सायनाईड प्रकरण 3
प्रकरण ३
दुसऱ्या दिवशी बरोबर साडेनऊ वाजता सौम्या सोहनी पाणिनी पटवर्धन ला म्हणाली, “ डॉ.डोंगरेआलेत इथे, त्यांना आपण दिलेल्या वेळे नुसार.”
“ त्यांच्या बरोबर ती मुलगी आहे? “
तिने मान डोलवली.
“ कशी आहे ती दिसायला सौम्या ? “
सौम्या जरा संकोचली.नंतर म्हणाली,’’ चांगली आहे दिसायला.”
आणखी काय विशेष असं ? “
“ लाजरी बुजरी “
“ नकारात्मक व्यक्तिमत्व ? “
“ नाही , नाही ,तसं अजिबात नाही.पण नेमकी कशी आहे माहित्ये का, घोटीव पाय आहेत, उभारीचे शरीर आहे पण त्याचे प्रदर्शन करणारी नाही.सुंदर डोळे आहेत पण नजर खाली आहे.,हात छानच आहेत पण घडी घालून बसली आहे.डोळे खूप बोलके आहेत पण हळुवार पणे संवाद साधणारे आहेत.तुमच्या लक्षात आले असेल मला काय म्हणायचं आहे. कदाचित जो पर्यंत तुम्ही तिला बघत नाही तो पर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही.”
पाणिनी पटवर्धन ने मान डोलवली, “ मी बाहेर जाऊन त्यांना भेटतो सौम्या. “
असं म्हणून तो बाहेर गेला. डॉ.डोंगरेशी हस्तांदोलन करून म्हणाला, “ कसे आहात तुम्ही डॉ. कार्तिक?”
त्यांनी अनन्या गुळवणी शी ओळख करून दिली. नंतर त्यांना घेऊन तो आत आला,दोघांना आदरपूर्वक बसायला सांगून म्हणाला, “ मिस गुळवणी, तुम्हाला इथे का बोलावलं याच आश्चर्य वाटलं असेल ना? “
सौम्या ने वर्णन केलेले आपले हळुवार बोलके डोळे क्षण भर वर करून तिने पाणिनी पटवर्धन कडे पाहिले.पुन्हा आपली नजर खाली करून ती म्हणाली ,” डॉ.डोंगरेयांनी सांगितलं मला इथे यायला लागेल म्हणून .माझ्या उपचाराचा तो एक भागच आहे असं मला वाटतंय.”
डॉ.डोंगरेथोडेसे खाकरले. “ त्यापेक्षा असं समज अनन्याकी ,तुला कसला तरी त्रास होतोय असे डॉक्टर या नात्याने मला वाटतंय. डॉक्टर म्हणून मी त्याचं स्वरूप काय आहे याचं निदान कदाचित करू शकेन पण त्याचा पूर्णपणे निपटारा करू शकेन असे नाही.”
“ पाणिनी पटवर्धन हा वकील आहे. देशातल्या मोजक्या उत्कृष्ट वकिलात त्याची गणना होते. तुला कशाचा तरी त्रास होतोय हे मी शोधून काढलंय. नेमका काय त्रास होतोय हे तू पाणिनी पटवर्धन ला सांगितलस तर तो तुला कदाचित मदत करेल.”
तिने त्याच्या कडे बावरलेल्या नजरेने वर पाहून मान हलवली. “ माफ करा, माझं पोट बिघडलंय, झोप ही नीट झाली नाहीये. अर्थात डॉ.डोंगरेम्हणत असतील की मला काही त्रास होतोय, तर त्यांचं बरोबरच असेल असं मी समजते पण कोणत्याही परिस्थितीत हा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. “
पाणिनी पटवर्धन ने तिच्याकडे निरखून बघितले.
“ कदाचित, “ डॉ.डोंगरेम्हणाले., “ मी पाणिनी पटवर्धन ला काही सांगू शकतो की जे........”
