श्लोक १ ते १०
अर्जुन उवाच ---
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥१॥
मग म्हणे पार्थ । ऐकिलें का देवा । पुसिला सांगावा । अभिप्राय ॥१॥
सांगा मज येथें । कवण तें ‘ब्रह्म ’ । ‘कर्म ’ ऐसें नाम । कोणासी तें ॥२॥
‘ अध्यात्म ’ तें काय । कैसें ‘ अधिभूत ’ । कोण असे येथ । ‘ अधिदैव ’ ॥३॥
सर्व हि तें मज । आकळेल नीट । ऐसें सांगा स्पष्ट । करोनियां ॥४॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥२॥
‘ अधियज्ञ ’ काय । कोण तो ह्या देहीं । कळेना हें कांहीं । अनुमानें ॥५॥
ओळखिती कैसें । सांगा तुम्हालागीं । स्थिरचित्त योगी । अंतकाळीं ॥६॥
चिंतामणीचिया । मंदिरीं साचार । झोंपला जो नर । भाग्यवंत ॥७॥
मग झोंपेंत हि । जें तो बरळेल । ते हि बोल फोल । नव्हतील ॥८॥
तैसे पार्थाचे ते । ऐकतां चि शब्द । सहजें गोविंद । काय बोले ॥९॥
म्हणे पार्था , तुंवा । पुसिलें जें कांहीं । ऐक लवलाहीं । बरवें तें ॥१०॥
कामधेनूचा तो । वत्स धनंजय । ऐसें निःसंशय । वाटे मज ॥११॥
कृष्णरुप कल्प -। वृक्षाची साउली । तयासी लाभली । निरंतर ॥१२॥
म्हणोनि सिद्धीस । जाती मनोरथ । नवल तें येथे । असे काय ॥१३॥
आपण तों व्हावें । जेव्हां कृष्ण -भक्त । तेव्हां चि तें चित्त । कृष्णमय ॥१४॥
मग ऋद्धिसिद्धि । सेविका होवोनि । राबती अंगणीं । संकल्पाच्या ॥१५॥
परी ऐसें प्रेम । अर्जुनाठायीं च । नांदतसे साच । अमर्याद ॥१६॥
म्हणोनि तयाच्या । कामना सकळ । सहजें सफळ । होती सदा ॥१७॥
ह्या चि साठीं पार्थ । निज -मनोगत । पुसेल निश्चित । आपणातें ॥१८॥
जाणोनि हें देवें । वाढोनि ठेविलें । पुढें ताट भलें । उत्तराचें ॥१९॥
करी स्तनपान । सान जें बालक । तयाची तों भूक । माता जाणे ॥२०॥
काय तें आपण । शब्दें दूध मागे । मग पाजूं लागे । माता त्यासी ॥२१॥
तैसेम कृपावंत । गुरुचिया ठायीं । हें तों सर्व कांहीं । स्वाभाविक ॥२२॥
असो आतां ऐका । देव सर्वेश्वर । काय सविस्तर । बोलिला तें ॥२३॥
श्रीभगवानुवाच ---
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भृतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥३॥
म्हणे नाशिवंत । आकारीं कोंदलें । परी जें ना गळे । कोणे काळीं ॥२४॥
एर्हवीं तयाचें । ऐसें सूक्ष्मपण । स्वभावें गगन । जणूं वाटे ॥२५॥
परी नव्हे तैसें । तयाहूनि सूक्ष्म । जया देती नाम । महाशून्य ॥२६॥
जें का शून्याचिया । पदरा आंतून । घेतलें गाळून । अति सूक्ष्म ॥२७॥
अति सूक्ष्म तरी । न जाई गळून । चाळणीमधून । विज्ञानाच्या ॥२८॥
पार्था , ऐसें जें का । सूक्ष्माहूनि सूक्ष्म । तें चि पर ‘ब्रह्म ; । ओळखावें ॥२९॥
