चातुर्याम धर्म 3
बुद्धांशीं तुलना
यांची तुलना बुद्धवंसांत वर्णिलेल्या २५ बुद्धांशी करणें योग्य वाटतें.
उंची आयुष्य वर्षे स्त्रिया
दीपंकर ८० हात १ लक्ष ३ लक्ष
कोण्डञ्ञ ८८ हात १ लक्ष ३ लक्ष
मंगल ८८ हात ९० हजार ३० हजार
सुमन ९० हात ९० हजार ६३ हजार
रेवत ८० हात ६० हजार ३३ हजार
सोभित ५८ हात ९० हजार ४३ हजार (?)
अनोमदस्सी ५८ हात १ लक्ष २३ हजार
पदुम ५८ हात १ लक्ष ३३ हजार
नारद ८८ हात ९० हजार ४३ हजार
पदुमुत्तर ५८ हात १ लक्ष ४३ हजार
सुमेध ८८ हात ९० हजार ४८ हजार
सुजात ५० हात ९० हजार २३ हजार
पियदस्सी ८० हात ९० हजार ३३ हजार
अत्थदस्सी ८० हात १ लक्ष ३० हजार
धम्मदस्सी ८० हात १ लक्ष ४० हजार
सिद्धत्थ ६० हात १ लक्ष ४८ हजार
तिस्स ६० हात १ लक्ष ३० हजार
पुस्स ५८ हात ९० हजार २३ हजार
विपस्सी ८० हात ८० हजार ४३ हजार (?)
सिखी ७० हात ७० हजार २४ हजार
वेस्सभू ६० हात ६० हजार ३० हजार
ककुसंध ४० हात ४० हजार ३० हजार
कोनागमन ३० हात ३० हजार १६ हजार
कस्सप २० हात २० हजार ४८ हजार (?)
गोतम - - ४० हजार
तीर्थंकरांच्या कथा ज्या ग्रन्थांत सांपडतात, त्यांच्यापेक्षां बुद्धवंस प्राचीन आहे. तेंव्हा प्रथमतः बौद्ध भिक्षूंनी अशा असंभाव्य दन्तकथा लिहिण्यास सुरुवात केली, आणि त्या लोकप्रिय होतात असें पाहून जैन साधूंनी त्यांच्यावर ताण केली असावी. अशा असत्याच्या चढाओढींमुळें बौद्धांचे आणि जैनांचेंच नव्हे, तर सर्व हिंदुस्थानचें केवढें नुकसान झालें, याचा या लेखांत यथायोग्य स्थळीं विचार करण्यांत येईलच.
ह्या दंतकथांत एक गोष्ट विशेष आहे ती ही कीं, श्वेताम्बर जैन मल्लि तीर्थंकर स्त्री होती असें मानतात. पण तें दिगम्बरांना मान्य नाहीं. त्यांच्या मतें स्त्री केवली होणें शक्यच नाहीं. कां कीं, स्त्री नग्न राहूं शकत नाहीं !
वर दिलेल्या ६३ शलाका-पुरुषांच्या कथा हेमचन्द्राचार्यांनी 'त्रिषष्ठी शलाका-पुरुषचरित्र' नांवाच्या ग्रन्थांत वर्णिल्या आहेत; त्यांपैकीं पार्श्वनाथाच्या कथेचा सारांश तेवढा येथें देतों.