“ आत्ता नाही.” पाणिनी पटवर्धन त्याचं वाक्य मधेच तोडत म्हणाला.
डॉक्टरांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले.
पाणिनी पटवर्धन म्हणाला,” आपण इथे एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे की जे काही अनन्या गुळवणी माझ्याशी बोलेल ते प्रीव्हिलेज्ड कम्युनिकेशन स्वरूपाचे राहावे असे माझे मत आहे. म्हणजे वकील व त्याचे अशील यांच्यातील गोपनीय संवाद.तिने माझी वकील म्हणून नियुक्ती केली पाहिजे.तिला काय त्रास होतो आहे हे तिने स्वतः च मला सांगितले पाहिजे.”
अनन्याकसनुसं हसली.” माफ करा मला पाणिनी पटवर्धन, पण अशी कोणतीच गोष्ट नाहीये की मला वकिलाची मदत घ्यावी लागेल.”
पाणिनी पटवर्धन आणि डॉक्टरांनी एकमेकांकडे पहिले.
“ काही भावनिक गुंतागुंतीची भानगड ? “
“ नाही “ खालच्या नजरेने ती म्हणाली.
“ तू प्रेमात पडली आहेस? “
तिने मोठा उसासा सोडला.पुन्हा एकदा तिचे बोलके डोळे बोलले. “ हो ! “ आणि नजर पुन्हा खाली गेली.
“ आणि बहुतेक त्यात तुझ्या बाबतीत काही अप्रिय घटना घडली का ? “
तिने पुन्हा त्याच्या नजरेला नजर दिली.नंतर डॉ.डोंगरेकडे पाहिले.खुर्चीत तिने अस्वस्थपणे हालचाल केली.
“ का सांगून टाकत नाहीस त्याला सर्व, अनन्या? “ डॉ.डोंगरेयांनी विचारलं
“ शास्त्रज्ञानी भिंगातून एखाद्या किड्याचे निरीक्षण करावं अस मला वाटतय “ ती म्हणाली.
“ तुझ्या भल्यासाठीच आहे हे बेटा. आम्ही तुला मदतच करतोय अनन्या.” हळुवार पणे डॉक्टर म्हणाले.
तिने खोलवर श्वास घेतला. पाणिनी पटवर्धन च्या नजरेला नजर दिली, आणि अचानक तिच्या चेहेरा पटकन बदलला.तिचे नाजुक, कावरं बावरं व्यक्तिमत्व बदललं.तिच्या डोळ्यात एक चमक आली. नाकपुड्या विस्फारल्या सारख्या झाल्या. “ ठीक आहे,आहे मी तो कीटक ! तुम्ही सगळे जण माझं अक्षरशः विच्छेदन करताय ! पण मी माणूस आहे. मलाही भावना आहेत. टोकाच्या जाणीवा आहेत ! “ प्रेमात पडला असता तर तुम्हा लोकांना कसं वाटलं असतं ? तुम्ही समजा कुणाच्या तरी प्रेमात पडला असता आणि एखाद्याने तुमच्यावर भयानक मानसिक दबाव आणून तुम्हाला सांगितलं असतं की त्याला विसरायचं, कोणताही आगापिछा मागे न ठेवता, आपल्या प्रियकराशी काहीही संबंध आणि संपर्क न ठेवता त्याच्या आयुष्यातून निघून जायचं, तर तुम्हाला काय वाटलं असतं ? “
हे आता बरं झालं. तुझ्या दबून ठेवलेल्या भावना तू व्यक्त केल्यास , आम्हाला सर्व सांगितलस, आणि अगदी मोकळेपणाने अश्रूंना वाट मोकळी करून दिलीस तर तुझ्यावरचा भावनिक ताण कमी होईल.” डॉक्टर डोंगरेम्हणाले.