जन्मतां आकार । न जन्मे त्या संगें । सर्वथा न भंगे । लोपतां तो ॥३०॥
ब्रह्माचा त्या नित्य । सहज स्वभाव । ‘अध्यात्म ’ हें नांव । तयालागीं ॥३१॥
निर्मळ आकाशीं । नेणों कैशा रीती । मेघ उद्भवती । नाना रंगीं ॥३२॥
तैसे निराकार । शुद्ध ब्रह्मठायीं । उद्भवती पाहीं । एकाएकीं ॥३३॥
महत्तत्त्वादिक । भूतभेदें किती । विविध आकृति । ब्रह्मांडाच्या ॥३४॥
ब्रह्मभूमीमाजीं । आदिसंकल्पाचा । अंकुर तो साचा । उगवतां ॥३५॥
ब्रह्म -गोलकांचे । असंख्य आकार । सवें चि साचार । प्रकटती ॥३६॥
पाहतां दिसती । तया एकेकांत । बीजें असंख्यात । सामावलीं ॥३७॥
आणि तेथें जीव । किती होती जाती । तयांची गणति । करवेना ॥३८॥
मग अगणित । आदिसंकल्पांस । ब्रह्मगोलकांश । जन्म देती ॥३९॥
असो , ऐसा वाढे । सृष्टीचा विस्तार । अर्जुना साचार । बहुवस ॥४०॥
परी असे पर -। ब्रह्म चि संचलें । सर्वत्र एकलें । दुजेवीण ॥४१॥
आणि जणूं नाना -। रुपत्वाचा पूर । लोटला अपार । तयाठायीं ॥४२॥
सम -विषमत्व । नेणों कैसें आलें । अकारण झालें । चराचर ॥४३॥
पाहूं जातां तेथें । लक्षावधि साचे । प्रकार योनींचे । प्रसवत्या ॥४४॥
जीवभावाची जी । इतर पालवी । तयाची न ठावी । सीमा कोणा ॥४५॥
कैसें कवण हें । प्रसवे सकळ । पाहूं जातां मूळ । शून्य चि तें ॥४६॥
परी मूळीं कर्ता । न दिसे सर्वथा । शेवटीं नसतां । कारण हि ॥४७॥
माजीं कार्य चि तें । वाढूं लागे पार्था । देखें स्वभावतां । जेणें योगें ॥४८॥
कर्त्याविण पाहीं । अव्यक्ताचे ठायीं । भासमान होई । आकार हा ॥४९॥
ऐसा जो व्यापार । तया पंडुसुता । बोलती तत्त्वतां । ‘कर्म ’ ऐसें ॥५०॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्वाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥४॥
बोलती सर्वथा । जया अधिभूत । तें हि थोडक्यांत । सांगूं ऐक ॥५१॥
नभीं अभ्र जैसें । होय जाय पार्था । तैसी ज्याची सत्ता । लटकीच ॥५२॥
आणि पाहूं जातां । नाहीं च जें साच । भासे जें उगाच । वरिवरी ॥५३॥
होवोनि एकत्र । पंचमहाभूतें । आणिती जयातें । व्यक्तत्वासी ॥५४॥
भूतांचा आश्रय । करोनि जें असे । संयोगें च दिसे । भूतांचिया ॥५५॥
आणि वियोगें जें । टिके ना क्षणैक । नामरुपादिक । ऐसें जें का ॥५६॥
अधिभूत ’ ऐसें । तयालागीं नांव । जाण अधिदैव । पुरुष तो ॥५७॥
गुणक्शोभिणीनें । निर्मिले जे भोग । घेई उपभोग । तयांचा जो ॥५८॥
असे जो का स्वामी । इंद्रिय -देशींचा । तेविं चेतनेचा । प्रकाशक ॥५९॥
मावळतां देह । संकल्प -पक्षिया । जो का रहावया । होय वृक्ष ॥६०॥
परमात्मरुप । मुळांत एकला । असोनि वेगळा । झाला जो का ॥६१॥
अहंकार -निद्रा । लागोनियां जया । पडे धनंजया । भव -स्वप्न ॥६२॥
