श्लोक ४१ ते ४७
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः॥४१॥
मग सारासार । राहे ना विचार । कळे ना साचार । योग्यायोग्य ॥३९०॥
कर्तव्याकर्तव्य । ओळखे ना कांहीं । ऐसी दशा होई । पापें येणें ॥३९१॥
मालवोनि दीप । चालतां अंधारीं । उजू मार्ग तरी । लागे ठेंच ॥३९२॥
कुलक्षयीं तैसा । आद्यधर्म सरे । एकलें चि उरे । पाप मात्र ॥३९३॥
मग तेथें मन । राहे ना स्वाधीन । दशेंद्रियगण । स्वैर वागे ॥३९४॥
हीन पुरुषाशीं । घडोनि संगति । तेणें बिघडती । कुलस्त्रिया ॥३९५॥
ऐसे वर्णावर्ण । जातां मिसळोन । लोपती संपूर्ण । ज्ञातिधर्म ॥३९६॥
चव्हाटयावरील । भक्षावया अन्न । कावळे धांवोन । येती जैसे ॥३९७॥
तैसीं महा - पापें । संचरती कुळीं । लोपे जिये वेळीं । कुल - धर्म ॥३९८॥
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्यषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥
तया कुलघ्नांच्या । सर्वें त्या कुळास । सर्वा घडे वास । नरकींच ॥३९९॥
वंशांतील प्रजा । पावे अधोगति । पूर्वज भ्रष्टती । स्वर्गातील ॥४००॥
लोपतां तीं कर्मे । नित्य नैमित्तिक । अर्पी तिळोदक । कोणा कोण ॥४०१॥
कोठोनि तयांसी । मग स्वर्ग - वास । सवें नरकास । ते हि जाती ॥४०२॥
जरी सर्पे केला । नखाग्रातें दंश । वेगें चढें विष । सर्वागातें ॥४०३॥
तैसे सत्यलोका - । पासोनि सत्वर । सर्व हि पितर । भ्रष्ट होती ॥४०४॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्व शाश्वताः ॥४३॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥४५॥
ऐकें देवा आतां । आणिक हि एक । भीषण पातक । घडे येथें ॥४०५॥
कीं ह्या कुलघ्नांची । घडतां संगति । तेणें लोकरीती । नाश पावे ॥४०६॥
गृहीं एकाएकीं । उफाळला अग्नि । टाकितो जाळोनि । आणिकांसी ॥४०७।
तैसा कुलघ्नांचा । जयां सहवास । तयांचा हि नाश । होय तेणें ॥४०८॥
नाना दोषें व्याप्त । होतां चि तें कुळ । दारुण केवळ । नरक भोगी ॥४०९॥
मग कल्पांती हि । सुटे ना त्यांतून । एवढें पतन । कुल - क्षयीं ॥४१०॥
नाना परी आम्हीं । आलों हें ऐकत । उपजे ना खंत । अजूनि हि ॥४११॥
सांगें देवा आतां । येथें कैसें मन । करावें कठिण । वज्राऐसें ॥४१२॥
जयालागीं राज्य - । सुख अपेक्षावें । तें तरी स्वभावें । नाशिवंत ॥४१३॥
देवा जाणतां हि । ऐसे महादोष । आम्हीं कां निःशेष । त्यजावे ना ॥४१४॥
येथें हे सकळ । आपुले वडील । वधाया केवळ । पाहिले जे ॥४१५॥
हें चि काय थोडें । घडलें पातक । आतां निरर्थक । जगावें कां ॥४१६॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्टा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥४६॥
होवोनि निःशस्त्र । सुखें ह्यांचे बाण । करावे सहन । हें चि बरें ॥४१७॥
ऐशा परी मृत्यु । आला तरी चांग । परी नको संग । पापाचा ह्या ॥४१८॥
मग बोले पार्थ । देखोनि स्व - कुळ । राज्य तें केवळ । नरक - भोग ॥४१९॥
संजय उवाच ---
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्रमानसः ॥४७॥
इति श्रीमद्धगवद्धीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम
प्रथमोऽध्यायः ॥१॥
ऐकें राया रणीं । बोलिला जें पार्थ । तें चि तुज येथ । सांगितलें ॥४२०॥
मग तो अर्जुन । खिन्न झाला फार । आला गहिंवर । आवरे ना ॥४२१॥
रथांतूनि तेव्हां । उतरोनि खालीं । दुःखें अश्रु गाळी । ढळढळां ॥४२२॥
जैसा राजपुत्र । होतां पदच्युत । कोणी ना ठेवित । मान त्याचा ॥४२३॥
नातरी राहूनें । टाकितां ग्रासून । दिसे प्रभाहीन । भानु जैसा ॥४२४॥
किंवा सिद्धीलागीं । भुलोनि तापसी कामनेच्या फांसी । दीन होय ॥४२५॥
तैसा दुःखभारें । जाहला जर्जर । रणांगणीं वीर । धनंजय ॥४२६॥
मग धनुर्बाण । ठेवोनि परते । बैसोनियां तेथें । अश्रु ढाळी ॥४२७॥
ऐशा परी रणीं । घडलें जें काय । रायासी संजय । तें चि सांगे ॥४२८॥
खिन्न अर्जुनासी । आतां कृष्णनाथ । कैसा परमार्थ । निरुपील ॥४२९॥
ती च कथा पुढें । ऐका अभिनव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥४३०॥
इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् अभंग - ज्ञानेश्वरी प्रथमोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।