श्लोक २१ ते २८
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धान परमं मम ॥२१॥
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥२२॥
कौतुकें जयातें । म्हणावें अव्यक्त । तरी नाहीं होत । स्तुति तेथें ॥३३८॥
मनबुद्धीलागीं । पार्था , अगोचर । असे जें साचार । म्हणोनियां ॥३३९॥
जयाचें मोडे ना । निराकारपण । साकार होवोन । नटतां हि ॥३४०॥
ना तरी आकार । लोपोनियां जातां । जयाची नित्यता । बिघडेना ॥३४१॥
म्हणोनि यथार्थ । बोलती साचार । अर्जुना ‘ अक्षर ’ । जयालागीं ॥३४२॥
नाहीं पलीकडे । जयाचिया देख । विस्तार आणिक । कशाचा हि ॥३४३॥
म्हणोनियां जया । चैतन्यातें नाम । सर्वथा परम - । गति ऐसें ॥३४४॥
परी सर्व देह - । नगरी व्यापोन । निद्रितासमान । वर्ते जें का ॥३४५॥
करवी ना करी । सर्व हि व्यापारीं । उदासीनापरी । राहे सदा ॥३४६॥
एर्हवीं देहाचा । एक हि व्यापार । थांबे ना साचार । धनुर्धरा ॥३४७॥
आपआपुलिया । व्यवहारीं पाहीं । इंद्रिये दहा हि । रहाटती ॥३४८॥
आणि मनोरूप । राजरस्त्यावर । मांडला बाजार । विषयांचा ॥३४९॥
सुखदुःखरूप । जो का अग्रभाग । तयचा हि भोग । घडे जीवा ॥३५०॥
झोपतां नृपाळ । सुखशय्येवर । राज्य -व्यवहार । काय थांबे ? ॥३५१॥
आपुलाल्या इच्छे -। सारिखी ती प्रजा । वर्ते कपिध्वजा । जैशा रीती ॥३५२॥
तैसे इंद्रियांचे । व्यापार सकळ । तेविं हालचाल । वायूची ती ॥३५३॥
संकल्प -विकल्प -। रूप घेणेंदेणें । आणिक जाणणें । बुद्धीचें हि ॥३५४॥
करवीना परी । ऐसी ही आघवी । होतसे बरवी । देह -क्रिया ॥३५५॥
सूर्य तो अलिप्त । परी प्रकाशांत । वर्तती समस्त । लोक जैसे ॥३५६॥
करितो शयन । देहीं तैसा ईश । म्हणोन ‘ पुरुष ’ । नांव जया ॥३५७॥
एकपत्नीव्रत । सती प्रकृतीशीं । नांव हें जयासी । म्हणोनि हि ॥३५८॥
चार हि वेदांचा । विस्तार अर्जुना । जयाचें देखेना । अंगण हि ॥३५९॥
आणि अति सूक्ष्म । ऐसें जें गगन । होय प्रावरण । तयाचें जो ॥३६०॥
जाणोनि हें जया -। लागीं योगीश्वर । देती परात्पर । ऐसें नांव ॥३६१॥
आणि होती । जे का । एकनिष्ठ भक्त । तयांतें शोधीत । येतसे जो ॥३६२॥
काया -वाचा -मनें । परब्रह्माविण । जयां उपासन । दुजें नाहीं ॥३६३॥
अनन्य जे ऐसे । होती उपासक । तयांचें सुपीक । सुक्षेत्र जें ॥३६४॥
पुरुषोत्तमरूप । त्रैलोक्य हें सर्व । ऐसा मनोभाव । निश्चियाचा ॥३६५॥
ठेविती जे तयां । आस्तिकांचें जाण । विश्रांतीचें स्थान । असे जें का ॥३६६॥
नाहीं जयांठायीं । अहंतेचें नांव । तयांचें गौरव । होय जें का ॥३६७॥
आणि त्रिगुणांतें । गेले लोलांडून । तयांचें जें ज्ञान । धनंजया ॥३६८॥
तेविं निष्कामासी । सुखाचें साम्राज्य । असे जें का भोज्य । संतुष्टांचें ॥३६९॥
सोडोनियां सर्व । संसाराची चिंता । शरण सर्वशा । आले मज ॥३७०॥
तयां अनाथांचें । जें का मायपोट । जेथें उजू वाट । भक्तीची च ॥३७१॥
काय हें एकैक । सांगूं धनंजया । विस्तार हा वायां । नको आतां ॥३७२॥
