचारते, त्या बाटलीतल्या सर्वच गोळ्या साखरेला पर्यायी गोळ्या होत्या?”
“ अगदी बरोबर, हेमंत ने जी चाचणी घेतली ती एवढी अचूक पद्धतीची होती की बाटलीतली एक जरी गोळी विषारी असती तरी त्याचा एखादा कण नमुना म्हणून घेतलेल्या पावडरला लागला असता आणि चाचणीमध्ये लगेच लक्षात आले असते.”
“ असं लक्षात येतं की अनन्याने सायनाईड च्या गोळ्यांची बाटली कुठे ठेवली आहे हे घरातल्याच कुणालातरी माहीत होते,त्यानेच त्या गोळ्या आणि साखरेला पर्यायी गोळ्या यांच्या बाटलीची अदलाबदल केली. अनन्याआहे का तिथे?”
“ हो ,आहे.”
“ सांग तिला आणि काही शंका आहे का तिला हे विचार “
पाणिनी ने फोन चालू ठेवला, त्या दोघींची कुजबुज ऐकू येत होती. नंतर सौम्या म्हणाली,” अनन्या तुम्हाला विचारू इच्छिते की तळ्यात सापडलेल्या गोळ्या जर विषाच्या नव्हत्या तर तिने घरी आणलेल्या सायनाईड च्या गोळ्यांचे काय झालं?”
पाणिनी उत्साहित होत म्हणाला,” तिला म्हणावे मी वकील आहे, मी त्रिकालज्ञानी नाही , तिने घरी जाऊन पुन्हा एकदा तिच्या खोलीत नीट शोधावी बाटली पण तरीही त्या गोळ्यांची बाटली कुठे आहे या गोष्टीत फारसा फरक पडत नाही.महत्वाचे हे आहे ही हर्षल च्या चॉकलेट मध्ये ज्या गोळ्या टाकायच्या होत्या त्याच तिने टाकल्या आणि त्याला आलेला मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता”
“ तिला सांग की घरी गेलीस तरी चालेल. तिच्याशी बोलायला आत्ता मला वेळ नाहीये,तू मात्र इकडे ये सौम्या.तुझ्यासाठी मी जेवण मागवतोय ! “
पाणिनी ने फोन ठेवला.काही वेळातच ऑपरेटर मुलगी
लीना ला घेऊन आत आली.” या आत या, बसा.” पाणिनी म्हणाला. बुद्धीसागर ने हात पुढे करून हस्तांदोलन केले.” तुमची पूर्व नियोजित भेट न ठरवता येणे म्हणजे जरा आगाऊ पणाच झाला माझा.पण माझ्या कामाचे स्वरूप एवढे तातडीचे आणि गोपनीय आहे की तुम्ही त्यासाठी अपवाद कराल असे मला वाटले.”
“ नाही नाही ठीक आहे ते ! तुम्ही बाहेरच्या मुलीला थोडी कल्पना दिली होतीच.पण काही लोक गूढ पणे वागतात ते त्यांच्या कामाच्या स्वरुपाची कल्पनाच बाहेर देत नाहीत.आता मला सांगा की गुळवणी च्या प्रकरणात तुम्हाला काय माहित्ये.”
“ गुळवणी च्या प्रकरणातले मला फारसे नाही माहीत पण अनन्या गुळवणी या व्यक्तीबद्दल मला बरच काही माहित्ये.”
“ बर तर सांगा काय माहीत आहे ते “पाणिनी म्हणाला. निवांतपणे अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीत बसत असताना तिने अभ्यासपूर्ण नजरेने पाणिनी कडे पहिले.
तिचे कपडे छान पैकी शिवलेले होते, आवाज प्रयत्न पूर्वक घोटून गोड येईल असं होता.
“ मला वाटत मी आधी स्वतःची ओळख करून द्यायला हवी.मी हर्षल मिरगल ची पुतणी”
“ तुम्ही विवाहित आहात?”
“ हो माझा नवरा तेलाच्या व्यवसायात आहे.”
“ तुमची आणि अनन्या गुळवणी ची ओळख कधी पासून ची आहे?”
