श्लोक ३१ ते ४२
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मिअ जाह्रवी ॥३१॥
वसुंधरेचिया । विस्तारामाझारीं । वेळ घडीभरी । न लागतां ॥४८६॥
सात हि सागरां । एका चि उड्डाणें । प्रदक्षिणा जेणें । करावी गा ॥४८७॥
ऐशा वेगवंतां - । माजीं जो पवन । तो मी ऐसें जाण । पंडु -सुता ॥४८८॥
शस्त्रधरांमाजीं । सद्रूगुण -समुद्र । प्रभु रामचंद्र । तो मी जाण ॥४८९॥
सांपडतां धर्म । संकटीं साचार । तयाचा कैवार । घेवोनियां ॥४९०॥
घेवोनियां हातीं । जेणें धनुर्बाण । आणिली खेंचोन । विजयश्री ॥४९१॥
सुवेल नामक । पर्वताच्या माथां । ठाकोनियां त्रेता - । युगीं जेणें ॥४९२॥
लंकाधीश महा - । प्रतापी रावण । तयाचीं छेदोन । दाही शिरें ॥४९३॥
दिलीं भक्षाया तीं । निशाचरां - हातीं । आकाशीं नाचती । आनंदें जीं ॥४९४॥
देवांचा लौकिक । जेणें संशोधिला । स्वधर्माचा केला । जीर्णोद्धार ॥४९५॥
सूर्यवंशामाजीं । तेजोराशि भला । जो का उगवला । प्रतिसूर्य ॥४९६॥
तो मी सीता -कांत । अयोध्येचा नाथ । शस्त्रशारकांत । रामचंद्र ॥४९७॥
जळचरांमाजीं । सपुच्छ मकर । विभुति साचार । माझी च ती ॥४९८॥
भगीरथें गंगा । स्वर्गांतूनि खालीं । आणितां गिळिली । जह्ननें ती ॥४९९॥
मग मांडींतून । सोडिली ती पुन्हां । करितां प्रार्थना । भगीरथें ॥५००॥
ऐसी जाह्नवी जी । त्रिलोकीं प्रख्यात । सर्व जलौघांत । जाण ती मी ॥५०१॥
असो , सृष्टींतील । ह्यापरी एकैक । विभूति त्या देख । वर्णूं जातां ॥५०२॥
जन्मसहस्त्रांत । धनंजया , पाहीं । न होती अर्ध्या हि । विवरून ॥५०३॥
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वाः ग्रवदतामहम् ॥३२॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताऽहं विश्वतोमुखः ॥३३॥
आघवीं नक्षत्रें । वेंचोनियां घ्यावीं । ऐसी इच्छा जीवीं । जरी झाली ॥५०४॥
तरी धनंजया । गगनाची मोट । बांधावया नीट । हवी जैसी ॥५०५॥
पृथ्वीवरी किती । परमाणु होती । तयांची गणति । करूं जावें ॥५०६॥
तरी भूगोल चि । अर्जुना आघवा । धरावया हवा । कांखेमाजीं ॥५०७॥
तैसा देवावया । विभूतिविस्तार । मातें चि साचार । ओळखावें ॥५०८॥
फळें फुलें शाखा । एकावेळीं हातीं । यावीं ऐसें चित्तीं । जरी वाटे ॥५०९॥
तरी वृक्षाचें तें । मूळ उपटोनि । स्वाधीन करोनि । घ्यावें जैसें ॥५१०॥
तैसें जरी माझे । विभूतिविशेष । कळावे अशेष । ऐसें वाटे ॥५११॥
तरी निर्विकार । स्वरूप निर्मळ । जाणावें केवळ । एक माझें ॥५१२॥
एर्हवीं अर्जुना । वेगळाल्या किती । तूं माझ्या विभूति । ऐकशील ? ॥५१३॥
तरी एकदांच । जाण बुद्धिमंता । सर्व हें तत्त्वतां । मी च आहें ! ॥५१४॥
वस्त्रामाजीं जैसें । एक चि तें सूत । राहे ओतप्रोत । भरूनियां ॥५१५॥
तैसा सृष्टीचिया । आदि मध्यें अंतीं । राहिलों किरीटी । मी च एक ॥५१६॥
सर्वव्यापकाचें । माझें होतां ज्ञान । नुरे प्रयोजन । विभूतींचे ॥५१७॥
परी तैसा नव्हे । तुझा अधिकार । आतां हा विचार । असो पार्था ॥५१८॥
तुवां मजलागीं । पुसिल्या विभूति । ऐक तुजप्रति । सांगेन त्या ॥५१९॥
