श्लोक २० ते ३०
न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥२१॥
देखावें जें स्वप्नीं । स्वप्नीं चि तें साच । जागृति येतांच । कांहीं नाहीं ॥२२६॥
तैसा जाणें पार्था । हां तो मायाभास । वाया गुंतलास । भ्रमामाजीं ॥२२७॥
जैसी शस्त्रें छाया । हाणितां अंगातें । सांगें काय रुते । धनुर्धरा ॥२२८॥
किंवा पूर्णकुंभ । उलंडतां जैसें । नष्ट झालें दिसे । भानु -बिंब ॥२२९॥
तया बिंबासवें । काय भानु नासे । स्वभावें तो असे । निजस्थानीं ॥२३०॥
किंवा मठीं जैसें । आकाश तें पाहें । होवोनियां राहे । मठाकार ॥२३१॥
भंगतां तो मठ । आकाश ना नासे । असे जैसें तैसें । मूळरुपीं ॥२३२॥
तैसें जरी पार्था । लोपलें शरीर । सर्वथा अमर । आत्मतत्त्व ॥२३३॥
आत्मतत्त्वावरी । जन्ममृत्युरुप । भ्रांतीचा आरोप । नको करुं ॥२३४॥
आसांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्राति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥
टाकोनियां द्यावें । वस्त्र जैसें जीर्ण । करावें धारण । मग नवें ॥२३५॥
तैसा देही एक । शरीर सांडोन । स्वीकारी नूतन । मग दुजें ॥२३६॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥२४॥
उपाधिरहित । विशेषत्वें शुद्ध । असे नित्यसिद्ध । अनादि हा ॥२३७॥
म्हणोनि घडे ना । शस्त्रें ह्याचा घात । प्रळयोदकांत । बुडे ना हा ॥२३८॥
अग्नि असमर्थ । जाळावया ह्यातें । तेविं हा वायूतें । शोषवेना ॥२३९॥
सर्वत्र हा नित्य । अचळ शाश्वत । असे सदोदित । परिपूर्ण ॥२४०॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मोदेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥२५॥
ध्यान उत्कंठित । भेटावया ह्यास । तर्काच्या दृष्टीस । दिसे ना हा ॥२४१॥
पाहें निरंतर । दुर्लभ हा मना । तेविं साधवे ना । साधनीं हा ॥२४२॥
उत्तम पुरुष । असे हा अनंत । गुणत्रयातीत । धनंजया ॥२४३॥
अनादि हा आत्मा । नित्य निर्विकार । तेविं निराकार । सर्वरुप ॥२४४॥
आकळितां ह्यातें । ऐसा सर्वात्मक । हारपेल शोक । स्वभावें चि ॥२४५॥
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि ॥२६॥
अविनाशी ऐसा । न जाणतां ह्यासी । जरी तूं मानिसी । नाशिवंत । २४६॥
तरी तुज पार्था । करावया शोक । कारण तें देख । नसे कांहीं ॥२४७॥
अर्जुना उत्पत्ति । स्थिति आणि लय । चाले हा अक्षय । नित्यक्रम ॥२४८॥
जाह्रवीचा जैसा । प्रवाह अखंड । वाहतो उदंड । निरंतर ॥२४९॥
उगमीं उदक । नाहीं च खुंटलें । अंतीं तरी मिळे । सागरासी ॥२५०॥
आणि वाहतां तें । मध्यें निरंतर । संचलें अपार । दिसे जैसें ॥२५१॥
प्राणिमात्रालागीं । तीन हि ह्या स्थिति । तैशापरी होती । अखंडित ॥२५२॥
कदापि हें सर्व । न ये थांबवाया । कासयासी वायां । खेद आतां ॥२५३॥
अनादि हा ऐसा । चाले नित्यक्रम । निसर्गाचा धर्म । जाण पार्था ॥२५४॥
तुज मानेना हें । जरी हा पाहोन । जन्मक्षयाधीन । जीव -लोक ॥२५५॥
तरी नको खेद । करावया कांहीं । अटळ हे पाहीं । जन्म -मृत्यु ॥२५६॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुर्महसि ॥२७॥
