Get it on Google Play
Download on the App Store

स्वराज्य संरक्षक : छत्रपती संभाजी महाराज

    मुघल, आदिलशहा, निजामशहा, यांच्यासारख्या मातब्बर शत्रूंच्या नाकी नऊ आणत छ्त्रपती शिवाजी महाराजांनी  हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.....जंग जंग पछाडून सुद्धा शिवरायांच्या स्वराज्याला धक्का लावता आला नाही....मात्र शिवछत्रपतींच्या स्वराज्याला गिळंकृत करण्यासाठी शिवरायांच्या निर्वाणानंतर सर्व शत्रू एकवटले...अशा बिकट स्थितीत एकाच वेळी अनेक शत्रू अंगावर घेऊन त्यांना अद्दल घडवण्यासाठी तशाच खंबीर नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज होती....अशात शिवपुत्र संभाजी महाराज यांचे नेतृत्व  संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरले...
       शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, परमप्रतापी, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज....
       संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजीराजांच्या माता सईबाईंचे राणीसाहेब  राजे लहान असतानाच निर्वतल्या. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ त्यांची दूध आई बनली. ते मासाहेब जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या देखरेखीखाली मोठे होत होते.  राणी पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर पुत्रवत  माया केली.
  कुशग्र बुद्धीच्या संभाजी महाराजांनी लहानपणीच राजकारणातील बारकावे  भराभर आत्मसात करायला सुरुवात केली. शंभूराजे  लहान असतानाच पुरंदरचा तह शिवाजी करावा लागला....तहानुसार अटी पूर्ण होईपर्यंत लहानग्या शंभुराजांना मिर्झाराजाकडे ओलीस म्हणून राहावे लागले. यानंतर तहानुसार पाच हजार मोगल सरदार म्हणून मुघल फर्मानाचा स्वीकार करावा लागला. स्वराज्याच्या  घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.  तिथेही औरगजेबाचा भर दरबारात अपमान करून महाराज निघून गेल्यावर आग्र्यात महाराजांसोबत संभाजीराजे अडकले. पण त्यांना मुघल दरबारात यायला बंदी नव्हती . ते कुठेही फिरू शकत होते. यानंतर महाराजांच्या सूचनेनुसार त्यांनी रामसिंगशी सख्य वाढवले.त्यांच्याकडून विविध वाटा माहीत करून घेतल्या. याचा फायदा नंतर कैदेतून सुटका होताना झाला. कैदेतून सुटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना झेपली नसती नसती  तसेच मोगली ठाण्यांवर लहान मुलासोबतची व्यक्ती शिवाजी महाराज असणार या शक्यतेने कुठेही पकडले गेले असते , त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले.मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने राजगडला पोहचल्यावर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. याचा परिणाम म्हणून मोगल गाफील राहिले व काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यात संभाजी राजांचा युवराज म्हणून अभिषेक झाला. तोपर्यंत संभाजीराजे राजकारणात सक्रिय होऊ लागले होते.  डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी प्रभावित  केले.
        शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात गुंतले होते.
           तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी प्रधानांशी विशेषतः अण्णाजी दत्तो यांच्याशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे सुरणीस अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य नव्हते.अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी प्रधान संभाजीराजांच्या विरोधात गेले.
       प्रधानांनी केलेल्या विरोधामुळे संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिणेच्या  मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला.  म्हणून संभाजीराजांना मनात असूनही स्वारीवर जाता आले नाही .
      दरम्यान संभाजी महाराज काही काळाने दिलेरखानाला जाऊन मिळाले. शिवाजी महाराज व त्यांच्या नजरबजांमुळे तसेच सिद्दी मसुदच्या सहकार्याने संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात आले.
त्यानंतर १६८० साली छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.त्या वेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते पण रायगडावरील अष्टप्रधान मंडळातील काही मंत्री व सोयराबाई यांनी ती खबर दाबून ठेवली व संभाजी महाराजांना पकडून कैद करण्याचा डाव रचला.शिवरायांचे पवित्र स्वराज्य काही कुटील कारस्थान करणाऱ्या व्यक्तीमुळे औरंगजबाच्या हाती जाण्याची शक्यता होती. सुदैवाने तो कट फुटला व या कटापासून पहिल्यापासून दूर असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते संभाजी राजांना येऊन मिळाल्यामुळे संभाजी महाराजांची बाजू भक्कम झाली. त्यामुळे कटकारस्थान करणाऱ्या अण्णाजी व सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, मोरोपंत पेशवे, बाळाजी आवजी चिटणीस इत्यादींना अटक झाली. त्यानंतर शंभुराजांचा स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगी येसुबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी कटकारस्थान करणाऱ्या व्यक्तींना सोडून दिले व  पुन्हा मानाने आपल्या मंत्रिमंडळात घेतले. पण कटवल्यांनी पुन्हा स्वराज्यद्रोह करून अर्धे स्वराज्य औरंगजेबाचा मुलगा अकबराच्या घशात घालायचा प्रयत्न केला तेव्हा राजांनी त्यांची गय न करता त्यांना हत्तीच्या पायी दिले.
   त्यानंतर काही दिवसातच औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. त्याचा मुकाबला मराठ्यांनी नेटाने चालू केला. रामशेज किल्ला ताब्यात घेण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी गेलेल्या मोगल सैन्याला त्या किल्ल्याने चांगलेच झुंजवले. तो किल्ला साडेसहा वर्षे झुंजत राहिला. अशाच प्रकारे एक-एक किल्ला घेण्यासाठी मोगल चांगलेच दमले. संभाजी राजांनी बुऱ्हाणपूर या मोगलांच्या मातब्बर बाजारपेठेवर हल्ला करून ती लुटली.  सरसेनापती हंबीरराव यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.  सेनेशी लढताना अनेक मोगल सरदार पराभूत झाले.प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या पराभवामुळे चिडून औरंगजेबाने जोपर्यंत संभाजी महाराजांना पकडत नाही तोपर्यंत किमॉष (म्हणजे औरंगजेबाचा मोगली थाटणीचा टोप ) घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली.
         संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज,  इंग्रज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा मोठा धडा शिकवला की त्यांची संभाजीराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच . संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
             मात्र यानंतर औरंगजेबाने अनेक सरदारांना वतनाची आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. त्यातच सरसेनापती हंबीरराव लढाईत कामी आले व बहिर्जी नाईक यांचेही निधन झाले. हे स्वराज्याला खूप मोठे धक्के होते. यात संभाजीराजांचे सख्खे मेहुणे  गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर, हरजीराजे महाडिक सामील झाले. स्वराज्यात फितुरीला उत आला. याचाच परिणाम म्हणून  १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी  संगमेश्वरची बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व  कवी कलश यांना जिवंत पकडले.
          त्यानंतर संभाजीराजे व कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. चिडलेल्या औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. तरीही संभाजीराजांनी औरंगजेबापुढे झुकण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. २४  मार्च १६८९ रोजी संभाजीराजांनी देह सोडला. हिंदू धर्म सोडण्यास नकार देणारे संभाजीराजे धर्मवीर ठरले.
          संभाजीराजे कुशल प्रशासक होते. त्यांनी स्वराज्याची घडी नीट बसवली.संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा  आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादबा, मोरया गोसावी, समर्थ रामदास  यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली.
राजे संभाजी उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी "बुधभूषण" हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय "नायिकाभेद" व "नखशिखा" हे दोन ग्रंथ लिहिले.
बुधभूषण या ग्रंथात शिवरायांचा अतिशय सुंदर उल्लेख आहे:

"कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो:  स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥"

म्हणजेच कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा र्‍हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥

    अशा या पराक्रमी शिवपुत्रामुळे औरंगजेबाचे शिवरायांचे पुण्यप्रद स्वराज्य गिळंकृत करण्याचे आसुरी स्वप्न हे स्वप्नच राहिले. दख्खन जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला महाराष्ट्रात वणवण करत फिरावे लागले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तरी स्वराज्य जिंकू असे औरंगजेबाला वाटले पण त्याने केलेल्या संभाजी महाराजांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. महाराष्ट्राने पुढे औरंगजेबाला निकराचा लढा दिला. त्यासाठी संभाजी महाराजांचे बलिदान अखंड महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहिले...

भारताची महान'राज'रत्ने

सौरभ माळवदे
Chapters
अखिल भारतवर्षाचे पहिले चक्रवर्ती सम्राट : चंद्रगुप्त मौर्य महान भारतीय सम्राट : सम्राट अशोक चिरोसन्नाश्वमेधाहर्ता : सम्राट समुद्रगुप्त सम्राट कनिष्क शालिवाहन शककर्ता : गौतमीपुत्र सातकर्णी महान प्रतापी : महाराणा प्रताप तेजस्वी दिल्लीधीपती : पृथ्वीराज चौहान विजयनगर साम्राज्याचे पराक्रमी सम्राट : कृष्णदेवराय वर्धन वंशाचे पराक्रमी सम्राट: हर्षवर्धन चोलवंशीय महाराज राजराज आणि महाराज राजेंद्र पराक्रमी दिल्लीधीपती सम्राट : हेमचंद्र विक्रमादित्य हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष : छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संरक्षक : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी छत्रसाल बुंदेला खालसा पंथ संस्थापक गुरु गोविंदसिंग