परी ऐक पार्था । जया ठाया जावें । ठाव चि तें व्हावें । ऐसें जें का ॥३७३॥
थंडीची झुळूक । लागतां चि देख । जैसें उष्णोदक । थंड होय ॥३७४॥
किंवा सूर्यापुढें । ठाकतां काळोख । तो चि होय देख । तेजोरूप ॥३७५॥
तैसा संसार हा । जया गांवा जातां । होतसे सर्वथा । मोक्षमय ॥३७६॥
जैसें अग्निमाजीं । घालितां इंधन । तें चि होय जाण । अग्निरूप ॥३७७॥
मग वेगळें तें । नुरे काष्ठपण । जरी निवडून । काढूं म्हणों ॥३७८॥
साखरेचा ऊंस । न होय मागुता । पार्था , करूं जातां । चातुर्यें हि ॥३७९॥
लागतां परीस । लोह तें सुवर्ण । होय परिपूर्ण । सर्वांगें चि ॥३८०॥
मग तयाचें तें । गेलें लोहपण । सांग कैसें कोण । आणूं शके ॥३८१॥
दुधाचें चि तूप । होतां धनंजया । दूधपण तया । मग कैंचें ॥३८२॥
ऐसें एकवेळ । पावतां जें स्थान । जीवासी फिरून । जन्म नाहीं ॥३८३॥
तें माझें परम । साच निजधाम । तुज गूढ वर्म । दाविलें हें ॥३८४॥
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥२३॥
पार्था , आणिक हि । एके परी पाहें । सुलभ हें आहे । जाणावया ॥३८५॥
योग्य कालीं निय - । देह ठेवोनियां । जाती मिळोनियां । योगी जेथें ॥३८६॥
माझें परंधाम । तें चि ऐसें जाण । सांगें तुज खूण । अंतरींची ॥३८७॥
किंवा एकाएकीं । अकालीं मरण । तरी जन्म जाण । पुनरपि ॥३८८॥
शुद्ध काळीं पार्था । ठेवितां चि देह । योगी निःसंदेह । ब्रह्म होती ॥३८९॥
एर्हवीं अकालीं । पडे देह तरी । मागुतीं संसारीं । येणें घडे ॥३९०॥
अंतीं पुनर्जन्म । किंवा सायुज्यता । जाणावीं हीं पार्था । कालाधीन ॥३९१॥
त्या चि योग्यायोग्य । कालाचें वर्णन । प्रसंगें करीन । ऐक आतां ॥३९२॥
मृत्यूचिया गुंगी - । माजीं विकलता । देहालागीं येतां । अंतकाळीं ॥३९३॥
चालूं लागती तीं । पंचमहाभूतें । आपुलाल्या वाटे । धनंजया ॥३९४॥
ऐशा हि स्थितींत । अंध नोहे स्मृति । आक्रमी ना भ्रांति । बुद्धीलागीं ॥३९५॥
सावध तें मन । ज्ञानेंद्रियगण । प्रफुल्ल प्रसन्न । असोनियं ॥३९६॥
ब्रह्मभावस्थिति । टिके तया काळीं । जीवें जी भोगिली । स्वानुभवें ॥३९७॥
पार्था , अंतकाल । होय तोंपर्यंत । ऐसीं व्यवस्थित । सर्वेंद्रियें ॥३९८॥
अंगीं अग्निबळ । तरी च हें घडे । ना तरी विघडे । सर्व कांहीं ॥३९९॥
जलें वा अनिलें । मालवतां ज्योति । आपुली असती । द्दष्टि व्यर्थ ॥४००॥
तैसा अंतकालीं । अंतर्बाह्म कफ - । वायूचा प्रकोप । होवोनियां ॥४०१॥
विझोनियां जातां । अग्नीची ती दीप्ती । नुरे क्रियाशक्ति । प्राणासी हि ॥४०२॥
मग तेथें बुद्धि । असोनि हि काय । निष्क्रिय ती होय । अग्निविण ॥४०३॥
म्हणोनियां अंतीं । देहीं अग्निविना । अर्जुना , राहे ना । ज्ञानकला ॥४०४॥
तरी देह नव्हे । चिखल तो ओला । जरी अग्नि गेला । देहांतील ॥४०५॥
मग अंधारांत । शोधावें तैसी च । स्थिति होय साच । आयुष्याची ॥४०६॥
आणि सर्व कांहीं । मागील स्मरण । सर्वथा राखोन । तैसें चि तें ॥४०७॥