“ दोन वर्षापेक्षा थोडी जास्त”
“ मला काय सांगायचय तुम्हाला?”
“तुम्ही एका गोष्टीकडे डोळे झाक करावी असे मला वाटत नाही.ती बाई आपण गोंडस,गोड आणि निष्पाप असल्याची बतावणी करण्यात अत्यंत निपुण आहे. आपल्या मोठाल्या डोळ्यात प्रामाणिक पणाचा भाव आणून ती तुमच्याकडे बघते,आणि अंदाज घेत असते की तुम्हाला तिच्या बोटाच्या तालावर कितपत नाचवता येईल.ती जे जे काही करते ते अगदी ठरवून स्पष्टपणे, आणि थंड माथ्याने करते. मला कळल्यानुसार ती आता कोणत्यातरी कारणास्तव असे भासवायचा प्रयत्न करत्ये की तिच्या काकाच्या बाबतीत काहीतरी भयानक घडल होत. तसं काहीही घडलेलं नव्हत प्रत्यक्षात. हर्षल काका ला पूर्णपणे नैसर्गिकच मृत्यू आला.त्याच्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या.डॉक्टरांना ते माहीत आहे.आणि तेच खरं आहे.”
“ अनन्या काय करायचा प्रयत्न करत होती त्याबद्दल तुमचा कदाचित काहीतरी गैरसमज झाला असावा.”
“ ते अगदी शक्य आहे. मला तिने विश्वासात घेतलेले नाही.ती गूढ आणि रहस्यमयच आहे.जगातल्या कुठल्याही पुरुषाला ती तिच्या तालावर नाचायला लावेल. जागरूक स्त्रियांना मात्र ती तसे करू शकत नाही. त्यामुळे ती तसा प्रयत्न ही करत नाही फार.तुम्ही स्त्री असाल तर तीचे पितळ तुम्ही उघडे पाडू शकता.पुरुष असाल तर ते केवळ अशक्य आहे.ती कायम निष्पाप पणाचे सोंग आणेल.असहाय्य पणे बघेल, तुमच्या गळ्यात पडेल.हे ती कसे करते देवच जाणे, भाबडेपणा,बुजरे पणा..... देवा.. देवा...”
“ मी मांजरासारखी भांडकुदळ आहे पाणिनी पटवर्धन.आणि मी ते लपवण्याचा प्रयत्न ही करत नाही. गरज वाटेल तेव्हा मी अधिकच होते.मी चावेन बोचकारेन ,पण भांडेन. “
“ कोणाविरुद्ध आणि कशाच्या विरुद्ध तुम्ही भांडणार आहात?” पाणिनी ने विचारले.” तुमचा नवरा त्याच्या वागणुकीच्या, शिष्ठाचाराच्यामर्यादा ओलांडतो आहे असे तुम्हाला वाटतंय का?”
तिने आपले ओठ घट्ट मिटले.” मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागरला तिने दुसऱ्या कुठल्याही पुरुषाप्रमाणे,स्वतःच्या नादी लावलंय.त्याला वाटतंय ती गोड, निष्पाप आहे, या जगातले वास्तव तिला कळलेले नाही.त्याला वाटतंय मी तिच्यावर जळते आहे ,तिचा छळ करत्ये.”
“ तिच्यावर जळण्यासारखे काही आहे का ?” पाणिनी ने तिला मधेच तोडत विचारले.
“ ते समजावे ही माझी इच्छा आहे.” ती म्हणाली. “मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर हा नर आहे, माणूस आहे,सर्वाना असते तशी त्यालाही ‘ ती ‘ भूक आहे. अनन्यातिच्या कडे कोणी येण्याची वाट बघत नाही,ती असहाय्य्तेचे तंत्र वापरते.आणि तिला हवंय ते सध्या करण्यासाठी काहीही करते. आणि आता मी मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर वर प्रेम करते ,त्याविषयी मला आदर आहे म्हणून सांगते की तुम्ही मला असा कोणताही सर्वसाधारण पुरुष दाखवा की अशाप्रकारच्या भूल थापांना बळी पडत नाही.आणि मी जळत असेनही.कसं कळणार मला? अर्थात मी ज्यासाठी तुम्हाला भेटायला आल्ये ते यापेक्षा खूप वेगळच आहे.”
