इतिहास
बामियान ऐतिहासिकदृष्ट्या रेशीम मार्गा वर स्थित हिंदुकुश पर्वतरांगांच्या बामियानच्या खोऱ्यात वसलेले शहर आहे. येथे अनेक बौद्ध मठ होते आणि यामुळे हे धर्म, तत्वज्ञान आणि कला यांचे समृद्ध केंद्र म्हणून विकसित झाले होते. बौद्ध भिक्खूंचे आसपासच्या लेण्यांमध्ये वास्तव्य होते आणि या लेण्या रंगीत भित्तीचित्रांनी सजवल्या होत्या. विशेषज्ञांचे असे मत आहे की हे भित्तीचित्र नंतरच्या काळात तयार केले आहेत. दुसऱ्या शतकापासून ते सातव्या शतकाच्या दुसऱ्या सहामाहीत इस्लामिक आक्रमणे होईपर्यंत हे एक बौद्ध धार्मिक स्थळ होते. जोपर्यंत ९व्या शतकात मुस्लिम सफ्फारी राजवंशाने पूर्ण पकडले नव्हते तोपर्यंत बामियानने गंधाराची संस्कृती सामायिक केली. अनेक चीनी, फ्रेंच, अफगाणि आणि ब्रिटिश शोधक, भौगोलिक, व्यापारी आणि यात्रेकरूंच्या कथा व वर्णनांमध्ये बमियानच्या बुद्धांचा उल्लेख केला गेला आहे. मुघल शासक औरंगजेब आणि फ़ारसी शासक नादिर शाहने हल्ला करुन ह्या मूर्त्यांचे नुकसान केले. मोठ्या बुद्ध मूर्तीचा पाय तोडण्यासाठी औरंगजेब कुप्रसिद्ध आहे.