मग तो पार्थासी । म्हणे आत्माराम । विद्यांत अध्यात्म - विद्या ती मी ॥५२०॥
वक्त्यांचियाठायीं । वाद जो म्हणोन । विभूति ती जाण । माझी च गा ॥५२१॥
जेथें शास्त्राधारें । बोलती समस्त । परी एकमत । होत नाहीं ॥५२२॥
वादें वादें वाद । वाढत चि जाय । होईना निर्णय । कांहीं केल्या ॥५२३॥
ऐकतां जो वाद । श्रोतयांचा तर्क । स्वभावतां देख । जोर घेई ॥५२४॥
आणि प्रवक्यांचीं । पांडित्य -प्रचुर । भाषणें मधुर । होती जेथें ॥५२५॥
ऐशापरी प्राति - । पादनामाझारीं । पार्था , अवधारीं । वाद तो मी ॥५२६॥
अक्षरामाझारीं । अकार विशद । समासांत द्वंद्व । तो मी जाण ॥५२७॥
मशकापासोनि । ब्रह्मदेवावेरीं । सर्व ग्रास करी । तो मी काळ ॥५२८॥
मेरु -मंदरादि । पर्वतांसहित । चुरोनि टाकीत । मेदिनी जो ॥५२९॥
मग सकल हि । होतां जलमय । जिरवीत जाय । ठायीं च तें ॥५३०॥
कल्पांतींचे तेज । सर्वथा ग्रासून । टाकी जो गिळून । वायूतें हि ॥५३१॥
मग नभःप्रांत । उरे तो समस्त । जयाच्या पोटांत । सामावे गा ॥५३२॥
ऐसा धनंजया । काळ जो अपार । तो मीं लक्ष्मी -धर । म्हणे ऐसें ॥५३३॥
मग सृष्टिकर्ता । जो का प्रजापति । अर्जुना , विभूति । माझी च ती ॥५३४॥
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥३४॥
सृजिलीं जीं भूतें । तयांचें धारण । धनंजया जाण । मी च करीं ॥५३५॥
सकळां जीवन । मी च पंडुसुता । शेवटीं संहर्ता । मृत्यु मी च ॥५३६॥
आतां स्त्रीगणांत । विभूति ज्या सात । कौतुकें त्या येथ । सांगेन मी ॥५३७॥
तरी ऐक जी का । नित्य नवी कीर्ति । माझी च ती मूर्ति । कुंति -सुता ॥५३८॥
आणिक औदार्या - । सहित संपत्ति । अर्जुना , विभूति । माझी च ती ॥५३९॥
बैसोनियां न्याय - । रूपी पालखींत । विवेकाचा पंथ । अंगीकारी ॥५४०॥
ऐसी जी का वाचा । ती माझी विभूति । म्हणे रमा -पति । भगवंत ॥५४१॥
देखिल्या पदार्थें । देतसे करोन । माझी आठवण । निरंतर ॥५४२॥
ऐसी जी का स्मृति । ती माझी विभूति । तुज नको भ्रांति । येथें कांहीं ॥५४३॥
स्वहितानुकूल । बुद्धि इहलोकीं । ध्रुति मी त्रिलोकीं । क्षमा हि मी ॥५४४॥
ऐशापरी नारी - । माजीं सात शक्ति । त्या माझ्या विभूति । ओळख तूं ॥५४५॥
संसार -गजासी । जो का पंचानन । देव तो श्रीकृष्ण । ऐसें बोले ॥५४६॥
बृहत्यासम तथा सान्मां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥३५॥
वेदांतील स्तोत्रां - । माजीं बृहत्साम । स्तोत्र जें उत्तम । जाण तें मी ॥५४७॥
अर्जुना गायत्री - । छंद जो छंदांत । तो मी हें निभ्रांत । ओळख तूं ॥५४८॥
ऋतूंत वसंत । तो मी पुष्पाकर । मासांत साचार । मार्गशीर्ष ॥५४९॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तोजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥३६॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥३७॥
स्पष्टपणें चोरी । चाले चव्हाटयांत । परी नाहीं येत । निवाराया ॥५५०॥
छळितयांमाजीं । ऐसें जें का द्यूत । विभूति निभ्रांत । माझी च ती ॥५५१॥
तेजस्वी वस्तूंत । जें का असे तेज । ती माझी सहज । विभूति गा ॥५५२॥