“ ठीक आहे , काय सांगायला आला आहात तुम्ही इथे?”
“अनन्याजरी हर्षल मिरगल ला काका म्हणत असली तरी तो तिचा नातलग नव्हता, तीच खरं चारित्र्य काय होत हे त्याला समजलं होत.तो असं होता की ज्याला ती आपल्या बोटावर नाचवू शकत नव्हती, तिला त्याची भीतीच वाटायची.”
“ का भीती वाटायची?”
“ते मला नाही माहिती आणि त्यासाठी मी कितीही खर्च करायला तयार आहे , काका चा तिच्या वर काहीतरी दबाव होता, हे नक्की.”
” कशा पद्धतीचा वचक होता?”
“ तिला त्याची भीती वाटायची पण आदरही वाटायचा.तिने त्याची कधी खुशामत करायचा प्रयत्न केला नाही किंवा असहाय्य,निष्पपतेचा प्रयोगही केला नाही.तो जे सांगायचा ते ती करायची.”
“ तुम्ही विशिष्ट हेतू मनात ठेऊन इथे आला आहात, तर सांगत का नाही मला ते?”
“ तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे,”
पाणिनी ने हसून मान हलवली.”तुम्ही इकडे कशा काय आलात?”
तुम्ही काही गोष्टी समजून घ्याव्यात म्हणून”
“ पण या माझ्या ऑफिस मध्ये कशा आलात? मी या प्रकरणात आहे हे तुम्हाला कसे कळले?”
‘कर्नल बलदेव ने संगितले मला”
“हा कोण आहे?”
“ माझ्या काकांचा स्वयंपाकी होता तो. शिवाय,ड्रायव्हर, आणि बराच काही, हरकाम्या थोडक्यात म्हणजे.”
“ त्यांनी काय सांगितलं?”
“ त्याने सांगितलं की अनन्या गुळवणी डॉक्टर कडे गेली होती,त्यांनी तिला औषधाच्या अंमलाखाली आणून ती जे काही बोलली ते टेप केले,त्यात ती म्हणाल्ये की तिने हर्षल मिरगलचा खून केला आहे.”
“ आणि हे सर्व बलदेव ला कसं कळलं?”
“ निमिष जयकर ने सांगितलं., ज्याच्यावर अनन्यासध्या आपला पाश टाकू पहात्ये तो.”
“ तस असेल तर तिचा हेतू शुद्ध आहे. पण निमिष ला हे कसे माहीत?”
“ तिनेच निमिषला सांगितलं.डॉक्टरांनी तो टेप तिला ऐकवला, नंतर.”
“ अच्छा, म्हणजे तिने निमिषला सांगितलं,निमिषने बलदेव ला आणि बलदेव ने तुम्हाला. हे सर्व रेकॉर्डिंग बद्दल झालं, पण माझ्या बद्दल तुम्हाला कसं कळल?”
“ मला ते पोलिसांकडून कळल.”
“ आता आपण जरा मूळ मार्गावर आलो ! तुम्ही या विषयाची चर्चा पोलिसांबरोबर कशी काय केली?”
“ पोलिसच आमच्या घरी आले होते.माझी आणि नवऱ्याची चौकशी करायला.”
“ आणि तुम्ही काय सांगितले त्यांना?”
“ आम्ही प्रश्नांची उत्तरे दिली.”
“ प्रश्न काय होते?”
“ त्यांना सगळ्या कुटुंबाची सर्व माहिती हवी होती, सर्व भानगडीची, अनन्या,हर्षल चा मृत्यू,वगैरे. सर्व प्रश्न विचारून झाल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की अनन्यातुमच्या कडे आली आणि तुम्ही त्या तळ्यातून विष मिळवलत”
“मग त्यानंतर तुम्ही त्यांना काय सांगितलं?
“ एवढ सगळ ऐकल्यानंतर मी पूर्णपणे निरुत्तरच झाले.”