“ मी अशी रडणारी मुलगी नाही.”ती म्हणाली. “ माझ्या आयुष्यात मी अशा अनेक प्रसंगाला तोंड दिले आहे.पण तुमच्यासारख्या आत्म संतोषी, आणि सुरक्षित पणे आपापली आयुष्य जगणाऱ्या लोकांना...स्वतःला तुम्ही माझ्या जागी आहात अशी कल्पना करून पहा.”
“ तू दूर निघून जा असं तुला कोणी सांगितलं ? “
काहीतरी बोलायला तिने सुरवात केली पण पुन्हा नकारार्थी मान हलवली.थोड्या वेळाने ती खुर्चीत पुन्हा सावरून बसली. पुन्हा तिचं लाजाळू बावरलेल्या , स्वत्व हरवलेल्या तरुणीत रुपांतर झालं.
“ तो हर्षल मिरगल होता का ? “
“तो मेलाय “
“ मला माहित्ये की तो मेला आहे पण त्यांनी तुला सांगितलं का, की तू गायब हो.दूर निघून जा.आणि तुझ्या प्रियकराला सोडून दे ? “
“ मेलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलू नये. “
“ तो तुझं नातलग होता का ? “
“ नाही. नातलग नाही म्हणता येणार.”
“ तू त्याला काका म्हणतेस ? “
“ हो”
“ तुला आवडायचा का तो ? “
क्षणभर ती संकोचली. नंतर उद्गारली, “ नाही. “
“ त्याचा तू द्वेष करतेस का ? “
बराच वेळ तिथे शांतता पसरली.अचानक तिने डॉ.डोंगरेकडे पाहिले.” मला अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारून मला का फाडून काढता ? “ तुमच्या मदतीच्या अपेक्षेने मी इथे आल्ये.मला रात्री नीट झोप लागावी म्हणून झोपेच्या गोळ्या किंवा तसले काहीतरी हवे होते. मी भयभीत होणार नाही यासाठी मला काहीतरी हवे होते.तुम्ही माझी ट्रुथ सिरम ची चाचणी घेतलीत आणि नंतर सांगितले की मी वकीलाला भेटणे गरजेचे आहे. का ? “
डॉ.डोंगरेहळुवार पणे म्हणाले, “ मी तुला कारण सांगणार आहे बेटा.त्याने तुझ्या भावनावर आघात होईल.तुला कठोर व्हावे लागेल. त्याही पेक्षा तुला लक्षात ठेवावे लागेल की आम्ही तुझी मदत करतोय.”
“ माझ्या भावनिक ताणाचा विचार नका करू. “ ती कडवट पणे हसत म्हणाली.” अगदी सकाळचा नाष्टा घेण्या पूर्वीच मला भावनिक ताणाचा सामना करावा लागतोय सध्या. मी अगदी छोटी असल्यापासून म्हणजे मी या खुर्ची एवढी सुद्धा उंच नसेन तेव्हा पासून समाजाने मला त्रास त्रास दिलाय. तुम्हाला जर सत्य माहीत असेल, काय घडल आहे हे तुम्हाला माहीत असेल,तर.... ओह, मी तुम्हाला हे सर्व सांगायची काहीच गरज नाही. “
“ खरं तर हेच सर्व आम्हाला तुझ्या कडून हवंय. “डॉ.डोंगरेम्हणाले.
तिने त्यांच्याकडे पाहिले. नंतर आपल्या मनाची कवाडं बंद करून घेतली.
“ मग ? “ डॉ.डोंगरेतिला पुन्हा बोलत करण्याच्या दृष्टीने म्हणाले.