सर्व अंगीकृत । कार्यांमाजीं साच । विजय तो मी च । ऐसें जाण ॥५५३॥
व्यवसायांमाजीं । न्याय्य व्यवसाय । तो मी , देवराय । म्हणे ऐसें ॥५५४॥
सर्व सत्त्वगुण - । संपन्नांमाझारीं । जें का अवधारीं । सत्त्व तें मी ॥५५५॥
पार्था , यादवांत । ऐश्वर्यें भूषित । तो मी भगवंत । पाहें येथें ॥५५६॥
जो मी वसुदेव - । देवकी -नंदन । झालों सवतीर्ण । मथुरेंत ॥५५७॥
जन्मतां चि मज । निवोनि गोकुळीं । यशोदेजवळी । ठेवूनियां ॥५५८॥
यशोदेची कन्या । योगमाया जाण । आणिली तेथोन । वसुदेवें ॥५५९॥
पार्था , स्तनपान - । निमित्तेंकरोन । शोषिले मीं प्राण । पूरनेचे ॥५६०॥
जेणें बाळदशा । संपण्यापूर्णीं च । अदानवी साच । सृष्टि केली ॥५६१॥
महेंद्राचा गर्व । टाकिला झाडोन । करीं गोवर्धन । धरोनियां ॥५६२॥
कालिंदीचें दुःख । निवारिलें जाण । करोनि मर्दन । कालियाचें ॥५६३॥
जेणें गोकुळाचें । केलें संरक्षण । दावाग्निपासोन । धनंजया ॥५६४॥
करोनि उत्पन्न । दुजीं धेनु -वत्सें । लावियेलें पिसें । विरंचीस ॥५६५॥
बाळपणाचिया । उषःकालीं जेणें अर्जुना , लीलेनें । एकाएकीं ॥५६६॥
कंसचाणूरादि । मोठमोठे दुष्ट । टाकिले गा नष्ट । करोनियां ॥५६७॥
सकळ हें पार्था । आहे तुज ठावें । म्हणोनि सांगावें । किती आतां ॥५६८॥
तरी यादवांत । तो मी भगवंत । जाण हें निश्चित । सव्यसाची ॥५६९॥
आणि सोमवंशीं । पांडवांमाझारीं । तूं जो धनुर्धारी । तो हि मी च ॥५७०॥
म्हणोनियां तुज - । मज परस्पर । न पडे अंतर । प्रेम -भावीं ॥५७१॥
नेली तुवां माझी । भगिनी चोरून । संन्यासी होऊन । लोकद्दष्टया ॥५७२॥
परी नाहीं आला । मन्मनीं विकल्प । तूं मी एकरूप । म्हणोनियां ॥५७३॥
मुनींमाजीं श्रेष्ठ । तो मी व्यासदेव । यादवांचा राव । म्हणे ऐसें ॥५७४॥
कवीश्वरांमाजी । थोर कविवर्य । तो मी सुक्राचार्य । धैर्यवंत ॥५७५॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥३८॥
मुंगीपासोनि जें । ब्रह्मदेवावेरीं । नियमन करी । सर्वांचें हि ॥५७६॥
नियमित्यांमाजीं । ऐसें अनिवार्य । शासन तें होय । माझें रूप ॥५७७॥
धर्म -ज्ञानाचा जें । घेतसे कैवार । पार्था सारासार । निर्धारोनि ॥५७८॥
तें मी नीति -शास्त्र । शास्त्रांमाजीं सर्व । ऐसें बोले देव । यादवेंद्र ॥५७९॥
स्वभावें कौन्तेया । होती जें का मौनी । ब्रह्मा हि अज्ञानी । तयांपुढें ॥५८०॥
म्हणोनियां सर्व । गूढांमाजीं मौन । विभूति ती जाण । माझी च गा ॥५८१॥
ज्ञानियांच्या ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । असो अंत नाहीं । विभूतींतें ॥५८२॥
यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भृतं चराचरम् ॥३९॥
नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभृतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥४०॥
मोजतां येतील । कैशा धनुर्धरा । पर्जन्याच्या धारा । सांगें मज ॥५८३॥
किंवा भूमीवरी । तृणांकुर होती । तयांची गणती । करवेल ? ॥५८४॥
महोदधीमाजीं । उठती तरंग । तयां मिति सांग । असे काय ? ॥५८५॥