मग अंतकाळीं । सोडोनि शरीर । मिळावें साचार । आत्मरूपीं ॥४०८॥
तरी कफव्याप्त । देहपंकीं पार्था । बुडोनियां जातां । चेतना ती ॥४०९॥
मागील पुढील । सर्व हि स्मरण । सहजें बुजोन । जाय तेव्हां ॥४१०॥
जैसें ठेवणें तें । न देखतां जावा । हातांतील दिवा । एकाएकीं ॥४११॥
तैसा अंतकाला - । पूर्वीं च लोपला । योगाभ्यास केला । जो का आधीं ॥४१२॥
तरी आतां पार्था । असो हें सकळ । जाण अग्नि मूळ । ज्ञानासी गा ॥४१३॥
म्हणोनिय प्रयाण - । काळीं संपूर्णत्वें । शरीरीं असावें । अग्नि -बळ ॥४१४॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥२४॥
देहामाजीं अग्नि - । ज्योतीचा प्रकाश । बाहेरी दिवस । शुक्लपक्ष ॥४१५॥
आणि जे षण्मास । उत्तरायणाचे । त्यांतील एकाचें । पाठबळ ॥४१६॥
ऐसा समयोग । साधोनि साचार । आपुलें शरीर । ठेविती जे ॥४१७॥
ब्रह्मवेत्ते पार्था । ब्रह्म चि ते होती । एवढी महती । काळाची ह्या ॥४१८॥
आत्मस्वरूपातें । मिळावया पाहें । सर्वथा हा आहे । उजू मार्ग ॥४१९॥
येथें अग्नि ही च । पहिली पायरी । जाणावी दुसरी । ज्योतिर्मय ॥४२०॥
तेविं दिवस ही । पायरी तृतीय । चवथी ती होय । शुक्लपक्ष ॥४२१॥
उत्तरायणाचे । मास जे का सहा । सोपान तो पहा । त्या हि वरी ॥४२२॥
अर्जुना , सायुज्य - । सिद्धि -सदनातें । योगी येणें पंथें । पावती गा ॥४२३॥
ह्यासी च अर्चिरा - । मार्ग ’ ऐसें नाम । काळ हा उत्तम । प्रयाणाचा ॥४२४॥
धनंजया आतां । अकाळ जो येथें । ऐक तो हि तूतें । निवेदीन ॥४२५॥
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥२५॥
तरी अंतकाळीं । देह व्याधिग्रस्त । कफ -वातें जात । दाटोनियां ॥४३६॥
तिये वेळीं मग । अंधार तो पाहें । भरोनियां राहे । अंतरांत ॥४२७॥
आणि काष्ठवत् । सर्वेंद्रियें होती । तेविं बुडे स्मृति । भ्रमामाजीं ॥४२८॥
मन होय वेडें । आणि कोंडे प्राण । जाय अग्निपण । अग्निचें हि ॥४२९॥
सर्वत्र तो धूर । भरोनियां ठाके । चेतना हि झांके । तेणें मग ॥४३०॥
नभामाजीं मेघ । जलें परिपूर्ण । ठाकतां दाटोन । चंद्राआड ॥४३१॥
मग ना अंधार । ना तरी उजेड । सर्वत्र धुकड । दिसे जैसें ॥४३२॥
तैसें ना मरण । नाहीं सावधता । येतसे स्तब्धता । जीवितासी ॥४३३॥
ऐशा स्थितीमाजीं । आयुष्य तें पार्था । मृत्यूची सर्वथा । वाट पाहे ॥४३४॥
मन बुद्धि आणि । सर्व इंद्रियें तीं । कोंडोनियां जाती । धुरामाजीं ॥४३५॥
आणि जो अभ्यास । जोडला जन्मोन । जाय तो लोपोन । तिये वेळीं ॥४३६॥
मग आणिकाचा । लाभ तो कोठून । जातां हारपून । हातींचें हि ॥४३७॥
अंतकाळीं देहीम । ऐसी दशा होय । रात्रीचा समय । बाहेरी हि ॥४३८॥
कृष्णपक्ष आणि । दक्षिणायनाचे । षण्मास ते साचे । त्या हि वरी ॥४३९॥
जन्म -मरणाच्या । घालिती फेर्यांत । ऐसे हे समस्त । योग जाण ॥४४०॥
पार्था , अंतकाळीं । जुळोनियां येतां । ब्रह्मप्राप्तिवार्ता । दूर राहे ॥४४१॥
जया योगियाचा । ऐसा देह पडे । तया जाणें घडे । चंद्रलोकीं ॥४४२॥