स्वप्नींचे व्यापार । मानोनि ते साच । होय जो वायां च । सुखीदुःखी ॥६३॥
जयालागीं देती । ‘जीव ’ ऐसें नांव । देहीं ‘अधिदैव ’ । तें चि जाण ॥६४॥
देहीं देहभाव । पाववितो लय । तो मी येथें होय । अधियज्ञ ॥६५॥
आणि अधिदैव । तेविं अधिभूत । तें हि गा समस्त । मी चि आहें ॥६६॥
लावोनियां कस । पाहतां चोखाळ । ऐसें चि केवळ । जें का हेम ॥६७॥
मग हीणामाजीं । मिळोनियां जातां । नव्हे का तें पार्था । डाकलग ॥६८॥
वस्तुतां हेमाचें । मळे ना शुद्धत्व । सर्वथा हीणत्व । पावे ना तें ॥६९॥
परी संबोधावें । तया डाकलाग । जोंवरी संसर्ग । किडाळाचा ॥७०॥
तैसे ते मद्रूप । अधिभूतादिक । धनंजया देख । सर्वथैव ॥७१॥
परी अविद्येच्या । पदरें झांकले । तोंवरी वेगळे । मानावे ते ॥७२॥
तो चि अविद्येचा । फाटतां पदर । लोपला साचार । भेद -भाव ॥७३॥
मग एकरुप । जाहले आटोन । म्हणूं तरी दोन । होते केव्हां ! ॥७४॥
करोनियां जैसा । केसांचा गुंडाळा । तयावरी शिळा । स्फटिकाची ॥७५॥
ठेवोनिया मग । पाहूं जाता तेथें । जणूं ऐसे वाटे । भंगळी ती ॥७६॥
सारितां तें दूर । केसांचें गुंडाळें । खंडत्व लोपलें । कोठें नेणों ॥७७॥
आतां सांगें काय । लावोनियां डाक । सांधिलें स्फटिक -। शिळेलागीं ॥७८॥
केसांचिया संगे । भेदलीशी भासे । अखंड ती असे । मूळची च ॥७९॥
केंस ते बाजूस । सारोनि पाहतां । होती तैसी आतां । दिसूं लागे ॥८०॥
तैसा अहंभाव । लोपोनियां जातां । ऐक्य स्वभावतां । आधीं चि तें ॥८१॥
ऐसी जेथें लाभे । प्रतीतीची खूण । पार्था , तो मी जाण । अधियज्ञ ॥८२॥
उद्देशें ज्या ऐसें । सांगितलें तुज । यज्ञ हे कर्म -ज । सकळ हि ॥८३॥
तो हा सकळ हि । जीवांचा विसावा । ब्रह्म -सौख्य -ठेवा । अधियज्ञ ॥८४॥
करोनि उघड । परी तें चि आतां । दावितसें पार्था । तुजलागीं ॥८५॥
आधीं वैराग्याचें । घालोनि इंधन । अग्नि पेटवोन । इंद्रियांचा ॥८६॥
शब्दादि विषय -। द्रव्याचिया देती । तयांत आहुति । धनंजया ॥८७॥
मग वज्रासन -। भूमि सारवोन । सर्वथा करोन । घेती शुद्ध ॥८८॥
आधारमुद्रेची । वेदिका बरवी । रचिती मांडवीं । शरीराच्या ॥८९॥
तेथें संयमाच्या । अग्निकुंडीं जाण । त्रिबंध -साधन -। मंत्र -घोषें ॥९०॥
इंद्रियद्रव्याच्या । विपुल आहुति । देवोनि करिती । यजन ते ॥९१॥
मग मन आणि । प्राणाचा संयम । हें जें सर्वोत्तम । होम -द्रव्य ॥९२॥
तेणें समारंभें । करिती संतुष्ट । धूमविरहित । ज्ञानाग्नीतें ॥९३॥
ऐसें सकळ हि । द्रव्य हें संपूर्ण । होतां समर्पण । ज्ञानामाजीं ॥९४॥
मग ज्ञान तें हि । हारपतां ज्ञेयीं । ज्ञेय चि तें राही । स्वरुपें गा ॥९५॥
तया ज्ञेयासी च । नांव ‘अधियज्ञ ’ । बोलिला सर्वज्ञ । ऐसें जंव ॥९६॥
