श्लोक ५१ ते ६०
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मवन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥
पार्था , योगी तरी । वर्तती कर्मात । परी अनासक्त । कर्म -फलीं ॥४५२॥
म्हणोनियां तयां । पाहें धनुर्धरा । नाहीं येरझारा । गर्भवास ॥४५३॥
मग जें शाश्वत । ब्रह्मानन्दें पूर्ण । पावती तें स्थान । योग -युक्त ॥४५४॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥
जिये वेळीं मोह । सोडोनि देशील । वैराग्य ठसेल । अंतरांत ॥४५५॥
तिये वेळीं तैसा । तूं हि पंडु -सुता । होशील सर्वथा । योगयुक्त ॥४५६॥
निर्दोष गहन । मग आत्मज्ञान । प्रकटेल जाण । धनंजया ॥४५७॥
तुझिया मनाचे । संकल्प -विकल्प । तेणें आपोआप । थांबतील ॥४५८॥
ऐसी साम्यावस्था । पावतां आणिक । जाणायाचें देख । नुरे कांहीं ॥४५९॥
किंवा पार्था , पूर्वी । जाणिलें जें कांहीं । तेथें नको तें हि । आठवाया ॥४६०॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥
इंद्रियांच्या संगे । बुद्धि जी चंचल । पुन्हां स्थिरावेल । आत्मरुपीं ॥४६१॥
आत्मसुखीं बुद्धि । होतां चि निश्चळ । पावसी सकळ । योग -स्थिति ॥४६२॥
अर्जुन उवाच ---
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥५४॥
पार्थ म्हणे तेव्हां । कृपानिधें देवा । सर्व हा सांगावा । अभिप्राय ॥४६३॥
विचारावें आतां । तुज सविस्तर । ऐसें वारंवार । मनीं येतें ॥४६४॥
मग तो अच्युत । तयालागीं बोले । विचारीं जें भलें । वाटे तुज ॥४६५॥
पार्था , सांगें तुझ्या । मनींची जिज्ञासा । सुखें हवा तैसा । प्रश्न करीं ॥४६६॥
ऐकोनि हे बोल । पार्थ म्हणे देवा । कैसा ओळखावा । स्थितप्रज्ञ ॥४६७॥
स्थिरबुद्धि ऐसें । बोलती कोणास । जाणावया त्यास । काय खूण ॥४६८॥
भोगी ब्रह्मानंदीं । अखंड समाधि । राहोनि उपाधि - । माजीं जो का ॥४६९॥
कोणे रुपीं कैसा । प्रपंचीं तो राहे । देवा , सांगावें हें । सर्व कांहीं ॥४७०॥
श्रीभगवानुवाच ---
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवाऽऽत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥
म्हणे पार्था ऐक झणीं । बळी काम जो का मनीं ॥४७२॥
तो चि आणी अडथळा । करी स्व -सुखावेगळा ॥४७३॥
जीव सदा नित्य तृप्त । परी गुंते विषयांत ॥४७४॥
ऐसा जयाचा प्रभाव । तया ‘काम ’ ऐसें नांव ॥४७५॥
सर्वथा तो काम जाई । आत्मतुष्ट मन राही ॥४७६॥
तो चि स्थितप्रज जाण । तुज सांगितली खूण ॥४७७॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥
नाना दुःखें झालीं प्राप्त । तरी खेद ना चित्तांत ॥४७८॥
आणि सुखाचिया हावे - । माजीं गुंते ना स्वभावें ॥४७९॥
पार्था तयाचिया ठायीं । काम क्रोध सहजें नाहीं ॥४८०॥
नेणे भयातें केव्हां हि । परिपूर्णपणें राही ॥४८१॥
भाव बाणला अभेद । ऐसा जो का अमर्याद ॥४८२॥
ज्यानें सोडिली उपाधि । तो चि जाण स्थिरबुद्धि ॥४८३॥
