chapter 5 : कॉलेजच्या दररोज दिवसांची मजा
आमचं रोजचं कॉलेजला जाणं सुरु झालं. काही लेक्चर बोरं व्हायचे पण तरीही लेक्चरमध्ये फार मजा यायची. माझं महत्वाचं लेक्चर तर नेहमीच सुटायचे पण जे लेक्चर नको होते तेच लेक्चर नेहमी नशीबात असायचे. मग कोंडलेल्या प्राणांप्रमाणे कधी सुटका होईल असे वाटायचे. अशा बोरिंग लेक्चर्स मध्ये आमच्या खोड्या नेहमी सुरु असायच्या जाईने किंवा अरुणाने आणलेले पराठे वा तीळगुडाचे लाडू असो, लेक्चरमध्ये आवाज न करता खायचं. सुगंध दरवळू लागला की मॅम सर रागावायचे नाहीत कारण त्यांना कोणीही खाताना दिसत नव्हतं.
नेटवर्किंग मधलं distribution आम्हाला चांगल्याप्रकारे समजलं होतं ज्यावेळेला आम्ही ते distribution प्रत्यक्षात केलं. आमचं नेटवर्क म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप आणि त्यातली प्रत्येक मैत्रीण म्हणजे संगणक आणि bigdata म्हणजे आमचं एक रुपयाचं मेलोडी चॉकलेट. नेटवर्किंग टूल जे distribution साठी लागणारं ते म्हणजे प्रत्येकाजवळ असणारी प्रत्येकाच्या उपयोगात येणारी सरळ स्केल. आता सुरुवात झाली ती उपक्रमाला स्केल या नेटवर्किंग टूलच्या साहाय्याने bigdata चॉकलेट, याला सारख्या भागामध्ये divide केल्या गेलं. division करताना ते अशाप्रकारे व्हायला पाहिजे number of computers = number of data parts. नंतर प्रत्येक डेटा चॉकलेट हा प्रत्येक मैत्रीण संगणकाला distribute करण्यात आला. अशीच आमची प्रॅक्टिकलची गंमत. पायाला पाय मारणे, एकमेकांचे केस ओढणे, केसांचे बो, क्लचर,क्लिप काढणे, कागदाचा गोळा करणे किंवा त्यात काहीतरी लिहून दुसऱ्याला फेकून मारणे असले फालतू खेळं आम्हाला लेक्चरमध्ये सुचायचे. मुलांची तर बाजूही वेगळी आणि टाईमपास म्हणून त्यांचे खेळही वेगळे. अधूनमधून मोबाईल डेक्सच्या खाली ठेऊन कोणाशी चॅटिंग करणे, समोर असलेल्या ppt प्रेझेंटेशनची स्लाईड सरांच लक्ष नसतांना चेंज करणे. हे मुलं नेहमीच लेक्चरला उशीरा यायचे लेक्चर सुरु झालं की १० मिनिटांनी यांचा आत प्रवेश राहायचा. विशेष म्हणजे यांची एन्ट्री एकदम डॉन भाई सारखी असायची, डॉन नेहमी चेंज व्हायचा. कुठलातरी एक मुलगा 'please may I come in'
म्हणायचा आणि लपलेले सगळे १०-१२ जण त्याच्या पाठोपाठ आत शिरायचे. त्यांची एन्ट्री होताच आधीच आलेल्या मुलांचे नारे सुरु व्हायचे. त्यावेळी सरांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि ही गंमत पाहण्यालायक असायची आताही आठवलं की खूप हसू येतं चेहऱ्यावर.
मुलींचे तर उलटंच होतं मुलं आत यायचे आणि मुली बाहेर. प्रेझेंटी झाल्यावर अर्ध लेक्चर झाल्यानंतर काही मुली सरांचं लक्ष नसतांना जादू झाल्याप्रमाणे मागच्या दरवाज्यातून गायब व्हायचे. सरांना तर याचा सुगावाही लागत नसे. एकदा मुद्दलकर सरांचं लेक्चर सुरु असतांना क्लासमध्ये असलेल्या आशिषने कागदाचा विमान बनवून ब्लॅक बोर्डच्या दिशेने फेकला. खाली पडलेला कागदाचा विमान उचलून सर सगळ्यांकडे रागाने बघत होते. क्लास अचानक शांत झाला. सरांना हे नक्कीच माहित होतं की मुलांमधूनच कोणीतरी हा विमान फेकला त्यामुळे सरांनी मुलांना विचारलं, 'कुणी फेकला हा विमान सांगा लवकर नाहीतर सगळ्या मुलांना बाहेर पाठवेल मी'.
मुलं खाली मान टाकून स्तब्ध राहिली माहित असून सुद्धा, कोणालाही नाव सांगायचं नव्हतं. सर जोरात ओरडले रागात ते म्हणाले,
'सगळे मुलं आताच्या आता बाहेर जा आणि उद्यापासून माझ्या लेक्चरला बसायचं नाही'.
मुलं सॉरी म्हणून नाव संगणाऱ्यांपैकी नव्हती तर त्या क्षणी एकजूट होऊन मैत्री निभवणारी होती. त्या दिवशी सगळे मुलं हसत हसत बाहेर गेले. त्यांचा तो मैत्रीचा लढा इतिहाच्या पानांवर नोंदवण्यासारखा होता. कागदाचा विमान बनवणाऱ्या आशिषला इंजिनीअर नाहीतर पायलट म्हणून मैत्रीच्या कट्यात ओळखल्या जातं. या सरांचा सगळ्यांनाच राग यायचा कारण त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीही सगळयांनी शुभेच्छा दिल्यानंतर रागावले होते. वाढदिवसाच्या शुभेच्छाही कॉलेजच्या नियमांच्या विरुद्ध आहे असं त्यांना वाटत होतं.
Bounded buffer, signal and wait यासारखे प्रोब्लेम सोडवून प्रतिक आणि भूषण यांनी आपले वर्चस्व गाजवले होते. सर्वांचा आवडता आणि मजेदार प्रसंग म्हणजे खंडवानी सरांचा वाढदिवस. त्या दिवशी आम्ही सर्वांनी सरांना लेक्चर न घेण्याची विनंती केली. आमच्या म्हणण्यावर नेहमी जीवतोडून शिकवणारे हे सर मानलेत. प्रत्येकाच्या मनात सुरु होतं सरांना आता शुभेच्छा कशा द्यायच्या. मैत्रिणींच्या म्हणण्यावर मी सरांसाठी चार ओळींची कविता बनवली आणि ती समोर जाऊन प्रस्तुत केली. मग सगळ्यांनी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरांच्या चेहऱ्यावर नुकतीच खुललेल्या कळीप्रमाणे गोड हास्य होतं. सर सगळ्यांना धन्यवाद म्हणाले. अजूनही लेक्चर संपायला खूप वेळ बाकी होता. मग सरांनी म्हटलं अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही समोर येऊन प्रेझेंट करू शकता. कुणी फिल्मी डायलॉग म्हणाले, कुणी गाणं, ड्रामा, कुणी कविता सादर केली. खरंतर हे लेक्चर म्हणजे आकाशात चमकणाऱ्या त्या रंगीबेरंगी सिताऱ्यांसारखं होतं. हेच नाहीतर असे कितीतरी प्रसंग नेहमीच्या दिवसात घडायचे. त्यामुळे कॉलेजच्या दररोज दिवसांची मजा वेगळीच होती असं अजूनही वाटतं..!!