मग तेथोनि तो । फिरोनि माघारा । गांठितसे फेरा । संसाराचा ॥४४३॥
अकाळ म्हणोनि । बोलिला जो आतां । हा चि तो तत्त्वतां । जाण बापा ॥४४४॥
धूम्रमार्ग ऐसें । बोलती ह्यासी च । पाववी जो साच । पुनर्जन्म ॥४४५॥
दुजा अर्चिरादि । मार्ग तो सुगम । सर्वथा उत्तम । मोक्षदायी ॥४४६॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः ॥२६॥
ऐशा अनादि ह्या । दोन्ही वाटा देख । एक उजू एक । आडमार्ग ॥४४७॥
बुद्धिपुरस्सर । दखविले दोन्ही । कळावे म्हणोनि । मार्गामार्ग ॥४४८॥
सत्य आणि मिथ्या । पार्था ओळखावें । हितार्थ जाणावें । हिताहित ॥४४९॥
तरावया नाव । देखोनियां भली । कोण उडी घाली । महाडोहीं ॥४५०॥
किंवा राजमार्ग । जाणोनि हि कोणी । सांग आडरानीं । शिरेल का ? ॥४५१॥
अमृत आणिक । विष ओळखील । काय तो सांडील । अमृतातें ? ॥४५२॥
तेविं उजू वाट । देखे जो सर्वथा । न जाय तो पार्था । आडवाटे ॥४५३॥
सत्य आणि मिथ्या । पारखोनि नीट । तरावें संकट । अकाळाचें ॥४५४॥
एर्हवीं देहान्तीं । पातली आपत्ति । पडोनियां भ्रांति । मार्गामार्गीं ॥४५५॥
तरी योगाभ्यास । सर्व हि तो देख । होय निरर्थक । धनंजया ॥४५६॥
अर्चिरादि पंथ । चुकोनियां योगी । पडे धूम्रमार्गीं । अकस्मात ॥४५७॥
तरी तयालागीं । भवचक्रासंगें । फिरावें चि लागे । वारंवार ॥४५८॥
ऐसे हे सायास । चुकावे म्हणोनि । विवरिले दोन्ही । मार्ग नीट ॥४५९॥
एक तो योग्यातें । ब्रह्मपदा नेई । दुजा फेरा देई । संसाराचा ॥४६०॥
परी अंतकाळीं । जया जो साचार । प्रारब्धानुसार । मिळे मार्ग ॥४६१॥
अर्जुना , तो योगी । तैसी गति पावे । सांगेन बरवें । ऐक आतां ॥४६२॥
नैसे सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥२७॥
कोण जाणे मार्ग । कोणता लाभेल । येतां अंतकाल । एकाएकीं ॥४६३॥
म्हणोनि देहान्तीं । ब्रह्म व्हावें मार्गें । नको तें वाउगें । अनिश्चित ॥४६४॥
तरी आतां देह । असो किंवा जावो । आपण तों आहों । ब्रह्मरूप ॥४६५॥
दोरीवरी जैसा । सर्पाचा आभास । तैसा मिथ्याभास । शरीराचा ॥४६६॥
काय उदकातें । तरंगाचें भान । तें तों नित्य जाण । उदक चि ॥४६७॥
पावे ना तें जन्म । उसळतां लाट । मरे ना निश्चित । लोपतां ती ॥४६८॥
तेविं जे देहें चि । झाले परब्रह्म । नामरूप -भ्रम । सांडोनियां ॥४६९॥
आतां शरीराचें । तयांचिया ठायीं । आडनांव तें हि । नुरे जेथें ॥४७०॥
तेथें कोणे काळीं । काय मरे पार्था । होतां तो सर्वथा । सर्वरूप ॥४७१॥
देशकालादिक । सर्व जरी तो च । जाहलासे साच । आपण चि ॥४७२॥
कशासाठीं मग । मार्ग ते शोधावे । कोणें कोठें जावें । कोठोनियां ॥४७३॥
भंगता चि घट । त्यांतील आकाश । लागेल वाटेस । नीटपणें ॥४७४॥
तरी च तें काय । शून्यासी भेटेल । ना तरी मुकेल । शून्यत्वासी ? ॥४७५॥
पाहतां विचार । लोपे घटाकार । शून्य तें साचार । शून्यीं असे ॥४७६॥
जया ‘ अहं ब्रह्म ’ । ऐसा झाला बोध । योगी सोऽहंसिद्ध । ऐसा जो का ॥४७७॥