तसे असंख्यात । विभूति -विशेष । म्हणे ह्रषीकेशा । जाण माझे ॥५८६॥
परी मुख्य मुख्य । तुज सात पांच । सांगितल्या साच । विभूति ह्या ॥५८७॥
गमे निरर्थक । वर्णन हें देख । विभूतींस लेख । नाहीं माझ्या ॥५८८॥
म्हणोनि मी काय । सांगूं त्या विभूति । अर्जुना तूं किती । ऐकशील ? ॥५८९॥
ह्या चि लागीं आतां । एकवेळ तुज । सांगेन मी निज - । वर्म ऐक ॥५९०॥
सर्व - भूतांकुरें । विरूढे सहज । तें मी । अदिबीज । हें चि जाण ॥५९१॥
नको मानूं उंच - । नीच थोर -सान । मी च एक मान । वस्तुजात ॥५९२॥
ह्या हि वरी आतां । सर्वसाधारण । ऐक एक खूण । आणिक हि ॥५९३॥
जेणें अनयासें । धनुर्धरा -, येथें । माझ्या विभूतीतें । जाणशील ॥५९४॥
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥४१॥
ऐश्वर्य आणिक । दया हीं दोन्हीं हि । आलीं जया ठायीं । रहावया ॥५९५॥
सर्वथा माझी च । विभूति ती होय । जाण निःशंशय । धनंजया ॥५९६॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥४२॥
इति श्रीमद्भगवद्नीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगी नाम दशमोऽघ्यायः ॥१०॥
किंवा एकलें च । बिंब आकाशांत । परी त्रैलोक्यांत । तेज फांके ॥५९७॥
तैसी आज्ञा जया । एकाची च देख । पाळिती निःशंक । सर्व लोक ॥५९८॥
एकला ऐसें तूं । तया नको म्हणूं । तया नको मानूं । धनहीन ॥५९९॥
काय सर्व वस्तु । आपुल्या सांगातें । घेवोनि हिंडते । काम -धेनु ? ॥६००॥
तियेपाशीं जो जो । जेव्हां जें जें मागे । तें तें देऊं लागे । एकसरां ॥६०१॥
तैसें विश्वांतील । सर्व हि ऐश्वर्य । अंगभूत होत । तयाठायीं ॥६०२॥
तया जाणावया । ही च असे खूण । तदाज्ञा -वंदन । करी लोक ॥६०३॥
ऐसे लोकमान्य । होती जे जे नर । जाण अवतार । माझे चि ते ॥६०४॥
भरोनि सर्वत्र । विश्वीं मी च एक । राहिलों निःशंक । म्हणोनियां ॥६०५॥
ही तों साधारण । विभूति ही चांग । कल्पोनि विभाग । ऐशा रीती ॥६०६॥
विभूतींत मानी । सामान्य विशेष । तरी मह -दोष । लागे तया ॥६०७॥
भेदाचा कलंक । बुद्धीलागीं वायां । सांगें धनंजया । लावावा कां ? ॥६०८॥
रांधोनि अमृत । कां गा आटवावें । घृत घुसळावें । कासयासी ? ॥६०९॥
वायुलागीं तरी । सव्य -वाम अंग । असे काय सांग । सव्यसाची ॥६१०॥
रवि -बिंबा पाठ - । पोट पाहूं जातां । नासेल सर्वथा । नि -द्दष्टि ॥६११॥
तैसी माझ्याठायीं । सामान्य विशेष । पार्था , ही अशेष । भाषा लोपे ॥६१२॥
मज अपारातें । मोजशील किती । जाणोनि विभूति । भिन्न भिन्न ॥६१३॥
म्हणोनियां काय । बोलोनियां फार । विभूति -विचार । राहो आतां ॥६१४॥
माझिया एकांशें । यापिलें हें विश्व । तरी भेदभाव । सांडोनिया ॥६१५॥
सर्वत्र मी एक । सारिखा मानून । करीं गा भजन । ऐक्यभावें ॥६१६॥
ज्ञानीजन - रूपी । वनासी वसंत । असे जो एकान्त । विरक्तांचा ॥६१७॥
जो कां सर्व -गुण - । ऐश्वर्य -संपन्न । देव तो श्रीकृष्ण । बोले ऐसें ॥६१८॥
ऐकोनि ते बोल । पार्थ म्हणे स्वामी । सांगतां हें तुम्हा । काय आम्हां ? ॥६१९॥
सांडावया भेद । आम्ही तुम्हांहून । असों काय भिन्न । भगवंता ? ॥६२०॥
