शबरी 14
शबरी म्हणाली, 'देवा, मी मूळची भिल्लीण म्हणून का फळें खात नाहीं ? परंतु मी निर्मळ व प्रेमळ आहें. प्रेमाला, भक्तीला विटाळ नसतो. हीं बोरें मुद्दाम मी चाखून पाहिलीं. चांगलीं गोड फळें पाहिजेत ना माझ्या रामाला ! हं-रामा, घ्याना ! सीतामाई, घ्याना !' सर्वांनी फळें घेतलीं. पलाशद्रोणांतील पाणी तिने त्यांच्या हातांवर घातलें.
नंतर शबरी उभी राहिली व हात जोडून म्हणाली, 'देवा, रामचंद्रा-
जलदश्यामा रामा, मम सार्थक झालें !
तुजला बघुनी देवा, मम डोळे धाले !
उत्कंठा जी धरूनी हे होते प्राण,
झाली देवा तृप्त आता नुरला काम !
हे भगवंता, गुणसागर हे रघुनाथा,
चरणीं तुझिया ठेवितसें माझा माथा !
झालें देवा, झालें मम जीवन धन्य;
मागायाचें नाही रे तुजला अन्य !
जन्मोजन्मीं देई भक्ती, मज सीतापति म्हणजे झालें
दुसरें मनिं कांही नुरले ॥ जलश्यामा ॥
शबरीने गाणें म्हटलें व 'मला पदरांत घ्या' असें म्हणून रामचंद्राचे पायांवर तिने मस्तक ठेविलें; परंतु रामचंद्राचे पायीं शबरी पडली, ती पुन: उठली नाही ! विश्वव्यापी परमात्म्यांत तिचें चित्तत्त्व मिळून गेलें ! तें देहपुष्प मात्र रामचरणीं कोमेजून पडलें !
तिघांना गहिवर आला. शबरीला त्यांनी अग्नि दिला व तिचें गुणवर्णन करीत तीं तिघें गेलीं. शबरी देहाने गेली, परंतु कीर्तिरूपाने सदैव अमर आहे. जोपर्यंत भारतवर्ष आहे, रामायण आहे, रामसीता यांची आठवण आहे, जोपर्यंत जगांत भक्ति आहे, हृदय आहे,
तोंपर्यंत शबरीही आहे.
शबरी अमर आहे !