श्लोक ११ ते १९
श्रीभगवानुवाच ---
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्व भाषसे ।
गतासूनगतासूंश्व नानुशोचन्ति पण्डिताः ॥११॥
मग पार्थालागीं । देव बोले काय । अर्जुना आश्चर्य । देखिलें हें ॥१४५॥
कीं जें तुवां आज । युद्ध -भूमीवरी । ऐसें दीनापरी । आरंभिलें ॥१४६॥
म्हणविसी पार्था । सुज्ञ तूं आपणा । परी सोडिसी ना । अज्ञपण ॥१४७॥
शिकवावें तरी । सांगसी किरीटी । पांडित्यांच्या गोष्टी । तूं चि आम्हां ॥१४८॥
जन्मतां जें अंध । लागावें त्या पिसें । मग धांवे जैसें । सैरावैरा ॥१४९॥
तैसें मज दिसे । तुझें सुज्ञपण । नेणसी आपण । कोण तूं हें ॥१५०॥
परी कौरवांचें । तुज दुःख मोठें । आश्चर्य हें वाटे । वारंवार ॥१५१॥
सांगें धनंजया । तुजमुळें काय । आलें लोक -त्रय । अस्तित्वासी ॥१५२॥
विश्वाची रचना । असे सनातन । काय अप्रमाण । म्हणावें तें ॥१५३॥
सर्वशक्तिशाली । ईश्वरापासोन । होतसे निर्माण । प्राणिमात्र ॥१५४॥
बोलती जें ऐसें । जगामाजीं पार्था । सर्वथा तें वृथा । मानावें कां ॥१५५॥
जन्म -मृत्यु हे तों । निर्मिले तूं पार्थे । म्हणावें का येथें । ऐसें आतां ॥१५६॥
आणि तूम चि ह्यांचा । करिशील नाश । तेव्हां चि विनाश । पावती हे ? ॥१५७॥
होवोनि अर्जुना । अहंकारें भ्रांत । येथें ह्यांचा घात । चिंतिसी ना ॥१५८॥
तरी चिरंजीव । काय हे होतील । विचार सखोल । करीं ह्याचा ॥१५९॥
किंवा मारणारा । ह्यांसी तूं चि एक । मरता हा लोक । सकळ हि ॥१६०॥
ऐसी तुझ्या चित्तीं । असे जरी भ्रांत । तरी तो त्वरित । सांडीं आतां ॥१६१॥
जन्म -मृत्यु हा तो । निसर्ग -स्वभाव । अनादि हें सर्व । स्वयंसिद्ध ॥१६२॥
तरी सांगें आतां । कासया तूं खिन्न । गेलासी भुलोन । मूढपणें ॥१६३॥
धरुं नये तें चि । धरोनियां चित्तीं । सांगसी तूम नीति । आम्हालागीं ॥१६४॥
देखें सव्यसाची । मृत्यु आणि जन्म । हा तों मायाभ्रम । म्हणोनियां ॥१६५॥
विवेकी जे होतो । घेवोनि हा बोध । करिती ना खेद । दोहींचा हि ॥१६६॥
न त्वेवाहं जातु नाऽऽसं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥१२॥
ऐकें पार्था येथें । आम्ही तुम्ही पाहें । आणि भूपती हे । सकळ हि ॥१६७॥
इत्यादिक ऐसे । नित्य रहातील । किंवा मरतील । निश्चयें चि ॥१६८॥
सोडोनि ही भ्रांति । पाहतां निश्चितीं । दोन हि ह्या स्थिति । भासमात्र ॥१६९॥
उत्पत्ति -विनाश । मायेमुळें दिसे । साच आत्मा असे । अविनाश ॥१७०॥
अर्जुना वायूनें । हालविलें नीर । लाटेचा आकार । धरी जेव्हां ॥१७१॥
तेव्हां तेथें कोण । जन्मलें कोठोनि । आदि अंतीं पाणी । एकलें चि ॥१७२॥
मग वायूचें तें । थांबतां स्फुरण । आलें स्थिरपण । उदकासी ॥१७३॥
तरी तेथें काय । नष्ट झालें आतां । विचार तत्त्वतां । करीं ह्याचा ॥१७४॥
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥
ऐकें धनंजया । देह तरी एक । परी ते अनेक । वयोभेद ॥१७५॥
देखें येथें आहे । प्रत्यक्ष प्रमाण । नको अनुमान । करावया ॥१७६॥
ह्या देहीं आरंभीं । दिसे बाळपण । तारुण्यीं तें जाण । नष्ट होय ॥१७७॥
देह हा एकैक । ऐसी दशा पावे । परी तियेसवें । नासें ना तो ॥१७८॥
तैसें पंडुसुता । चैत्यन्याच्या ठायीं । होती जातो पाहीं । नाना देह ॥१७९॥
नाशिवंत देह । जाईल सर्वथा । चैतन्याची सत्ता । सर्वकाळ ॥१८०॥
ऐसें जाणे तया । व्यामोहाचें दुःख । होत नाहीं देख । कल्पांती हि ॥१८१॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुख दुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥१४॥
देखें इन्द्रियांच्या । होवोनि आधीन । वागे तया ज्ञान । नाकळे हें ॥१८२॥
विषयांचे ठायीं । जडे त्याचें चित्त । म्हणोनि भ्रमांत । सांपडे तो ॥१८३॥
आपुले विषय । इंद्रियें सेवितो । तेथें उपजती । हर्ष -शोक ॥१८४॥
