Get it on Google Play
Download on the App Store

महेंद्र


महेंद्र (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, उज्जैन, मध्य प्रदेश) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्रोतांनुसार 'श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे' असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.

ऐतिहासिक स्त्रोत

दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील दोन धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचे त्यांनी धर्मांतर केले, याबाबतची माहिती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचे आयुष्य व त्याचे कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्रोत आहेत. शिलालेखांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.

जीवन

विदिशा नगरीत महेंद्र वाढले, कारण त्यांची आई तिथे राहात होती. त्यांच्या वडिलांचे आध्यात्मिक गुरू मोग्गलीपुत्ता-तिस्सा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार वयाच्या विसाव्या वर्षीच महेंद्र भिक्खू बनले. त्रिपिटकामध्ये ते पारंगत होते. इथ्थिया, उत्तिया, संबला आणि संघमित्राचा मुलगा भद्दसला या इतर भिक्खूंबरोबर महेंद्रांना श्रीलंकेत पाठवले गेले. बौद्धधर्मीय सल्लागार मंडळाची तिसरी सभा पार पडल्यानंतर मोगल्लीपुत्ता-तिस्सा यांच्या शिफारशीनुसार, श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठीच या सगळ्यांना पाठवले गेले होते. महेंद्रबरोबर धर्मगुरूंचा अनुयायी असलेला भानकुका हा त्याच्या मावशीचा नातूही होता. वेदसगिरी विहार येथून या सर्वांनी श्रीलंकेसाठी प्रस्थान केले. हे ठिकाण म्हणजे आताची सांची होय असे मानले जाते.