पराक्रमी छत्रसाल बुंदेला
काही राजांचा पराक्रम मोठा असतो परंतु बर्याचदा लोकांना तो माहिती नसतो. त्यापैकी एक म्हणजे महाराज छत्रसाल बुंदेला.बुंदेला वीर महाराजा छत्रसाल हे बुंदेलखंडाच्या शौर्य ,निर्भयता व संघर्षाचे प्रतिक आहेत. त्यांचे स्थान इतिहासत त्या भारतीय वीरांत आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राणा प्रतापांप्रमाणे मुघल साम्राज्य उखडून टाकण्यासाठी जीवन भर संघर्ष केला. ते बुंदेलखंडचा एक मोठा भूभाग शक्तिशाली मुघलांच्या पंज्यातून मुक्त करू शकले.
पराक्रमाची ख्याति असलेल्या बुंदेला वीर ,चंपतरायचे ते पुत्र होते. चंपतरायनी ओरछाला मुघल साम्राज्याच्या बंधनातून स्वतंत्र करण्यासाठी विद्रोहाचा झेंडा उभारला होता परंतु वीर चम्पतरायला आपल्याच स्वजनांशी लढावे लागले. त्यांनंतर त्यांनी ३० वर्षे मुघलांशी संघर्ष केला. त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचे समर्थक औरंगजेबाला नजर केले गेले.
या संघर्षमय काळात बाल छत्रसाल आपल्या पित्यासोबत ठिकठिकाणी भटकले व युद्धकला शिकले. छत्रसालाला सूड घ्यायची इच्छा होती पण त्यांच्याकडे सैन्य नसल्याने तो गप्प राहिला. छत्रसाल मुघल सेनेत भरती झाले आणि सेनेसोबत १६६७ ला दक्षिण अभियानात गेले. दक्षिण मोहिमेत मिर्झाराजे जयसिंहाच्या सैन्याबरोबर त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला, परंतु त्यांना योग्य ते श्रेय दिले गेले नाही. त्यांच्या मनात सूडाची भावना तर होतीच परंतु आता मुघलांविरुद्ध एक स्वतंत्र हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या राजाच्या विरोधात आपण लढत आहोत हे शल्य त्यांच्या मनाला बोचत राहिले . त्यांनी शिवाजी महाराजांना भेटण्याचा निर्णय घेतला. शिकारीचे निमित्त करून ते मुघल छावणीतून पळाले आणि शिवाजी महाराजांना भेटले . महाराजांच्या सैन्यात सामील होऊन मुघलांविरुद्ध लढण्याची त्यांची इच्छा होती, परंतु महाराजांनी त्यांना स्वतंत्र राष्ट्र निर्मितीसाठी उद्युक्त केले आणि त्यांना बुंदेलखंडात जाऊन स्वतंत्र राष्ट्र स्थापण्यास सांगितले.
त्याप्रमाणे छत्रसाल बुंदेलखंडात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सैन्यही नव्हते. परंतु तिथे गेल्यावर त्यांना चंपतराय चे पूर्वीचे काही सरदार येऊन मिळाले आणि हळूहळू त्यांनी बुंदेलखंडातील प्रदेश मोगलांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी सुरुवात केली. तिकडे औरंगजेबाने हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालवला होता . अशा वेळी छत्रसालाने बुंदेलखंडाला मोगलांपासून मुक्त करण्याची मोहीम चालवली.तेथील जनतेने त्यास आपला पुढारी आणि राजा म्हणून मान्य केले व त्याच्या शौर्याची व गुणांची वाहवा केली.
सुरुवातीस त्याच्याजवळ अत्यंत थोडे सैन्य होते. प्रथम त्याने धामोणीवर हल्ले केले, तेव्हा तेथील छोटे - मोठे सरदार त्यास येऊन मिळाले. अशा तऱ्हेने त्याने त्या प्रांतात आपला अंमल बसवून, तेथे चौथाई वसूल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने माळवा आणि कालिंजर हेही जिंकून आपल्या ताब्यात घेतले. मोगल सैन्याने त्यास विरोध केला. औरंगजेबाने तहव्वुर खान यांस त्याच्यावर पाठविले. परंतु त्याने त्यांचा व १६९९ मध्ये शेख अन्वरखानाचाही पराभव केला.
युद्धाच्या धामधुमीने क्लांत होऊन छत्रसालाने औरंगजेबासोबत १७०७ ला तह केला . बदल्यात औरंगजेबाने छत्रसालाला “राजा” ही पदवी व ४००० ची मनसब दिली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याला बहादूरशहाने स्वतंत्र राजा मान्य केले.
मुघल शासकांशी छत्रसालाचे संबंध सन १७२३ पर्यंत सौजन्यपूर्ण राहिले पण छत्रसालाने मराठ्यांना दिल्लीच्या राजकारणात मदत केल्यामुळे चिडलेल्या मोहम्मद शहा बंगशाने छत्रसालावर स्वारी करून बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाले असल्यामुळे छत्रसालाने बाजीरावाची मदत मागितली. बाजीरावाने बंगशला पराभूत करून छत्रसालाच्या बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य अबाधित राखले. त्या बदल्यात छत्रसालाने त्याला आपले आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा दिला. त्यानंतर काही दिवसातच छत्रसालाचा मृत्यू झाला.
छत्रसाल बुंदेला हे एक प्रजाहितदक्ष व राष्ट्रप्रेमी राजा होते. मुघल सम्राट औरंगजेबच्या विरूद्ध हयातभर लढणार्या मोजक्याच राजांत त्यांचा समावेश होतो. केवळ बुंदेलखंडच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक असामान्य योद्धा म्हणून ते इतिहासात अमर आहेत.