“ किती आधी घडल हे?”
“ पोलीस जाता क्षणीच मी गाडीत बसले आणि इथे आले.”
“ का?”
“ कारण अस आहे पाणिनी पटवर्धन,तुम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय ! मला पोलिसांकडून समजलं की तुम्ही अनन्याची वकिली घेणार आहात.ती त्या लायकीची नाहीये. हा सगळा प्रकार म्हणजे तिच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहे.”
“ तुम्हाला वाटतंय की तिने मिरगल चा खून केला?”
“ लीना हसली.” तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत्ये,त्याला कोणीच मारलं नाहीये.त्याला नैसर्गिक मृत्यू आलाय, काय घडलय हे तुम्ही समजावून घ्यावं असाच माझा प्रयत्न आहे.”
“ पण मग अनन्याअसा समज का पसरवेल की तिने काकांना मारलं?”
“ तिने ते हेतू पुरस्सर आणि ठाम अशा कारणास्तव केलंय, माझ्या काका कडे पंचाहत्तर हजार किंमत असलेली ची मिळकत होती त्याच्या मृत्यूपत्रानुसार या जागेची खरी किंमत किती आहे याची त्याला थोडीसुद्धा कल्पना नव्हती.किंवा कदाचित अनन्यापासून फारकतघेण्यासाठीचा हा डाव असावा..”
“ मला मृत्युपात्राबद्दल सांगा.”
“ त्यात अशी तरतूद होती की तो ज्या घरात राहत असे ते दोन मजली मोठ घर मला मिळणार.गाडी,फर्निचर मिळणार, पण शिक्षण पूर्ण होई पर्यंत अनन्यात्या घरी राहू शकते.त्याने मला ,माझ्या नवऱ्याला आणि कॉलेज ला रोख बक्षिसी ठेवली.मृत्युपत्राच्या व्यवस्थापकाला,सूचना दिली की त्याचा हरकाम्या नोकर बलदेव याला पुढील चार महिने कालावधीसाठी निम्म्या पगारावर नोकरीवर ठेवावे.अनन्याच्या शालेय शिक्षणाचा खर्च करावा,आणि हे सर्व झाल्यावर जर काही शिल्लक राहिली तर ती अनन्याला द्यावी. यात विनोदी भाग असं की घर विकून आणि हातातील रोख मिळून दोन लाख पंचवीस हजार एवढीच शिल्लक काका कडे निघाली असती.”
“ म्हणजे अनन्याला थोडक्यात काहीही न मिळाल्या सारखेच होते.” पाणिनी उद्गारला!
“ एकदम बरोबर!तो पूर्वी खूप श्रीमंत होता आणि मृत्युपत्रात अनन्याच्या नावाने काही तरतूद करण्याची व्यवस्था त्याने त्यावेळी केली होती.”
“ त्याला अनन्याआवडत नव्हती?”
“ तस नाही म्हणणार मी, तो तिला समजून घ्यायचा.”
“ सांगा पुढे, तुम्ही अजून अनन्याच्या हेतू बद्दल सांगितलच नाही.”
“ ती अत्यंत कावेबाज आणि हुशार आहे, तिला फायदा बरोब्बर कळतो. माझ्या काकांची कित्येक एकर पडिकजमीन आहे , अत्ता त्याची बाजारभावाने किंमत खूपच कमी आहे.पण लौकरच एक तेल कंपनी काकांच्या त्या जमीनी शेजारच्या जामीनत तेल संशोधनासाठी खूप खोल विहीर खणणार आहे. तसे झाले तर काही काळानंतर काकांच्या त्या पडिक जागेला प्रचंड किंमत येईल ”
“अनन्याला आपोआपच ती जागा वारसा हक्काने मिळेल. लक्षात घ्या, मृत्युपत्रात , ’ इतर सर्वाना सर्व देऊन झाल्यावर जर काही शिल्लक राहिली तर ती अनन्याला द्यावी. ‘ अशी तरतूद आहे.त्या जागेला किंमत नाही त्यामुळे अनन्याला दिल्या सारखे दाखवायचे पण प्रत्यक्षात मिळू द्यायचे नाही असे गृहित धरून काकाने त्यावेळी, तशी तरतूद केली असावी. पण आता नजिकच्या काळात ती जागा म्हणजे सोन्यासारखी होणार आहे ती हातची जाऊ नये म्हणून आता ती खुनाचे खोटे प्रकरण शिजवून जागेची किंमत वाढे पर्यंत वेळ काढू पणा करते आहे. मृत्युपत्र अंमलबजावणीसाठी कोर्टात जाईल अशी व्यवस्था करायच्या तयारीत आहे. प्रकरण एकदा कोर्टात गेले की कोणीही तिला ती जागा मिळण्यापासून रोखू शकणार नाही.”