यः सर्वत्रानाभिस्नेहस्तत्त्वत्प्राय शुभाशुभम् ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥
उच्च -नीच ऐसा पार्था । भेदाभेद न करितां ॥४८४॥
सारिखा चि सकलांस । देई पूर्णैदु प्रकाश ॥४८५॥
तैसा ठेवी समभाव । सर्वा भूतीं जो सदैव ॥४८६॥
ऐसी अखंड समता । भूतमात्रीं सदयता ॥४८७॥
आणि येवो कैसी वेळ । चित्त होई ना चंचल ॥४८८॥
कांही भलें प्राप्त झालें । तरि हर्षे जो ना डोले ॥४८९॥
आणि पावतां वाईट । विषादे ना ज्याचें चित्त ॥४९०॥
ऐसा हर्ष -शोकादिक । द्वन्द्वांतून मुक्त देख ॥४९१॥
आत्मबोधें परिपूर्ण । तो चि प्रज्ञायुक्त जाण ॥४९२॥
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्दियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥
जैसा हर्षला कासव । सोडी मोकळे अवयव ॥४९३॥
इच्छावशें आवरोन । घेई आपुले आपण ॥४९४॥
तैसीं सर्व इंद्रियें तीं । ज्याच्या आज्ञेंत वागती ॥४९५॥
ज्याचीं इंद्रियें स्वाधीन । तो चि स्थितप्रज्ञ जाण ॥४९६॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज रसोऽप्यस्य परं दृष्टाव निवर्तते ॥५९॥
पार्था आणिक हि एक । ऐक सांगेन कौतुक ॥४९७॥
भोग त्यजावया पाहें । सज्ज झाले जे निग्रहें ॥४९८॥
इंद्रियांतें आवरिती । परी गोडी न सांडिती ॥४९९॥
तयां साधकां घेरिती । ते चि भोग नाना रीती ॥५००॥
जेविं वृक्षाची पालवी । वरीवरी च खुटावी ॥५०१॥
आणि मूळीं द्यावें जळ । तरि कैसा तो मरेल ॥५०२॥
कीं तो जळाच्या आधारें । जैसा अधिक विस्तारे ॥५०३॥
तैसे गोडीच्या प्रभावें । भोग वाढती स्वभावें ॥५०४॥
बळें इंद्रियांपासोन । भोग टाकिले तोडोन ॥५०५॥
तोडिले ते जाती जरी । सुटे ना ती गोडी तरी ॥५०६॥
असे कीं हा रस जाण । इंद्रियांचा जीव प्राण ॥५०७॥
म्हणोनियां तयावीण । होती इंद्रियें निःप्राण ॥५०८॥
पार्था , साधका साचार । होतां ब्रह्म -साक्षात्कार ॥५०९॥
रसाचें हि नियमन । मग स्वभावें संपूर्ण ॥५१०॥
देहभाव ते नासती । भोग इंद्रिये विसरती ॥५११॥
सोऽहं -भावाचा प्रत्यय । येतां ऐसी स्थिति होय ॥५१२॥
यततो ह्यापि कौन्तेय पुरुषस्य विपश्वितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥६०॥
नाहीं तरी हें अर्जुना । साधनानें साधूं ये ना ॥५१३॥
इंद्रियांते आवरोन । वागती जे रात्रंदिन ॥५१४॥
यम -नियमांचे कुंपण । तयांभोंवतें घालोन ॥५१५॥
अभ्यासाची देखरेख । नित्य ठेविती जे देख ॥५१६॥
राहती जे धनंजया । मन मुठीं धरोनियां ॥५१७॥
तयांतें हि भोग ओढी । ऐसी इन्दियांची प्रौढी ॥५१८॥
करोनियां कासावीस । छळिती तीं साधकास ॥५१९॥
जैसी मांत्रिकातें जाण । भूल घालिते डाकीण ॥५२०॥
ऋद्धि -सिद्धीच्या निमित्तें । प्राप्त होती भोग त्यातें ॥५२१॥
मग इंद्रियांच्या द्वारा । सुरु होय त्यांचा मारा ॥५२२॥
लाचावलें मन तेथें । तरी अधिकाधिक गुंते ॥५२३॥
मग पार्था काय सांगूं । अभ्यासीं तें होय पंगु ॥५२४॥
ऐसें इंद्रियांचें बळ । करी चित्तातें चंचल ॥५२५॥