शबरी 4
ऋषि म्हणाले, 'बाळ, तूं अजून लहान आहेस. मनुष्य कसा वागतो, शबरी कशी वागते, हें सारें पाहण्यासाठी हे वरूणदेवाचे हेर आहेत, हे तारे वरूणदेवतेचे दूत आहेत. डोळयांत तेल घालून मनुष्याचीं कृत्यें ते पहात असतात व माणसांचीं वाईट कृत्यें पाहून हे तारे रडतात. त्यांचे जे अश्रु त्यांनाच तूं दंवबिंदु म्हणतेस. झाडामांडांच्या पानांवर ते दंवबिंदु टप्टप् पडतांना तूं नाही का ऐकलेस ? सकाळीं पानांफुलांवर, दूर्वांकुरांवर ते अश्रु कसे मोत्यांसारखे चमकतात !'
शबरी म्हणाली, 'तात, मी आज त्या हरिणपाडसास बाणाने टोचलें, तें त्यांना दिसलें असेल का ?'
ऋषि म्हणाले, 'होय, दिवसा लोकांकडे लक्ष्य ठेवण्याचें काम सूर्य करतो; रात्रीं तेंच काम चंद्र व तारे करतात.'
शबरीचे ते प्रेमळ व निष्कपट डोळे पाण्याने डबडबून आले व ती म्हणाली, 'तात, मघा त्या मोराच्या पिसा-यांतील पीस उपटण्यास मी गेलें, तें पाहून तारे आज रडतील का ? मोर कसा निजला होता !'
ऋषि म्हणाले, 'होय. परंतु हें काय ? वत्से शबरी, अशी रडूं नकोस. पूस. डोळे पूस आधी. तूं त्या ता-यांची प्रार्थना कर व म्हण की, 'आजपासून हरिणांना, मोरांना मी दुखविणार नाही.' '
शबरीने हात जोडले व आकाशाकडे तोंड करून ती म्हणाली, 'हे देवदूतांनो, हे तारकांनो, या मुलीला क्षमा करा; माझ्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेऊं नका. मी आजपासून बाणाच्या टोकाने हरिणांस टोचणार नाहीं, पक्ष्यांचीं पिसें उपटणार नाहीं. मला क्षमा करा.'
ऋषीने शबरीचें वात्सल्याने अवघ्राण केलें व ऋषिपत्नीने तिला प्रेमभराने हृदयाशीं धरिलें.
ऋषिपत्नी म्हणाली, 'शबरी, तूं फार गुणी पोर आहेस.'
शबरीच्या गंगायमुना थांबल्या व ऋषिपत्नीच्या मांडीवर डोकें ठेवून ती झोपी गेली.
शबरी हळूहळू वयाने वाढत होती, मनाने वाढत होती. सत्य, दया, परोपकार यांचे ती धडे घेत होती. तिचें मन आता फुलासारखें हळुवार झालें होतें. झाडांच्या फांदीलासुध्दा धक्का लावतांना तिला आता वाईट वाटे.