“ तुम्ही मला ट्रुथ सिरम चाचणी देऊन काय शोधून काढलंय? मी काय बोलले ? “
“ मी सांगणारे तुला ते. “डॉ.डोंगरेम्हणाले. “ मी तुला टेप रेकोडींग ऐकवणार आहे. तुला ते ऐकताना थोडी अडचण जाणवेल, कारण तुझा आवाज त्यावेळी जरा जाड , झोपेत असल्यासारखा आलाय. “
“ मी काय बोलल्ये ते मला ऐकायचच आहे. “
डॉ. डोंगरेने टेप रेकॉर्डर जोडला.”आता मधे काहीही न बोलता सर्व ऐक
“ ठीक आहे” ती म्हणाली
टेप रेकॉर्डर मधून आधी एक कर्कश्य आवाज आला . नंतर डॉक्टरांचा आवाजआला
“ तुझे नाव काय आहे ? “
पाणिनी पटवर्धन ने तिरक्या नजरेने अनन्याकडे पाहिले. कोणतीही हालचाल न करता ती बसून होती.
हाताची घडी घातली होती. नजर खाली होती.चेहरा शांत आणि भावना हीन होता.
खोलीत बसलेले चारही जण शांत पणे ऐकत होते खोलीत फक्त टेप चा आवाज भरून राहिला होता.जेव्हा अनन्या गुळवणी चा आवाज आला , “ मी मारले त्याला “ तेव्हा तिघांनी चमकून तिच्याकडे पाहिले.
चेहऱ्यावर कोणतेही भाव नआणता, डोळ्यांची पापणी सुध्दा न हलवता , ती खुर्चीत निश्चल बसली होती .
सरते शेवटी डॉक्टरांनी टेप बंद केला ‘.’बर मग ?” त्यांनी तिला विचारलं.
तिने त्यांच्या नजरेला नजर दिली.” तुम्ही काय करणार आहात? “
“ मी तुला मदत करणार आहे पोरी.” डॉ.डोंगरेम्हणाले.
तुम्ही पोलिसांकडे जाणार आहात ? “
“ सध्या तरी नाही.” पाणिनी पटवर्धन ने उत्तर दिले. डॉ.डोंगरेयांनी माझा सल्ला घेतला पुढे काय करायला पाहिजे असे त्यांनी मला विचारले. मी त्यांना सांगितलंय की डॉक्टर म्हणून या गंभीर गुन्ह्याची माहिती लपवण्याचा त्यांना अधिकार नाही.पण तू त्यांची रुग्ण असल्याने,तुला संरक्षण देण्याची आणि विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांची आहे. “
ही दोन्ही विधाने परस्पर विरोधी नाहीत का ? “ तिने विचारले.
पाणिनी पटवर्धन हसला.” तसा अर्थ तू काढू शकतेस. . आम्हाला अस वाटतंय की दुसर काहीहीकरण्यापूर्वी आपण शोध मोहीम हाती घेतली पाहिजे,आणि त्यात तू आम्हाला मदत करशील असं वाटतं. तुला माहित असेल की डॉ.डोंगरेहे माझे अशीलच आहेत.
तिने दोघांकडे आळीपाळीने पहिले.अचानक ती खुर्चीतून उठली.
“ काही सांगायचं होत ? “पाणिनी पटवर्धन ने विचारले.तिने मानेनेच नाही म्हटले.
“ शेवटी असं आहे बाळा, मनामध्ये एवढा तणाव सहन करून तू जगू शकणार नाहीस.तुला जगातले कोणतेच औषध बरे करू शकणार नाही,फारतर तुला बधीरत्व आणून तात्पुरता इलाज होईल.तुझ्या आत दडपलेल्या भावनांना वाट मोकळी करू देणे हे एकच तुझ्यासाठीचे औषध आहे.तू औषधाच्या अमलाखाली असताना , तुला कशाचा त्रास होतोय या बद्दल थोडा सुगावा आम्हाला लागला. तू बाकीचं सगळं......”
