chapter 4 : कॉलेजचा पहिला दिवस
निवांत झोप लागल्यानंतर होस्टेलच्या रूमच्या खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्य किरणांनी मला जाग आली. आई मला थोडं अजून झोपू दे म्हणून मी पुन्हा माझं अंथरून पांघरून घेतलं होतं. पण तितक्यात एक आवाज आला
'ये लवकर उठ नाहीतर कॉलेजला उशीर होईल'. आईची हाक दुसऱ्या आवाजात आल्यासारखी वाटली. तो आवाज माझ्या रुममेटचा होता. त्यामुळे पुन्हा मला झोपू दे असं न म्हणताच मी उठली आणि खिडकीचा अर्धवट राहिलेला काच पूर्ण उघडला. पलंगावरच अंथरून नीट साफ केलं आणि ब्रश केल्यानंतर होस्टेलच्या खाली आलेली मिनी कॅन्टीनमध्ये चहा घेतला. आंघोळ झाल्यानंतर कॉलेजच्या तयारीला लागली. बॅगमधून आईने छानसा प्रेस केलेला गणवेश काढला पायजमा आणि कुर्ती आकाशी आणि निळी ओढणी असा तो गणवेश. मी आणि माझी रुममेट आम्ही दोघंही तयार झालो. ती म्हणाली
'चल आपण दोघंही सोबतच जाऊया जेवायला'.
ती खूप छान होती हसरी त्यामुळे तिचं नावं जान्हवी असताना मी तिला जानू म्हणायची. सगळं वेळेवर आटोपलं होतं सकाळी ११ ला सुरु होणाऱ्या कॉलेजला अजून अर्धातास बाकी होता. मग आम्ही थोडावेळ होस्टेल गार्डनमध्ये बसून गप्पा मारल्या आणि निघालो मग कॉलेजला.
तीने विचारलं, 'तू कुठली आहेस?'
मी म्हटलं,'नागपूर आणि तू ?'
ती म्हणाली,'अकोला, किती गुण मिळाले तुला पॉली ला?'
मी म्हटलं,'८३℅ आणि तुला '
ती म्हणाली,'८९'
मी म्हटलं,'अरे वाह तू तर टॉपरच असणार मग'
ती म्हणाली,'हो'
हे एकून मी मनात म्हटलं
'चला चांगलं आहे मला अभ्यासू रुममेट मिळाली' बोलता बोलता कसं कॉलेज गेट आलं कळलं सुद्धा नाही आणि त्या गेटला एक सुंदर नाव होतं 'विद्यामंदिर'. आता आत प्रवेश केल्यानंतर ती तिच्या क्लासला गेली आणि मी माझ्या. मला माहित नाही तिला तिचा क्लास मिळाला का नाही पण मला माझा क्लास शोधायला जास्तच वेळ लागला. थेट ११ वाजता बेल वाजली सगळे विद्यार्थी जागेच उभे राहिले. मीही सगळ्यांना पाहून जिथे होती तिथेच उभी राहिली. गजानन महाराजांचं आणि सरस्वतीचं श्लोक सुरु झालं आणि त्यानंतर राष्ट्रगीत. हे माझ्यासाठी नवीन कॉलेजमध्ये नवीनच होतं. तुम्हीही विचारात पडलाय न आता, कुठल्या कॉलेजमध्ये जर देवाच्या नावापासून आणि राष्ट्रगीतापासून सुरुवात होत असेल तर ते आमचच कॉलेज आहे. शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवन सोबत जगणार असं वाटलं. क्षणभर क होईना त्या दिवसापासून आध्यात्म आणि देशभक्तीची भावना जागृत व्हायची.
मला अचानक आठवलं ऍडमिशनच्या दिवशी प्रिन्सिपल सरांनी मला HOD सरांना भेटायला सांगितलं होतं. मी लेक्चरचा विचार न करता सरांच्या कॅबिनमध्ये गेली. सरांना मी आधी माझं नाव सांगितलं आणि सरांनी मला स्कॉलरशिप आणि अजूनकाही महत्वाची माहिती सांगितली. मी तेथून निघाली आणि टाईमटेबल माहित नसल्याने नोटीस बोर्ड कडे गेली टाईमटेबल बघितला. टाईमटेबल नुसार पहिलं लेक्चर नाही तर प्रॅक्टिकल होतं. माझं पाहिलं EDC विषयाचं प्रॅक्टिकल DMC लॅब मध्ये. मी एकाला विचारलं DMC लॅब कुठे आहे. मी गेली आणि म्हटलं,
'sir, please may I come in' . सरांनी मला नाव विचारलं मी सांगितलं,
'नेहा मौन्देकर'.
सरांनी त्यांच्याकडे असलेली लिस्ट बघितली आणि मला विचारलं,
'why are you late?'
मी घाबरलेली होती, हिंदीत बोलली,
'सर वो hod सरने बुलाया था इसीलिए लेट हो गया'.
सर म्हणाले, 'ओके , लेकिन अगली बारसे प्रॅक्टिकल हो या थेअरी टाईम पे आना'
मी फक्त बैलासारखी मान हलवली. रागावणाऱ्या त्या सरांच नाव होतं खंडवानी सर. क्लासमध्ये सगळे बसले असतांना मागून येऊन सिनेमात दाखवणाऱ्या एखाद्या हिरोईन सारखी एन्ट्री करणार आणि सगळे माझ्याजवळ येऊन बस ना म्हणून सीट ऑफर करणार. या माझ्या सिनेमातल्या विचारांना मी सोबत घेतलेल्या वहीच्या मधल्या पानांत लपून ठेवलं कारण मला समोरचं दृश्य काही वेगळचं सांगत होतं. शाळेपासून नेहमी पहिल्या बाकावर बसणारी मी पाहिलं बेंच पकडण्यासाठी धावत गेली. पण काय पहिल्याच दिवशी पहिला पोपट. प्रत्येकजण मागचा बेंच पकडण्यासाठी लढत होता. समोरून येणारा प्रत्येकजण बसण्यासाठी मागे जात होता मग मीही बसायला मागेच गेली. काळे मॅम, शहादे सर असे एकापाठोपाठ एक लेक्चर झालेत. वाटलं पहिल्या दिवशी काहीही समजणार नाही पण पोलीटेक्निकला झालेलेच विषय असल्याने सगळं काही समजलं होतं. रिसेसमध्ये मैत्रिणींशी मैत्री पण झाली आणि ५:४५ ला आमचं कॉलेज सुटलं.
कॉलेजच्या दर्शवणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी येणाऱ्या प्रत्येक दिवसांसाठी सातत्याने माझा सोबत राहिल्या. पहिली गोष्ट थोडावेळ अभ्यासाला वेगळं ठेवत आध्यात्म आणि देशभक्तीची जागरूकता. दुसरी पहिल्या दिवशीही सूट न देता रागावणं म्हणजे शितबद्धता आणि तिसरी गमतीदार गोष्ट म्हणजे सुरुवात मागच्या बाकापासून तर पुढच्या बाकापर्यंत...!!