जें जें जन्मा येई । तें तें लया जाई । नासलें तें घेई । पुन्हां जन्म ॥२५७॥
ऐसें घटिकायंत्र । फिरे अखंडित । जैसे उदयास्त । स्वभावें चि ॥२५८॥
तैसे जन्म -मृत्यु । जगीं अनिवार । सर्वथा साचार । धनंजया ॥।२५९॥
कल्पान्ताच्या वेळीं । त्रैलोक्य हि नासे । अटळ हा असे । आदिअंत ॥२६०॥
आत्मा नाशिवंत । ऐसें तुझें मत । तरी हि उचित । नव्हे खेद ॥२६१॥
जाणोनि कां ऐसें । पांघरसी वेड । विषाद हा सोड । धनुर्धरा ॥२६२॥
येथें नानापरी । विचारितां जाण । दिसे ना कारण । खेदालागीं ॥२६३॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२८॥
जन्मापूर्वी जीव । सर्व हे अमूर्त । मग होती व्यक्त । जन्मतां चि ॥२६४॥
पावतां ते नाश । न जाती निभ्रांत । अन्य स्थितीप्रत । पाहें पार्था ॥२६५॥
परी तयांची जी । होती पूर्वस्थिति । तेथें चि अव्यक्तीं । लीन होती ॥२६६॥
आतां मध्यें चि जो । आकाराचा भास । जैसें निद्रितास । दिसे स्वप्न ॥२६७॥
तैसा माया -योगें । भासतो आकार । अर्जुना साचार । आत्मरुपीं ॥२६८॥
तरंगाच्या रुपें । भासतें उदक । पवनें जें देख । हालविलें ॥२६९॥
सुवर्णसी जैसें । अलंकारपण । यावया कारण । परापेक्षा ॥२७०॥
मायेमुळें तैसी । सृष्टी आकारली । अभ्रें जैसें आलीं । आकाशांत ॥२७१॥
तैसें पार्था मूळीं । नाहीं चि जें अंगें । कां गा खेद सांगें । तयासाठीं ॥२७२॥
म्हणोनि तूं आतां । अवीट जें एक । चैतन्य तें देख । धनंजया ॥२७३॥
तें चि परब्रह्म । देखावयासाठीं । उत्कटता मोठी । साधुसंतां ॥२७४॥
म्हणोनि तयांसी । अवघा विषय । सोडोनियां जाय । स्वभावें चि ॥२७५॥
तें चि परब्रह्म । भेटावें म्हणोन । विरागी ते वन । स्वीकारिती ॥२७६॥
दृढ तपोव्रतें । ब्रह्मचर्यादिक । आचरिती देख । मुनिश्रेष्ठ ॥२७७॥
आश्चर्यवत्पश्यति कश्विदेनमाश्वर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥
एक ते अंतरीं । होवोनि निश्चळ । चैतन्य केवळ । न्याहाळितां ॥२७८॥
गेले विसरोन । सकळ संसार । ध्यान -योगी थोर । महात्मे जे ॥२७९॥
करितां चि कोणी । गुण -संकीर्तन । चित्तासी होवोन । उपरति ॥२८०॥
परब्रह्म -पदीं । श्रेष्ठ भक्तजन । जाहले तल्लीन । निरंतर ॥२८१॥
कोणी ज्ञानी ह्यावें । करोनि श्रवण । उपाधि सांडोन । शांत झाले ॥२८२॥
होवोनि तद्रूप । स्वानुभवें कोणी । योगी भक्त ज्ञानी । झाले सिद्ध ॥२८३॥
सरितांचे ओघ । जैसे का समस्त । जाती सागरांत । मिळोनियां ॥२८४॥
परी पार्था पाहें । न मावतां तेथें । परतले मागुते । ऐसें नाहीं ॥२८५॥
तद्रूप बुद्धीसी । होतां साक्षात्कार । सिद्धांसी संसार । नुरे तैसा ॥२८६॥
देही नित्यमवध्योऽयं देह सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥
करुं जातां ज्याचा । होत नाहीं घात । सर्व हि देहांत । वसे जें का ॥२८७॥
असे जें सर्वत्र । तेविं सर्वात्मक । चैतन्य तें एक । पाहें पार्था ॥२८८॥
स्वभावें तेथें चि । होय जाय जग । तरी कां गा सांग । शोक आतां ॥२८९॥
नेणों कैसें तुज । माने ना हें पार्था । शोक हा सर्वथा । योग्य नोहे ॥२९०॥