ती डॉ.डोंगरेकडे आली, त्यांचा हात हातात घेतला.त्यांच्या डोळ्यात असहाय्य्तेने पाहून म्हणाली, “ मला विचार करायला चौवीस तासांचा अवधी मिळेल का हो ? “ आणि हमसून हमसून रडायला लागली.डॉ.डोंगरेनी अर्थपूर्ण नजरेने पाणिनी पटवर्धन कडे पहिले.तिचा खांद्यावर थोपटल्यासारखं केले आणि तिला विश्वास देत म्हणाले, “ छान ,योग्य निर्णय घे पोरी. अन्यथा एवढा मानसिक ताण तुला नाही सहन व्हायचा.” ती त्यांच्या पासून लांब गेली.आपली पर्स उघडली.रुमालाने आपले डोळे व नाक पुसले.
” मला खर तर अस रडूबाई म्हणून जगायला आवडत नाही.पहिल्यांदाच मी अशी रडल्ये.”
“ कदाचित तीच मोठी समस्या आहे.तू नेहमीच स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न केला आहेस, सतत या दुष्ट प्रवृत्तीशी झगडली आहेस.”
“ मला झगडायला भाग पाडलं गेलं .” ती शांत पणे म्हणाली.” जाऊ मी आता ? “
“ मी पण निघालोय अनन्या, माझ्या बरोबर आलीस तरी चालेल.” डॉक्टर म्हणाले.
“ मला नाही यायचं तुमच्या बरोबर.”
“ का ? “
“ मला पुन्हा कोणतीही प्रश्नोत्तरे नको आहेत.”
ती दाराकडे जायला निघाली.अचानक पुन्हा पाणिनी पटवर्धन कडे येऊन तिने त्याचा हात हातात घेतला.” मला माहित्ये की मी तुम्हाला कृतघ्न वाटेन.पण मी खरच नाहीये तशी. तुम्ही खरच उमद्या स्वभावाचे आहात.”
तिने सौम्या कडे पाहून स्मित केले.” तुझ्या डोळ्यातच माझ्या बद्दल सहानुभूती दिसत होती मला.खरच तुम्हा सर्व लोकांना भेटल्याचा आनंद झला.मी हे शब्दात सांगू शकत नाही.” ती वळली आणि ताठ मानेंनी ऑफिस मधून बाहेर पडली.डॉ.डोंगरे नी आपले खांदे उडवले.
पाणिनी पटवर्धन म्हणाला, “ वरकरणी ती लाजरी आणि कावरी बावरी दिसत असली तरी तिच्या आत एक विलक्षण लढवय्यी स्त्री दडलेली आहे.”
“ अगदी खर बोललात तुम्ही “ सौम्या म्हणाली. “
“ आता या सगळ्या प्रकरण नंतर, तुमच तिच्या बद्दलच मत काय आहे डॉक्टर ? “पाणिनी पटवर्धन म्हणाला,
“ती एखाद्याचा खून करू शकेल अस तुम्हाला वाटतं? “
“ ते मला समजाव अशी माझीही इच्छा आहे ! मानस शास्त्र बद्दल मला ज्ञान असण अपेक्षित आहे पण या मुलीने मात्र माझी दांडी उडवली ! “
पाणिनी पटवर्धन ने टेप रेकॉर्डर कडे खूण करून म्हंटल ,” हा कुठेतरी सुरक्षित जागी ठेवा. “
“ दरम्यानचे काळात कायदेशीर दृष्ट्या माझी नेमकी स्थिती काय राहील? “ डोंगरेनी विचारले.
पाणिनी पटवर्धन ने जरा विचार करून म्हटले, “ तांत्रिक दृष्ट्या, नाजुक स्थिती आहे, तसे बघायला गेलं तर.”
व्यावहारिक दृष्ट्या, तुम्ही माझ्याकडे आलात, माझा सल्ला घेतला,आपण आता सर्वच प्रकरणाचा शोध घेतोय त्यामुळे एका अर्थी तुम्ही सुरक्षित आहात. “
आणि दुसऱ्या अर्थी ? “डॉक्टरांनी विचारले.
जो पर्यंत त्या टेप रेकॉर्डर मध्ये काय आहे ते दुसऱ्या कोणाला माहित होत नाही तो पर्यंतच !
(प्रकरण 3 समाप्त )