तंव तो अर्जुन । अति बुद्धिमान् । तयानें ती खूण । आकळिली ॥९७॥
जाणोनि हें देव । बोले गा पांडवा । श्रवणीं बरवा । दक्ष होसी ॥९८॥
ऐसा कृष्णदेव । होतां चि संतुष्ट । आनंदला पार्थ । पाहोनि तें ॥९९॥
तान्हया बाळाचें । भरतां चि पोट । तेणें चि संतुष्ट । स्वयें होणें ॥१००॥
किंवा शिष्याचिया । कृतकृत्यपणें । कृतार्थ मानणें । आपणांसी ॥१०१॥
हें तों सर्वथैव । जाणे सद्गुरु च । किंवा जाणे साच । जन्मदात्री ॥१०२॥
म्हणोनि अष्ट हि । सात्त्विक भावांचा । समुदाय साचा । पार्थाआधीं ॥१०३॥
देवाचिया अंगीं । सामावे ना परी । तयें सांवरिली । निज -बुद्धि ॥१०४॥
मग परिमळ । पिकल्या सुखाचा । शीत अमृताचा । कल्लोळ कीं ॥१०५॥
तैसा तो कोमल । आणि सु -रसाळ । बोलिला गोपाळ । तेथें बोल ॥१०६॥
म्हणे तुजऐसा । सर्वश्रेष्ठ श्रोता । नाहीं दुजा पार्था । येथें कोणी ॥१०७॥
ऐकें , ऐसी माया । जळोनियां जातां । जाळितें तत्त्वतां । तें हि जळे ॥१०८॥
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥५॥
अर्जुना आतां चि । सांगितलें तूतें । बोलती जयातें । ‘अधियज्ञ ’ ॥१०९॥
तया मातें जे का । जाणती आधीं च । आणिक तैसें च । अंतकाळीं ॥११०॥
मठालागीं जैसें । आकाश तें पाहें । व्यापोनियां राहे । अंतर्बाह्य ॥१११॥
ठेले आत्मरुप । होवोनि ते तैसे । देह मिथ्या ऐसे । मानोनियां ॥११२॥
तयां प्रतीतीच्या । माजघरीं साची । जागा निश्चयाची । प्राप्त झाली ॥११३॥
बाह्य विषयांचा । म्हणोनि विसर । पडला साचार । तयांलागीं ॥११४॥
ह्यापरी सबाह्य । भोगोनि एकता । होवोनि राहतां । मद्रूप ते ॥११५॥
बाहेरी पांच हि । भूतांची खवलें । गळतां न कळे । तयांसी तें ॥११६॥
असतां देहाचें । आतां उभेपण । तयाचें तों भान । नाहीं जयां ॥११७॥
पडतां तो देह । तयाचें सांकडें । काय तरी पडे । तयांलागीं ? ॥११८॥
म्हणोनि तयांची । स्वरुपानुभूति । ढळे ना कल्पान्तीं । धनंजया ॥११९॥
ऐक्यरसाची च । जणूं ती ओतली । हृदयीं घातली । नित्यतेच्या ॥१२०॥
सामरस्यचिया । जणूं सागरांत । काढिली निभ्रांत । धुवोनि ती ॥१२१॥
म्हणोनियां काम -। क्रोधादि सकळ । तेथें मनोमळ । राहती ना ॥१२२॥
अथांग उदकीं । बुडतां चि घट । उदक तें आंत । बाहेर हि ॥१२३॥
मग दैवगत्या । पावतां तो भंग । भंगतें का सांग । उदक तें ? ॥१२४॥
उष्मा होतां कोणी । वस्त्र केलें दूरी । टाकिली ना तरी । कात सर्पे ॥१२५॥
तरी आतां सांग । अर्जुना साचार । भंगलें शरीर । काय तेथें ॥१२६॥
तैसा नाशिवंत । मिथ्या हा आकार । पावला साचार । जरी लोप ॥१२७॥
तरी नित्य ब्रह्म । शाश्वत एकलें । सर्वत्र संचलें । ओतप्रोत ॥१२८॥