“ तुम्हाला असं वाटतंय की खोट्या खुनाची ती कबुली देईल ? “ पाणिनी ने विचारले.
“का नाही? तिला काय धोका आहे त्यात? ती जर म्हणाली की कबुली देते वेळी मी औषधाच्या नशेत होते तर ते तिला हातही लावू शकणार नाहीत.”
“ तुम्हाला वाटत खरच ती असे काही करेल म्हणून?”
“अर्थात करेल ती, करेल नव्हे तर ती करत्ये हे सगळे”
“ भावनिक दृष्ट्या तिची झालेली कोंडी, मानसिक उलथापालथ हे सगळे मृत्युपत्र सिद्ध करण्यासाठी विलंब व्हावा या करता आहे?”
“ नक्कीच,ती काय करत्ये कळलंय का तुम्हाला? हर्षल काकांचे पुरलेले प्रेत विषाच्या तपासणीसाठी तिला पुन्हा बाहेर उकरून काढायचं आहे. त्या सर्वात जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे म्हणजे तो पर्यंत जागेची किंमत वाढेल.“
“ ठीक आहे तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल.काळजी करणे ही सोडा.तिने काका च्या चॉकलेट मध्ये टाकलेल्या गोळ्या , ज्या असायला पाहिजे होत्या,त्याच होत्या, म्हणजे साखरेला पर्यायी गोळ्याच होत्या.”
बुद्धीसागर चा चेहेरा त्या धक्क्याने एकदम पडला.” पाणिनी जागेवरून उठून उभा राहिला आणि तिला निरोप देण्याच्या दृष्टीने म्हणाला,” थोडक्यात तुमचे काका हे नैसर्गिक मृत्यूनेच गेलेत.काळजी सोडा आता.”
“ तरीही मला एक कळत नाही........”
“ पाणिनी तिच्याकडे गंभीरपणे बघत उभा राहिला.” माझी खात्री आहे की तुम्हाला कळत नाहीये. त्या जागे मधून तेल येईपर्यंतया प्रकरणाला विलंब लावणे हे अनन्या गुळवणी च्या फायद्याचे असेल तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही आज दुपारी इथे येऊन जी विधानं केली आहेत, त्या आधारे मृत्युपत्राची अंमलबजावणी करणारा न्यायाधीश हिरण्यगर्भ ही या जागेची घाई घाईत विक्री होवू देण्यास मज्जाव करेल.”
बुद्धीसागर खुर्चीतून उठली, काहीतरी बोलायला गेली पण विचार बदलला.दारा पर्यंत गेली , पुन्हा परत आली.आणि म्हणाली.” हर्षल काका च्या मिळकतीत जर ती तेलाच्या खाणीची जागा समाविष्ट असेल तर आम्ही त्यात वाटेकरी आहोत.मी समजते जी तुम्हाला मी मांजर वाटेन कदाचित.”
‘’ मी म्हणीन की की तुमच्या आहारात काहीतरी कमतरता आहे.”
“ का बरं? “
“ माणसाविषयी स्नेह निर्माण होईल असा आणि पुरेसा आहार तुम्ही घेत नाही “
एकदम रागाने उसळून ती म्हणाली, “ तुम्ही थोडा काळ थांबा, तुम्हालाच अनुभव येईल की ती कैदाशीण कशी आहे ते. मग मला सांगा.” आणि ताडकन निघून गेली.