शबरी 2
मतंग ऋषि फार थोर मनाचे होते. प्रात:काळीं नदीवर स्नान करून नंतर ते संध्या, ईश्वरपूजा व ध्यानधारणा करीत. तदनंतर आश्रमाच्या भोवती जे कोणी रहिवाशी येतील, त्यांना खुणांनी मोडक्यातोडक्या भाषेंत सुरेख गोष्टी सांगत. हळूहळू ते त्यांची भाषा शिकूं लागले आणि आपले उन्नत व उदात्त विचार त्यांना सांगूं लागले. जरी त्या रानटी लोकांना प्रथम प्रथम विशेष समजत नसे, तरी त्या पावन वातावरणाचा, ऋषीच्या व्यक्तिमाहात्म्याचा त्यांच्या मनांवर संस्कार झाल्याशिवाय रहात नसे. पावित्र्य हें न बोलतां बोलतें, न शिकवितां शिकवितें. दिव्याची ज्योत नि:स्तब्धपणें अंधार हरण करीत असते. थोर लोकांचें नामोच्चारणहि जर मनास उन्नत करतें, तर त्यांचें प्रत्यक्ष दर्शन किती प्रभावशाली असेल बरें !
मतंग ऋषींच्या आश्रमापासून कांही कोसांच्या अंतरावर एका भिल्ल राजाचें राज्य होतें. राज्य लहानसेंच होतें. भिल्लांचा राजा जरी रानटी होता, तरी तोहि ऋषींच्या आचरणाने व उपदेशाने थोडा सुधारला होता. या भिल्ल राजास एक पांचसहा वर्षांची मुलगी होती. मुलगी काळीसावळीच होती; पण तिचा चेहरा तरतरीत होता. रानांतील हरिणीच्या डोळयांसारखेच तिचे डोळे खेळकर व पाणीदार असून ती हरिणीप्रमाणेच चपळहि होती. घरांत बसून राहणें तिला कधीच आवडत नसे; घडीची म्हणून तिला उसंत माहीत नसे. भिल्ल राजाचीच ती मुलगी. लहानपणीं तीहि लहानसें धनुष्य घेऊन हरिणांच्या पाठीमागे लागे. आपल्या मुलीचें कोडकौतुक राजा-राणी कितीतरी करीत. मनुष्य रानटी असो वा सुधारलेला असो, मनुष्यस्वभाव हा सर्वत्र सारखाच आहे. रानटी मनुष्यालाहि प्रेम समजतें, त्याला मुलेंबाळें आवडतात. रानटी मनुष्यहि आनंदाने हसतो व दु:खाने रडतो.
आईबापांच्या प्रेमळ सहवासांत लहानगी शबरी वाढत होती. एक दिवस भिल्ल राजा आपल्या राणीला म्हणाला, 'आपल्या या मुलीला मतंग ऋषींच्या आश्रमांत ठेवलें तर ? मी याविषयी त्यांना विचारलें, तेव्हा त्यांच्या पत्नीने मोठया आनंदाने संमति दिली. ऋषिपत्नीलाहि मूलबाळ नाही. ऋषिपत्नी मला म्हणाली, 'खरंच तुमची मुलगी आश्रमांत ठेवां; मी तिला शिकवीनसवरीन; पोटच्या मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करीन.' मग बोल, तुझें म्हणणें काय आहे तें. मुलीस तेथे पाठविण्यास तुझी संमति आहे ना ? ती तुझ्यासारखीच अडाणी राहावी, असें तुला वाटतें का ?'
राणी म्हणाली, 'मी आपल्या इच्छेविरुध्द नाही. मनाला कसेसेंच वाटतें हें खरें; तरी पण मुलीचें कल्याण होईल, तेंच केलें पाहिजे. आपल्या लहानपणीं आपणांस नाही असे ऋषि भेटले; परंतु आपल्या मुलीच्या भाग्याने भेटले आहेत, तर ती तरी चांगली होवो.'
उभयतां मातापितरांनी मुलीला आश्रमांत पाठविण्याचा निश्चय केला. शुभ दिवशीं त्या भिल्ल राजाने शबरीस बरोबर घेतलें, तिला पालखींत बसविलें आणि मतंग ऋषींच्या आश्रमांत आणून सोडिलें.
कन्येस ऋषींच्या स्वाधीन करून राजा म्हणाला, 'महाराज, ही माझी मुलगी मी आपल्या स्वाधीन करीत आहें. ही सर्वस्वी आपलीच समजा व तिला नीट वळण लावा.'