तयलागीं मार्गा - । मार्गाचें बिकट । पडेना संकट । कदाकाळीं ॥४७८॥
म्हणोनियां तुवां । व्हावें योगयुक्त । मग अखंडित । ब्रह्मसाम्य ॥४७९॥
ऐसें होतां देह । केव्हां कोठें कैसा । पडो किंवा जैसा - । तैसा राहो ॥४८०॥
परी अनिर्बंध । नित्य ब्रह्मस्थिति । तयाची कल्पन्तीं । बिघडे ना ॥४८१॥
तया कल्पारंभीं । बाधे ना जनन । पावे ना मरण । कल्पान्तीं तो ॥४८२॥
आणि मध्यें स्वर्ग - । संसाराची भूल । परी तो निश्चल । राहे तेथें ॥४८३॥
तो चि ज्ञानाची ह्या । जाणे सरलता । होय ऐसा ज्ञाता । योगी जो का ॥४८४॥
कीं तो सर्व भोग । ओलांडोनि पाहें । होवोनियां राहे । ब्रह्मरूप ॥४८५॥
इंद्रादिकां देवां । सर्वस्व चि वाटे । ऐसें जें का मोठें । स्वर्गसुख ॥४८६॥
तें हि त्याज्य तुच्छ । लेखोनियां पार्था । सहजें सर्वथा । दूर लोटी ॥४८७॥
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।
अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥२८॥
इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिपत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम
अष्टमोऽध्यायः ॥८॥
घोकोनियां चारी । वेद अहोरात्र । पिकवोनि क्षेत्र । यज्ञरूप ॥४८८॥
किंवा करोनियां । पार्था , तपोदान । पुण्य -संपादन । करावें जें ॥४८९॥
बहरोनि सर्व । पुण्याचा त्या मळा । जरी फळा आला । परिपूर्ण ॥४९०॥
तरी नित्य शुह्म -स्वरूपाशीं । तुलना ती कैशी । होय त्याची ॥४९१॥
ऐसें नित्यानंदा - । सारिखें आणिक । दिसे स्वर्गसुख । पार्था , जें का ॥४९२॥
तेविं जयाचिया । प्राप्तीसाठीं देख । वेद -यज्ञादिक । साधनें तीं ॥४९३॥
करी भोक्तयाचे । पूर्ण मनोरथ । संपेना अवीट । ऐसें जें का ॥४९४॥
ब्रह्मसुखाचें जें । धाकटें भावंड । देई जें आह्लाद । दर्शनासी ॥४९५॥
असे अद्दष्टाचा । जयासी आधार । अर्जुना , साचार । ऐसें जें का ॥४९६॥
तेविं शत यज्ञ । करोनि हि देख । लाधे ना जें सुख । कोणा एकां ॥४९७॥
तया स्वर्ग -सुखा । कौतुकें तोलून । आपुल्या झेलून । हातावरी ॥४९८॥
ज्ञानद्दष्टिबळें । पाहतां तें जाण । योगीश्वरा गौण । वाटतसे ॥४९९॥
स्वर्गसुखाची त्या । पायरी करोनि । ब्रह्मसिंहासनीं । बैसती ते ॥५००॥
चराचराचें जो । असे एकभाग्य । पूजावया योग्य । ब्रह्मेशांसी ॥५०१॥
आणि योगियांचें । भोग्य भोग -धन । जीवाचें जीवन । विश्चाचिया ॥५०२॥
तेविं चि सकळ । कळांची जो कळा । ओतीव पुतळा । स्वानंदाचा ॥५०३॥
असे जो का सर्व । ज्ञानांचा जिव्हाळा । यादवांच्या कुळा । उजळिता ॥५०४॥
यादवेंद्र कृष्ण । सर्वज्ञ श्रीपति । ऐसें पार्थाप्रति । बोलिला तो ॥५०५॥
कुरु -क्षेत्रीं ऐसें । घडलें जें तें तें । संजय रायातें । सांगतसे ॥५०६॥
आतां पुढें ऐका । वृतांत तो सर्व । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥५०७॥
इति श्री स्वामी स्वरूपानंदविरचित श्रीमत् अभंग -ज्ञानेश्वरी
अष्टमोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
। श्रीकृष्णार्पणमस्तु ।