आतां बुद्धि तें चि । जाहली निजांगे । तरी कैसी डगे । अंतकाळी ॥१२९॥
म्हणोनि अंतरीं । अंतकाळीं मज । जाणोनि सहज । ऐशा रीती ॥१३०॥
राहोनि सावध । सोडिती जे देह । होती निंसंदेह । मद्रूप ते ॥१३१॥
नाहीं तरी ज्याचें । जैसें जो जो करी । स्मरण अंतरीं । अंतकाळीं ॥१३२॥
तया तैसी ती च । लाभे गति साच । संदेह नाहीं च । येथें कांहीं ॥१३३॥
जैसा दीनवाणा । कोणी एक पार्था । धांवतां पळतां । वायुवेगें ॥१३४॥
होवोनि बेभान । दुर्दैवे अवचित । पडावा कूपांत । महाघोर ॥१३५॥
ऐशा स्तितीमाजीं । टाळाया पतन । नाहीं च साधन । तयापाशीं ॥१३६॥
घसरतां पाय । नावरोनि वेग । पडणें चि भाग । पडे तया ॥१३७॥
तैसें अंतकाळीं । जीवापुढें राहे । जी जी वस्तु पाहें । धनुर्धरा ॥१३८॥
तद्रूप सर्वथा । तया व्हावें लागे । चुके ना तें ओघें । आलें जें जें ॥१३९॥
ज्याचा निदिध्यास । घ्यावा जागृतींत । झोंपतां स्वप्नांत । तें चि दिसे ॥१४०॥
यं यं वाऽपि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥६॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥७॥
तैसें जन्मभरी । जीवा ज्याचें ध्यान । आवडीनें मन । रमे जेथें ॥१४१॥
तें चि अंतकालीं । होवोनियां फार । व्यापोनि अंतर । राहतसे ॥१४२॥
आणि अंतकालीं । जया जें आठवे । ती च गति पावे । सर्वथा तो ॥१४३॥
म्हणोनियां तुवां । सदा सर्वकाळ । मातें चि केवळ । आठवावें ॥१४४॥
पहावें नयनीं । ऐकावें जें कानीं । कल्पावें जें मनीं । धनंजया ॥१४५॥
आणि जें जें कांहीं । मुखें उच्चारावें । तें तें सर्व व्हावें । मद्रूप चि ॥१४६॥
मग स्वभावतां । निरंतर एक । सर्वकाळीं देख । मी चि आहे ॥१४७॥
पडे जरी देह । मग ऐसें होतां । साच पाहूं जातां । मरे ना तो ॥१४८॥
तरे धनंजया । आतां सांगें मज । भय काय तुज । संग्रामाचें ॥१४९॥
माझिया स्वरुपीं । बुद्धि आणि मन । होतां समर्पण । सर्वभावें ॥१५०॥
सर्वथा मातें चि । पावसी निःशंक । हे गा माझी भाक । पंडुसुता ॥१५१॥
घडेल हें कैसें । ऐसें तुझें मन । आशंका घेवोन । विचारील ॥१५२॥
तरी पहावें हें । अभ्यासूनि चांग । न हो तरी मग । रागेजावें ॥१५३॥
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुष दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥८॥
ऐशा अभ्यासाशीं । चित्ताची बरवी । सांगड घालावी । धनुर्धरा ॥१५४॥
प्रयत्नाचे बळें । पांगळा हि पार्था । गिरीचिया माथां । चढूं शके ॥१५५॥
तेविं परात्पर -। पुरुष -चिंतन । करीं रात्रंदिन । सोऽहंभावें ॥१५६॥
मग तुझा देह । जावो किंवा राहो । तुज मृत्यु न हो । कल्पान्तीं हि ॥१५७॥
पाववी जें चित्त । नाना गतींप्रति । वरील तें अंतीं । आत्म्ययातें ॥१५८॥