भेद तो निराळा । आम्ही हि निराळे । ऐसें तो उरले । नाहीं आतां ॥६२१॥
अहो लोकांलागीं । म्हणे का भास्कर । लोक हो , अंधार । दूर सारा ॥६२२॥
परी कैसें म्हणूं । तुज अविचारी । मज काय तरी । शोभेल तें ? ॥६२३॥
मुखीं तुझें नाम । येतां एक वेळ । भेद तो राहील । कैसा कोठें ? ॥६२४॥
एक वेळ तुझें । नाम येतां कानीं । भेद तो पळोनि । जाय दूरी ॥६२५॥
ऐसा जो तूं ईश । पर -ब्रह्म पूर्ण । सुदैवें स्वाधीन । होसी आज ॥६२६॥
तरी आतां कोणें । कोहें कैसा देवा । भेद तो पहावा । सांगें मज ॥६२७॥
उष्मा होय ऐसें । म्हणेल का कोणी । गाभारां रिघोनि । चंद्राचिया ॥६२८॥
तुझें मज साच । घडलें दर्शन । उरेल कोठून । भेद आतां ॥६२९॥
वरी थोर -पणें । सांगतसां मातें । सोडावें भेदातें । म्हणोनियां ! ॥६३०॥
करोनि श्रव्ण । पार्थाचें भाषण । स्वभावें श्रीकृष्ण । संतोषला ॥६३१॥
तया जीवेंभावें । आलिंगोनि मग । म्हणे नको राग । मानूं पार्था ॥६३२॥
भेदाचिया मार्गें । तुज पंडु -सुता । सांगितली कथा । विभूतींची ॥६३३॥
ती तुज अभेद - । भावें धनंजया । सर्वथा प्रत्यया । आली कीं ना ॥६३४॥
हें चि पहावया । आम्ही क्षणभरी । ऐसें बाह्मात्कारीं । बोलिलों गा ॥६३५॥
तंव कळों आलें । तुझ्या चित्तीं खासा । अभेदाचा ठसा । उमटला ॥६३६॥
विभूतींचें ज्ञान । तुज झालें चांग । ऐसें तो श्रीरंग । बोले तेव्हां ॥६३७॥
पार्थ म्हणे मज । विभूतींचे ज्ञान । झालें कीं ना जाण । तुझें तुं च ॥६३८॥
परी तूं चि एक । विश्वीं भरलासी । हें तों प्रत्ययासी । आलें माझ्या ॥६३९॥
पार्थालागीं ऐसा । आला जो प्रत्यय । सांगे तो संजय । धृतराष्ट्रा ॥६४०॥
परी धृतराष्ट्र । राहे उदासीन । पाहोनि हें खिन्न । संजय तो ॥६४१॥
म्हणे आलें भाग्य । दवडावें दूर । नव्हे का साचार । आश्चर्य हें ? ॥६४२॥
हें तों सच ह्यासी । बाह्म द्दष्टि नाहीं । परी अंतरीं हि । आंधळा हा ॥६४३॥
असो , आता देखा । कैसा तो अर्जुन । स्व -हिताचा मान । वाढवील ॥६४४॥
कैसी तयाचिया । चित्तामाजीं भली । उत्कंठा आगळी । उपजली ॥६४५॥
मनीं म्हणे सर्व । विश्व हरिमय । ऐसा जो प्रत्यय । अंतरींचा ॥६४६॥
तो चि ह्या द्दष्टीसी । दिसो मूर्तिमंट । हें चि एक । आर्त । जीवालागीं ॥६४७॥
ह्या चि दोन्ही डोळां । पहावें सकळ । व्यापक वेल्हाळ । विश्वरूप ॥६४८॥
ऐसी उत्कटेच्छा । धरी तो साचार । भाग्य त्याचें थोर । म्हणोनियां ॥६४९॥
पार्थ वाटे शाखा । कल्पतरूची च । म्हणोनि नाहीं च । वांझ फुलें ॥६५०॥
देखा जें जें येई । तयाचिया मुखें । तें तें देव सुखें । साच करी ॥६५१॥
विषा हि सकट । आपण चि झाला । प्रह्लादाच्या बोला - । साठीं जो का ॥६५२॥
तो चि परमात्मा । देव आजि भला । सद्गुरू लाभला । पार्थालागीं ॥६५३॥
मग विश्वरूप । पुसावयासाठीं । कैसा तो किरीटी । प्रवर्तेल ॥६५४॥
ऐकावी ती कथा । पुढें श्रोतृ -जनें । ज्ञानदेव म्हणे । निवृत्तीचा ॥६५५॥
इति श्री स्वामी स्वरूपानंदविरचित अभंग -ज्ञानेश्वरी
दशमोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।