ऐसा विषयांचा । घडतां संसर्ग । तेणें अंतरंग । भ्रमे त्याचें ॥१८५॥
विषयांच्या ठायीं । एक भाव नाहीं । कांहीं सुख कांहीं । दुःख दिसे ॥१८६॥
शब्द -विषयाची । पाहें पार्था व्याप्ति । निंदा आणि स्तुति । दोन्ही तेथें ॥१८७॥
कर्णद्भारें निंदा । ऐकतां स्वभावें । चित्त क्षोभ पावे । एकाएकीं ॥१८८॥
परी कानीं येतां । स्वभावतां स्तुति । उपजते प्रीति । अंतरांत ॥१८९॥
स्पर्श -विषयाचे । कोमल कठिण । ऐसे दोन्ही गुण । होती जे कां ॥१९०॥
त्वचेन्द्रिद्भारा । धनुर्धरा जाण । होती ते कारण । तोष -खेदां ॥१९१॥
एक तें सुंदर । एक तें अघोर । रुपाचे प्रकार । ऐसे दोन ॥१९२॥
ते चि जीवालागीं । धनंजया देख । देती सुख -दुःख । नेत्रद्वारा ॥१९३॥
जार्णे परिमळ । तो हि गा द्विविध । सुगंध दुर्गध । ऐशा भेदें ॥१९४॥
घ्राणेन्द्रियद्वारा । सुगंधे आनंद । दुर्गधें विषाद । वाटे चित्ता ॥१९५॥
गोड आणि कडू । द्विविध हा रस । तैसा प्रीति -त्रास । उपजवी ॥१९६॥
म्हणोनि अर्जुना । विषयांचा संग । दावी अधोमार्ग । जीवालागीं ॥१९७॥
शीतोष्णादि द्वन्द्वें । ह्या परी पावोनि । जाय तो गुंतोनि । सुखदुःखीं ॥१९८॥
विषयांवांचोनि । नाहीं दुजें गोड । ऐसी जन्मखोड । इंद्रियांची ॥१९९॥
आणि पाहूं जातां । विषय हे कैसे । जैसें का आभासे । मृगजळ ॥२००॥
दिसावा इंद्राचा । स्वप्नीं ऐरावत । तैसे नाशिवंत । सर्वथैव ॥२०१॥
म्हणोनियां ह्यांचा । नको धरुं संग । वेगें करीं त्याग । धनुर्धरा ॥२०२॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं घीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥१५॥
देखें विषयांच्या । नव्हे जो आधीन । सुख -दुःखांतून । सुटे तो चि ॥२०३॥
धनंजया तया । नाहीं गर्भवास । विषयांचा पाश । तुटे ज्याचा ॥२०४॥
तो चि तो तत्त्वतां । नित्यरुप पार्था । सहजें सर्वथा । ओळखावा ॥२०५॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥१६॥
आतां कांहीं एक । सांगेन तें ऐक । जें का सुज्ञ लोक । ओळखिती ॥२०६॥
विश्वीं सर्वगत । चैतन्य तें गुप्त । स्वीकारिती संत । तत्त्वज्ञ जे ॥२०७॥
मिसळलें जैसें । दूध आणि पाणी । काढी निवडोनि । राजहंस ॥२०८॥
किंवा अग्निमाजीं । घालोनि सुवर्ण । तज्ञ चोख हीण । निवदिती ॥२०९॥
बुद्धिचातुर्यानें । घुसळितां दहीं । नवनीत पाहीं । दिसे अंतीं ॥२१०॥
भूस आणि बीज । एकत्रित जाण । परी पाखडून । घेतां जैसें ॥२११॥
बीज तें राहिलें । फोल तें उडालें । ऐसें कळों आलें । स्वभावें चि ॥२१२॥
तैसा सारासार । करितां विचार । सहजें संसार । निरसला ॥२१३॥
मग तत्त्वतां तें । एकलें चि एक । उरे तत्त्व देख । ज्ञानियांसी ॥२१४॥
चैतन्य उपाधि । दोहोंतील सार । तयांनीं साचार । ओळखिलें ॥२१५॥
म्हणोनि अनित्य । संसाराच्या ठायीं । तयांसी तों नाहीं । सत्यबुद्धि ॥२१६॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्स्यास्य न कश्वित्कर्तुमर्हति ॥१७॥
देखें सारासार । करितां विचार । भ्रांति ती साचार । असारता ॥२१७॥
उरे सार तें तों । स्वभावतां नित्य । त्रिवार हें सत्य । जाण पार्था ॥२१८॥
लोकत्रयाकार । जयाचा विस्तार । नसे त्या आकार । नाम वर्ण ॥२१९॥
ऐसा विलक्षण । सदा सर्वगत । जन्मक्ष्यातीत । असे जो का ॥२२०॥
धनंजया तया । आत्मयचा निभ्रांत । केलिया हि घात । होत नाहीं ॥२२१॥
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥१८॥
देहमात्र सर्व । विनाशी स्वभावें । म्हणोनि झुंजावें । अर्जुना तूं ॥२२२॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्वैन मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥
धरोनियां पार्था । देह -अभिमान । देह चि मानोन । आपणातें ॥२२३॥
मारिता मी तैसे । सर्व हे मरते । ऐसें भ्रांतचित्तें । बोलतोसी ॥२२४॥
न होती हे वध्य । साच पाहूं जातां । मारिता हि पार्था । न होसी तूं ॥२२५॥