Get it on Google Play
Download on the App Store

विजयनगर साम्राज्याचे पराक्रमी सम्राट : कृष्णदेवराय

    विजयनगर साम्राज्य इतिहासातील सर्वांत वैभवशाली आणि समृद्ध साम्राज्यांपैकी एक होते. आजही त्याचे अवशेष पाहून त्यांच्या वैभवशाली साम्राज्याची कल्पना येते. या महान साम्राज्याचे प्रसिद्ध सम्राट कृष्णदेवराय यांच्या शौर्याला आपण  विसरत आहोत . आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
   १५०९ साली वीर नरसिंहानंतर कृष्णदेवराय गादीवर आले. त्या वेळी राज्याच्या चारी बाजूंनी नंदराज ,गजपती प्रतापरुद्र, महंमूदशाह, आदिलशाह वगैरे लहान-मोठे राजे कृष्णदेवरायांविरुद्ध होते. कृष्णदेवरायांनी या सर्वांशी अत्यंत बहादुरीने आणि चतुराईने मुकाबला केला. प्रथम त्यांनी १५१० मध्ये  महंमूदशाहाचा व विजापूरच्या आदिलशाहाचा पराभव केला.
    कृष्णदेवरायांनी श्रीलंका ते बांगलादेशाच्या सीमेपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. हिंदूधर्माचे रक्षण केले. 
    डेक्कनचा सुलतान त्याच्या फौजा विजयनगरमधील लोकांची लूटमारीसाठी पाठवत असे. सम्राट कृष्णदेवरायच्या काळात त्यांनी जो बंदोबस्त केला त्यामुळे ही लूटमार पूर्णपणे थांबली.
    सम्राट श्री कृष्णदेवरायांनी इसवी सन १५०९ मध्ये विजापूरवर स्वारी केली व श महमूदशाहला पराभूत केले. त्यामुळे, एकेकाळचे विजयनगरचे भाग बिदर, गुलबर्गा, विजापूर हे पुन्हा विजयनगरला जोडले गेले.  त्याने उम्मत्तूर, शिवसमुद्रम्, श्रीरंगपट्टणम् आणि इतर प्रदेश आपल्या राज्यास जोडले. शत्रूकडे गेलेला प्रदेश प्रतापरुद्रकडून तर मिळविलाच व  त्याच्या राज्यातील बराच प्रदेश जिंकून घेतला. अखेर त्याने आपली मुलगी कृष्णदेवरायास देऊन त्याच्याशी तह केला. यानंतर त्याने जवळजवळ सध्याचा सर्व आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला. सोळाव्या शतकातील ही दक्षिणेतील स्वारी लष्करीदृष्ट्या एक मोठी घटना होती.
    कृष्णदेवराय यांना विजयनगरच्या इतिहासात सर्वाधिक लष्करी यश मिळाले. शेवटच्या क्षणाला युद्धाची योजना बदलण्याची रणनीती ते वापरत. या रणनीतीमुळे शत्रूला नवीन रणनीती समजून त्यावर कारवाई करण्यासाठी वेळ मिळतात नसायचा. अशा युद्धनीतीमुळे ते त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही युद्ध हरले नव्हते.
     त्यांनी विजया नगरच्या भोवती कालवे व तळी बांधून कोरडवाहू शेतजमिनीस पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली . तुंगभद्रा नदीवर धरण बांधले. त्यांनी अनेक प्रासाद, मंदिरे व शेकडो गोपुरे बांधली. ते स्वतः वैष्णव होता. त्यांनी अनेक इतर देवतामंदिरांचा जीर्णोद्धार केला. ते स्वतः विद्वान व विद्येचे परम भोक्ते होते. त्यांनी कित्येक विद्वान, कवी, संत, साधूंना  उदार आश्रय दिला. ते शूर योद्धा, मुत्सद्दी, न्यायप्रिय प्रशासक ,  विद्येचा भोक्ते म्हणून प्रसिद्ध होते.
     कृष्णदेवराय स्वत: विद्वान होते आणि त्यांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला. तेलगू साहित्यातील प्रख्यात आठ कवी त्याच्या दरबारात होते ते सर्व ‘अष्टदिग्गज’ म्हणून ओळखले जात.स्वत: कन्नड असूनही तेलुगू व संस्कृत या भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते व त्यांनी ह्या भाषांत साहित्यनिर्मिती केली . 
  संस्कृतमधील त्याचे मंदालसाचरित्र,सत्यवधू परिणय, सकल कथासारसंग्रहम्, ज्ञानचिंतामणि, जांबवतीपरिणय आणि रसमंजरि हे काव्य व नाट्यग्रंथ होत.
    बेलगामच्या किल्ल्यावर आक्रमणाच्या तयारीत असताना, कृष्णदेवराय गंभीर आजारी पडले.त्यानंतर, सन १५२९ नंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.
   प्रवासवर्णनांमध्ये कृष्णदेवराय हे एक उत्कृष्ट न्यायप्रिय शासक तर होतेच , बरोबर उत्तम योद्धे होते. प्रत्येक युद्धामध्ये ते स्वतः सर्व सेनेचे नेतृत्व करत. अनेक लढाईंमध्ये ते घायाळ असूनही त्यांनी सैन्याचे नेतृत्व केल्याचे वर्णन प्रवासवर्णनांमध्ये आढळते.
      या महान राजाला इतिहासात मानाचे स्थान आहे.

भारताची महान'राज'रत्ने

सौरभ माळवदे
Chapters
अखिल भारतवर्षाचे पहिले चक्रवर्ती सम्राट : चंद्रगुप्त मौर्य महान भारतीय सम्राट : सम्राट अशोक चिरोसन्नाश्वमेधाहर्ता : सम्राट समुद्रगुप्त सम्राट कनिष्क शालिवाहन शककर्ता : गौतमीपुत्र सातकर्णी महान प्रतापी : महाराणा प्रताप तेजस्वी दिल्लीधीपती : पृथ्वीराज चौहान विजयनगर साम्राज्याचे पराक्रमी सम्राट : कृष्णदेवराय वर्धन वंशाचे पराक्रमी सम्राट: हर्षवर्धन चोलवंशीय महाराज राजराज आणि महाराज राजेंद्र पराक्रमी दिल्लीधीपती सम्राट : हेमचंद्र विक्रमादित्य हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष : छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संरक्षक : छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी छत्रसाल बुंदेला खालसा पंथ संस्थापक गुरु गोविंदसिंग