Get it on Google Play
Download on the App Store

उपाली

महास्थवीर उपाली (ई. पु. ५२७) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्खू होते. गौतम बुद्धांच्या मृत्युनंतर आयोजित केलेल्या प्रथम धम्मसभेमध्ये त्यांनी विनयपिटकाचे कथन केले होते.

उपाली यांचा जन्म कपिलवस्तू येथे एका नाभिक कुटुंबामध्ये झाला होता. वयात आल्यानंतर ते कपिलवस्तूच्या शाक्य राजकुमारांची सेवा करू लागले. या राजकुमारांनी जेव्हा भिक्खू संघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा उपालीही त्यांच्याबरोबर निघाले. राजकुमारांनी त्यांना परत जाण्यास सांगितले, परंतु त्यांनी परत जाण्यास नकार दिला व ते संघप्रवेशासाठी राजकुमारांसह गेले. हा पूर्वी आपला सेवक होता अशी भावना मनात राहू नये म्हणून शाक्य कुमारांनी गौतम बुद्धांना उपालीस प्रथम दीक्षा देण्याची विनंती केली. त्यामुळे बुद्धांनी उपाली यांना शाक्य राजकुमारांअगोदर दीक्षा देऊन त्यांना संघात राजकुमारांपेक्षा वरचे स्थान दिले. पुढे उपालींनी विनायासंबंधी विशेष ज्ञान प्राप्त केले. भिक्खूंमधील वाद सोडवण्यात उपाली यांचा शब्द प्रमाण मानला जाई. गौतम बुद्धही त्यांच्या निर्णयाचा आदर करत असत. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर आयोजित केलेल्या प्रथम धम्मसभेमध्ये जे स्थान भिक्खू आनंद यांचे धम्मासंबंधी होते तेच स्थान उपाली यांना विनयासंबंधी होते. महाकाश्यप यांनी विनयासंबंधी उपाली यांना प्रश्न विचारले, त्या उत्तरांवर आधारीत विनयपिटक या ग्रंथाची रचना करण्यात आली.

उपाली यांना दीर्घायुष्य लाभले. त्यांचा मृत्यू वयाच्या १५०व्या वर्षी झाला असावा असे मानले जाते.