सम्यक कर्मात
चौथं सूत्र आहे सम्यक कर्मात. योग्य ते आणि योग्य तेवढं कर्म करणं म्हणजे सम्यक कर्मात. यात आत्महत्या, चोरी, हिंसा, परस्त्रीविषयी लोभ, अशी सारी कर्मे निषिद्ध आहेत. दुसरीकडे कितीही मिळाले तरी, 'अजून हवे'ची लालसा न सुटणे, त्यासाठी जिवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे सुद्धा वर्ज्य असावे. सगळे ज्ञानी लोक याचा उद्घोष करतात. या संदर्भातील टॉलस्टॉयची कथा प्रसिद्ध आहे. एका माणसाला सांगितले गेले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू जिथपर्यंत धावत जाशील तेवढी जमीन तुझी होईल. सूर्यास्तापर्यंत खूप अंतर पार करायला हवे म्हणून तो लोभामुळे जोराने धावत राहिला. सूर्यास्त झाल्यावर तो थांबला आणि अतिश्रमाने मृत्यू पावला. त्याला पुरण्यास साडेतीन हात जमीन पुरेशी झाली. आपल्याला योग्य असे साध्य ठरविल्यावर त्या दिशेने शांतपणे कर्म करत राहणे, म्हणजे सम्यक कर्मात.