मग पार्था ,देह । गेला किंवा आहे । सांग कोण पाहे । आठवोनि ॥१५९॥
नदीचिया ओघें । घोघावलें पाणी । मिळालें जावोनि । सिंधु -जळा ॥१६०॥
मग मागें काय । घडे तें पहाया । सांग धनंजया । वळे का तें ? ॥१६१॥
तें तरी सिंधूसि । मिळोनियां गेलें । होवोनियां ठेलें । सिंधुरुप ! ॥१६२॥
तैसें चित्ताचें त्या । जाहलें चैतन्य । होतां चि अनन्य । चैतन्याशीं ॥१६३॥
जन्ममरणाचा । नाहीं जेथें शीण । असे परिपूर्ण । आनंदे जें ॥१६४॥
कर्वि पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमचिन्त्यरुप मादित्यवर्ण तमसः परस्तात् ॥९॥
जयालागीं जाण । जन्म ना मरण । आकारावांचोन । असे जें का ॥१६५॥
जें का सर्वव्यापी । सर्वपणें पाहे । पुराणें जें आहे । नभाहून ॥१६६॥
परमाणुहून । अर्जुना जें सान । ऐसें सूक्ष्माहून । सूक्ष्म जें का ॥१६७॥
जयाच्या सान्निध्यें । विश्वाचे व्यापार । चालती साचार । अव्याहत ॥१६८॥
जेणें योगें होय । सर्व हें निर्मान । विश्वाचें जीवन । असे जें का ॥१६९॥
न ये अनुमान । करावया ज्याचें । अचिंत्य जें साचें । धनुर्धरा ॥१७०॥
वाळवी खाई ना । निखार्यातें जैशी । शिरे ना प्रकाशीं । अंधकार ॥१७१॥
तैसें दिसे ना जें । चर्मचक्षूलागीं । जरी झाला जगीं । सूर्योदय ॥१७२॥
असंख्य सूर्याची । जणूं स्वच्छ रास । नित्य ज्ञानियांस । प्रत्यक्ष जें ॥१७३॥
अस्तमानाचें तों । जया नाहीं नांव । स्वभावें सदैव । प्रकाशे जें ॥१७४॥
प्रयाणकाले मनसाऽचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्य्क् स तं परं पुरुषमुपौति दिव्यम् ॥१०॥
तया परिपूर्ण । ब्रह्मातें जाणोन । आठवी प्रयाण । कालीं जो का ॥१७५॥
अंतरीं एकाग्र । करोनियां मन । बाहेरी रचोन । पद्मासन ॥१७६॥
उत्तराभिमुख । बैसोनियां देख । जीवीं योग सुख । सांठवोनि ॥१७७॥
मेळवोनि आंत । सर्व मनोधर्म । ठेवोनियां प्रेम । स्वरूपीं च ॥१७८॥
आपुली आपण । घ्यावयासी भेट । झाला उत्कंठित । योगी जो का ॥१७९॥
तयाचा तो प्राण । अग्निचक्राहून । मध्यमार्गें जान । सुषुम्नेच्या ॥१८०॥
निघे ब्रह्मरंध्रीं । शिरावया , तेथ । मृर्धन्याकाशांत । संचरे तो ॥१८१॥
देहाशीं संबंध । जीवचैतन्याचा । मग दिसे साचा । वरिवरी ॥१८२॥
मनाचें संपूर्ण साधोनियां स्थैर्य । करोनि ह्रदय । भक्तियुक्त ॥१८३॥
योगबळें सिद्ध । राहिला होवोन । ठेवोनियां प्राण । भ्रू मध्यांत ॥१८४॥
घंटेंत चि लय । पावे घंटानाद । तैसें जडाजड । विरवी जो ॥१८५॥
जैसा घटाखालीं । झांकला जो दिवा । कळे ना तो केव्हां । काय झाला ॥१८६॥
तैशा रीती ठेवी । अर्जुना जो देह । होय निःसंदेह । मद्रूप तो ॥१८७॥
परम पुरुष । ऐसें जया नाम । जो मी परब्रह्म । केवळ गा ॥१८८॥