खरा समाजधर्म 2
बौद्ध-साहित्याचा प्रधान ग्रंथ " त्रिपिटक ", यांतील विनयपिटकाचा सारांश त्यांनीं 'बौद्ध संघाच्या परिचया 'त दिला आहे.
बौद्ध लोकांत ज्या प्रकरणाची महती गीतेसारखी मानली आहे त्या ' धम्मपदाचें ' भाषांतर आणि त्यानंतर तितकेंच लोकप्रिय असलेलें शान्तिदेवाचार्यांच्या " बोधिचर्यावतारांचे " भाषांतर त्यांनीं मराठींत उपलब्ध करून दिलें आहे.
बौद्ध लोकांच्या योगमार्गाविषयींची यथार्थ कल्पना आपल्याला त्यांच्या " विशुद्धि मार्ग " या लहानशा पुस्तकांत सुंदर रीतीनें मिळते.
या खेरीज त्यानीं इतरही लहान मोठी पुस्तकें लिहिलीं आहेत. पण जीवनविषयक आणि धर्माविषयक स्वतःचे परिपक्व विचार त्यानीं स्वतःच्या स्वतंत्र मौलिक अशा तीन ग्रंथांत ग्रंथित केले आहेत.
कोणकोणत्या सामाजिक आणि राजकीय कारणांमुळें बुद्ध भगवानानें राज्यत्याग केला आणि संन्यास घेतला याविषयींची स्वतःची अगदीं स्वतंत्र उपपत्ति नाटकाच्या रूपानें त्यानीं " बोधिसत्त्व " या ग्रंथांत दिली आहे.
वैदिक काळापासून धर्मविचारांत परिवर्तन कसें होत गेलें; धर्मक्रांन्ति बरोबर निरनिराळे पुरोहितवर्ग कसे निर्माण झाले आणि धर्माच्या शुद्ध कल्पनेला संप्रदायांच्या निरनिराळ्या व्यूहांतून मुक्त होतांना कसे सायास पडले, हें सर्व स्वतःच्या कल्पनेप्रमाणें त्यानीं " हिंदी संस्कृति आणि अहिंसा " या वादग्रस्त पुस्तकांत नमूद केलेलें आहे. आणि त्यानंतर वेदकाळाच्या पूर्वीपासून या देशांतील ऋषिमुनींनी जी तपस्यामूलक अहिंसा धर्म चालविला होता त्याची परिणति भगवान पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्मांत कशी झाली आणि त्यानंतर याच चातुर्याममूलक समाजधर्माचा आजवर कसकसा विस्तार होत आला आहे हें त्यानीं प्रस्तुत ग्रंथांत मुद्देसूद रीतीनें मांडलें आहे. येथेंही स्वतःला जें वाटलें तें सडेतोडपणानें सांगतांना त्यामुळें वादाच्या किती वावटळी उठतील याची पर्वा त्यानीं मुळींच केलेली नाहीं.
धर्म म्हणजे जीवन-धर्म. त्यांत व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन हीं दोन्हीं येतात; आणि सामाजिक जीवनांत आर्थिक आणि राजकीय हे प्रधान भाग टाळतां येत नाहींत. धर्म शास्त्र जर खरें जीवन-धर्म शास्त्र असेल तर त्याला राजकारण आणि अर्थकारण यांचें वावडें बाळगून चालावयाचें नाहीं.
अर्थात् चातुर्यामात्मक समाज-धर्माचा उहापोहा करतांना धर्मानंदजींना समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांच्या विषयींचे स्वतःचे विचार मांडावेच लागले. आणि तसें करीत असतांना काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचे संबंध, काँग्रेसचें आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरे गोष्टींविषयीं देखील त्यांना लिहावेंच लागलें.